गाझा: जीव वाचवण्यासाठी ही चिमुकली मृतदेहांत लपून बसली, पण इस्रायली हल्ल्यात झाला मृत्यू

फोटो स्रोत, RAJAB FAMILY
- Author, लुसी विल्यमसन
- Role, बीबीसी प्रतिनिधी, जेरुसलेमहून
गेल्या महिन्यात गाझा शहरातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. त्यासोबतच तिच्या इतर नातेवाईकांचे मृतदेह देखील सापडले आहेत. जवळच मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखीन दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचे मृतदेहसुद्धा सापडले आहेत.
इस्रायली रणगाड्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
आपला जीव वाचवण्यासाठी हिंद रजब नावाची ही मुलगी तिच्या काका-काकूंसोबत गाझा शहरातून गाडीमधून पळून जात होती. त्यांच्यासोबत तिचे तीन चुलत भाऊदेखील गाडीमध्ये होते.
हिंद रजब आणि इमर्जन्सी कॉल ऑपरेटर यांच्यामधील संभाषणाच्या रेकॉर्डिंगवरून अशी माहिती मिळालेली की, गाडीमध्ये हिंद रजब एकटीच जिवंत होती. इस्रायली सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी ती आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहांमध्ये लपून बसली होती.
'कुणीतरी येऊन मला वाचवा,' अशी याचना ती फोनवर करत होती, परंतु अचानक गोळीबार झाल्याचा मोठा आवाज आला आणि संपर्क तुटला. त्यानंतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा हिंद रजबसोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
अनेक दिवसांनी मृतदेह सापडले
युद्ध सुरू असल्यामुळे या भागाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. शनिवारी (10 फेब्रुवारी) पॅलेस्टाईनमधील रेड क्रेसेंट सोसायटी (पीआरसीएस) चे आरोग्य कर्मचारी या भागात पोहोचण्यात यशस्वी ठरले होते.
हिंदचं कुटुंब प्रवास करत असलेली एक काळी किया गाडी त्यांना इथे सापडली. गाडीची विंडस्क्रीन आणि त्याच्या डॅशबोर्डवरील काच फुटून त्याचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. गाडीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा स्पष्टपणे दिसत होत्या.
एका आरोग्य कर्मचाऱ्याने पत्रकारांना सांगितलं की, गाडीमध्ये हिंद रजबसह सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. सर्वांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत.

या गाडीपासून काही अंतरावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आणखीन एक गाडी आढळून आली. या गाडीच्या इंजिनाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले होते.
ही रुग्णवाहिका हिंद रजबचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलेली, असं रेड क्रेसेंटचं म्हणणं आहे.
इस्रायली सैन्याच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या या रुग्णवाहिकेतून युसूफ अल-झेईनो आणि अहमद अल-मदहून प्रवास करत होते, असं संघटनेचं म्हणणं आहे.
पीआरसीएसचा आरोप
पीआरसीएसने एक निवेदन प्रसिद्ध करून इस्रायलवर रूग्णवाहिकेला जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा आरोप केलाय.
29 जानेवारी रोजी हिंदची गाडी असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचताच त्यावर बॉम्बहल्ला करण्यात आला, असं निवेदनात म्हटलं आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, "रेड क्रिसेंटने हिंद रजबला वाचवण्यासाठी या भागात रुग्णवाहिका पाठवण्याची आवश्यक परवानगी घेतली होती, परंतु या भागावर वर्चस्व प्रस्थापित इस्रायली सैन्याने जाणीवपूर्वक संस्थेच्या लोकांना लक्ष्य केलं.”

पीआरसीएसने बीबीसीला सांगितलं की, हिंद रजबच्या मदतीसाठी आरोग्य कर्मचारी पाठवण्यासाठी इस्रायली सैन्याकडून त्यांना परवानगी घेणं आवश्यक होतं आणि या प्रक्रियेसाठी अनेक तास लागले.
संस्थेचे प्रवक्ते निबल फरशाख यांनी मला एका आठवड्यापूर्वी सांगितलेलं की, "आम्ही त्यांच्यासोबत संपर्क साधला आणि आम्हाला त्यासाठी हिरवा कंदिल मिळाला आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यावर हिंद रजब ज्या गाडीमध्ये लपून बसली होती, ती त्यांना सापडल्याची खात्री आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.”
"त्यांना ती गाडी दिसत होती. गोळीबाराचा आवाज ही त्यांना ऐकू आलेली शेवटची गोष्ट होती."
