हिजबुल्लाहवर हल्ला करून इस्रायल काय जुगार खेळतंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेरेमी बॉवेन
- Role, आंतरराष्ट्रीय संपादक, बीबीसी न्यूज
- Reporting from, जेरुसलेमहुन रिपोर्टिंग
(हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचा इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाहतील संघर्ष कसा आहे याचे विश्लेषण बीबीसीचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी बोवेन यांनी केले आहे. मूळ लेख 6 दिवसांपूर्वी बीबीसी न्यूजवर प्रकाशित करण्यात आला होता. सध्याच्या घडामोडी समजून घेण्यासाठी हे विश्लेषण मराठी वाचकांसाठी या ठिकाणी सादर करत आहोत.)
गेल्या वर्षभरापासून इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षानं जगाची झोप उडवली आहे. गाझातील हमास विरुद्ध युद्ध सुरू असताना इस्रायलनं आता लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर अत्यंत तीव्र हल्ले सुरू केले आहेत.
या हल्ल्यांना हिजबुल्लाह कसं प्रत्युत्तर देणार? यातून व्यापक युद्धाचा भडका उडणार का? की मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर तोडगा काढला जाईल? या प्रश्नांचा धांडोळा घेणारा हा लेख...
हिजबुल्लाहवर इस्रायल करत असलेल्या हल्ल्यांच्या प्रगतीनं इस्रायली नेते आनंदी आहेत. शस्त्रास्त्र असलेले पेजर आणि रेडिओ यांच्या स्फोटानं सुरू झालेली कारवाई आता इस्रायलकडून होत असलेल्या तीव्र आणि प्राणघातक अशा हवाई हल्ल्यांवर पोहोचली आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सोमवारी (23 सप्टेंबर) इस्रायलनं हिलबुल्लाहवर केलेल्या हवाई हल्ल्याचं कौतुक केलं.
"आजचा हल्ला हा एक मास्टरपीस होता...हिजबुल्लाहच्या स्थापनेपासूनचा हा त्यांच्यासाठी सर्वाधिक वाईट आठवडा होता. या हल्ल्याच्या परिणामांमधूनच ते दिसून येतं."
गॅलंट म्हणाले, हवाई हल्ल्यामुळे हिजबुल्लाहचे हजारो रॉकेट्स नष्ट झाले आहेत. या रॉकेटचा वापर त्यांनी इस्रायली नागरिकांना मारण्यासाठी केला असता.
या सर्व हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनचं म्हणणं आहे की इस्रायलनं त्यांच्या 550 हून अधिक नागरिकांची हत्या केली आहे. यात 50 मुलांचाही समावेश आहे.
2006 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह मध्ये महिनाभर चाललेल्या युद्धात लेबनॉनच्या जितक्या लोकांचा मृत्यू झाला होता त्याच्या जवळपास निम्म्याइतकी ही संख्या आहे. यावरून इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यांची तीव्रता लक्षात येते.
हिजबुल्लाहवर जोरदार हल्ला चढवण्यामागे इस्रायलचे काही डावपेच आहेत.
इस्रायलला वाटतं की या भीषण हल्ल्याद्वारे त्यांना हिजबुल्लाहवर दबाव आणता येईल. त्यांना हवं ते करण्यास हिजबुल्लाहला भाग पाडता येईल.
या आक्रमणातून हिजबुल्लाहचं इतकं भयंकर नुकसान करता येईल की ज्यातून हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह आणि त्यांचे सहकारी आणि इराण मधील त्यांच्या पाठीराख्यांना या गोष्टीची जाणीव होईल की इस्रायलला प्रतिकार करण्याची खूप जास्त किंमत मोजावी लागते आहे.
इस्रायलच्या राजकारण्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना विजयाची गरज आहे.
हमास विरुद्ध इस्रायलने पुकारलेल्या वर्षभराच्या युद्धानंतर गाझाला एकप्रकारचं दलदलीचं स्वरूप आलं आहे.
