मोसाद : ऑपरेशन फिनाले ते रॅथ ऑफ गॉड, इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेची टॉप-5 ऑपरेशन

फोटो स्रोत, BBC/PUNEET KUMAR
- Author, नितिन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
18 जून 2023 रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे खलिस्तान समर्थक नेते हरदीपसिंग निज्जर यांची हत्या करण्यात आली.
यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमागे भारतीय एजन्सी असण्याची शक्यता व्यक्त केली होती.
भारतानं कॅनडाचे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं. शिवाय, या हत्येत कोणतीही नसल्याचं म्हटलं. मात्र, एखाद्या देशावर दुसऱ्या देशात गुप्तचर कारवाई केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
अमेरिका, रशिया, इस्रायल, चीन आणि ब्रिटन यांसारख्या देशांवर यापूर्वीही अनेकदा असे आरोप झाले आहेत.
भारत आणि पाकिस्ताननं अनेकदा एकमेकांवर गुप्तचर मोहिमेअंतर्गत विविध कारवाया केल्याचा आरोपही केला आहे.
अशा मिशनबद्दल जर आपण बोलत आहोत आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचा उल्लेख होणार नाही, हे शक्यच नाही. चला तर मग वाचूया मोसादनं केलेल्या 5 प्रमुख मोहिमांबद्दल :
1960 सालचं ऑपरेशन फिनाले
1957 मध्ये हेस या पश्चिम जर्मन राज्याचे मुख्य सरकारी वकील आणि ज्यू वंशाचे जर्मन नागरिक फ्रिट्झ बॉएर यांनी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादशी संपर्क साधला आणि त्यांना माहिती दिली की अॅडॉल्फ आइकमन जिवंत आहे आणि अर्जेंटिनामधील गुप्त ठिकाणी तो राहत आहे.
लेफ्टनंट कर्नल अॅडॉल्फ आइकमन हा अॅडॉल्फ हिटलरच्या कुप्रसिद्ध राज्य गुप्त पोलिस 'गेस्टापो'मध्ये 'ज्यू डिपार्टमेंट'चा प्रमुख होता. त्याच्या कार्यकाळात 'फायनल सोल्युशन' नावाचा अत्यंत अत्याचारी कार्यक्रम सुरू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
या कार्यक्रमांतर्गत, जर्मनी आणि आसपासच्या देशांमध्ये राहणाऱ्या हजारो ज्यू नागरिकांना त्यांच्या घरातून छळछावणीत नेण्यात आलं आणि त्यांची क्रमाक्रमानं हत्या करण्यात आली.
ज्याला होलोकॉस्ट म्हणून ओळखले जातं, होलोकॉस्ट म्हणजे 1933 ते 1945 दरम्यान नाझी जर्मन राजवटी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी युरोपमधील सुमारे 40 लाख युरोपियन ज्यूंचा पद्धतशीर, राज्य-प्रायोजित छळ आणि हत्या होती.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराभवानंतर अॅडॉल्फ आइकमन याला तीनवेळा पकडण्यात आलं पण प्रत्येक वेळी तो अटकेपासून बचावला. फ्रिट्झ बॉएर यांना इचमॅनच्या अर्जेंटिनामध्ये राहण्याची बातमी तिथं राहणाऱ्या एका ज्यूकडून मिळाली, ज्याची मुलगी आणि आइकमनच्या मुलाचे प्रेमसंबंध होते.
इस्त्रायली गुप्तचर संस्थेनं सुरुवातीला ही माहिती फारशी गांभीर्यानं घेतली नव्हती. पण नंतर त्यांच्या पद्धतीनं तपास केल्यानंतर ती खरी असल्याचं त्यांना दिसून आलं.
'द कॅप्चर अँड ट्रायल ऑफ अॅडॉल्फ आइकमन' या शीर्षकाच्या पुस्तकात चार्ल्स रिव्हर्स लिहितात, “आइकमन हा लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी होता, पण नाझी जर्मनीमध्ये त्याचा दर्जा हा जनरलपेक्षा कमी नव्हता. या काळात तो थेट हिटलरच्या कोअर टीमला रिपोर्ट करत असे.
आइकमनच्या अर्जेंटिनामध्ये लपल्याच्या वृत्ताची पुष्टी झाल्यानंतर, इस्रायलच्या मोसादच्या प्रमुखानं रफी ऐतान यांना त्या मिशनचे कमांडर म्हणून नियुक्त केलं ज्या अंतर्गत एजंट त्याला जिवंत पकडण्याचा आणि इस्रायलमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करतील.
