लेबनॉनवरील हवाई हल्ल्यानंतर इस्रायलने केली जमिनीवरुन सैन्य कारवाईची घोषणा

इस्रायल डिफेन्स फोर्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायल डिफेन्स फोर्स

इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) लेबनॉनमधील हवाई हल्ल्यानंतर आता प्रत्यक्ष जमिनीवरुनही सैन्य कारवाईची घोषणा केली आहे.

आयडीएफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरुन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटलं आहे की, दक्षिण लेबनॉनमधून ते प्रत्यक्ष जमिनीवरुनही आपल्या लष्करी कारवाईस सुरुवात करणार आहेत.

आयडीएफने म्हटलं की, "आम्ही दक्षिण लेबनॉनमध्ये जमिनीवरुन सैन्य कारवाई करणार आहोत. आम्ही दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करू.

"ही सैन्य कारवाई मर्यादित स्वरुपात असेल. सीमेशी संलग्न असलेल्या गावांमध्ये ही कारवाई केली जाईल.

"या तळांमधूनच उत्तर इस्रायलच्या सीमेवर वसलेल्या लोकांवर हिजबुल्लाहकडून सातत्याने हल्ले केले जातात. मिलटरी ऑपरेशन योजनेअंतर्गतच ही कारवाई केली जात आहे; ज्याची तयारी अलीकडच्या काही महिन्यांमध्ये केली जात होती. इस्रायली एअरफोर्स आणि आयडीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जाईल."

इस्रायचे संरक्षण मंत्री याओव गॅलेंट यांनी लेबनॉनच्या सीमेजवळ तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांची 30 सप्टेंबर 2024 रोजी भेट घेतली होती.

या दरम्यान गॅलेंट यांनी म्हटलं होतं की, "आपण आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करू. तुम्हीदेखील या मोहिमेचा भाग आहात. आम्हाला असा विश्वास आहे की, तुम्ही काणतीही गोष्ट साध्य करू शकता."

पुढे त्यांनी म्हटलं होतं की, "जे काही करण्याची गरज असेल, ते केलं जाईल. आम्ही हवा, पाणी आणि प्रत्यक्ष जमिनीच्या मार्गावरुन संपूर्ण ताकदीचा वापर करू."

बीबीसीचे डिप्लोमॅटिक कॉरस्पॉडन्ट पॉल ऍडम्स यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष जमिनीवरुनही हल्ला होऊ शकतो, असा विचार हिजबुल्लाहने करावा अशीच इस्रायची अपेक्षा आहे. याबाबतचे संकेत गेल्या अनेक दिवसांपासून दिले जात आहेत.

दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाहचे डेप्यूटी लीडर शेख नईम कासिम यांनी म्हटलं की, "इस्रायलच्या जमिनी हल्ल्याशी दोन हात करण्यासाठी हिजबुल्लाह पूर्णपणे तयार आहे. आम्ही इस्रायलच्या विरोधातील आमचा लढा सुरुच ठेवू."

पुढे कासिम यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी 'संयम' बाळगण्याविषयीही भाष्य केलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

इस्रायल करणार जमिनीवरुन आक्रमण

इस्रायलने 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये अनेक पेजर्स आणि वॉकी-टॉकींमध्ये स्फोट घडवून आणले होते. या स्फोटांमध्ये जवळपास 39 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये हिजबुल्लाहच्या सशस्त्र सदस्यांबरोबरच सामान्य नागरिकांचाही समावेश होता.

या घटनेनंतर लेबनॉनमध्ये इस्रायची कारवाई सातत्याने सुरुच आहे.

हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतरही इस्रायल लेबनॉनवर सातत्याने हल्ले करत आहे. अमेरिकेसहित इतर पाश्चिमात्त्य देशांकडून युद्धविरामाचे आवाहन केलं जात असूनही इस्रायल मात्र आपल्या कारवाईवर ठाम आहे.

हिजबुल्लाहचे डेप्युटी लीडर नईम कासिम

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हिजबुल्लाहचे डेप्युटी लीडर नईम कासिम

या पार्श्वभूमीवर आता इस्रायलकडून प्रत्यक्ष जमिनीवरुन कारवाईचे संकेत दिले गेलेले असताना प्रत्यक्षात तसं खरंच घडू शकतं का?

बीबीसीचे डिप्लोमॅटीक कॉरस्पॉडन्ट पॉल ऍडम्स यांच्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याचे रणगाडे लेबनॉनच्या सीमेवर मोठ्या संख्येने जमा होत आहेत. इस्रायलच्या सैन्यप्रमुखांनी हिजबुल्लाहच्या बालेकिल्ल्यावर कारवाई करण्यासाठी आपल्या सैनिकांना सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

सैन्याकडूनही दक्षिण लेबनॉनच्या आत बफर झोन तयार करण्याचेही संकेत प्राप्त झाले आहेत. मात्र, अद्यापतरी इस्रायली सैन्य जमिनीवरुन लेबनॉनमध्ये घुसल्याची अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

दरम्यान इस्रायलने लेबनॉनवरील आपले हवाई हल्ले सुरुच ठेवले आहेत. याच हल्ल्यांदरम्यान 27 सप्टेंबर रोजी हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचाही मृत्यू झाला.

संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

इस्रालयच्या या हल्ल्यामध्ये हमासचे नेतेही मारले गेले आहेत.

लेबनॉनमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन आठवड्यांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांमुळे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे; तर 10 लाखहून अधिक लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे.

संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जवळपास एक लाख लोकांना लेबनॉन सोडून सीरियामध्ये स्थलांतरित व्हावं लागलं आहे.

इस्रायल हिजबुल्लाहवर हल्ले का करत आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या सशस्त्र सदस्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 1200 हून अधिक इस्रायली लोक मारले गेले, तर 200 हून अधिक जणांना बंदी करण्यात आल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

या बंदींची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी इस्रायलमध्ये नेतन्याहूंच्या विरोधात आंदोलन देखील झाले.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा आणि पश्चिम किनारपट्टीवर लष्करी कारवाईस सुरुवात केली.

हमासकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, इस्रायलच्या या लष्करी कारवाईमध्ये आतापर्यंत 40 हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. या मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

इस्रायलने गाझावर केलेल्या या हल्ल्यानंतर हिजबुल्लाह ही सशस्त्र संघटना हमासच्या समर्थनार्थ पुढे आली होती.

हिजबुल्लाहने लेबनॉनच्या सीमेवरुन इस्रायलवर सातत्याने रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यामुळे लेबनॉनच्या सीमेवर राहणाऱ्या हजारो इस्रायली नागरिकांना स्थलांतर करावं लागलं आहे.

इस्रायलचं म्हणणं आहे की, ते आपल्या नागरिकांच्या सुरक्षित घरवापसी करता हिजबुल्लाहवर हल्ले करत आहेत.

दुसऱ्या बाजूला, जोपर्यंत गाझामध्ये इस्रायलचे हल्ले थांबवले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हल्ले सुरुच ठेवू, असे हिजबुल्लाहचे म्हणणे आहे.

सध्या तरी हिजबुल्लाह स्वत:चं इस्रायलच्या हल्ल्यांना बळी पडत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)