राएद अहमद : सद्दाम हुसेनला चकवा देऊन ऑलिम्पिक व्हिलेजमधूनच पळून गेलेला इराकचा ऑलिम्पियन

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॉर्ज राइट
- Role, बीबीसी न्यूज
"राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्याकडं पाहायचं नाही," अशी सूचना 1996 च्या अॅटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी राएद अहमद यांना देण्यात आले होते.
अमेरिका आणि क्लिंटन दोघांनाही इराकला उध्वस्त करायचं आहे. त्यामुळं त्यांना आदर द्यायचा नाही, असं इराकचे वेटलिफ्टर राएद अहमद यांना सांगण्यात आलं.
इराकच्या ऑलिम्पिक समितीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना हा संदेश पोहोचवण्यात आला होता. त्यावेळी इराकची ऑलिम्पिक समिती सद्दाम हुसेनचा मोठा मुलगा उदय यांच्या आदेशानुसार काम करत होती.
"उजवीकडं किंवा डावीकडं पाहायचं नाही. कारण त्याठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असू शकतात. त्यांच्याकडं पाहायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यावर मी ठीक आहे, असं म्हटलं,'' अशी आठवण राएद सांगतात.
राएद यांनी राष्ट्रध्वजासह मैदानामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट झळकत होता. त्यावेळी ते 29 वर्षांचे होते. दोन इतर क्रीडापटू स्पर्धेत असतानाही त्यांनाच या सन्मानासाठी निवडण्यात आलं होतं.
एका क्षणानं आयुष्य पालटलं
इराकच्या अधिकाऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. पण तरीही राएद यांनी उजव्या बाजूला पाहिलं.
"मला विश्वासच बसला नाही की, क्लिंटन आम्हाला पाहत होते. त्यांनी आम्हाला पाहिलं तेव्हा ते आनंदी दिसत होते. ते उभे राहिले आणि टाळ्या वाजवत होते," असं राएद सांगतात.
पण या एका क्षणानं राएद यांचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं.

फोटो स्रोत, Getty Images
राएद यांचा जन्म 1967 मध्ये इराकच्या बसरा शहरात एका शिया मुस्लीम कुटुंबात झाला होता. राएद यांचे वडील बॉडी बिल्डिंग (शरीर सौष्ठव) चे प्रशिक्षक होते. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीलाच राएद यांनी वेटलिफ्टिंगमध्ये (भारोत्तोलन) यश मिळवण्यास सुरुवात केली होती.
1984 मध्ये ते 99 किलो वजन गटातील नॅशनल चॅम्पियन बनले. पण राएद क्रीडाविश्वात नाव कमावत असतानाच त्यांच्या मातृभूमीमध्ये राजकीय उलथा-पालथ व्हायला सुरुवात झाली होती.
1991 मध्ये शिया अरबींनी इराकच्या दक्षिण आणि कुर्दिशांनी उत्तरेत बंड करण्यास सुरुवात केली होती.
हे बंड पहिल्या आखाती युद्धाच्या समाप्तीनंतर सुरू झाला होता. त्याच्या एका वर्षापूर्वी इराकच्या लष्करानं कुवेतवर हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वातील विविध राष्ट्रांच्या (बहुराष्ट्रीय) लष्करानं इराकचा पराभव केला होता.
1991 मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात बहुराष्ट्रीय लष्करानं हल्ले सुरू करण्यापूर्वी, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी एक संदेश जाहीर केला. त्यात या युद्ध आणि रक्तपातापासून बचावाचा एक मार्ग असल्याचं इराकच्या नागरिकांना सांगण्यात आलं.
"इराकचं लष्कर आणि जनतेनं हे प्रकरण त्यांच्या हाती घेऊन हुकूमशहा सद्दाम हुसेनला सत्तेवरून उतरवावं,'' असं या संदेशात म्हटलं होतं.
बंडाची स्थिती नियंत्रणाबाहेर
अमेरिका सद्दाम विरोधातील बंडामध्ये सहकार्य करेल असं शिया आणि कुर्दिशांना वाटलं. त्यामुळं मार्च महिन्यात बंडाला सुरुवात झाली.
बसरा आणि इराकच्या इतर शहरांमध्ये शेकडो सामान्य नागरिक रस्त्यांवर उतरले. या नि:शस्त्र लोकांनी सरकारी इमारतीवर ताबा घ्यायाला सुरुवात केली. तुरुंगातील कैदेत असलेल्यांना सोडवलं आणि लहान-सहान शस्त्रागारांवर ताबा मिळवला.
