इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या 15 सदस्यांचा मृत्यू

इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या 15 सदस्यांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायलने लेबनॉनमध्ये बिंत जेबिलसह काही स्थळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या 15 सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे.

इस्रायली संरक्षण दल म्हणजेच आयडीएफने रात्रभर आपल्या लढाऊ विमानांनी बिंत जेबिलच्या स्थानिक प्रशासनाच्या इमारतीवर हल्ला केला, तिथं हिजबुल्लाहचे दहशतवादी होते, तसेच तिथं मोठा शस्त्रसाठा होता असं सांगितलं आहे.

या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याचं आयडीएफनं सांगितलं आहे.

सुमारे 200 ठिकाणांवर इस्रायलने हल्ले केल्याचं आयडीएफनं सांगितलं. यात शस्त्रं ठेवण्याच्या, टेहळणीच्या जागांचा समावेश आहे.

दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या 8 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू, पुढे काय होऊ शकतं?

फोटो स्रोत, Getty Images

हॉस्पिटलवर हल्ला

इस्रायलने मध्य बैरुतमधील एका हॉस्पिटलवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे हॉस्पिटल हिजबुल्लाहशी संबंधित असल्याचं बोललं जातंय.

लेबनॉनवर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या मिशिगनमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाचा समावेश आहे. मिशिगन राज्यातील डिअरबॉर्न शहराचे रहिवासी असणाऱ्या 56 कामेल अहमद जवाद यांचा मृत्यू झाल्याची माहिती 'द डेट्रॉईट न्यूज'ने दिली आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी कामेल अहमद जवाद यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "कामेल अहमद जवाद यांच्या मृत्यूमुळे आम्हाला दुःख झाले. त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. ही एक अत्यंत दुर्दैवी घटना असून, लेबनॉनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाचा मृत्यूही दुर्दैवी आहे."

लेबनॉनची राजधानी बैरुत येथील बीबीसीच्या पत्रकारांना बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलच्या लष्करानं 'लक्ष्य ठरवून अचूक हल्ले' केल्याची माहिती दिली आहे.

व्हीडिओ कॅप्शन, लेबनॉनवर इस्रायलचे मोठे हल्ले, रात्रीतून नेमकं काय घडलं?

इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. हिजबुल्लाह आणि इस्रायली संरक्षण दल यांच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चकमकी होत आहेत. या चकमकींमध्ये आयडीएफने आठ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. इस्रायलने लेबनॉनवर आक्रमण केल्यापासून पहिल्यांदाच इस्रायली सैनिकांच्या मृत्यूची घटना घडली आहे.

हमासचा सशस्त्र गट अल-कसाम ब्रिगेडने मंगळवारी तेल अवीवमध्ये झालेल्या गोळीबार आणि चाकू हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील खान युनूस शहरात 51 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हमासच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

इस्रायल प्रत्युत्तरासाठी सज्ज, पण पुढे काय होऊ शकतं?

बीबीसीचे संरक्षण प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांचं विश्लेषण

इराणने मंगळवारी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल सज्ज आहे. इराणने डागलेल्या काही मिसाईल्सनी इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा भेदली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, "इराणला याची मोठी किंमत चुकवावी लागेल."

हमासचे मुख्य नेते इस्माईल हानिये आणि हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केल्याचं सांगितलं आहे.

3 ऑक्टोबर 2024ला बैरुत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या इमारतीवर इस्रायलने हवाई हल्ला केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 3 ऑक्टोबर 2024ला बैरुत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या इमारतीवर इस्रायलने हवाई हल्ला केला.

पुढे काय होईल?

एप्रिल महिन्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इस्रायलच्या सहकारी देशांनी इस्रायलला संयम राखण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी मात्र तसं झाल्याचं दिसत नाहीये.

दुसरीकडे इस्रायलने लेबनॉन, गाझा, येमेन आणि सीरिया यांच्याविरोधात एकाच वेळी युद्धाची आघाडी उघडल्यामुळे, माघार घेण्याचा त्यांचा कुठलाही मानस दिसत नाही.

त्यामुळे आता इस्रायलमध्ये 'इराणवर हल्ला करायचा की नाही?' या प्रश्नावर चर्चा होणार नाही, तर ही चर्चा फक्त या हल्ल्याची तीव्रता किती असेल? याभोवतीच असणार आहे.

अमेरिकेची सॅटेलाईट इंटेलिजन्स यंत्रणा आणि इराणमध्ये उपस्थित असणाऱ्या मोसादचे एजंट यांच्या मदतीने इस्रायली संरक्षण दलाकडे हल्ला करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील.

पारंपरिक लष्करी कारवाई, आर्थिक निर्बंध आणि आण्विक कारवाई असे तीन प्रमुख पर्याय इस्रायलकडे आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

इराणनं 180 हून अधिक मिसाईल्स डागले, यात इस्रायलचं किती नुकसान झालंय?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मॅट मर्फी, बीबीसी न्यूज

इराणने मंगळवारी (1 ऑक्टोबर) उशिरा रात्री इस्रायलच्या दिशेने शेकडो मिसाईल्स डागल्या. यामधील काही मिसाईल्स इस्रायलच्या भूभागावर पडल्या आहेत.

