NEET परीक्षा रद्द, नाशिकमधून एक जण ताब्यात; पुढच्या तारखेबद्दल NTA ने नेमकं काय सांगितलं?

नाशिक पोलिसांनी नीट प्रकरणाची माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पेपर फुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही परीक्षा पुढे कधी होणार याबाबतच्या तारखा स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहेत.

या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याला केंद्रिय तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं, "हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे."

"पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे", असंही एनटीएनं नमूद केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं आहे.

नाशिक पोलिसांनी काय सांगितलं?

नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितलं, "सकाळी राजस्थान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तो आरोपी नीट प्रकरणातील आहे अशी माहिती मिळत आहे."

"क्राइम ब्रांच युनिट 2 च्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. ते पथक आल्यावर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल," अशी माहिती त्यांनी दिली.

"आरोपीने त्याचा वेश बदलला होता, केस कापले होते. त्यामुळे त्याची माहिती मिळत नव्हती. मात्र, तांत्रिक कौशल्य आणि जिकिरीने तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं," असंही त्यांनी नमूद केलं.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

परीक्षा पुन्हा कधी होणार?

एनटीएने परीक्षा पुन्हा आयोजित करण्याबाबत म्हटलं, "ही परीक्षा पुन्हा कधी आयोजित केली जाईल याच्या तारखा आणि नव्याने जारी केल्या जाणाऱ्या प्रवेशपत्रांचे वेळापत्रक यासह पुढील सर्व सूचना, एजन्सीच्या अधिकृत माध्यमांद्वारे जारी केल्या जातील."

"उमेदवारांनी आणि पालकांनी केवळ या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा आणि समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या, खात्री नसलेल्या बातम्यांकडे किंवा वृत्तांकडे दुर्लक्ष करावे," असं आवाहन एनटीएनं केलं आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, NEET पेपर लीकच्या आरोपांनंतर परीक्षा रद्द, नवीन तारखेबद्दल NTA ने काय सांगितलं?

पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल का?

पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल का यावर एनटीएनं म्हटलं, "मे 2026 च्या परीक्षा सत्रासाठी करण्यात आलेली नोंदणीची माहिती, उमेदवारीची स्थिती आणि उमेदवारांनी निवडलेली परीक्षा केंद्रे ही सर्व माहिती पुन्हा आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेसाठीही कायम ठेवली जाईल."

"यासाठी कोणत्याही प्रकारची नवीन नोंदणी करणे आवश्यक असणार नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले शुल्क त्यांना परत केले जाईल. ही परीक्षा एनटीएच्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून पुन्हा घेतली जाईल," असंही एनटीएनं नमूद केलं आहे.

परीक्षा नेमकी का रद्द करण्यात आली?

एनटीएनं 10 मे रोजी जारी केलेल्या निवेदनात नीट (यूजी) 2026 परीक्षेच्या संदर्भात कथित अनियमिततांबाबत राजस्थानच्या 'स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप'ने कारवाई सुरू केल्याची माहिती दिली होती. तसेच कारवाईविषयी एनटीएला पूर्ण कल्पना असल्याचंही नमूद केलं होतं.

या निवेदनात एनटीएनं म्हटलं होतं, "परीक्षा झाल्यानंतर 4 दिवसांनी म्हणजेच 7 मे 2026 च्या उशिरा रात्री एनटीएला परीक्षेच्या संदर्भात कथित गैरप्रकारांविषयी काही माहिती मिळाली. या माहितीची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी आणि आवश्यक ती कारवाई करण्यासाठी एनटीएने 8 मे 2026 च्या सकाळीच ही माहिती केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवली."

3 मे रोजी भोपाळ येथील परीक्षा केंद्रावर NEET UG 2026 परीक्षेसाठी प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा कर्मचारी परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रांची तपासणी करत आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 3 मे रोजी भोपाळ येथील परीक्षा केंद्रावर NEET UG 2026 परीक्षेसाठी प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा कर्मचारी परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रांची तपासणी करत आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"त्यानंतर कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी केलेली कारवाई ही त्या यंत्रणांच्या तत्पर कामगिरीचाच परिणाम आहे. अलीकडच्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांतून याबाबत अटकेचीही माहिती समोर आली आहे," अशी माहिती एनटीएनं दिली.

एनटीएनं 8 मे 2026 रोजी उपस्थित झालेल्या बाबींची स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कारवाईसाठी हे प्रकरण केंद्रीय संस्थांकडे सोपवलं होतं.

आता सरकारने या संदर्भातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि चौकशीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, रेकॉर्ड्स आणि इतर सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देऊ, असं एनटीएनं म्हटलं आहे.

राजस्थानचे मंत्री किरोरी लाल मीना यांनी एएनआयला सांगितले, "प्रश्नपत्रिकेतील 320 पैकी 120 प्रश्न फुटले होते, असे म्हटले जात आहे. केरळ असो वा सीकर (राजस्थान), जो कोणी दोषी असेल तो यातून सुटू शकणार नाही."

"सरकारची संवेदनशीलता पाहा, पेपरफुटीची वस्तुस्थिती समोर येताच सरकारने तात्काळ परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशीचे आदेश दिले," असंही त्यांनी नमूद केलं.

राहुल गांधींनी परीक्षेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (11 मे) नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "मी नीट 2026 परीक्षेच्या पेपरफुटीची बातमी ऐकली. ही आता परीक्षा राहिलेली नाही. नीट हा एक लिलाव बनला आहे. परीक्षेच्या अवघ्या 42 तास आधी व्हॉट्सॲपवर अनेक प्रश्नांची विक्री होते."

राहुल गांधी

फोटो स्रोत, Elke Scholiers/Getty Images

"22 लाखांहून अधिक मुलांनी वर्षभर रात्रंदिवस, जागून अभ्यास केला आणि एका रात्रीत त्यांचे भविष्य उघडपणे विकले गेले. हे पहिल्यांदाच घडत नाही. 10 वर्षांत 89 वेळा पेपरफुटी, 48 वेळा फेरपरीक्षा झाली. प्रत्येक वेळी तीच आश्वासने आणि मग तेच मौन."

"मोदीजी, जेव्हा तुम्ही प्रत्येक अपयशाचे खापर जनतेवर फोडता, तेव्हा त्यात गरीब मुलांच्या भविष्याचाही समावेश होतो. 22 लाख मुलांचा विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे आणि भारताच्या तरुणांच्या स्वप्नांना मोदी सरकारपेक्षा मोठा धोका दुसरा नाही," अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनीही या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)