देशातील 18 पैकी 14 प्रांतांवरचा सद्दामच्या लष्कराचा ताबा सुटला होता, एवढ्या मोठ्या पातळीवर हा बंड पोहोचलं. त्यामुळं बगदादपासून अवघ्या काही अंतरापर्यंत हा लढा पोहोचला होता.
मात्र हे बंड संपूर्ण देशात पसरला असतानाच, इराकच्या अंतर्गत प्रकरणात दखल देणं आणि सद्दाम हुसेनला हटवणं हे अमेरिकेचं धोरण नसल्याचं, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितलं.
त्यामुळं आखाती युद्ध संपल्यानंतर आणि बंडखोरांना अमेरिकेची मदत न मिळाल्यानं सद्दाम हुसेननं शिया आणि कुर्दिशांविरोधात दडपशाही सुरू केली. त्याच्या अत्यंत क्रूर अशा मोहिमेमध्ये हजारो लोक मारले गेले.
राएद यांनी त्या काळात सद्दामचे चुलत भाऊ अली हसन अल माजीद यांना पाहिलं होतं. सद्दामच्या या भावाला केमिकल अली या नावानं ओळखलं जात होतं. त्यांना बंडखोरांवर दडपशाही करण्याची आणि बसरा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उभं करून गोळ्या झाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
अमेरिकेनं तेव्हा इराकवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर व्हायला सुरुवात झाली होती. राएद यांच्यामते लोकांसमोर रोजच्या अन्नाच्या गरजा पूर्ण करण्याचंही संकट निर्माण झालं होतं.
राएदही या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करत होते.
इराकच्या इतर नागरिकांकडं ही संधी नव्हती. पण राएद यांना स्पर्धेच्या निमित्तानं विदेशात जाण्याची संधी होती.

फोटो स्रोत, Rex Features
पण इराकचे प्रमुख क्रीडापटू असणं म्हणजेच सद्दामचा क्रूर आणि कुख्यात मुलगा उदयचा सामना करणं. उदय हुसेन त्यावेळी इराकच्या ऑलिम्पिक समिती आणि इराकच्या फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष होते.
'त्यांना हवं तसं ते करायचे, कारण सद्दाम त्यांचे वडील होते'
क्रीडापटूंना चुका झाल्यामुळं शिक्षा देण्यासाठीही उदय हुसेन कुख्यात होते. एखाद्या फुटबॉलपटूकडून पेनल्टी मिस झाली अथवा, त्याला मैदानात रेड कार्ड दाखवण्यात आलं किंवा अपेक्षेप्रमाणं त्यानं कामगिरी केली नाही, तर उदय त्यांना वीजेचे शॉक द्यायचे. मलयुक्त पाण्यात त्यांना आंघोळ करायला लावलं जायचं किंवा त्यांना फाशीही दिली जात होती.
"त्यांना हवं तसं ते करायचे, कारण सद्दाम त्यांचे वडील होते," असं राएद म्हणतात.
इंटरनॅशनल स्पर्धांबाबत उदय यांच्या अपेक्षा जास्त असू नये, असा प्रयत्न राएद यांचा स्वतःला वाचवण्यासाठी असायचा.
"शिक्षा उपभोगल्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या क्रीडापटूंना मी पाहिलं होतं. फुटबॉल आणि बास्केटबॉलपटू स्पर्धेत भाग घेण्यासाठी जात असाल तर सावध राहण्याचा सल्ला द्यायचे,'' असं ते सांगतात.
"गोल्ड मेडल जिंकू शकाल का? असं उदय विचारायचे तेव्हा मी त्यांना नाही सांगायचो. गोल्ड मेडल जिंकण्यासाठी किमान चार वर्षे तयारी करावी लागेल आणि बसरामध्ये अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळं ते कठीण आहे. वेटलिफ्टिंगसाठी भरपूर जेवण आणि फिजिकल थेरपी गरजेची असल्याचं मी त्यांना सांगायचो.''
पण हळूहळू राएदला याची जाणीव होऊ लागली की, इराकमधून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा हा एक उत्तम मार्ग असू शकतो. त्यानंतर ते पूर्वीपेक्षा अधिक परिश्रम करू लागले. दिवसातून दोन सेशनमध्ये ते सराव करायचे. अधिक चांगली कामगिरी करता यावी यासाठी आठवड्यात पाच दिवस ते सराव करायचे.
1995 मध्ये राएद, वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी ते चीनला गेले होते. पण त्याठिकाणी चीनमधील अधिकाऱ्यांची करडी नजर होती. त्यामुळं त्यांना पळून जाण्याचा प्रयत्नही करता आला नाही. पण त्यांची कामगिरी चांगली झाली आणि त्यांना ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्यात यश आलं. अॅटलांटा ऑलिम्पिकसाठी ते पात्र ठरले.
