‘अंतहीन, शोकांतिका आणि पृथ्वीवरील नरक’ : शांततेसाठीची खरी किंमत सगळे मिळून मोजतील की...

इस्रायल-गाझा युद्ध

फोटो स्रोत, GETTY IMAGES

    • Author, जेरेमी बॉवेन
    • Role, आंतरराष्ट्रीय संपादक, जेरुसलेम

गाझा पट्टीमध्ये फक्त दिवस मावळेपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत जीव वाचणं हेदेखील एखाद्या चमत्कारासारखं वाटतं.

गाझामधली संयुक्त राष्ट्रांची मदत पुरवणारी संस्था UNRWA चे प्रमुख फिलिप लॅझरिनी यांनी याबाब लिहिलं की, "अंतहीन. प्रचंड शोकांतिका आणि हे पृथ्वीवरील नरक असून, पॅलिस्टिनी लोक सुरक्षेसाठी विनवण्या करत आहेत."

हमासनं बंदी बनवलेले पीडित आणि त्यांच्या कुटुंबांसाठीदेखील हे तेवढंच नरकासमान असेल. युद्ध हे अत्यंत क्रूर भट्टीसारखं असतं आणि त्यामुळं मानवाला प्रचंड यातना होतात.

पण यातून जी उष्णता निर्माण होते, त्यामुळं अशक्य वाटणारं परिवर्तन घडू शकतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपमध्ये तसं घडलं होतं. शेकडो वर्षं एकमेकांचा जीव घेणाऱ्या जुन्या शत्रूंनी शांततेचा मार्ग स्वीकारला होता.

आता गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळंदेखील इस्रायली आणि पॅलिस्टिनी यांच्यात भूमध्य सागर आणि जॉर्डन नदीवरून सुरू असलेलं अनेक शतकांचं शत्रुत्व कमी होऊ शकेल का?

मोहम्मद अबू शार यांची विधवा

मी दुःखात बुडालेल्या एका महिलेचा व्हीडिओ पाहत आहे. त्या पती मोहम्मद अबू शार यांच्या मृतदेहाजवळ बसलेल्या आहेत.

इस्रायल आणि इजिप्त पत्रकारांना गाझामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देत नसल्यानं, मला त्यांची भेट घेता आली नाही. मला त्यांचं नावही समजू शकलं नाही. त्यांचे मृत पती आणि मुलांच्या नावाबरोबर ते पोस्ट करण्यात आलं नव्हतं.

हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये 18,600 लोक मारले गेले आहेत.

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये 18,600 लोक मारले गेले आहेत.

व्हीडिओमध्ये असं वाटत आहे जणू, त्यांच्या दुःखाच्या शक्तीनं त्यांचे पती परत येणार आहेत.

"आपण एकत्र जगण्या मरण्याची शपथ घेतली होती. पण तुम्ही मला सोडून गेले. आता आम्ही काय करणार? मोहम्मद जागे व्हा! जागे व्हा, तुम्हाला ईश्वराची शपथ आहे. ईश्वरासाठी तरी जागे व्हा. आपली मुलं नूर आणि अबूदही इथं आहेत, जागे व्हा."

दोन्ही मुलंही त्यांच्या वडिलांबरोबर होती. कारण त्या तिघांना इस्रायलनं ठार केलं होतं. राफाहमध्ये त्यांना सुरक्षित वाटलेल्या ठिकाणावर हवाई हल्ला झाला आणि त्यात सगळं होत्याचं नव्हतं झालं.

योनातन झीगेन

मी योनातन झीगेन यांना त्यांच्या तेल अवीवमधील फ्लॅटमध्ये भेटलो. ते एक सुखवास्तू घर होतं, सगळीकडं मुलांची खेळणी होती. फॅमिली फोटोमध्ये मी त्यांच्या आई विवियन सिलव्हर यांना ओळखलं.

त्या पॅलिस्टिनींबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इस्रायलमधील आघाडीच्या स्वयंसेवक होत्या. हमासनं 7 ऑक्टोबरला हल्ला केला त्यावेळी विवियन गाझा जवळच्या सीमेवर किबुत्झ बीरी याठिकाणच्या त्यांच्या घरी होत्या.