कधीही न संपणारी प्रतीक्षा
रेड क्रेसेंटने हिंद रजबच्या ऑपरेटरशी झालेल्या संपूर्ण संभाषणाचं रेकॉर्डिंग सार्वजनिक केलंय आणि हिंद रजबसोबत नेमकं काय घडलं याबाबत शोधमोहीम सुरू केली आहे.
हिंद रजबची आई विसाम यांनी आम्हाला सांगितलं की, जोपर्यंत तिचा मृतदेह आम्हाला सापडला नव्हता तेव्हा आम्ही रात्रंदिवस तिची पाट पाहत होतो.
त्यांची मुलगी 'कोणत्याही क्षणी त्यांच्यासमोर येईल' अशी आशा त्यांना वाटत होती.
आता तिच्या मृत्यूनंतर याला कोण जबाबदार आहे हे शोधून काढायला हवं, अशी त्यांची मागणी आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
हिंद रजबच्या आईने बीबीसीला सांगितलं की, "ज्यांनी माझा आवाज ऐकला, मदतीची याचना करणा-या माझ्या मुलीचा आवाज ऐकला, परंतु तिला वाचवण्यासाठी काहीही केलं नाही, अशा सर्वांना तिच्या अंत्यविधीच्या दिवशी देवासमोर मी प्रश्न विचारणार आहे."
"नेतन्याहू, बायडेन आणि ते सर्वजण ज्यांनी आमच्या विरोधात, गाझा आणि तिथल्या लोकांच्या विरोधात हल्ल्यासाठी हातमिळवणी केली, त्यांना मी माझ्या अंतःकरणातून शाप देते.”
विसाम एका हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीच्या बातमीची वाट पाहत होत्या. हिंदला देण्यासाठी आणलेली एक गुलाबी रंगाची छोटी पिशवी त्यांच्या हातात होती. या पिशवीत एक वही होती ज्यामध्ये हिंद हस्ताक्षराचा सराव करत असे.
"अजून किती मातांनी या दुःखाचा सामना करावा याची वाट तुम्ही पाहात आहात? तुम्हाला अजून किती मुलं मारायची आहेत?” असं त्या विचारतात.
युद्धाच्या दरम्यानचे नियम
बीबीसीने दोन वेळा लष्कराला त्या दिवशीच्या लष्करी कारवाईची, हिंद बेपत्ता होण्याची आणि तिच्या शोधात गेलेल्या रुग्णवाहिकेबद्दल माहिती मागितली. याबाबत तपास सुरू असल्याचं लष्करानं सांगितलं.
शनिवारी (10 फेब्रुवारी) रेड क्रिसेंटने केलेल्या आरोपांबाबत विचारणा करण्यासाठीदेखील बीबीसीने लष्कराशी संपर्क साधला.
युद्धाचे नियम असं सांगतात की, युद्धाच्या वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना युद्धभूमीवर लक्ष्य केलं जात नाही, उलट त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जातं. युद्धभूमीवर जखमी झालेल्या लोकांपर्यंत शक्य होईल तितक्या लवकर आवश्यक वैद्यकीय मदत पोहोचवण्यात येते.
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा शहरावर भीषण हल्ले केले आहेत.
इस्रायलचं म्हणणं आहे की, हमासचे युद्धखोर रुग्णालयं, मदत शिबिरं आणि निवासी भागात बांधलेल्या बोगद्यांमध्ये लपून बसले आहेत.
शस्त्र आणि त्यांच्या युद्धखोरांनाची वाहतूक करण्यासाठी हमास रुग्णवाहिकांचा वापरत करत असल्याचा दावादेखील यापूर्वी इस्रायलने केला होता.
आपत्कालीन क्रमांकावर हिंद रजबसोबत संभाषण
हिंद रजबचं पीआरसीएसच्या राणा सकीह यांच्याशी मोबाईल फोनवर संभाषण झालेलं.
हिंद फोनवर म्हणाली होती, “माझ्या शेजारी एक रणगाडा आहे आणि तो हलतोय.”
राणाने विचारलं, “तो खूप जवळ आहे का?”
हिंद म्हणाली, "खूप जवळ आहे. मला खूप भीती वाटते. तू येऊन मला वाचवशील का?"
हिंदचं कुटुंब कुठे जायला निघालेलं?
इस्रायली सैन्याने 29 जानेवारी रोजी गाझा शहराच्या पश्चिमेला राहणाऱ्या लोकांना समुद्राच्या सीमेला लागून असलेल्या रस्त्याने दक्षिणेकडे जाण्यास सांगितलं.