मोसाद टीमनं ब्युनोस आयर्समध्ये एक घर भाड्यानं घेतलं, ज्याला 'कासेल' हे सांकेतिक नाव देण्यात आलं. दरम्यान, असं कळलं की अर्जेंटिना 20 मे रोजी आपल्या स्वातंत्र्याचा 150 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे.
शिक्षणमंत्री अब्बा इबन यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलही अर्जेंटिनाला शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय झाला. ते घेऊन जाण्यासाठी इस्रायली एअरलाइन्स ‘एल-अल’ नं 'व्हिस्परिंग जायंट' हे विशेष विमान दिलं.
इस्रायलच्या शिक्षणमंत्र्यांना न कळवता आइकमन याचं अपहरण करून त्याला याच विमानातून इस्रायलला आणण्याची योजना होती.
आइकमन हा रोज संध्याकाळी 7.40 वाजता बस क्रमांक 203 ने घरी परतायचा आणि त्याच्या घरी जाण्यासाठी थोडं अंतर चालायचा.
या कारवाईत दोन कार सहभागी होतील आणि एका कारमध्ये त्याचं अपहरण होईल, अशी योजना होती. बसमधून उतरताना इचमॅनला पकडण्यात आलं.
20 मे च्या रात्री आइकमन याला इस्रायली एअरलाइन्सच्या कर्मचार्यासारखे कपडे घातले होते. झीव झिक्रोनीच्या नावानं त्याच्या खिशात खोटं ओळखपत्र ठेवलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं विमान इस्रायलच्या तेल अवीव शहरात उतरलं.
त्याला इस्रायलमध्ये आणल्यानंतर दोन दिवसांनी ही बातमी जगासमोर ठेवण्यात आली. महिनाभर चाललेल्या खटल्यात 15 प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड
1972 साल होतं आणि जर्मनीत म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत्या. 5 सप्टेंबरच्या रात्री म्युनिक ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये इस्रायली खेळाडू त्यांच्या फ्लॅटमध्ये झोपले असताना अचानक संपूर्ण अपार्टमेंटमध्ये मशीनगनचा आवाज गुंजला.
पॅलेस्टिनी 'ब्लॅक सप्टेंबर लिबरेशन ऑर्गनायझेशन' चे आठ सदस्य , खेळाडूंच्या वेशात, अपार्टमेंटमध्ये घुसले आणि अंदाधुंद गोळीबार केला.
यात 11 इस्रायली खेळाडू आणि एक जर्मन पोलीस ठार झाला.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी, इस्रायलनं सीरिया आणि लेबनॉनमधील 10 पीएलओ (पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन) तळांवर बॉम्बफेक करून ते नष्ट केले. अनेक वर्षानंतर प्रसिद्ध झालेल्या इस्रायलच्या संसदीय समितीच्या अहवालात इस्रायलनं त्यावेळी काय योजना आखल्या होत्या याचा उल्लेख केला आहे.
अहवालानुसार, “पंतप्रधान गोल्डा मेअर यांनी एक्स ‘समिती’ स्थापन केली होती मोसादचे तत्कालीन प्रमुख झवी झमीर हे काउंटर ऑपरेशनचे प्रभारी होते.
सायमन रीव्ह यांच्या 'वन डे इन सप्टेंबर' या पुस्तकात इस्रायलनं या ऑपरेशनच्या तयारीसाठी बराच वेळ घेतला याचा उल्लेख आहे, जेणेकरून जगाच्या कोणत्याही भागात लपून बसलेल्या म्युनिक हल्लेखोरांना शोधता येईल.
सायमन रीव्ह लिहितात, "16 ऑक्टोबर 1972 रोजी एजंटनी पीएलओ इटलीचे प्रतिनिधी अब्देल-वेल झावैतार यांना रोममधील त्यांच्या घरी गोळ्या घातल्या, ही दीर्घकाळ चाललेल्या इस्रायली बदल्याची सुरुवात होती."
त्यानंतर, 9 एप्रिल, 1973 रोजी, मोसादनं बेरूतमध्ये एक संयुक्त ऑपरेशन सुरू केलं, ज्यामध्ये इस्रायली कमांडो रात्रीच्या वेळी क्षेपणास्त्र नौका आणि गस्ती नौकांमधून रिकाम्या लेबनॉनच्या समुद्रकिनाऱ्यावर आले.
दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, 'ब्लॅक सप्टेंबर लिबरेशन ऑर्गनायझेशन' चालवणाऱ्या 'फतह'च्या गुप्तचर शाखेचे प्रमुख मोहम्मद युसूफ किंवा अबू-युसूफ, कमल अदवान आणि पीएलओचे प्रवक्ते कमल नासेर मरण पावले.
