'इस्रायलचे डोळे' ज्यांनी हमासकडून होणाऱ्या हल्ल्याचा इशारा दिला होता

इस्रायली महिला सैनिक
    • Author, अॅलिस कड्डी
    • Role, बीबीसी न्यूज, इस्रायल

गाझाच्या सीमेवरील इस्रायलचे डोळे म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. या तरुण महिला सीमेवर निरीक्षकाचं काम करतात आणि वेळोवेळी माहिती वरिष्ठांकडे पोहोचवतात. त्यांनी दिलेल्या माहितीची लष्कराला खूप मदत होते.

अनेक वर्षं तरुण महिला सैनिकांकडे हेच एकमेव काम होतं. त्यांना तासनतास निगराणीसाठीच्या तळांमध्ये बसून काही संशयास्पद तर घडत नाही, याचा शोध घ्यावा लागायचा.

हमासकडून 7 ऑक्टोबरला हल्ला झाला त्याच्या काही महिने आधी त्यांना याबाबत लक्षात यायला सुरुवात झाली होती. सरावासाठीची छापेमारी, बनावट कैदी बनवणं याबरोबरच सीमेपलीकडील शेतकऱ्यांचं वर्तनही काहीसं विचित्र होतं, यांचा अंदाज घेऊन या मुलींनी हा इशारा दिला होता.

नोआ (बदललेले नाव) सांगतात की, त्यांना जे काही दिसेल किंवा कळेल त्याची माहिती त्यांना उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांना द्यावी लागायची. त्याशिवाय त्या काहीही करू शकत नव्हत्या.

"आम्ही फक्त डोळे होतो," असं त्या म्हणतात.

हमास काही तरी मोठं करण्याची योजना आखत असल्याचं यापैकी काही जणींना स्पष्टपणे समजलं होतं. नोआ यांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, "एक असा फुगा होता जो लवकरच फुटणार होता."

बीबीसीनं या तरुण महिलांबरोबर चर्चा केली आहे. त्यात त्यांनी पाहिलेल्या संशयास्पद हालचाली, त्यांनी त्याबाबत दिलेली माहिती, सादर केलेले रिपोर्ट आणि त्यांना जाणवलेल्या इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या थंड प्रतिसादाबाबत माहिती घेतली.

7 ऑक्टोबरच्या काही महिने आधी महिलांनी सीमेवरील हालचालींची माहिती देण्यासाठी पाठवलले व्हाट्सअप मेसेजही आम्ही पाहिले.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांच्यापैकी काहींसाठी तर हा एक गंभीर असा जोक बनला होता. तो म्हणजे अटळ असलेल्या या हल्ल्याच्या वेळी ड्युटीवर त्यांच्यापैकी कोण असेल?

अशा प्रकारे इशारा देणाऱ्या या महिला एकट्या नव्हत्या. तर जसजशी माहिती आणि पुरावे समोर येत आहेत, तसतसा इस्रायलवरील राग, त्यांच्या थंड प्रतिसादाबद्दलचे प्रश्न हे वाढत चालले आहे.

ज्यांनी या हल्ल्यात त्यांच्या मुली गमावल्या अशा कुटुबीयांशीही बीबीसीनं चर्चा केली. तसंच या महिलांच्या माहितीवर थंड प्रतिसाद देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या (IDF)वर्तनाकडं गुप्तचर संस्थांचं अपयश म्हणून पाहणाऱ्या तज्ज्ञांशीही चर्चा केली.

"सध्या आम्ही हमास या दहशतवादी संघटनेकडून निर्माण झालेला धोका कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत," असं म्हणत IDF नं बीबीसीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला.

"त्या (लष्कर) गोष्टींचा संबंध एकमेकांशी लावला नाही, ही समस्या आहे," असं बॉर्डर युनिटच्या एका माजी कमांडरनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

त्यांनी तसं केलं असतं, तर हमास काहीतरी मोठं करण्याची तयारी करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं असतं असंही या कमांडर म्हणाल्या.

शाइ अशराम
फोटो कॅप्शन, शाइ अशराम

शाइ अशराम या 19 वर्षीय महिला सैनिक 7 ऑक्टोबरला ड्युटीवर असलेल्या सैनिकांमध्ये होत्या. कुटुंबीयांबरोबर फोनवर बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, "बेसमध्ये दहशतवादी आहेत आणि काहीतरी मोठी घटना घडणार आहे," त्या बोलत असताना मागून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकायला येत होते.