अजूनही हमासचे सदस्य इस्रायली सैनिकांना मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी, बोगदे किंवा पडक्या इमारतींमधून हल्ले करत असतात. त्याचबरोबर अजूनही त्यांनी इस्रायली लोक ओलीस ठेवले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासनं अचानक हल्ला चढवून इस्रायलला धक्का दिला होता.
अर्थात हमासपासून खूप मोठा आणि घातक परिणाम असलेला धोका आहे, असं इस्रायलला वाटत नाही. मात्र लेबनॉनची गोष्ट वेगळी आहे. 2006 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये भीषण युद्ध झालं होतं.
मात्र त्या युद्धात कोणाचाही विजय किंवा पराजय झाला नव्हता. तेव्हापासूनच इस्रायली संरक्षण दल (IDF) आणि मोसाद ही त्यांची गुप्तहेर संस्था हिजबुल्लाहविरुद्धच्या पुढील युद्धाची तयारी करत आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना वाटतं की सध्याचा हल्ला महत्त्वाचा आहे. सध्या हिजबुल्लाहकडे जे सामर्थ्य आहे त्याला हे आव्हान ठरू शकतं आणि त्यांची शक्ती कमी करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे असे नेतन्याहू यांना वाटते.
सीमेपलीकडून हिजबुल्लाहकडून जो इस्रायलवर रॉकेट्सचा जो मारा होतो तो नेतन्याहू यांना थांबवायचा आहे.
त्याचबरोबर इस्रायली लष्कराचं म्हणणं आहे की इस्रायल-लेबनॉन सीमेवरून हिजबुल्लाहला मागे ढकलणं आणि इस्रायला त्यांच्या सैन्यापासून जो धोका आहे तो कमी करणं हा आमचा उद्देश आहे.
म्हणजेच लेबनॉनमध्ये राहून हिजबुल्लाह इस्रायलला जे आव्हान देतं आहे, तिथून जे हल्ले चढवते आहे आणि यातून या भूप्रदेशात एकप्रकारचं शक्ती संतुलन निर्माण झालं आहे, ही सर्व परिस्थिती इस्रायलला त्यांच्या अनुकूल करायची आहे.
लेबनॉनमध्ये गाझा पट्टीची पुनरावृत्ती होणार का?
लेबनॉनमध्ये मागील आठवड्यात झालेल्या हल्ल्यांनी गेल्या वर्षीच्या गाझामधील युद्धाची आठवण पुन्हा करून दिली आहे.
यावेळी सुद्धा इस्रायलनं लेबनॉनमधील नागरिकांना हल्ला होणार असलेल्या भागातून निघून जाण्याचा धोक्याचा इशारा दिला होता. गाझा मधील नागरिकांना देखील त्यांनी असाच इशारा दिला होता.
हमासप्रमाणेच हिजबुल्लाह देखील नागरिकांचा वापर मानवी ढाल म्हणून करत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता.
इस्रायलचे विरोधक आणि टीकाकार म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनच्या नागरिकांना दिलेले इशारे खूपच अस्पष्ट स्वरूपाचे आहेत.
लेबनॉनच्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर त्या भागातून निघून जाण्यासाठी पुरेसा वेळ इस्रायलनं दिलेला नाही.
युद्धासाठीचे जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत त्यानुसार नागरिकांचं संरक्षण किंवा बचाव केला पाहिजे आणि लष्करी ताकदीचा अविवेकी, बेजबाबदार व चुकीचा वापर करता कामा नये.
हिजबुल्लाहनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांपैकी काही हल्ले नागरी वस्त्यांवर झाले आहेत. यातून नागरिकांच्या संरक्षणासंदर्भातील कायद्यांचं उल्लंघन झालं आहे.
हिजबुल्लाहनं इस्रायली लष्करावर देखील हल्ले केले आहे.