यावर्षी इराणने इस्रायलवर केलेला हा दुसरा हल्ला आहे. एप्रिलमध्येही इराणने इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.

इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे हे हल्ले आता थांबले असून सध्या कोणताही धोका नाहीये.

मात्र, या हल्ल्यामुळे इस्रायलचं किती नुकसान झालं आहे, त्याची स्पष्टता अद्याप आलेली नाही.

मंगळवारी रात्री इराणने 181 बॅलिस्टीक मिसाईल्स इस्रायलच्या दिशेने डागल्या आणि त्यामध्ये एका पॅलिस्टीनी नागरिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट करून दिली आहे. इस्रायलने या हल्ल्याचा व्हीडिओ देखील प्रसारित केला आहे.

एक व्यक्ती रस्त्यावरुन जात असताना या हल्ल्याला बळी पडत असल्याचे या व्हीडिओमध्ये दिसून येते. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पश्चिम किनारपट्टी परिसरातील हा व्हीडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.

इराणचे शासन धोकादायक असून जागतिक शांततेला इराणकडून धोका असल्याचे इस्रायलने म्हटलं आहे.

इराणचा हा हल्ला किती मोठा?

एप्रिलच्या तुलनेत हा तसा मोठा हल्ला आहे. पाच महिन्यांआधी म्हणजेच एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर जवळपास 110 बॅलिस्टीक मिसाईल्स आणि 30 क्रूझ मिसाईल्सने हल्ला केला होता.

इस्रायलच्या टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये स्थानिक वेळेनुसार, रात्री पावणेआठच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी) काही वेळ आधी तेल अवीव आणि त्या आसपासच्या परिसरामध्ये आकाशामध्ये काही मिसाईल्स दिसून आल्या.

या हल्ल्यादरम्यान काही मिसाईल्स निश्चित ठिकाणी धडकल्या असल्याचं सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सैन्यातील एका प्रवक्त्याने म्हटलं की, हे हल्ले इस्रायलच्या मध्य आणि दक्षिण भागावर झाले आहे.

दुसऱ्या बाजूला, इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कोअरचं (आयआरजीसी) म्हणणं आहे की, त्यांच्या सैन्याने पहिल्यांदा हायपरसोनिक मिसाईल्सचा वापर केला असून 90 टक्के प्रोजेक्टाइल्स (मिसाईल्स / ड्रोन्स) योग्य निशाण्यावर लागले आहेत.

इस्रायल

आयआरजीसीच्या सूत्रांनी इराणच्या सरकारी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे की, इस्रायलची तीन लष्करी तळे या हल्ल्यामधील लक्ष्य होते.

मात्र, दुसऱ्या बाजूला इस्रायलच्या सैन्याने म्हटलं आहे की, इराणकडून डागण्यात आलेल्या मिसाईल्सना 'मोठ्या प्रमाणावर' नष्ट करण्यात आलं.

तेल अव्हीव शहराच्या आकाशामध्ये चमकत्या उजेडाच्या तिरीप दिसत होत्या. इस्रायलच्या एअर डिफेन्सने या मिसाईल्सना थांबवल्याचं त्या निदर्शक होत्या.

जेरुसलेममधील बीबीसी कॉरस्पॉडन्ट्सनी म्हटलं की, त्यांना कमीतकमी दोन मिसाईल्स इंटरसेप्ट केल्याचा आवाज ऐकू आला.

दुसऱ्या बाजूला, इस्रायलच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे की, त्यांना आतापर्यंत कुणीही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.

मात्र, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सैन्यानेही हीच माहिती जाहीर केली आहे.

इराणने इस्रायलवर हल्ला का केला?

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअरने (आयआरजीसी) एका वक्तव्यात म्हटलं आहे की, हे हल्ले आयआरजीसीचे एक टॉप कमांडर आणि इराण-समर्थित मिलिशिया गटांच्या नेत्यांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत.

हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह आणि गेल्या आठवड्यात बैरुतमध्ये आयआरजीसीचे कमांडर अब्बास निलफोरोशनच्या मृत्यूचा उल्लेखही आयआरजीसीने आपल्या वक्तव्यात केला आहे.

तर, जुलै महिन्यात तेहरानमध्ये हमासच्या पॉलिटीकल विंगचे प्रमुख इस्माईल हानिये यांच्या मृत्यूचा उल्लेखही या वक्तव्यात करण्यात आला आहे. मात्र, इस्रायलने हनियाच्या मृत्यूची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूमागे इस्रायलचाच हात असल्याचं म्हटलं जातं.

नुकतंच इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नुकतंच इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे की, देशाचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनेई यांनी वैयक्तिकरीत्या या हल्ल्याचे आदेश दिले होते.

इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून हाडवैर दिसून येत आहे. या ताज्या हल्ल्यांमुळे त्यांच्यामध्ये आधीपासूनच सुरू असलेल्या छद्म युद्धातील तणाव आता टिपेला पोहोचला आहे.

वास्तवात मुद्दा हा आहे की, इराण इस्रायलचं अस्तित्वचं मान्य करत नाही. इराणच्या सैन्य धोरणामध्ये इस्रायल नेहमीच केंद्रस्थानी असल्याचं दिसून येतो.

दुसऱ्या बाजूला इस्रायलला इराणला आपल्या अस्तित्वासाठी असलेला धोका मानतो. गेल्या कित्येक वर्षांपासून इस्रायल इराणविरोधात गुप्त मोहीम चालवत आलेला आहे.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

आयर्न डोममुळे मिसाईल्स रोखण्यात यश?

इस्रायलकडे एअर डिफेन्ससाठी फारच प्रभावशाली यंत्रणा उपलब्ध आहे. यामधील सर्वांत प्रसिद्ध म्हणजे आयर्न डोम होय.

हमास आणि हिजबुल्लाहकडून डागण्यात आलेल्या कमी अंतरावरील मिसाईल्सना रोखण्यासाठीच या आयर्न डोम्सची निर्मिती करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात इराणने जो हल्ला केला होता, त्या दरम्यानही एअर डिफेन्सच्या काही अंशी वापर करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी (1 ऑक्टोबर) जो हल्ला झाला, त्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीमच्या इतर यंत्रणांनीही काम केलं असावं.

इस्रायल

यातील 'डेव्हीड्स स्लींग'ला 'जादूची कांडी' असंही म्हटलं जातं. ही एक अमेरिकन-इस्रायली यंत्रणा आहे. याचा वापर मध्य ते अधिक अंतरावरील रॉकेट्सना थांबवण्याबरोबरच बॅलेस्टीक आणि क्रूझ मिसाईल्सना रोखण्यासाठी केला जातो.

पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर उडणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांशी दोन हात करण्यासाठी इस्रायल एरो-2 आणि एरो-3 इंटरसेप्टर्सचा वापर करतो.

इस्रायलच्या सहकाऱ्यांनी काय म्हटलं?

व्हाईट हाऊसने म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या भागात आधीपासूनच तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याला आदेश दिला की, त्यांनी इराणच्या हल्ल्यापासून इस्रायलचं संरक्षण करावं तसेच इराणच्या मिसाईल्सना निष्प्रभ करावं.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, अमेरिकेच्या नौदलाने इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलेल्या कमीत कमी एक डझन मिसाईल्सना इंटरसेप्ट केलं.

जॉर्डनची राजधानी अम्मानवर मिसाईल्स अडवताना दिसणाऱ्या व्हिडिओंची बीबीसीनेही पुष्टी केली आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या हल्ल्यांदरम्यानही अनेक मिसाईल्सना निष्प्रभ करण्यात आलं होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपराष्ट्राध्यक्षा आणि कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपराष्ट्राध्यक्षा आणि कमला हॅरिस

ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरुन चर्चा केली तसेच कठोर शब्दांमध्ये या हल्ल्याचा निषेध केला.

ब्रिटीश पंतप्रधानांनी म्हटलं की, "आम्ही इस्रायलच्या सोबत आहोत. आम्ही असं मानतो की, आक्रमणासमोर स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण हक्क त्यांना आहे. इराणने हिजबुल्लाहसारख्या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून असे हल्ले करणं बंद करायला हवं."

"हा संघर्ष अधिक वाढू नये, यासाठीचे प्रयत्न करण्याची भूमिका ब्रिटीश सैन्याने निभावली," असेही ब्रिटनने म्हटलं आहे. मात्र, सैनिकी स्तरावर ब्रिटनने यामध्ये कशा प्रकारे भूमिका निभावली, याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही.

आता पुढे काय होणार?

या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा इस्रायलने इराणला दिला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की, "इराणने फार मोठी चूक केली असून त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल."

इस्रायलच्या सैन्यानेही असाच इशारा दिला आहे.

इस्रायलच्या सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटलं की, हे हल्ले अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते आणि संपूर्ण देश हाय अलर्टवर होता.

पुढे त्यांनी म्हटलं की, "या हल्ल्याचे गंभीर परिणाम होतील. आमच्याकडे त्यासंदर्भात रणनीती असून आम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे याला प्रत्युत्तर देऊ."

याआधीच अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टीन यांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर म्हटलं होतं की, जर इराणने इस्रायलवर हल्ला केला तर याचे फारच 'गंभीर परिणाम' होतील.

दुसऱ्या बाजूला इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअरने आपल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की, जर इस्रायलने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं तर इराणची त्यावरील प्रतिक्रिया 'अधिक विनाशकारी' असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)