अमेरिकेत पळून जाण्याचा डाव
अमेरिकेत अधिक संधी उपलब्ध असतील हे राएद यांच्या लक्षात आलं होतं. ऑलिम्पिकसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेत असलेल्या त्यांच्या मित्रांशी संपर्क केला. या सगळ्यात किती धोका असू शकतो? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images
जर आपल्याला परत इराकला पाठवलं तर काय होईल? आपल्या कुटुंबाबरोबर काय होईल? इराकच्या अधिकाऱ्यांच्या निगराणीतून कसं पळून जाता येईल? विमान अमेरिकेत उतरल्यानंतर पळून जाणं शक्य तरी होईल का? असे अनेक प्रश्न राएद यांना पडले होते.
ऑलिम्पिक व्हिलेज (गाव) मध्ये पोहोचल्यानंतर राएद आजूबाजूला असलेल्या सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत होते. कोणाला संशय येऊ नये याची ते काळजी घेत होते. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत त्यांना राष्ट्रध्वज हाती घेऊन संघाच्या नेतृत्वाची संधी मिळाली होती.
सद्दाम हुसेनचे माजी दुभाषक अम्मार मेहमूद हेही ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या पथकासह अॅटलांटामध्येच होते. उद्घाटन सोहळ्याच्या आधी त्यांनी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्याकडं पाहायचं नाही, असं अनेकदा सांगितलं होतं.
"इराकचे नागरिक अमेरिका आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना पसंत करत नाही, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं," असं राएद यांनी सांगितलं.
राएद 19 जुलै 1996 ला ऑलिम्पिक ट्रॅकवर आले तेव्हा मेहमूद त्यांच्या मागेच उभे होते. त्यांनी राएद यांना क्लिंटन यांच्याकडं पाहताना पाहिलं होतं. पण ते काहीही म्हणाले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इराकच्या संघासाठी टाळ्या वाजवत असल्याचं पाहून त्यांनाही आश्चर्य झालं होतं.
त्यानंतर राएद यांच्या मनातील सर्व शंका मिटल्या होत्या. आता परत इराकला जायचं नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. पण अमेरिकेत राहणार कसं हा प्रश्न कायम होता.
राएद यांनी अमेरिकेतील त्यांचे मित्र मोहसीन फरिदी यांना फोन केला आणि त्यांची कल्पना सांगितली. त्यानंतर जॉर्जिया विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले इंतिफाद कम्बर त्यांना भेटण्यासाठी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आले. त्यांच्याकडं याठिकाणी जाण्यासाठीचा पास होता.
राएद यांनी त्यांना तिथून बाहेर पडण्यासाठी मदत मागितली. दोघं अत्यंत गोपनीय पद्धतीनं भेटले होते. पण इराकच्या अधिकाऱ्यांना राएद यांच्याबाबत संशय आला होता.
"मला अमेरिकेत राहण्याची इच्छा आहे असा संशय इराकच्या ऑलिम्पिक अधिकाऱ्यांना आला होता. त्यांनी मला थांबण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं. तसं केल्यास मला तुरुंगात पाठवलं जाऊ शकतं, असं राएद म्हणाले.
पण राएद यांचा ठाम निश्चय झाला होता. त्यांची योजनाही तयार होती. पण त्यापूर्वी त्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचं होतं. मात्र त्यांना प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देता आलं नाही. ते शेवटून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी दोन संधींमध्ये एकूण 665.6 पाऊंड एवढं वजन उचललं. पण स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्यांचं लक्ष्य केवळ ऑलिम्पिक व्हिलेजमधून पळून जाण्याचंच होतं.
पळून जाण्यात यश
इराकचा ऑलिम्पिक संघ जवळच असलेल्या प्राणी संग्रहालयात जाण्याची तयारी करत होता. त्यावेळी संघातील सदस्य नाश्त्यासाठी निघाले तेव्हा राएद यांनी काहीतरी खोलीत विसरलं आहे असं दाखवलं. तो दिवस होता 28 जुलै 1996 चा.

फोटो स्रोत, Rex Features
त्यानंतर त्यांनी अत्यंत घाईनं बॅग पॅक केली आणि ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर पडले. बाहेर कम्बर त्यांची वाट पाहत होते. राएद कारममध्ये बसले आणि ते दोघं निघाले.