इस्रायल आणि अमेरिका, इंग्लंडसारख्या इस्रायलच्या महत्त्वाच्या पाश्चिमात्य मित्र-राष्ट्रांनी हिजबुल्लाहला एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
इस्रायलचं असं ठामपणे म्हणणं आहे की त्यांच्याकडं कायदे, नियमांचं पालन करणारं नैतिकता असणारं सैन्य आहे. मात्र गाझामध्ये इस्रायली सैन्यानं जी कारवाई केली त्याचा जगभरातून निषेध करण्यात आला.
सीमेवरील व्यापक युद्धाच्या ठिणगीमुळे दोन्ही बाजूंच्या अत्यंत टोकाच्या भूमिकांमधील दरी अधिक रुंदावेल आणि त्यातून या भूप्रदेशातील तणाव वाढत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
आता पेजर हल्ल्याचंच पाहा. इस्रायल म्हणतं आहे की हिजबुल्लाहच्या ज्या सदस्यांना पेजर देण्यात आले होते त्यांना निशाण्यावर ठेवून हा हल्ला करण्यात आला होता.
मात्र त्या पेजरमध्ये असणाऱ्या बॉम्बचा जेव्हा स्फोट होईल, तेव्हा ते नेमके कुठे असतील हे मात्र इस्रायलला माहित नव्हतं. त्यामुळे जेव्हा या पेजरचे स्फोट झाले तेव्हा घरात, दुकानांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिक आणि मुलं जखमी आणि ठार झाली.
काही आघाडीच्या वकिलांचं म्हणणं आहे की यातून सिद्ध होतं की सैनिक (हिजबुल्लाहचे सदस्य) आणि नागरिक यांच्यात फरक न करता इस्रायलकडून प्राणघातक हल्ले होत होते, हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षाला 1980च्या दशकात सुरूवात झाली. मात्र इस्रायल-लेबनॉन सीमेवरील या युद्धाला हमासनं 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केल्याच्या दुसऱ्या दिवशी सुरूवात झाली.
हमासला मदत करण्यासाठी हसन नसरल्लाह यांनी त्यांच्या माणसांना (हिजबुल्लाहच्या सदस्यांना) इस्रायलच्या सीमेवर मर्यादित स्वरूपात मात्र दररोज गोळीबार करण्याचे किंवा हल्ले करण्याचे आदेश दिले होते. ( हसन नसरल्लाह यांचा आता मृत्यू झाला आहे. हे आदेश त्यांनी मृत्यूपूर्वी दिले होते.)
तेव्हापासूनच इस्रायल-हिजबुल्लाह मधील युद्धाची सुरूवात झाली होती.
हिजबुल्लाहच्या या हल्ल्यांनी लेबनॉनच्या सीमेवरील इस्रायली सैन्याला जखडून ठेवलं होतं. त्यांच्या हालचालींना मर्यादा आल्या होत्या. त्याचबरोबर सीमेजवळील शहरांमधील जवळपास 60,000 इस्रायली लोकांना त्यांची घरं सोडावी लागली होती.
भूतकाळातील आक्रमणांचं सावट
इस्रायलमधील काही प्रसारमाध्यमांनी, लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यांची तुलना जून 1967 मध्ये इस्रायलनं इजिप्तवर केलेल्या अचानक हल्ल्याशी म्हणजे 'ऑपरेशन फोकस'शी केली आहे.
अरब-इस्रायल युद्धातील इस्रायलचा हा हल्ला जगप्रसिद्ध आहे. त्यावेळेस इजिप्तच्या हवाई दलाची लढाऊ विमानं त्यांच्या हवाई तळांवर रांगेत उभी असताना इस्रायलच्या हवाई दलानं अचानक मोठा हल्ला चढवला होता.
