NEET अनियमितता आणि कथित पेपरफुटी प्रकरणी CBIची धडक कारवाई; 5 आरोपी अटकेत

फोटो स्रोत, Pravin Thackeray
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
NEET परीक्षेमधील अनियमितता आणि कथित पेपरफुटीशी संबंधित प्रकरणात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआयनं 5 आरोपींना अटक केली आहे. तसंच देशभरात अनेक ठिकाणी झडत्या घेतल्या आहेत. CBI ने याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
प्रसिद्धिपत्रकात सीबीआयने सांगितले की, "सीबीआयनं 12 मे 2026 ला या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. NEET UG-2026 परिक्षा घेताना अनियमितता आणि कथितरीत्या पेपरफुटी प्रकरणात, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून जी लेखी तक्रार करण्यात आली, त्याच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
"गुन्हेगारी कट, फसवणूक, गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), प्रीव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आणि द पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रीव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) ॲक्ट, 2024 अंतर्गत इतर संबंधित तरतुदींनुसार येणाऱ्या गुन्ह्यांसाठी हा एफआयआर नोंदवण्यात आला होता," असे सीबीआयने प्रसिद्धिपत्रकात म्हटले.
पुढे सीबीआयने म्हटले, "आतापर्यंत, या प्रकरणात सीबीआयनं 5 आरोपींना अटक केली आहे. त्यातील 3 जणांना जयपूरमधून तर एकाला गुरुग्राम आणि एकाला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या इतरही अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे."
"सीबीआयनं देशातील अनेक ठिकाणी झडत्यादेखील घेतल्या आहेत. समोर येत असलेल्या नव्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे, पुढील झडत्या आणि तपासकार्य सुरू आहे.
"या झडत्या घेताना आणि अटक करत असताना, गुन्ह्याशी संबंधित अनेक पुरावे आणि मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. तपास करताना सीबीआय, राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) बरोबर समन्वय साधून आहे. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनंच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली होती.
"सीबीआय या कथित पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित सर्व धाग्यादोऱ्यांच्या पाठपुरावा सखोल तांत्रिक आणि फॉरेन्सिक विश्लेषणाद्वारे करतं आहे. तसंच या प्रकरणाचा सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि व्यावसायिक किंवा निपुण स्वरुपाचा तपास करण्यासाठी सीबीआय कटिबद्ध आहे, असे सीबीआयने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले.
याआधी काय घडले?
याप्रकरणी, पोलिसांनी 12 मे रोजी कारवाई करत सर्वात आधी नाशिकमधून एका 30 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले होते.
NEET परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नाशिक पोलिसांनी आरोपीला CBI च्या ताब्यात दिलं होतं.
पहिला प्रश्नपत्रिकेचा संच इथूनच एका टेलिग्राम ग्रुपवर पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
दरम्यान, या प्रकरणात आपल्या मुलाचा या प्रकरणाशी संबंध नाही. तो निर्दोष सुटेल असं त्याच्या वडिलांनी म्हटलं होतं.
नाशिक पोलिसांनी काय माहिती दिली होती?
नाशिक पोलिसांनी अशी माहिती दिली होती की "प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर तिची पहिली कॉपी नाशिकमधून समोर आली होती. नाशिकमधून लीक झालेला हा प्रश्नपत्रिकेचा संच हरियाणात पोहोचला.

फोटो स्रोत, UGC
"तिथे या लीक झालेल्या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले होते. त्यानंतर NEET ची प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत सहज पोहोचली," असे पोलिसांनी सांगितले होते.

फोटो स्रोत, ANI
नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार, "देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं.
"राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं. तो सीहोर येथील सत्यसाई युनिव्हर्सिटीत BAMS च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता," असं पोलिसांनी सांगितले होते.
'देवदर्शनासाठी निघाला होता आरोपी'
पोलिसांनी सांगितलं होतं की, "आमच्याकडे नाव होतं, पण पत्ता आणि इतर माहिती नव्हती. काही तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला.
"त्याने कपडे बदलले होते आणि मुंडण केलं होतं. तो देवदर्शनासाठी जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची चौकशी करण्यात आली."
त्याने पेहराव बदलला होता तरी त्याला ओळखून पोलिसांनी संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेतले आणि नंतर सीबीआयकडे सोपवले, अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