किबुत्झमधील हल्ल्यानंतर मी पहिल्यांदाच योनातनला भेटत होतो. त्यांना आशा होती की, त्यांच्या आईला बंदी बनवून गाझाला नेलं असेल.

योनातन झीगेन (डावीकडे) त्यांच्या आई विवियन सिलव्हर सोबत

फोटो स्रोत, FAMILY HANDOUT

फोटो कॅप्शन, योनातन झीगेन (डावीकडे) त्यांच्या आई विवियन सिलव्हर सोबत

त्यांनी तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन ऐकले तेव्हा त्यांनी विवियन यांना फोन केला. त्यानंतर किबुत्झमद्ये गोळ्या आणि स्फोटांचे आवाज येऊ लागताच त्यांनी व्हाट्सअॅपचा वापर केला. कदाचित आवाज झाला नाही, तर हमास घराकडं दुर्लक्ष करून निघून जाईल, असं त्यांना वाटलं होतं.

त्यांनी केलेलं चॅटिंग मी वाचलं. सुरुवातीला काही विनोदी संभाषण होतं. पण काही अघटीत घटणार याची जाणीव होताच गंभीर आणि प्रचंड प्रेमाने भरलेला संवाद होता.

"तिनं लिहिलं होतं, ते घराच्या आत आहे. आता गंमत पुरे, निरोप घेण्याची वेळ आली आहे," असं योनातन म्हणाले.

"मी तिला मॅसेज केला, 'आय लव्ह यू, मम. माझ्याकडं शब्द नाहीत. मी तुझ्याबरोबर आहे'. पुढं तिनं लिहिलं, 'मी समजू शकते'. त्यानंतर काहीही नव्हतं, तो अखेरचा मॅसेज होता."

मला भीती वाटते की माझी आजी मरेल, असं विवियनच्या नातवंडांनी काढलेल्या चित्रात लिहिलं होतं.

फोटो स्रोत, OREN ROSENFELD

फोटो कॅप्शन, मला भीती वाटते की माझी आजी मरेल, असं विवियनच्या नातवंडांनी काढलेल्या चित्रात लिहिलं होतं.

दुसऱ्या दिवशी मी किबुत्झमधील आईच्या घरी गेलो, तर ते पूर्णपणे जळालेलं होतं. राखेच्या ढिगाऱ्यातून विवियन सिलव्हर यांचे शरिराचे अवशेष शोधण्यासाठी काही आठवड्यांचा काळ लागला. योनातन यांनी त्यांचं सपूर्ण करिअर शांतीच्या प्रसारासाठी वाहून दिलं.

"ते आमच्या देशात आले आणि माझ्या आईला ठार केलं. कारण आमच्यात शांतता नव्हती. त्यामुळं शांतीची गरज आहे, हा मुद्दा माझ्यासाठी सिद्ध होतो," असं ते म्हणाले.

"हे दोन्ही बाजुंनी असू शकतं. अशा प्रकारच्या आपत्तीमुळं समाजात आणि जगात बदल घडू शकतात. मला विश्वास आहे की, यातूनही चांगलं भवितव्य निर्माण होईल."

इस्सा अमरो

इस्सा अमरो हे वेस्ट बँकमधील हेब्रॉनमध्ये राहणारे पॅलिस्टियन कार्यकर्ते आहेत. मुस्लीम आणि यहुदी हे शहर पवित्र समजतात. पैगंबर अब्राहम यांना याठिकाणी दफन केलं आहे, अशी त्यांची मान्यता आहे. अनेक दशकांपासून हाच मुद्दा महत्त्वाचा राहिला आहे.

इस्सा यांना हेब्रॉनमध्ये अनेकजण ओळखतात. शहराच्या मध्यवस्तीतील यहुदी भागात राहणाऱ्या पॅलिस्टिनींवर कर्फ्यू लावणारे इस्रायली सैनिक त्यांना उपद्रवी समजतात.