यात हल्ल्यात इजिप्तची लढाऊ विमानं मोठ्या प्रमाणात नष्ट झाली होती. या हल्ल्याचा धक्का आणि प्रभाव इतका जबरदस्त होता की त्यानंतर फक्त सहाच दिवसात इस्रालयलनं इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन या देशांचा पराभव केला होता.
या युद्धातील विजयानंतर इस्रायलनं पूर्व जेरुसलेम, गाझा पट्टी आणि गोलन टेकड्यासह वेस्ट बँक ताब्यात घेतलं होतं. यातूनच आज या भागात सुरू असलेल्या संघर्षाची मूळं पेरली गेली होती आणि आजचं स्वरुप त्याला प्राप्त झालं होतं.
मात्र ही काही चांगली तुलना नाही. लेबनॉन आणि हिजबुल्लाहविरोधातील युद्ध वेगळ्या स्वरुपाचं आहे. इस्रालयलनं हिजबुल्लाहवर जोरदार आणि भयंकर स्वरुपाचा हल्ला केला आहे.
मात्र असं असूनही अजूनपर्यंत हिजबुल्लाहची इस्रायलमध्ये हल्ला करण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती इस्रायलला संपवता आलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलची हिजबुल्लाह बरोबर याआधी झालेली युद्धं ही एकमेकांचं मर्यादित स्वरूपाचं नुकसान करणारी होती. ती फारशी व्यापक स्वरूपाची नव्हती. या युद्धांमध्ये दोन्ही बाजूंपैकी कोणालाच निर्णायक विजय मिळाला नव्हता.
सध्या सुरू असलेलं युद्ध देखील त्याच मार्गानं जाऊ शकतं. इस्रायल, त्यांच्या गुप्तचर यंत्रणा आणि सैन्यासाठी मात्र मागील आठवड्यातील ही आक्रमक कारवाई समाधानकारक होती.
इस्रायलनं हिजबुल्लाहवर चढवलेला हल्ला एका गृहितकावर अवलंबून आहे. तो म्हणजे जुगार. हा जुगार असा आहे की एक क्षण असा येईल की हिजबुल्लाह चिरडलं जाईल, ते सीमेवरून मागे हटतील आणि इस्रायलवर हल्ला करणं, गोळीबार करणं थांबवतील.
हिजबुल्लाहवर लक्ष ठेवून असलेल्या बहुतांश निरीक्षकांना, अभ्यासकांना मात्र वाटतं की यामुळे हिजबुल्लाह मागे हटणार नाही. ते इस्रायलवर हल्ला करणं थांबवणार नाहीत.
कारण इस्रायलबरोबरचा लढा किंवा संघर्ष हेच हिजबुल्लाहच्या अस्तित्वामागचं मुख्य कारण आहे.
जर हा संघर्षच थांबला की हिजबुल्लाहनं शस्त्रं टाकली तर मग हिजबुल्लाहच्या अस्तित्वाचं काय होणार? साहजिकच हिजबुल्लाहला याप्रकारे रोखता येईल असं अभ्यासकांना वाटत नाही.
याचा अर्थ एकीकडे पराभव स्वीकारण्यास नाखूष असलेला इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला माघार न घेणारी हिजबुल्लाह अशा स्थितीत इस्रायलला युद्धाची व्याप्ती आणखी वाढवावी लागेल.


जर हिजबुल्लाहनं इस्रायलवरील हल्ले सुरूच ठेवले आणि त्यामुळे उत्तर इस्रायलमधील नागरिकांना त्यांच्या घरी परतणं जर शक्य होत नसेल किंवा तिथे राहणं धोकादायक ठरत असेल तर अशा परिस्थितीत इस्रायलला हिजबुल्लाहवर जमिनीवरून देखील हल्ला चढवायचा की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल.
कारण इस्रायलच्या उत्तर भागातील नागरिकांना जर त्या भागातील शहरांमध्ये वास्तव्यं करायचं असेल तर हिजबुल्लाहकडून सीमेपलीकडून होणारे हल्ले थांबवावे लागतील.