या हल्ल्यात पाळत ठेवणारे सुमारे डझनभर सैनिक मारले गेले. त्यांच्यापैकी शाइ एक होत्या. काही सैनिकांना बंदीही बनवण्यात आलं होतं.

हमासनं हल्ला करताच गाझाच्या सीमेपासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नाहल ओझच्या तळावर असलेल्या महिला सैनिकांनी एकमेकींना व्हाट्सअप ग्रुपवर निरोपाचे मेसेज करायला सुरुवात केली होती.

त्यावेळी ड्युटीवर नसलेल्या आणि घरी बसून मेसेज वाचणाऱ्या नोआ यांनीही तेव्हा सर्वकाही संपलं असंच वाटल्याचं सांगितलं. अनेक दिवसांपासून त्यांना भीती असलेला हल्ला खरंच होत होता.

या लष्करी तुकडीतील महिला सैनिक हिब्रूमध्ये तात्झपितानियोत म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचा बेस अशा ठिकाणी होता की, हमासचे सदस्य गाझामधून निघाल्यानंतर सर्वांत आधी त्याच ठिकाणी पोहोचले होते.

'सर्व नागरिकांचे संरक्षण हे आमचे काम'

या सर्व महिला सैनिक सीमेला लागून असलेल्या खोलीत बसून रोज अनेक तास कुंपणावर लावलेल्या हाय टेक कॅमेऱ्यात चित्रत झालेले फुटेज पाहत असतात. तसंच गाझावर फिरणाऱ्या मोठ्या बलूनचं निरीक्षण करत असतात.

यापैकी काही तुकड्या गाझाच्या सीमेवरील कुंपणाला लागून आहेत. तर इतर काही इस्रायलच्या सीमेवरील विविध ठिकाणी आहेत. या सर्व तुकड्यांमध्ये विशीच्या आतील तरुणींचा समावेश आहे. त्यांच्याकडे गनही नसतात.

फावल्या वेळेमध्ये या तरुणी डान्स शिकणं, एकत्र स्वयंपाक करणं आणि टीव्ही पाहणं अशा पद्धतीनं वेळ घालवत असतात. यापैकी अनेकींसाठी लष्करातील हा वेळ म्हणजे कुटुंबापासून पहिल्यांदाच लांब राहण्याचा क्षण आहे. त्यामुळं या तरुणींमध्ये आपसांत बहिणींसारखी नाती तयार होतात.

पण जबाबदाऱ्यांचं अगदी गांभीर्यानं पालन केल्याचं त्या सांगतात. "सर्व नागरिकांचं संरक्षण करणं हे आमचं काम आहे. आमचं काम खूप कठीण आहे. एकदा कामाला बसल्यानंतर आम्हाला हालायची किंवा अगदी डोळे हलवण्याचीही परवानगी नसते. कायम लक्ष केंद्रीत ठेवावं लागतं," असं नोआ म्हणाल्या.

आयडीएफनं प्रकाशित केलेल्या एका लेखामध्ये काही विशिष्ट गुप्तचर तुकड्यांबरोबर तात्झपितानियोत यांचा उल्लेख करत म्हटलं होतं की, त्यांना "शत्रूबाबत सर्वकाही माहिती असतं."

महिला निरीक्षकांना जेव्हा काही संशयास्पद आढळतं तेव्हा त्या कमांडला त्याची माहिती देतात आणि कंप्युटरमध्येही त्याची नोंद करतात त्यामुळं वरिष्ठांना त्याबाबत समजते.

गाझा-इस्रायल नकाशा

आयडीएफमधील निवृत्त मेजर जनरल आयटन डंगोत म्हणाले की, 'काहीतरी चुकीचं घडणार आहे हे समजण्यात तात्झपितानियोत यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांनी कमांडरच्या माध्यमातून जी चिंता व्यक्त केलेली असते ती पुढील साखळीमार्फत पुढं जाणं गरजेचं असतं. त्यामुळं नेमकी परिस्थिती समजू शकते.'

कोणत्याही प्रकारचा धोका लक्षात येण्यासाठी एखाद्या कोड्याचे काही क्लू असतात तशी ही माहिती कामाची ठरत असते.

हमासच्या हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरित्या एक वक्तव्य केलं होतं. हमासकडून निर्माण झालेला धोका नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले होते.

पण सीमेवर खूप काहीतरी चुकीचं घडत असल्याचे अनेक संकेत मिळत होते.

सप्टेंबरच्या अखेरीस नाहल ओझमधील एका निरीक्षक महिलेनं व्हाट्सअप ग्रुपमध्ये लिहिलं होतं की, "आणखी काही घटना घडणार आहे का?"