7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आली, असं त्यांनी मला सांगितलं.

इस्सा अमरो

फोटो स्रोत, KATHY LONG/BBC

फोटो कॅप्शन, इस्सा अमरो

जसं योनातन झीगेन यांना युद्धामुळं इस्रायली आणि पॅलेस्टिनींसाठी चांगली संधी निर्माण होऊन चांगलं आणि सुरक्षित जीवन जगण्याची संधी त्यांना मिळू शकते, असं वाटलं तसंच इस्सा अमरो यांनाही वाटतं.

"मला वाटतं या दोन संधी आहेत. एकतर आपण याला परिस्थिती आणखी वाईट बनवण्याचा पर्याय निवडू किंवा एक संधी समजून जुना, ताब्याचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तसंच एकत्र राहण्याची शक्यता सत्यात उतरवण्याचाही प्रयत्न करू शकतो. कारण सुरक्षेचा मुद्दा अपयशी ठरला असून केवळ शांतता हाच पर्याय शिल्लक आहे."

शांतीच्या शक्यता

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अजून तरी हा लांबचा पल्ला वाटत आहे आणि ते घडण्यापूर्वी अनेक लोक मारलेही जातील. पण इतर प्रत्येक युद्धासारखं हे युद्धही थांबेल.

2007 मध्ये जेव्हा हमासनं गाझावर ताबा मिळवला तेव्हापासून याठिकाणी किंवा याच्या आसपास घडलेली सर्व युद्ध अशाचप्रकारे शस्त्रसंधीच्या माध्यमातून थांबली आहेत.

पण सर्व शस्त्रसंधींमध्ये एक घातक त्रुटी होती. ती म्हणजे त्यात हमास आणि इस्रायल यांच्यातील पुढील युद्धाची गॅरंटी होती. याचं कारण म्हणजे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शेकडो वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्याचे प्रयत्नच झाले नाहीत.

या युद्धात झालेल्या हत्या आणि विनाश एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की, पुन्हा सामान्य परिस्थिती निर्माण करता यावी याची शक्यताच नाही.

पण यावेळी हे नक्कीच वेगळं असायला हवं. इस्रायली आणि पॅलिस्टिनींबरोबरच यात महत्त्वाच्या असलेल्या इतर बाह्य शक्तींनीही हे स्वीकारलं आहे.

पण नेमकं कोणतं भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न करायचा यावर एकमत होणं, ही समस्या आहे. शस्त्रसंधीनंतर काय होईल, यावरून इस्रायल त्यांचा सर्वांत महत्त्वाचा मित्र राहिलेल्या अमेरिकेबरोबर एका राजनायिक वादाच्या दिशेनं पुढं जात आहे.

इस्सा अमरोने बीबीसीला सांगितलं की, 7 ऑक्टोबर रोजी जेव्हा त्याला IDF ने ताब्यात घेतले तेव्हा त्याचे हात इतके घट्ट बांधलेले होते की त्यामुळे त्याचे रक्ताभिसरण बंद झाले.

फोटो स्रोत, ISSA AMRO

फोटो कॅप्शन, इस्सा अमरोने बीबीसीला सांगितलं की, 7 ऑक्टोबर रोजी जेव्हा त्याला IDF ने ताब्यात घेतले तेव्हा त्याचे हात इतके घट्ट बांधलेले होते की त्यामुळे त्याचे रक्ताभिसरण बंद झाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलनं गाझावर केलेल्या बॉम्बहल्ल्यानं प्रचंड नाराज आहेत. पण तरीही ते लढाऊ विमान वाहक तैनात करून, प्रचंड शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून तसंच सुरक्षा परिषदेत शस्त्रसंधीच्या प्रस्तावात विटोचा वापर करून इस्रायलला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्धाच्या सुरुवातीपासून अमेरिकेनं असंच केलंय.

