भारत-पाकिस्तान 1971 युद्ध : भारतीय मेजरने जेव्हा आपल्या हातांनी स्वतःची मांडी कापून काढली होती...

फोटो स्रोत, IAN CARDOZO
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
7 डिसेंबर 1971. अतग्राम आणि गाझीपूर येथील लढाईत पाकिस्तानी सैनिकांना पराभूत केल्यानंतर 5 गोरखा रायफल्समधील चौथ्या बटालियनच्या जवानांना आराम करण्यासाठी 4 दिवस देण्यात आले होते.
त्या जवानांनी तलावात आंघोळ करून आपले कपडे वाळवत टाकलेच होते, इतक्यात कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल हरोळीकर यांना ब्रिगेडच्या मुख्यालयातून फोन आला.
चौथ्या बटालियनला मुख्यालयातून आता आणखी एक काम देण्यात आलं होतं. त्यामुळे तिथून आणखी पुढे जाण्याची गरज पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हरोळीकर यांनी त्याचा विरोध केला. जवान चार दिवसांपासून झोपलेले नाहीत. त्यांना आरामाची सक्त गरज आहे, असं हरोळीकर म्हणाले.
पण ब्रिगेड कमांडर बंटी क्विन म्हणाले, "हॅरी, मी याचा विरोध केला नाही, असं तुम्हाला वाटतं का? माझंही कुणीच ऐकून घेतलं नाही."
सिल्हेटला लँड करताच भारतीय सैनिकांवर हल्ला
घडलं असं की पाकिस्तानच्या 202 इन्फेंट्री ब्रिगेडला सिल्हेटमधून हटवून ढाकाच्या सुरक्षिततेसाठी नेण्यात आलं आहे, अशी सूचना कोर कमांडर जनरल सगत सिंह यांना मिळाली होती.
तिथं फक्त 300 रझाकारांना सिल्हेटच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलं होतं.
जनरल सगत सिंह यांनी योजना बनवली. गोरखा सैनिकांकडे उपलब्ध असलेल्या 10 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने त्यांना सिल्हेटमध्ये उतरवण्यात यावं. तिथं कब्जा करावा, असा त्यांचा विचार होता.
गोरखा बटालियनला सकाळी साडेसात वाजता हेलिबॉर्न ऑपरेशनचे आदेश मिळाले.

फोटो स्रोत, SAGAT SINGH FAMILY
साडेनऊ वाजता त्यांनी आपल्या नियोजनानुसार सराव केला. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता त्यांची मोहीम सुरू झाली. कलौराहून सर्वप्रथम सात MI 4 हेलिकॉप्टर गोरखा सैनिकांना घेऊन सिल्हेटच्या दिशेने रवाना झाली. गोरखा सैनिक सिल्हेटला उतरण्यात यशस्वी ठरले.
नुकतेच प्रकाशित झालेल्या 1971 स्टोरीज ऑफ ग्रिट अँड ग्लोरी फ्रॉम द इंडो-पाक वॉर पुस्तकाचे लेखक मेजर जनरल इयान कारडोजो सांगतात, "गोरखा बटालियनच्या जवानांना कधीच हेलिबॉर्न ऑपरेशनची ट्रेनिंग देण्यात आलेली नव्हती. इतकंच नव्हे तर ते पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमध्ये बसले होते.
मेजर मणि मलिक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन वाजता पहिलं हेलिकॉप्टर सिल्हेटला पोहोचलं.
त्यामधून गोरखा सैनिक खाली उतरतच होते, इतक्यात पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पाहिलं. त्यांनी अल्लाह हो अकबरचा नारा लावत हेलिकॉप्टरवर हल्ला चढवला.
"पहिल्या फेरीदरम्यान आमच्या सीओचा रेडिओ सेट आमच्याकडे नव्हता. त्यामुळे आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत, हे आम्ही ब्रिगेड कमांडरला सांगू शकलो नाही."
पाकिस्तानी सैनिकांवर कुकरी हल्ला
या हल्ल्याचं काही वर्णन अर्जुन सुब्रमण्यम यांच्या इंडियाज वॉर्स 1947-1971 या पुस्तकातही पाहायला मिळतं.
सुब्रमण्यम विंग कमांडर एससी शर्मा यांना सांगतात, "मी MI हेलिकॉप्टरच्या पहिल्या फेरीत सिल्हेटला उतरलो होतो. माझ्यासोबत 75-80 गोरखा शिपाई होते. हेलिकॉप्टरचा आवाज इतका मोठा होता की खाली आमच्या कशा पद्धतीने स्वागत होणार आहे, याची कल्पना आम्हाला आली नाही."
जमिनीवरून पाच फूट उंचीवरून आम्ही उड्या मारायला सुरुवात केली. पण खाली उतरताच आमच्या दिशेने फायरिंग होत असल्याचं आम्हाला लक्षात आलं.