लगेचच त्यावर एक रिप्लाय आला, "तू आहेस कुठे? दोन आठवड्यांपासून आपल्याकडे रोज एक घटना घडतेय."

ज्या लूक आऊटबाबत आपण चर्चा करत आहोत, ते अशा काही घटनांक्रमांबाबत आहेत ज्या 7 ऑक्टोबरच्या आधीच्या महिन्यांत पाहायला मिळाल्या होत्या.

त्यामुळं काही जणांमध्ये हल्ला होणार असल्याची चिंताही निर्माण झाली होती.

"एखादा छापा असतो त्याप्रमाणे ते रोज सराव करत असल्याचं आम्हाला दिसत होतं," असं अजूनही लष्करात काम करणाऱ्या नोआ बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.

"त्यांच्याकडे कुंपणाजवळ शस्त्रांचं एक मॉडेलही होतं आणि त्याचा ब्लास्ट कसा करणार हेही दाखवत होते. तसंच लष्करावर ताबा कसा मिळवायचा आणि हत्या तसंच अपहरण कसं करायचं या सर्वांचा समन्वय तिथं सुरू होता."

या बेसवरील आणखी एक निरीक्षक एडन हदार म्हणाल्या की, त्यांनी जेव्हा लष्करात काम सुरू केलं त्यावेळी, हमासचे सदस्य हे प्रामुख्यानं फक्त व्यायाम करत होते. पण त्या जेव्हा ऑगस्टमध्ये लष्करातून बाहेर पडल्या त्यावेळी तिथं प्रत्यक्षात लष्करी प्रशिक्षण सुरू होतं, हे त्यांच्या लक्षात आलं.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

सीमेवरील एका दुसऱ्या बेसवरील गेल (नाव बदललेले) यांनीदेखील सीमेवर प्रशिक्षणात वाढ झाल्याचं पाहिल्याचं सांगितलं.

निगराणीसाठीच्या बलूनद्वारे त्यांच्या लक्षात आलं होतं की, सीमेवरील इस्रायलयच्या एका ऑटोमॅटिक शस्त्राची प्रतिकृती गाझाच्या मध्यभागी तयार करण्यात आली होती.

काही महिलांनी इस्रायलची लोखंडी भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंपणाजवळही काही बॉम्बचे स्फोटही पाहिले होते. कदाचित या कुंपणाची मजबुती तपासली जात होती. 7 ऑक्टोबरच्या फुटेजवरून नंतर लक्षात आलं की, हमासचे सदस्य दुचाकींवरून इस्रायलमध्ये शिरले त्याआधी तिथं मोठे स्फोट झाले होते.

माजी निरीक्षक रोनी लिफशिट्झ या हल्ल्याच्या वेळी कार्यरत होत्या पण तेव्हा ड्युटीवर नव्हत्या. त्यांच्या मते, त्यांनी हल्ल्यापूर्वीच्या काही महिन्यांत पाहिलेली सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, हमासच्या सदस्यांनी भरलेल्या वाहनांद्वारे केलं जाणारं पेट्रोलिंग. ते दुसऱ्या बाजूला असलेल्या निगराणींच्या चौक्यांवर थांबत होते.

रोनी लिफशिट्झ

ते लोक कॅमेऱ्याकडे, कुंपणाकडे इशारे करायचे, फोटो काढायचे असं त्या म्हणाल्या.

त्यांच्या कपड्यांवरून ते हमासच्या एलाइट नुखुबा गटाचे असल्याचं त्यांच्या लक्षात येत होतं. ऑक्टोबरमधील हल्ल्यात सहभागी असलेल्या महत्त्वाच्या शक्तींमध्ये यांचा समावेश होता, असं इस्रायलचं म्हणणं आहे.

बीबीसी बरोबर बोललेल्या आणखी एका महिलेच्या वर्णनाशी रोनी यांचं वर्णन अगदी जुळत होतं.

काही निरीक्षक महिलांनी घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचंही म्हटलं.

एका महिला सैनिकांनी आमच्याबरोबर शेअर केलेल्या संदेशांमधील कोडमध्ये सीमेजवळ असलेल्या व्हॅनबाबत संकेत होते. तसंच IDF लोकांना इस्रायलमध्ये प्रवेशापासून अडवण्यासंदर्भातही संकेत होते. कारण हे प्रकार वरचेवर घडू लागले होते. या टीममधील सदस्य ही गुप्त माहिती मिळवल्याबद्दल एकमेकांचे हार्टचे इमोजी आणि GIFs पाठवून अभिनंदन करत होते.