त्यासाठी कदाचित इस्रायलच्या सैन्याला लेबनॉनच्या सीमेवरील जमिनीची एक पट्टी ताब्यात घ्यावी लागेल. जेणेकरून हिजबुल्लाहचे तळ मागे ढकलले जातील आणि त्या पट्टीमुळे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये एक बफर झोन (निर्मनुष्य सुरक्षित भाग) तयार होईल.
इस्रायलनं याआधी देखील लेबनॉनवर आक्रमण केलं आहे.
1982 मध्ये लेबनॉनमध्ये शरण घेतलेल्या पॅलेस्टिनींकडून इस्रायलवर होत असलेले हल्ले थांबवण्यासाठी इस्रायली सैन्यानं लेबनॉनच्या बैरुतपर्यंत मजल मारली होती.
इस्रायली सैन्याच्या लेबनीज ख्रिश्चन सहकाऱ्यांनी बैरुत मधील साब्रा आणि शतिला निर्वासित छावण्यांमध्ये असणाऱ्या पॅलिस्टिनी नागरिकांची हत्या केल्यानंतर इस्रायली सैन्यानं शहराच्या परिघावर ताबा मिळवला होता.
मात्र त्यांच्याच देशात आणि परदेशात याविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर इस्रायली सैन्याला अपमानास्पदरीत्या लेबनॉन मधून माघार घ्यावी लागली होती.

फोटो स्रोत, Reuters
1990 च्या दशकापर्यंत इस्रायलनं लेबनॉनच्या सीमेवरील मोठ्या भूभागावर कब्जा केलेला होता. आज इस्रायली सैन्यातील वरिष्ठ अधिकारी तेव्हा तरुण अधिकारी होते.
हे अधिकारी हिजबुल्लाहच्या विरोधातील अंतहीन चकमकी आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गोळीबाराविरोधात लढले होते.
इस्रायलला लेबनॉनमधून हाकलून लावण्यासाठी लढणारी हिजबुल्लाह तेव्हा अधिक मजबूत होत चालली होती.
एहुद बराक हे तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान होते. ते इस्रायलचे माजी सैन्यप्रमुख देखील होते.
बराक यांनी 2000 मध्ये लेबनॉनच्या सीमेवरील तथाकथित 'सुरक्षा क्षेत्रातून' माघार घेतली होती.
या धोरणामुळे आणि लेबनॉनचा भूभाग ताब्यात घेतल्यामुळे इस्रायल अधिक सुरक्षित होणार नाही आणि त्यातून होणाऱ्या संघर्षामुळे अनेक इस्रायली सैनिक मारले गेले, अशी बराक यांची भूमिका होती.
2006 मध्ये इस्रायल-हिजबुल्लाह जोरदार युद्ध झालं होतं. त्यावेळेस हिजबुल्लाहनं अतिशय तणावग्रस्त आणि प्रचंड सैन्य तेनात असलेल्या सीमेपलीकडे जाऊन इस्रायलवर छापा टाकला होता.
त्यामध्ये इस्रायली सैनिक मारले गेले आणि पकडले देखील गेले होते. मात्र यावर इस्रायलची काय प्रतिक्रिया असेल किंवा ते काय प्रत्युत्तर देतील याबाबतचा हिजबुल्लाहचा अंदाज चुकला होता. हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं युद्धाची मोठी आघाडी उघडली होती.
या युद्धानंतर हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह म्हणाले होते की या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्रायल काय करेल हे जर लक्षात आलं असतं तर मी इस्रायलवर छापे टाकण्यास परवानगी दिली नसती.
एहुद ऑलमर्ट हे इस्रायलचे पंतप्रधान होते. हिजबुल्लाहला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी युद्ध पुकारलं होतं.