फोटो स्रोत, PENGUIN EBURY PRESS
लेफ्टनंट कर्नल हरोळीकर यांनी सर्व सैनिकांना जमिनीवर पडून राहण्यास सांगितलं. पाकिस्तानी सैनिक आमच्या दिशेने अल्लाह हो अकबर ओरडत पुढे आले.
सारे गोरखा जमिनीवर चुपचाप पडून होते. पाकिस्तानी सैनिक 40 फूट अंतरावर येताच त्यांनी जय काली माँ अयो गुरखाली नारा लावत त्यांच्या दिशेने धाव घेतली.
गोरखा सैनिकांनी पाकिस्तानींवर कुकरी (चाकूसारखं हत्यार) हल्ला सुरू केला. पाकिस्तानी सैनिकांनी तिथून पळ काढून 400 मीटर अंतरावरील एका गावात आश्रय घेतला.
चुकीच्या माहितीच्या आधारे लँडिंग
खरं तर, 202 पाकिस्तानी ब्रिगेडला सिल्हेटमधून हटवून ढाकाला नेण्यात आलं आहे, अशी चुकीची माहिती जनरल सगत सिंह यांना मिळालेली होती.
313 ब्रिगेडला ढाकाला जाण्यास सांगण्यात आलं होतं. पण ते ढाकाला जाण्याऐवजी सिल्हेटला आले होते.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
त्यामुळे गोरखा सैनिकांची बटालियन सिल्हेटला दाखल झाली त्यावेळी त्यांचा सामना एकाच वेळी पाकिस्तानच्या दोन ब्रिगेड्सशी होणार होता.
दुसऱ्या दिवशी काही गोरखा सैनिकांना घेऊन काही हेलिकॉप्टर्स सिल्हेटमध्ये लँड झाले, त्यावेळी बारताने तिथं दुसरी बटालियन पाठवली आहे, असा गैरसमज पाकिस्तानी सैनिकांमध्ये पसरला.
भारतीय सैनिकांच्या परिस्थितीचं वर्णन PVS जगनमोहन आणि समीर चोपडा यांनी आपल्या ईगल्स ओव्हर बांगलादेश या पुस्तकात अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे.
ते लिहितात, "भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर्स आणि गोरखा सैनिकांच्या अचानक लँडिंगमुळे तिथं उपस्थित असलेले पाकिस्तानी ब्रिगेड कमांडर काहीसे चिडले.
"गोरखा सैनिकांना सिल्हेटमध्ये अत्यंत कमी प्रतिकार होईल, असं जनरल सगत सिंह यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्याच्या विपरीत घडलं. गोरखा सैनिक उतरताच तिथं पाकिस्तानी सैनिकांचा मोठ्या संख्येने त्यांना सामना करावा लागला. तसंच त्यांच्यापर्यंत जमिनीमार्गे कोणतीच कुमक पाठवणं भारतीय सैन्याला शक्य नव्हतं."
अन्न-पाणी संपलं
सिल्हेटमध्ये उतरलेल्या गोरखा सैनिकांची संख्या फक्त 384 होती. काही वेळातच पाकिस्तानी सैनिकांना त्यांची संख्या माहीत होणार होती.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
9 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत गोरखा सैनिक तिथं उतरून 48 तास उलटून गेले होते. त्यांना लिंक-अपचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण तेही पूर्ण झालं नाही.
त्यांच्याकडील अन्नपदार्थ आणि पाणी संपू लागलं. जखमी आणि मृतांची संख्याही वाढू लागली.
स्थानिकांनी मागे टाकून पळून गेलेल्या झोपड्यांमधून त्यांना थोडंफार जेवण उपलब्ध होत होतं.
पाण्यासाठी त्यांना गलिच्छ अशा तलावांवर अवलंबून राहावं लागत होतं. ते आपल्या रुमालातून पाणी गाळून ते पीत होते.
याचदरम्यान, भारताला बीबीसीकडून अप्रत्यक्ष स्वरुपात मदत मिळाली.
बीबीसीच्या चुकीमुळे भारतीय सैनिकांना फायदा
त्यावेळी जगाला या लढाईचं योग्य चित्र समजावं यासाठी भारतीय सैन्याने काही परदेशी पत्रकारांना आपल्यासोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता.