निरीक्षक शाहाफ निस्सानी यांनी त्यांच्या आईला जुलैमध्ये एक मेसेज केला होता. त्यात त्यांनी लिहिलं होतं, "गुड मॉर्निंग मम्मी. माझी शिफ्ट आता संपली आहे. आमच्याकडे घुसखोरी होणार होती. अत्यंत घाबरवणारी ही घटना होती. आजवर कोणाचाही सामना झाला नसेल अशी ही घटना होती."

महिलांना सीमेवर होत असलेल्या वर्तनातही बदल झाल्याचं पाहायला मिळत होतं.

गाझाचे सैनिक, पक्षी पकडणारे आणि मेंढपाळही सीमेच्या जवळ येऊ लागले होते, असं त्यांनी सांगितलं. तपास करणाऱ्यांच्या मते, हे सर्व लोक हल्ल्याच्या पूर्वी शक्य तेवढी माहिती गोळा करत होते.

हमासचा वॉच टॉवर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हमासचा वॉच टॉवर

आणखी एका निरीक्षक महिलेनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, "आम्हाला प्रत्येकाचा चेहरा आणि त्यांचं दैनंदिन रुटीन आणि तासही माहिती होते. पण अचानक आम्हाला ओळखीचे नसलेले शेतकरी आणि पक्षी पकडणारे दिसू लागले. ते नवीन भागात फिरत असल्याचं आम्ही पाहिलं. त्यांचं रुटीन बदललेलं होतं."

नोआ यांनीही ते कुंपणाच्या जास्तीत जास्त जवळ येऊ लागले होते, असं सांगितलं.

"पक्षी पकडणारे त्यांचे पिंजरे बरोबर कुंपणावर ठेवायचे. हे विचित्र होतं कारण त्यांना पिंजरे कुठंही ठेवता येऊ शकत होते. शेतकरीही कुंपणाच्या अधिक जवळ येऊ लागले होते.

तिथं शेतजमीन नव्हती. त्यामुळं जास्तीत जास्त माहिती मिळवून ती पुढं द्यायची याशिवाय दुसरा काहीही उद्देश यामागं असू शकत नव्हता. आम्हाला ते संशयास्पद वाटलं," असं त्या म्हणाल्या.

शेतकरी

फोटो स्रोत, Getty Images

'कोणी ऐकत नसेल तर आम्ही कशासाठी आहोत?'

गेल या त्यांच्या तुकडीच्या कमांडर आहेत. त्या म्हणाल्या की निरीक्षक त्यांना माहिती पाठवायच्या आणि तीच माहिती त्या सुपरवायझरकडं पुढं पाठवायच्या.

खरं म्हणजे याचा समावेश परिस्थितीनुसार अभ्यासात करण्यात आला होता. पण जेव्हा वरिष्ठांनी निरीक्षकांच्या रिपोर्टवर चर्चा केली असेल तेव्हा त्यापुढं दुसरं काहीही केलं नसावं, असं त्या म्हणाल्या.

काही महिला म्हणाल्या की, त्यांनी त्यांची काळजी कुटुंबाबरोबर बोलताना व्यक्त केली होती.

"आमचं कोणी ऐकतच नसेल तर आम्ही इथं का आहोत?" असं शाहाफ म्हणाल्याचं त्यांच्या इलाना यांनी सांगितलं.

"तिनं मला सांगितलं की, काहीतरी गडबड आहे असं मुलींना जाणवत आहे. मी तिला विचारलं, तुम्ही तक्रार करत आहात का?'

"मला लष्कराबद्दल फार काही माहिती नाही. पण मला हे नक्की माहिती आहे की, कारवाईचा निर्णय बेसवर असणाऱ्यांकडून नव्हे तर वरिष्ठांकडून घेतला जायला हवा होता," असं त्या म्हणाल्या.

पण शाहाफ यांच्या काळजीनंतरही त्यांच्या प्रमाणेच इतरांच्या कुटुंबीयांनाही लष्करावर आणि इस्रायल सरकारवर विश्वास होता. अगदीच काही कट रचला गेला तरी त्याचा लगेचच सामना केला जाईल याची त्यांना खात्री होती.

इस्रायली टँक

"गेल्या काही महिन्यांमध्ये तिनं वारंवार युद्ध होईल असं सांगितलं, आणि आम्ही ती अतिशयोक्ती करत असल्याचं म्हणत, तिच्यावर हसलो," असंही इलाना म्हणाल्या.