हिंदचं कुटुंब गाझा शहरात होतं. कुटुंबाने निर्णय घेतला की, ते पूर्वेकडे जातील आणि अल्-अहली रुग्णालयात आश्रय घेतील. ही जागा त्यांच्यासाठी सुरक्षित असेल, अशी त्यांना आशा होती.
या भागात जोरदार गोळीबार सुरू होता, असं विसाम यांनी सांगितलं.
"आम्ही घाबरलो होतो, आम्हाला आमचा जीव वाचवायचा होता. हवाई हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आम्ही एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पळत होतो," असं त्या म्हणाल्या.
विसाम आणि त्यांची मोठी मुलं पायी चालत हॉस्पिटलच्या दिशेने निघाले.
त्या सांगतात, “कडाक्याची थंडी पडली होती आणि पाऊसही पडत होता. मी हिंदला तिच्या काकांच्या गाडीतून त्यांच्यासोबत जायला सांगितलं. मला असं वाटत होतं की, तिला पावसाचा त्रास होता कामा नये."
हिंद तिच्या काकांच्या किया पिकांटो गाडीमध्ये बसली. गाझा येथील प्रसिद्ध अल-अजहर विद्यापीठाच्या दिशेने गाडी जात होती, मात्र दुर्दैवाने गाडी इस्रायली रणगाड्यांसमोर आली.
मदतीची याचना
गाडीमध्ये बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणापासून 80 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या पीआरसीएसच्या आपत्कालीन मुख्यालयाशी संपर्क साधला.
काही वेळाने दुपारी अडीच वाजता पीआरसीएसने हिंदच्या काकांशी त्यांच्या फोनवर संपर्क साधला. 15 वर्षांच्या लेयानने फोन उचलला.
त्याने सांगितलं की त्याचे आई-वडील आणि भावंडांचा मृत्यू झालाय. लेयानने सांगितलं की, त्याच्या गाडीजवळ उभ्या असलेल्या एका रणगाडयातून त्यांच्यावर सतत “गोळीबार सुरू आहे”. बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाच्या दरम्यान एक मोठी किंकाळी ऐकू आली आणि फोन कट झाला.
काही वेळात टीमने पुन्हा फोन केला. यावेळी हिंदने फोन उचलला. सर्वप्रथम तिने सांगितलं की गाडीमधील सर्व लोकं मेली आहेत, फक्त ती जिवंत आहे. मग म्हणाली की, कदाचित सर्वजण "झोपले आहेत.”
टीमने हिंदला सांगितलं, "सर्वांना झोपू दे, त्यांना त्रास देऊ नकोस. तू गाडीच्या सीटच्या खाली लपून बस, कुणालाही दिसणार नाहीस असा प्रयत्न कर."
राणा सकीह हे हिंद रजबसोबत काही तास फोन लाइनवर होते, यादरम्यान रेड क्रिसेंटने त्यांच्या रुग्णवाहिकांना शहरात प्रवेश मिळावा यासाठी इस्रायली सैन्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
हिंद रजबला वाचवण्याची मोहीम

कॉल सुरू झाल्यानंतर तीन तासांनी हिंदच्या मदतीसाठी एक रुग्णवाहिका पाठवण्यात आली.
रेड क्रिसेंटने हिंदची आई विसाम यांच्याशीही संपर्क साधला आणि तिचा फोन चालू असलेल्या कॉलशी जोडला. आईचा आवाज ऐकून हिंद आणखी मोठमोठ्याने रडू लागली.
विसाम म्हणाल्या, "मी तिला विचारलं की तिला दुखापत झाली आहे का. मी कुराण वाचून तिचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. ती माझ्या प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत होती."
सायंकाळपर्यंत रुग्णवाहिका त्या भागात पोहोचली. प्रवेश देण्याआधी इस्रायली लष्कर रुग्णवाहिकेची तपासणी करणार होते.
यानंतर रुग्णवाहिका आणि हिंद या दोघांशी रेड क्रिसेंटचा संपर्क तोडण्यात आला, जेणेकरून हिंदला मदत करता येईल. मात्र, हिंदच्या आईसोबतच्या संभाषणाची फोन लाइन चालू होती.
हिंदचे आजोबा बहा हमादा म्हणाले की विसामने गाडीचा दरवाजा उघडल्याचं ऐकलं आणि हिंदने सांगितले की तिला रुग्णवाहिका दिसतेय.