आधी इस्रायलला वाटलं की होतं की त्यांच्या हवाई दलाच्या ताकदीवर ते लेबनॉनमधून इस्रायलमध्ये होणारे रॉकेट हल्ले थांबवू शकतील.
मात्र जेव्हा तसं झालं नाही तेव्हा इस्रायलकडून भूदल आणि रणगाडे पुन्हा एकदा सीमेवर आणण्यात आले. ते युद्ध म्हणजे लेबनॉनच्या नागरिकांसाठी मोठं अरिष्ट, संकट ठरलं होतं.
मात्र युद्धाच्या शेवटच्या दिवशी देखील हिजबुल्लाह इस्रायलमध्ये रॉकेटचा मारा करत होतं.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी लढताना इस्रायल समोरील आव्हानं
लेबनॉन मध्ये शिरून हिजबुल्लाहवर आक्रमण करणं हे गाझा मध्ये हमासशी लढण्यापेक्षा कितीतरी भयंकर आणि मोठं लष्करी आव्हान असेल हे इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांना माहिती आहे.
2006चं युद्ध संपल्यापासून हिजबुल्लाह देखील इस्रायलविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या योजना तयार करतं आहे.
इस्रायली सैन्य लेबनॉन मध्ये शिरल्यास तिथे त्यांच्याशी लढताना स्वत:च्याच मैदानात लढण्याचा फायदा हिजबुल्लाहला होणार आहे.
त्यातच इस्रायलच्या सीमेला लागून असणाऱ्या दक्षिण लेबनॉनमध्ये गनिमी युद्धाला अनुरुप असा खडकाळ, डोंगराळ प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे.
त्याचा हिजबुल्लाहला नक्कीच फायदा होईल. याआधी देखील या भूप्रदेशाचा फायदा घेत हिजबुल्लाहनं इस्रायली सैन्याला लढा दिला आहे.
इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे संपूर्ण गाझापट्टीवर इस्रायली सैन्याचं वर्चस्व असून देखील तिथले हमासचे सर्व बोगदे, छुपे तळ नष्ट करण्यात इस्रायली सैन्याला यश आलेलं नाही.
तिकडे इस्रायलला लागून असलेल्या दक्षिण लेबनॉनच्या सीमेवर हिजबुल्लाह 18 वर्षांपासून बोगदे आणि खडकात लपण्याच्या जागा तयार करतं आहे. त्याचबरोबर हिजबुल्लाहकडे इराणनं पुरवलेली शक्तिशाली शस्त्रास्त्र देखील आहेत.
गाझापट्टीला इस्रायलनं वेढा घातल्यानंतर हमासला होणाऱ्या शस्त्रास्त्र पुरवठ्यावर मर्यादा आल्या होत्या. साहजिकच हमासकडून इस्रायली सैन्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ले होणं शक्य नव्हतं.
मात्र हिजुबल्लाहच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. हिजबुल्लाहला सीरियाद्वारे जमिनीच्या मार्गानं इराण शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवू शकतो. त्यामुळे इस्रायली सैन्याशी लढताना हिजबुल्लाह शस्त्रांचा तसा तुटवडा भासणार नाही.
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक आणि इंटरनॅशनल स्टडीज हे वॉशिंग्टन डीसी मधील एक थिंक टँक आहे. त्यांच्या अंदाजानुसार, हिजबुल्लाहकडे जवळपास 30,000 सक्रीय लढवय्ये सदस्य आहेत आणि 20,000 राखीव लढवय्ये आहेत.
या सर्वांना चटकन हालचाल करणाऱ्या पायदळाच्या तुकड्यांच्या स्वरुपात प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्यातील अनेकांना सीरियातील असद राजवटीच्या समर्थनात लढण्याचा अनुभव देखील आहे.