काही तज्ज्ञांचं असेही मत आहे की इस्रायलनं पुढील पाच वर्षे ही कारवाई सुरू ठेवली.
सीरियावर मोसादची पकड (1962-65)
सीरिया आणि इस्रायलमधील संबंध 1960 च्या दशकात खराब होते. इस्रायलच्या उत्तर सीमेवर राहणाऱ्या समुदायांना गोलान हाइट्सवरील सीरियन लष्कराकडून वारंवार धमक्या येत होत्या, ज्यामुळं इस्रायलमध्ये अस्वस्थता वाढत होती.
सीरियामध्ये इस्रायलच्या विरोधात बनवल्या जात असलेल्या गुप्तचर राजकीय आणि लष्करी योजना शोधण्यासाठी आणि योग्य बातम्या काढण्यासाठी सीरियामध्ये एजंटची आवश्यकता होती. त्याला या कामासाठी एली कोहेन नावाचा एक व्यक्ती सापडला.

फोटो स्रोत, Getty Images
एली कोहेन यांचा जन्म इजिप्तमध्ये झाला होता आणि ते सीरियन वंशाच्या ज्यूंचा मुलगा होते, एली यांनी यापूर्वी इस्रायली गुप्तचर संस्थेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु दोन्ही वेळा नाकारण्यात आला होतं.
मात्र, 1960 मध्ये मोसादनं एली कोहेन यांना गुप्तहेर म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सीरियात जाऊन हेरगिरी करण्याचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
यानंतर, एली कोहेन यांना सीरियन पालकांच्या पोटी जन्मलेला एक यशस्वी व्यावसायिक म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करण्यासाठी अर्जेंटिनाला पाठवण्यात आलं.
तिथे ते सीरियन स्थलांतरितांच्या अनेक संघटना आणि गटांमध्ये सामील झाले. मुत्सद्दी, राजकारणी आणि वरिष्ठ लष्करी अधिकार्यांशी मैत्री करण्याव्यतिरिक्त, त्यांनी एका व्यक्तीशीही मैत्री केली जे नंतर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
1962 मध्ये बाथ पार्टीनं सीरियामध्ये सरकार स्थापन केलं आणि कोहेन ही संधी शोधत होते.
अर्जेंटिनामधील त्याच्या संपर्काचा चांगला उपयोग करून, तो सीरियामध्ये राहत असताना अनेक उच्च अधिकाऱ्यांचे विश्वासू बनले.
'द मोसाद: सिक्स लँडमार्क मिशन्स' या पुस्तकात लेखक मार्क ई. वर्गो लिहितात, “एकेकाळी कोहेनला संरक्षण उपमंत्री पदाचे उमेदवारही मानले जात होते आणि ते दमास्कसमध्ये कोणत्याही प्रकारचा बिजनेस डील किंवा करार करू शकत होते.
हाच तो काळ होता जेव्हा सीरियन अधिकाऱ्यांना महागड्या भेटवस्तू आणि महागडी दारू देत असताना त्यांनी त्यांच्याकडून सर्व गुप्तचर माहिती गोळा केली आणि ती मोसादला दिली.
एली कोहेन यांनी 1964 मध्ये इस्रायल सरकारला माहिती दिली की सीरिया जॉर्डन नदीजवळ एक मोठा कालवा बांधून इस्रायलचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा विचार करत आहे.
मोसादनं ही माहिती सरकारला दिली आणि ताबडतोब इस्रायली विमानांनी हेवी वॉटर डायव्हर्जन उपकरणं आणि छावण्यांवर जोरदार बॉम्ब हल्ला करून योजना फसवली.
एली कोहेन यांनी सीरियन सरकारमध्ये अशी घुसखोरी केली होती की तो एकदा सीरियन-इस्त्रायली सीमेची पाहणी करण्यासाठी गेला होता, अनेक दिवस उच्च लष्करी अधिकाऱ्यांच्या शेजारी बसला होता.
सीमेवरील सुरक्षेचा संपूर्ण तपशील आणि लष्कराची खरी संख्या आणि शक्ती याची माहिती गुप्तपणे मोसादच्या हाती म्हणजेच इस्रायलपर्यंत पोहोचली.
गुप्तचर माहिती लीक झाल्यामुळं हताश झालेल्या सीरियाच्या गुप्तचरांनी मित्र राष्ट्र सोव्हिएत युनियनच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली.
1965 मध्ये, एली कोहेन यांना सीरियाच्या आणि सोव्हिएत अधिकाऱ्यांनी इस्रायलला गुप्तचर संदेश पाठवताना अत्यंत संवेदनशील तपास उपकरणं वापरताना पकडलं.
कोहेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि सीरियाची राजधानी दमास्कसच्या मध्यभागी फाशी देण्यात आली. कोहेन आजही इस्रायलमध्ये देशभक्त नायक म्हणून स्मरणात आहेत.
मिशन ईराण
इस्रायल आणि इराणमधील संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. विशेषतः इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत.
पण २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'मोसाद: द ग्रेटेस्ट मिशन्स ऑफ द इस्त्रायली सिक्रेट सर्व्हिस' या पुस्तकात इराणचा आण्विक कार्यक्रम थांबण्यासाठी इस्रायलच्या गुप्तचर प्रयत्नांचा उल्लेख तर आहेच पण या एजन्सीनं चित्रपटातील जेम्स बाँडप्रमाणेच वास्तविक जीवनात धोकादायक मोहिमा कशा केल्या हेही सांगण्यात आलंय.
या पुस्तकाचे लेखक, मायकेल बर-जोहर आणि निस्सीम मिशल यांच्या मते, “इराणला अण्वस्त्रं बनवण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलनं त्यांच्या सेंट्रीफ्यूजची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
यासाठी, मोसादनं पूर्व युरोपीय आघाडीच्या कंपन्या स्थापन केल्या, ज्यांनी इराणला दोषपूर्ण इन्सुलेशन विकलं. "त्यांच्या एकत्रित वापरामुळे, इराणचे नवीन सेंट्रीफ्यूज निरुपयोगी झाले."

फोटो स्रोत, Getty Images
'मोसाद: द ग्रेटेस्ट मिशन्स ऑफ द इस्त्रायली सिक्रेट सर्व्हिस' " असंही अहवाल देतं की जानेवारी 2010 मध्ये इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे सल्लागार "त्याच्या कारजवळ पार्क केलेल्या मोटरसायकलमध्ये लपवलेल्या स्फोटकाचा वापर करुन हत्या करण्यात आली ."
न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, “ 2011 मध्ये इराणच्या आण्विक प्रकल्पाचे प्रमुख त्यांच्या कारमधून कुठेतरी जात होते, तेव्हा त्यांच्याजवळून जाणार्या एका मोटरसायकलस्वारानं कारच्या मागील विंडशील्डवर एक छोटं उपकरण अडकवलं. "काही सेकंदांनंतर, उपकरणाचा स्फोट झाला, 45 वर्षीय अणुशास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी जखमी झाली."
फार पूर्वी नाही, 2021 मध्ये, इराणच्या आण्विक साइटवरील युरेनियम संवर्धन कार्यक्रमाला मोठा धक्का बसला जेव्हा एका प्रचंड स्फोटामुळे त्या जागेवरील वीज ठप्प झाली आणि युरेनियम साठवण्यासाठी वापरण्यात येणारे सेंट्रीफ्यूज बंद पडली.
तज्ज्ञांचं मत आहे की, "वीज तोडणं हे मोसादचे काम होतं, जरी त्यांनी कोणतीही अधिकृत जबाबदारी घेतली नाही. "
‘हमास’चा बदला घेतला
जवळपास वर्षभर चाललेल्या तपासानंतर पॅलेस्टिनी संघटना ‘हमास’नं इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर ट्युनिशिया मध्ये राहणाऱ्या आपल्या कमांडर मुहम्मद अल-झ्वारी यांची हत्या केल्याचा आरोप केला.
15 डिसेंबर 2016 रोजी मुहम्मद अल-झ्वारी यांना स्फॅक्स, ट्युनिशिया येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ चालत्या कारमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
झ्वारी हे एक व्यावसायिक एरोनॉटिकल अभियंता होते ज्यांनी हमास आणि हिजबुल्लाहसाठी विविध प्रकारचे ड्रोन तयार केले.

फोटो स्रोत, Getty Images
काही अपुष्ट अहवालानुसार, त्यानं एक मानवरहित नौदल जहाज देखील तयार केलं जे पाण्याखालील इतर जहाजांवर हल्ला करू शकते.
मारेकरी ओळखण्यासाठी कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही आणि जे काही सापडले ते मोबाइल फोनचे सिम आणि भाड्यानं घेतलेली कार होती जी तिसऱ्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती.
हमासच्या हायटेक शस्त्रास्त्र तज्ज्ञांची हत्या ही पूर्वीच्या ऑपरेशन्सपेक्षा वेगळी असल्याचं सांगण्यात आलं कारण मोसादनं केवळ हल्लेखोरांनाच नव्हे तर त्यांच्या पाठीमागील सपोर्ट सिस्टमला देखील लक्ष्य करणं सुरू केले होतं.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