या मोबदल्यात इस्रायलनं पॅलिस्टिनींसाठी स्वतंत्र राज्य निर्मितीच्या चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेनं पावलं उचलावी, अशी बायडेन यांची इच्छा आहे. अनेक वर्षांच्या चर्चेनंतर अपयश आलेल्या ओस्लो शांतता प्रक्रियेचा हाच उद्देश होता.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासवर विजय मिळवल्याची घोषणा केल्यास ते गाझाचं प्रशासन कसं चालवतील, याबाबत फारसं काही बोलले नाही. पण त्यांनी बायडेन यांची योजना फेटाळून लावली आहे.

ओस्लो प्रक्रियेत स्वतंत्र पॅलेस्टियन प्रांतासाठी जो प्रयत्न करण्यात आला होता, त्याला नेतन्याहू यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत सातत्यानं विरोध केला आहे.

इस्रायलचा उद्देश हा पूर्ण विजय आणि हमासमधील जिवंत बचावलेल्या सर्वांची बिनशर्तन शरणागती हा आहे. हमासला संपवणं हाच बंदींना सोडवण्याचा एकमेव मार्ग असल्याचं, नेतन्याहू यांचं मत आहे.

The Bethlehem separation barrier

फोटो स्रोत, Fred Scott

फोटो कॅप्शन, बेथलहम शहरातील भींत

इस्रायलनं अंधाधुंद बॉम्बहल्ले केले असं बायडेन म्हणाले त्याच्या काही तासांपूर्वीच नेतन्याहू यांनी त्यांचं भाषण केलं होतं.

"मी इस्रायलला पुन्हा ओस्लो सारख्या चुकीची पुनरावृत्ती करू देणार नाही. आमच्या नागरिकांच्या आणि सैनिकांच्या बलिदानानंतर, जे दहशतवादाचं प्रशिक्षण देतात, दहशतवादाला पाठिंबा देतात आणि दहशतवादाला आर्थिक मदत देतात त्यांना मी गाझामध्ये प्रवेशाची परवानगी देणार नाही. गाझा हमास्तान किंवा फताहस्तानही होणार नाही," असं ते म्हणाले.

फताहस्तान हा हमासच्या प्रतिस्पर्धी पॅलिस्टिनी अथॉरिटीसाठी वापरला जाणारा एक अपमानास्पद शब्द आहे. ते इस्रायलला पाठिंबा देतात आणि सुरक्षेच्या मुद्दयावर त्यांना सहकार्य करतात.

इस्रायलचं अंतर्गत राजकारण नेतन्याहू यांच्या गणितांवर अवलंबून असतं. सर्वेक्षणांवरून असं समोर येत आहे की, हमासनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला. त्यासाठी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा यांच्या अपयशासाठी इस्रायलचे नागरिक नेतन्याहू यांना कारणीभूत ठरवू शकतात.

पॅलेस्टाईनला अस्तित्व देण्यास विरोध करून नेतन्याहू त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या यहुदी लोकांची मनं पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

शांतीसाठी प्रचार करणाऱ्या विवियन सिलव्हर यांचा मुलगा असलेले योनातन झीगेन म्हणाले की, त्यांच्या आईला युद्ध पाहून खूप दुःख झालं असतं. कारण युद्ध आणखी युद्धांना कारणीभूत ठरतं असं त्यांचं मत होतं.

"मला वाटतं, ती म्हणाली असती की आपण खूप भोळे नसू तर युद्ध हे एक साधन असायला हवं. पण असं वाटतं की, हे युद्ध बदला घेण्यासाठीचं एक कारण आहे."

हमासने 7 ऑक्टोबर रोजी 1200 लोक मारले आणि 240 लोकांना ओलिस बनवले होते, त्यात किबुत्झ बेरीचा समावेश होता.

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, हमासने 7 ऑक्टोबर रोजी 1200 लोक मारले आणि 240 लोकांना ओलिस बनवले होते, त्यात किबुत्झ बेरीचा समावेश होता.

इस्रायलच्या राजकीय अजेंड्यामध्ये शांततेचा मुद्दा पुन्हा समाविष्ट करण्याची यात संधी असल्याचं योनातन यांना वाटतं.