हमासनं 7 ऑक्टोबरला नाहल ओझवर ताबा घेतला त्यावेळी सर्वात आधी शाहाफ मारल्या गेल्या होत्या.

हा इस्रायलच्या इतिहासातील सर्वांत भयावह दिवस होता. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार यात जवळपास 1200 जण मारले गेले आणि 240 जणांना बंदी बनवण्यात आलं.

हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई आणि मैदानी हल्ल्यात गाझातील 23 हजाराहून अधिक लोक मारले गेल्याचं हमासतर्फे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

पण त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं की, याबाबत काळजी व्यक्त करणाऱ्या केवळ तात्झपितानियोत याच नव्हत्या. तसंच फक्त त्यांच्या निरीक्षणातूनच माहिती मिळत होती, असंही नाही.

शाफाह (डावीकडे)
फोटो कॅप्शन, शाफाह (डावीकडे)

न्यू यॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार 7 ऑक्टोबरच्या सुमारे वर्षभर आधी हमासच्या योजनेबाबत एक विस्तृत ब्लूप्रिंट इस्रायलच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. पण त्यावेळी खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचं म्हणत हा दावा फेटाळण्यात आला होता.

या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, इस्रायलच्या गुप्तचर संस्थेतील युनिट 8200 च्या एका अनुभवी अॅनालिस्टनं हमासच्या हल्ल्याच्या तीन महिन्यापूर्वीच माहिती दिली होती. ब्लू प्रिंटमधील उल्लेखाप्रमाणेच हमासनं कठोर प्रशिक्षण घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण त्याकडंही दुर्लक्ष करण्यात आलं होतं.

हमास आणि इतर सशस्त्र गटांकडून करण्यात आलेल्या सरावांची माहिती सोशल मीडियावरही देण्यात आली होती. बीबीसीच्या या रिपोर्टमध्येही ते दिसत आहे.

महिलांकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही

निवृत्त मेजर जनरल आयटन डंगोत यांच्या मते, "संकेत स्पष्टपणे दिसत होते. तुम्हाला सर्व प्रकारचे संकेत मिळतात तेव्हा तुम्ही ते रोखण्यासाठी लवकर निर्णय घ्यायला हवा.

"पण दुर्दैवानं हेच घडलं नाही."

ते म्हणाले की, अद्याप तपास पूर्ण झालेला नसला तरी निरीक्षणाचं काम करणाऱ्या महिला सैनिकांनं दिलेल्या माहितीला हवं तेवढं महत्त्व दिलं गेलं नाही.

"कधी कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आत्मविश्वासाचा याच्याशी संबंध असतो. मी ऐकलं पण मला तुमच्यापेक्षा जास्त समजतं. मला जास्त अनुभव आहे. माझं वय जास्त आहे. माझ्याकडे माहिती आहे आणि तुम्ही सांगत आहात तसे काही नाही," असंही म्हटलं जातं.

"कधी-कधी हा अंध राष्ट्रवादही असू शकतो," असंही ते म्हणाले.

"गुप्तचर यंत्रणेच्या संकेतात तुम्हाला टेबलबर बसून माहितीवर विचार करून धागे जुळवावे लागतात. नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांचयाबरोबर बसावं लागेल. त्यांना काळजीपूर्वक ऐकून घ्यावं लागेल. त्यांना नेमकं काय वाटतं हे समजून घ्यावं लागेल."

गाझा डिव्हिजनचे ब्रिगेडियर जनरल आणि माजी डेप्युटी कमांडर आमीर अवीवी यांच्या मते यात लिंगभेद हे कारण नाही. याबाबत अधिक काळजी घेऊन कारवाई करणं गरजेचं होतं असंही ते म्हणाले.

"नेमकं काय झालं हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. पण नेमकं काय अपेक्षित होतं हे मी निश्चितपणे सांगू शकतो," असं ते म्हणाले.

"जेव्हा सीमेवरील लोक त्याचं काम करत असतात तेव्हा त्यांना जी महिती मिळते त्याबाबत त्यांना काळजी वाटत असेल तर त्यांना काय वाटत आहे हे, ऐकून घ्यायला हवं. कारण ते प्रशिक्षित असतात. ते खऱ्या अर्थानं लष्कराचे डोळे असतात."

त्यांच्या मते, हमास घाबरलेलं आहे असा विचार करणं हेच सर्वांत मोठं अपयश होतं. ते प्रशिक्षण घेत आहेत, त्यांनी योजना आखली आहे पण ते तसं करणार नाही, असा विचार करणं चुकीचं होतं.