या बातम्याही वाचा :

हिजबुल्लाहच्या लष्करी ताकदीबद्दलच्या अनेक अंदाजांनुसार, हिजबुल्लाहकडे साधारण 1,20,000 ते 2,00,000 क्षेपणास्त्रं आणि रॉकेट्स आहेत. यात काही दिशा न देता मारा करता येणाऱ्या शस्त्रांपासून ते इस्रायलच्या शहरांवर मारा करता येतील अशी लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रं देखील आहेत.
हिजबुल्लाह आपल्या या क्षमतेचा वापर करूनच इस्रायलला अनेकदा जेरीस आणत असतं. त्यामुळे लेबनॉनमध्ये जाऊन हिजबुल्लाहवर जमिनीवरून हल्ला करताना इस्रायलला ही क्षमता लक्षात घेऊनच हल्ला चढवावा लागणार आहे.
थोडक्यात गाझामध्ये हमासवर हल्ला करण्याइतकं ते सोपं नाही.
अर्थात इस्रायली सैन्यादेखील याची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच हिजबुल्लाहची ही ताकद कमी करण्यासाठीच इस्रायलनं भयंकर हवाई हल्ले केले आहेत.
अर्थात हिजबुल्लाहविरोधात आक्रमक झालेलं इस्रायल यात कदाचित जुगार देखील खेळत असण्याची शक्यता आहे.
इस्रायली हवाई दलानं ज्या प्रकारे गाझामध्ये बाँब टाकून गाझा पट्टीतील सर्व शहरं जमीनदोस्त केली आणि त्यांचं रूपांतर काँक्रिटच्या ढिगाऱ्यात केलं.
त्याप्रमाणे आपण जर इस्रायलवर सर्व शक्तीनिशी हल्ला चढवला तर लेबनॉनची देखील इस्रायली हवाई दल तीच स्थिती करून टाकेल.
सर्व शहरं बेचिराख होतील आणि हजारो नागरिक मारले जातील या भीतीनं कदाचित हिजबुल्लाह त्यांच्याकडील क्षेपणास्त्र, रॉकेट्स आणि सर्व शक्तीचा वापर करणार नाही, अशी इस्रायलची व्यूहरचना असू शकते.
त्याशिवाय हिजुबल्लाहनं इस्रायलविरुद्धच्या सध्याच्या युद्धात सर्व शस्त्रास्त्रांचा वापर न करता त्यातील बरीचशी शस्त्रास्त्रं राखीव ठेवावीत अशीच कदाचित इराणची देखील इच्छा असेल.
कारण समजा जर इस्रायलनं इराणच्या अणुभट्ट्यांवर आणि इतर आण्विक सुविधांवर जर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देताना इराण हिजबुल्लाहकडील क्षेपणास्त्रांचा आणि रॉकेट्सचा जोरदार मारा इस्रायल करू शकेल.
एकप्रकारे इस्रायल वरचा हा दबाव असणार आहे.
इराणच्या बाजूनं खेळला जाणारा हा आणखी एक जुगार आहे. अर्थात इस्रायलच्या हल्ल्यांची तीव्रता लक्षात घेऊन इस्रायलनं सर्व शस्त्रास्त्रं नष्ट करण्यापूर्वीच हिजबुल्लाह त्यांचा वापर करण्याचा देखील निर्णय घेऊ शकतं.
गाझामध्ये हमासविरुद्ध युद्ध असताना आणि ताब्यात असणाऱ्या वेस्ट बँकमधील हिंसाचार वाढत असताना, इस्रायलने जर लेबनॉनवर आक्रमण केलं तर त्यांना तिसऱ्या आघाडीवर देखील लढावं लागेल.
इस्रायलच्या सैनिकांचं मनोधैर्य चांगलं आहे, त्यांना उत्तम प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि ते उत्तम शस्त्रांनी सुसज्ज आहेत.
इस्रायलला व्यापक स्वरूपात युद्ध करण्याची शक्ती त्यांच्या सैन्याच्या राखीव तुकड्यांमधून मिळते.