ओस्लो प्रक्रिया 2000 मध्ये अपयशी ठरली. त्यानंतर सशस्त्र पॅलिस्टिनी बंडखोर म्हणून बदनाम होईपर्यंत शांतीदूत किंवा शांती प्रचारक हे इस्रायलमध्ये अत्यंत महत्त्वाचे होते.

इस्रायलच्या मुख्य राजकारणातून पॅलेस्टाईनबरोबर शांततेता मुद्दा गायब झाला. पण आता योनातन यांना पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत.

"नक्कीच. तुम्ही हा शब्दही उच्चारू शकत नव्हते. पण आता लोक याबाबत बोलत आहेत."

हेब्रॉनमधले पॅलेस्टियन कार्यकर्ते इस्सा अमरो यांनी सांगितलं की, 7 ऑक्टोबरनंतर त्याठिकाणी पॅलिस्टिनी कार्यकर्त्यांसाठी जीवन अधिक कठिण बनलं आहे.

"परिस्थिती आणखी वाईट बनली आहे. दहापटीनं अधिक वाईट. अधिक निर्बंध, अधिक हिंसाचार, अधिक धमक्या. लोकांना जराही सुरक्षित वाटत नाही. लोकांना खायला पुरेसं अन्न नाही. त्यांना समाजात वावरता येत नाही. शाळा, काम काहीही सुरू नाही. प्रचंड निर्बंध असलेल्या भागांमध्ये ही एकप्रकारची सामूहिक शिक्षा आहे."

आम्ही इस्सा यांच्याबरोबर हेब्रॉनच्या केंद्रावरून जात होतो तेव्हा त्यांचा इस्रायलच्या सैनिकांबरोबर वाद झाला. त्यांच्यापैकी एका सैनिकानं कॉम्बॅट गीअर परिधान केला होता.

एकाकडं असॉल्ट रायफल आणि मोठं पिस्तुल होतं. काळ्या मास्कमध्ये फक्त डोळे दिसत होते.

इस्सा म्हणाले की, या वादावर लष्करी तोडगा शक्य नव्हता, त्यामुळं केवळ शांती हा एकच पर्याय आहे. वाद झाला त्यावेळी सैनिकानं नाव सांगितलं नाही.

हेब्रॉन या इस्रायलच्या नियंत्रित भागात पॅलेस्टिनींची पूर्वीची दुकाने.

फोटो स्रोत, KATHY LONG

फोटो कॅप्शन, हेब्रॉन या इस्रायलच्या नियंत्रित भागात पॅलेस्टिनींची पूर्वीची दुकाने.

"इस्रायलमध्ये अशा शेजाऱ्यांबरोबर वाढणं, कसं असतं हे तुम्हाला समजणार नाही. समलैंगिक अधिकार, महिलांना मारहाण हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यांना आवडत नसलेल्या एखाद्याबरोबर मुलीनं अफेअर केलं तर ते तिची हत्या करतात.

पॅलिस्टिनी हिंसक आहेत. मी त्यांना ओळखतो, मी त्यांच्याबरोबर राहतो. त्यांना शांतता नको आहे… ते माझा तिरस्कार करतात. तुम्हाला माहिती आहे की, मी हे अनुभवू शकतो. ते जे सांगत आहेत, ते सर्व मला माहिती आहे. मी त्यांच्याशी बोलत नाही," असं ते म्हणाले.

अमेरिका, ब्रिटन आणि अनेक देशांनी सुरक्षित इस्रायलबरोबरच स्वतंत्र पॅलिस्टिनी राज्य ही शांतीपूर्ण भवितव्याची संधी असल्याचं म्हटलं आहे. पण राजकीय इच्छाशक्ती आणि सातत्यानं या मुद्द्याचा द्विपक्षीय चर्चांमध्ये समावेश केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.

अमेरिकेनं मध्यस्थी करत सुरू केलेली शांततेची जुनी ओस्लो प्रक्रिया अपयशी ठरली.