"त्यावेळी मी फक्त कुटुंबाचा विचार करत होतो. मी पळून गेल्याचं समजल्यानंतर इराकचे अधिकारी त्यांच्याबरोबर काय वर्तन करतील याची मला चिंता होती. मी स्वतःसाठी घाबरत नव्हतो. कारण मला चांगल्या लोकांची मदत मिळाली आहे याची मला जाणीव झाली होती. त्यामुळं मला काहीही धोका नव्हता,'' असं राएद म्हणाले.
पळून गेल्यानं अडचणी वाढल्या
मला कुटुंबाबाबत भीतीही होती आणि काळजीही. सर्व कागदपत्रं इराकच्या अधिकाऱ्यांकडं असल्यानं राएद यांच्याकडं पासपोर्ट नव्हता. त्यामुळं त्यांची मदत करण्यासाठी न्यूयॉर्कहून आलेल्या इराकी-अमेरिकन वकिलाला ते भेटले. त्यानंतर ते सर्व एका इमिग्रेशन एजन्सीमध्ये गेले आणि तिथं जाऊन त्यांनी राएदला अमेरिकेत राहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.
त्यानंतर राएद यांच्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करून त्यांना जगभरातील माध्यमांसमोर बोलण्यास सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेनंतर द न्यूयॉर्क टाइम्सनं राएद यांच्या वक्तव्यावर ''माझं माझ्या देशावर प्रेम आहे, पण तिथलं सरकार (शासन) मला आवडत नाही'', अशा मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केलं.

फोटो स्रोत, Getty Images
या पत्रकार परिषदेनंतर उदय हुसेननं सीएनएनच्या कार्यालयात फोन केला आणि ''माझ्या पूर्ण कुटुंबाला बंदी बनवलं असल्यानं मला परतावं लागेल,'' असा संदेश द्यायला सांगितलं.
पण राएद यांनी इराकला परतण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सोडण्यात आलं. मात्र राएद यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ कुटुंबीयांशी बोलता आलं नाही.
"कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या होत्या. लोक त्यांच्याशी बोलतही नव्हते. माझी आई एका शाळेची संचालिका होती. तिलाही नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं,'' असं राएद यांनी सांगितलं.
अमेरिकेत शरण मिळाल्यानंतर पत्नीचा बनावट पासपोर्ट तयार करण्यासाठी लागणारा पैसा जमा करण्यासाठी ते आठवड्यातील सातही दिवस काम करत होते. 1998 मध्ये त्यांच्या पत्नी जॉर्डनला पोहोचण्यात यशस्वी झाल्या आणि त्याठिकाणी संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन त्या अमेरिकेत पोहोचल्या.
राएद आणि त्यांचं कुटुंब मिशिगनच्या डियरबोर्नमध्ये स्थायिक झालं. आजही ते तिथंच राहतात. त्यांची पाच मुलं आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर अरबी समुदायाचे लोक राहतात. 2003 मध्ये इराक युद्ध सुरू झाल्यानंतर हजारो इराकींनी या परिसरात शरणागती पत्करली होती.
"डियरबोर्न बगदादसारखंच आहे,'' असं राएद म्हणतात. त्यांनी याठिकाणी जुन्या कारच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. तसंच वेटलिफ्टिंग प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं. इराकींनी याठिकाणी तयार केलेल्या फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या संघांनाही त्यांनी प्रशिक्षण दिलं.

फोटो स्रोत, RAED AHMED
सद्दाम हुसेनच्या पतनानंतर 2004 मध्ये प्रथमच ते इराकला परतले. "संपूर्ण कुटुंब माझी वाट पाहत होतं. सर्वांना मला भेटायचं होतं. मीही त्यांना 1996 नंतर पाहिलं नव्हतं. मला पाहिल्यानंतर ते रडू लागले. मला पुन्हा पाहत आहेत, यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता,'' अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
राएद यांचे आई-वडील अजूनही बसरामध्येच राहतात. कोरोना संक्रमणापूर्वी दरवर्षी ते अमेरिकेत मुलाला भेटायला येत होते.
इराकसारखं वातावरण असलेल्या परिसरात राहणं आवडेल, पण भविष्यात कदाचित मिशिगनमध्येच राहील असं राएद सांगतात.
"मला फ्लोरिडाला जायची इच्छा आहे. कारण तिथलं वातावरण इराकसारखंच आहे. मिशिगनमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान राहणं अत्यंत कठीण असतं. प्रचंड थंडी आणि बर्फ पडत असतो. मी इथं येण्यापूर्वी कधीही बर्फ पाहिला नव्हता. तीन-चार इंच बर्फाचा थर असतानाही लोक बाहेर कसे पडतात, असा विचार मनात येतो,'' असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