मात्र मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धाचा ताण त्यांच्या सैन्याच्या राखीव तुकड्यांवर आधीच पडतो आहे.
त्यामुळे लेबनॉनमध्ये सैन्य घुसवून हिजबुल्लाह विरोधात युद्धाची व्याप्ती वाढवताना इस्रायललादेखील विचार करावा लागणार आहे.
द्विपक्षीय संबंधातील अडचणी
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इस्रायलच्या मित्रराष्ट्रांना देखील इस्रायलनं हिजबुल्लाह विरोधात युद्धाची व्याप्ती वाढवावी असं वाटत नव्हतं.
इस्रायलनं लेबनॉनवर आक्रमण करू नये असंच त्यांना वाटतं.
या देशांना असं वाटतं की, मुत्सद्देगिरीच्या जोरावरच सीमा सुरक्षित करता येतील आणि दोन्ही बाजूच्या नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षितरित्या परतता येईल.
यासाठी अमेरिकेच्या राजदूतानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा ठराव 1701 वर आधारित एक करार तयार केला आहे.
2006 चं इस्रायल-हिजबुल्लाह युद्ध याच आधारे थांबलं होतं.
मात्र जोपर्यंत गाझामध्ये युद्धविराम होत शांतता निर्माण होत नाही तोपर्यंत राजनयिक अधिकारी किंवा राजदूतांना काहीही करता येणार नाही.
हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांनी स्पष्ट केलं आहे की गाझामधील युद्ध संपल्यानंतरच हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ले करणं थांबवेल. सध्याची परिस्थिती मात्र गुंतागुंतीची आहे.
कारण इस्रायल आणि हमास देखील सद्यपरिस्थितीत गाझामध्ये युद्धविरामाचा करार होण्यासाठी आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात इस्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी माघार घेण्यास किंवा मवाळ होण्यास तयार नाहीत.
इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अनेकदा वाटाघाटी झाल्या आहेत, अनेक प्रयत्न झाले आहेत.
मात्र त्यातून फारसं काही निष्पन्न झालेलं नाही. किंबहुना दिवसेंदिवस परिस्थिती आणखीच चिघळत चालली आहे.
इस्रायली हवाई दल लेबनॉन मध्ये भयंकर बॉम्बहल्ले करत आहे.
त्यामुळे आधीच संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेत स्वत:चा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लेबनॉनमधील नागरिकांना प्रचंड संकटाला आणि अनिश्चिततेला तोंड द्यावं लागतं आहे.
लेबनॉनच्या नागरिकांमध्ये इस्रायली हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे.
दुसऱ्या बाजूला इस्रायलला या गोष्टीची जाणीव आहे की मागील वर्षाच्या तुलनेत हिजबुल्लाह त्यांचं अधिक जास्त नुकसान करू शकते.
इस्रायलला असं वाटतं आहे की हिजबुल्लाहला त्यांच्या सीमेवरून दूर ढकलून देण्यासाठी आक्रमक आणि साहसी होण्याची हीच वेळ आहे. मात्र हिजबुल्लाह म्हणजे हमास नाही. हिजबुल्लाहसारखा एक जिद्दी, सुसज्ज आणि संतापलेला शत्रू इस्रायलसमोर उभा आहे.
हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यापासून गाझापट्टीत युद्ध सुरू आहे. या वर्षभराच्या युद्धातील ही सर्वात धोकादायक स्थिती आहे. मागील वर्षभरात या प्रदेशात निर्माण झालेलं हे सर्वात मोठं संकट आहे.
मात्र, दुर्दैवानं या क्षणाला ही परिस्थिती आणखी गंभीर आणि भीषण होत जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. इस्रायल, हिजबुल्लाह आणि हमास यांच्या आक्रमक भूमिकांमुळे या भूप्रदेशावर प्रचंड अनिश्चितता आणि भीषण युद्धाचं सावट दाटलेलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