पुन्हा असं काही झालं तर, वरिष्ठ पाश्चिमात्य राजदुतांनी सुचवलेली कल्पना महत्त्वाचा भाग ठरू शकते. ती म्हणजे पॅलिस्टिनी स्वातंत्र्याला मध्य पूर्वच्या बदलासंबंधीच्या पॅकेजचा महत्त्वाचा भाग बनवणं.

इस्रायलनं पॅलिस्टिनींच्या स्वातंत्र्यासाठी पुरेशा सवलती दिल्या तर, इस्रायलला सौदी अरेबियाबरोबर परस्पर सहकार्याची भेट दिली जाऊ शकते. इस्रायलबरोबर शांतता प्रस्थापित करणाऱ्या देशांमध्ये जॉर्डन आणि इजिप्त महत्त्वाचे भागीदार ठरू शकतात. तसंच प्रचंड श्रीमंत असलेले कतार आणि युनायटेड अरब अमिरात हेदेखील महत्त्वाचे असतील.

स्वतःला जागतिक पटलावर स्थान मिळवून देण्यासाठी ते शेकडो अब्ज डॉलर खर्च करत आहेत. त्यामुळं त्यांनाही आखाती देशांत शांतता हवी आहे.

त्यासाठीचं ब्लूप्रिंट आधीच तयार आहे. 20 वर्षांपूर्वी सौदी शांतता योजनेद्वारे इस्रायलला अरब राज्यांबरोबर पूर्ण सहकार्याशह शांततेची ऑफर दिली होती. त्या मोबदल्यात गाझा आणि वेस्ट बँकमध्ये स्वतंत्र पॅलेस्टियन राज्य आणि पूर्व जेरूसलेमला राजधानी बनवावं असं सांगण्यात आलं होतं.

ही योजना पुन्हा आणली जाऊ शकते. त्यात इस्रायल आणि काही अरब देशांदरम्यान अब्राहम कराराचा विस्तार केला जाऊ शकतो. पण त्यासाठी स्वतंत्र पॅलिस्टिनी राज्याची अट असू शकते.

ही एक महत्त्वाकांक्षी कल्पना आहे. ती या पूर्ण योजनेवर विश्वास असणाऱ्या नव्या इस्रायली आणि पॅलिस्टिनी नेत्यांशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

अमेरिका मध्यस्थी करू शकते. पण त्यांना सर्वांबरोबर समान वर्तन करावं लागेल, जे यापूर्वी पाहायला मिळालेलं नाही. दोन्ही बाजुंना काही कठोर निर्णय घेण्याची तयारी ठेवावी लागू शकते.

विशेषतः संबंधित भागांबाबत. शांतीसाठी धोका पत्करायला तयार असणाऱ्या लोकांना राजकीय वादळाचा सामना करावा लागू शकतो.

इस्रायलचे पंतप्रधान यित्झॅक राबीन यांनी 1995 मध्ये पॅलेस्टाईनबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी 1995 मध्ये एका यहुदी कट्टरतावाद्यांनं त्यांची हत्या केली होती.

तर मुस्लीम कट्टरतावाद्यांनी इजिप्तचे राष्ट्रपती अन्वर सादर यांची इस्रायलबरोबर शांतता स्थापित करण्याचा प्रयत्न केला म्हणून हत्या केली होती.

तसंच गाझामधील युद्ध लवकरातच लवकर संपवावं लागेल. जर ते वाढत गेलं तर, हताश पॅलिस्टिनी इजिप्तची सीमा तोडण्याचा प्रयत्न करू शकतात.

कारण इस्रायलच्या टँक जवळ येत असून इस्रायल आणि लेबनिस मिलिशिया गट हेजबोल्ला यांच्यात सध्या सीमेवर संघर्ष वाढला आहे. त्याचं पूर्णपणे युद्धात रुपांतर होऊ शकतं.

शांतता प्रस्थापित करण्याची संधी मिळण्यासाठी खूप काही योग्य होणं गरजेचं आहे. पण आधीच एवढं सगळं चुकीचं घडलं आहे की, कदाचित शांतता प्रस्थापित होणं, अशक्य ठरू शकतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)