शाइचे वडील ड्रोर
फोटो कॅप्शन, शाइचे वडील ड्रोर

IDF नं भविष्यात चौकशीचं आश्वासन दिलं. तसंच बीबीसीच्या विनंतीबाबत म्हटलं की, "अशा प्रकारच्या प्रश्नांवर नंतरच्या टप्प्यात विचार केला जाईल."

निरीक्षकांचं मात्र त्यांच्या माहितीवर मोठ्या पातळीवर कारवाई का झाली नाही, याबाबत वेगळं मत आहे. आम्ही चर्चा केलेल्या काहींच्या मते, "याचं कारण म्हणजे आम्ही सर्वांत खालच्या पातळीवरील सैनिक आहोत. त्यामुळं आम्हाला कमी महत्त्वाचं समजलं जातं."

"प्रत्येकजण आम्हाला डोळे म्हणून पाहतं, सैनिक म्हणून पाहत नाही," असं रोनी म्हणाल्या.

हल्ल्याच्या तीन महिन्यांनंतर वाचलेल्या तात्झपितानियोत आणि मृतांची दुःखी कुटुंब ही तपासाच्या आणि नेमकं काय झालं हे समजण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

शाइ अशराम यांच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलवर मिलिट्री टोप्या लटकावलेल्या असून गणवेशातील त्यांचे फोटो आणि चित्रही आहेत.

त्यांचे वडील ड्रोर यांनी, ते कधीकधी तिच्या रूममध्ये जाऊन रडतात असंही सांगितलं.

"तिचं कामावर प्रचंड प्रेम होतं. तिला लष्कराची आवड होती आणि सैनिकच बनायचं होतं," असं ते म्हणाले.

"मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मी लोकांना स्टेशनवरून नेत असतो. मी जेव्हा सैनिक वडिलांबरोबर जात असल्याचं पाहतो तेव्हा मला वाईट वाटतं. मला त्यांच्याबाबत ईर्ष्या वाटते."

'प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर आठवणी'

नोआ त्यांच्या घरात सोशल मीडियावरील जुन्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींबरोबरच्या बेसवरील आठवणी पाहत असतात. बेडरूममध्ये एकटं राहण्याची भीती वाटते म्हणून रोज त्या सोफ्यावर झोपतात.

"त्या माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी आहे. स्वप्नांत, विचारांत अगदी कमी झालेल्या झोपेत आणि भूकेतही. मी आधी होते ती व्यक्ती आता राहिले नाही," असं त्या म्हणल्या.

व्हाट्सअप चॅट स्क्रोल करताना तात्झपितानियोत बरोबर केलेलं चॅटिंग दाखवताना त्या त्यांची नावं सांगू लागल्या. सोबतच त्यापैकी कोण मारल्या गेल्या किंवा कुणाचं अपहरण झालं हेही सांगत होत्या.

नाहल ओझमध्ये त्यांच्या बेसवर काम करायच्या ती खोली आता भग्नावस्थेत आहे. ज्या स्क्रीनमध्ये त्या हमास हल्ल्याची तयारी करत असल्याचं पाहत होत्या, त्या स्क्रीन आता जळालेल्या आणि काळ्या पडलेल्या आहेत.

हमासनं नाहल ओझवर हल्ला करताच अनेकांची हत्या केली होती.

त्यांच्यामध्ये इस्रायलसाठी सीमेवर निगराणीचं काम करणाऱ्या बहुतांश महिलांचा समावेश होता. इस्रायलच्या शक्तीबाबत जाणीव असूनही एक दिवस असं काहीतरी होईल याची भीती असतानाही, त्या ते काम करत होत्या.

  • अतिरिक्त वार्तांकन- इदान बेन अरी
  • डिझाईन आणि व्हिज्युअलायझेशन - तुराल अहमदझादे, मॅट थॉमस आणि गेरी फ्लेचर
  • संपादन - सॅम्युअल होर्ती

दुरुस्ती 13 फेब्रुवारी : हमासनं 7 ऑक्टोबरपासून केलेल्या हल्ल्यात 1300 जणांचा मृत्यू झाल्याचं चुकीचं वार्तांकन या लेखात झालं होतं. या हल्ल्यात ज्या जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यांनासुद्धा या आकड्यात मोजण्यात आलं होतं. जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याचं या लेखात आता दुरुस्त करण्यात आलं आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार हा आकडा अजूनही अंतिम नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)