इराणच्या एकमेव महिला ऑलिम्पिक पदक विजेतीने सोडला देश कारण...

किमिआ अलिझादे, इराण, अमेरिका, युक्रेन

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, किमिआ अलिझादे

इराणसाठी एकमेव ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या किमिआ अलिझादेने आपण देश सोडत असल्याचं जाहीर केलं आहे.

'ढोंगीपणा, असत्य, अन्याय आणि खुशमस्करी' या सगळ्याचा भाग व्हायचं नसल्याने आपण इराण देश सोडल्याचं 21 वर्षांच्या अलिझादेने सोशल मीडियावर म्हटलंय.

आपण 'इराणणधल्या लाखो पीडित महिलांपैकी एक' असल्याचं तिने म्हटलं आहे.

आपण नेमके कुठे आहोत हे अलिझादेने स्पष्ट केलं नसलं तरी ती नेदरलँड्समध्ये प्रशिक्षण घेत असल्याचं वृत्त आहे. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकच्या तायक्वांडो स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकत किमिआ अलिझादेने इराणसाठी इतिहास रचला होता.

पण इस्लामिक राष्ट्र असणाऱ्या इराणमधल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या यशाचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी केल्याचं तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

सध्या इराण आणि अमेरिकेत वाद सुरू आहे. शिवाय बुधवारी इराणने चुकून युक्रेनचं विमान पाडल्यापासून इराणमध्ये निदर्शनांना सुरुवात झालीय. यासगळ्या दरम्यानच अलिझादेने देश सोडल्याचं वृत्त आलंय.

अधिकाऱ्यांनी अपमान केला

"मुस्कटदाबी करण्यात आलेल्या इराणमधल्या लाखो महिलांपैकी मी एक आहे," ती लिहिते.

"ते सांगतील ते कपडे मी घातले, ते सांगतिल त्याप्रमाणे मी वागले. त्यांनी आदेश दिलेल्या प्रत्येक वाक्याचा मी आजवर पुनरुच्चार केला. त्यांच्यासाठी आम्ही फक्त प्यादी आहोत, बाकी काही नाही."

खेळामधल्या आपल्या यशाचा सरकारने एकीकडे राजकीयदृष्ट्या फायदा घेतला पण दुसरीकडे सरकारी अधिकारी आपल्याला "बायकांनी पाय ताणणं चांगलं लक्षण नाही," यासारखे टोमणे मारत, असं तिने पुढे म्हटलंय.

युरोपातून बोलावणं आलं, आकर्षक ऑफर देण्यात आल्याचं वृत्त अलिझादेने फेटाळून लावलं असलं तरी ती नेमकी कोणत्या देशात गेली आहे हे तिने जाहीर केलेलं नाही.

किमिआ अलिझादे, इराण, अमेरिका, युक्रेन

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, अमेरिकेने सुलेमानी यांना मारल्यानंतर या प्रदेशातलं वातावरण तापलं आहे.

अलिझादे नाहीशी झाल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात आल्यानंतर इराणी नागरिकांना धक्का बसला होता.

'इराणची मानवी संपत्ती' अशा प्रकारने बाहेर जाऊ दिल्याबद्दल इराणचे राजकारणी अब्दुलकरीम हुसैनजादे यांनी 'अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर' टीका केली होती.

तर 'इराणच्या तायक्वांडो विश्वाला धक्का, किमिआ अलिझादेचं नेदरलँड्सला देशांतर' अशी बातमी गुरुवारी इराणमधील इस्ना या वृत्तसंस्थेने दिली होती.

अलिझादेला 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचं असलं तरी तिला इराणकडून खेळायचं नसल्याचं या वृत्तसंस्थेने म्हटलंय.

इराण सोडण्यामागचा आपला हेतू अलिझादेने जाहीर केला असला तरी आपल्या पुढच्या योजना तिने अद्याप जाहीर केलेल्या नाही. पण आपण कुठेही असलो तरी कायमच 'इराणची कन्या' राहू असं तिने म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)