फोटो स्रोत, IAN CARDOZO
जनरल कारडोजो सांगतात, "त्यावेळी बातम्यांचे फक्त तीन स्त्रोत होते. पहिलं, रेडिओ पाकिस्तान - ज्याला आम्ही रेडिओ झूठिस्तान, असं म्हणायचो. दुसरं आकाशवाणी - पण आकाशवाणीच्या बातम्यांना लष्कराच्या मुख्यालयातून क्लिअरन्स घ्यावा लागायचा त्यामुळे त्या उशीरा यायच्या. तिसरं म्हणजे बीबीसी - त्यांची विश्वसनीयता खूप जास्त होती."
बीबीसीच्या युद्ध प्रतिनिधींनी त्या दिवशी रेडिओ बुलेटिनमध्ये एक बातमी दिली होती. त्यामध्ये भारताने सिल्हेटमध्ये आपली संपूर्ण ब्रिगेड उतरवल्याचं सांगितलं होतं. हे वृत्त प्रसारित झालं तेव्हा दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने होतं आणि बीबीसीचं प्रसारण ऐकत होतं.
"कर्नल हरोळीकर म्हणाले, 'बीबीसीने काय म्हटलं, तुम्ही ऐकलं का? आश्चर्यचकीत होऊन एका अधिकाऱ्याने उत्तर दिलं, बीबीसीकडून अशी चूक झाली, याचं आश्चर्य वाटतं. मी लगेच म्हणालो, बीबीसीने चुकीचं काही म्हटलेलं नाही. त्यांनी अगदी योग्य सांगितलं आहे. पाकिस्तान्यांनीही हे ऐकलं असेल. आता आपण एक ब्रिगेडच आहोत, असं आपल्याला भासवलं पाहिजे.
बटालियनला विखुरण्यास सांगितलं
जनरल कारडोजो सांगतात, "आमचे सीओ आणि मी मिळून आपल्या बटालियनला मोठ्या परिसरात पसरवलं. काही सैनिकांना स्वयंचलित शस्त्रं देऊन मोठ-मोठ्या गॅप्समध्ये तैनात करण्यात आलं. पाकिस्तानी सैनिकांना आम्ही एक ब्रिगेडच आहोत, असं भासवण्याचा आमचा विचार होता."

फोटो स्रोत, IAN CARDOZO
लवकरच एका टेकडीसदृश उंचवट्यावर कब्जा करा, असं गोरखा सैनिकांच्या प्लाटूनला सांगण्यात आलं. कारण, त्यांच्या ताब्यात हा उंच भाग गेल्यास भारतीय सैनिकांची संख्या कमी असल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं असतं.
दरम्यान, त्याच वेळी पाकिस्ताननेही तिथंच जाण्याची योजना बनवली. पण गोरखा सैनिक त्यांच्या आधी तिथं पोहोचण्यात यशस्वी ठरले. त्यांनी उंचावरून फायरिंग करून पाकिस्तानी सैनिकांना तिथंच रोखलं.
गोरखा सैनिकांनी कुकरींना धार चढवली
दरम्यान, पाकिस्तानी सैन्य मोठा हल्ला करण्याच्या उद्देशाने एकत्र येत असल्याचं दिसताच भारतीय सैनिक वायुदलाची मदत घेत. त्यानंतर भारतीय वायुदलातील मिग-21 आणि हंटर विमान येऊन त्याठिकाणी बॉम्बहल्ले सुरू करत.

फोटो स्रोत, IAN CARDOZO
रात्री भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरताच त्यांनी मोठी कुमक घेऊन आल्याचं पाकिस्तानी सैनिकांना वाटायचं. मात्र, भारतीय हेलिकॉप्टर फक्त जखमी किंवा मृतांना घेऊन जाण्यासाठी तिथं येत होते.
गोरखांनी त्याठिकाणी गस्त घालणं, सापळा रचून हल्ला करणं, यांसारखी कामे सुरू केली. मात्र त्याचवेळी गोरखांकडील शस्त्रंही कमी होऊ लागली.
मेजर जनरल कारडोजो सांगतात, "आमचे सीओ आपल्या सैनिकी ठिकाणांवर जायचे त्यावेळी गोरखा आपल्याकडील कुकरींना धार चढवताना त्यांना नेहमीच दिसायचं. त्यांनी एकदा त्याचं कारण त्यांना विचारलं. तेव्हा गोरखा सैनिक म्हणाले, आपल्याकडील सर्व शस्त्रं संपल्यानंतर सर्वात विश्वसनीय शस्त्र म्हणून कुकरीचा वापर आम्ही करणार आहोत."
पाकिस्तानने आत्मसमर्पणाचा प्रस्ताव ठेवला
गोरखा सैनिकांनी सिल्हेटमध्ये अशा प्रकारे 8 दिवस घालवले. 15 डिसेंबर 1971 च्या सकाळी 9 वाजता भारताचे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करावी, असं आवाहन रेडिओवरून केलं.
ही घोषणा होताच दोन पाकिस्तानी अधिकारी पांढरे झेंडे घेऊन गोरखा तळाच्या दिशेने पुढे आले.

फोटो स्रोत, IAN CARDOZO
याचं वर्णन कर्नल आर. डी. पळसोकर यांनी आपल्या फॉरएव्हर इन ऑपरेशन या पुस्तकात दिलेलं आहे.
ते लिहितात, "त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचे कमांडर 4/5 गोरखा सैनिकांसमोर आत्मसमर्पण करण्यास तयार आहेत. पण सी कंपनीचे मेजर माने मलिक यांनी त्यांना 1500 मीटर अंतरावर येताना पाहिलं तेव्हा त्यांनी आपल्या कमांडिंग ऑफिसरला संदेश पाठवत विचारलं की काय आदेश आहे?
"लेफ्टनंट कर्नल हरोळीकर यांनी पुढे येऊन पाहिलं की 1 ते 2 हजार पाकिस्तानी सैनिक जंगलाच्या एका कोपऱ्यात जमा झाले आहेत. तोपर्यंत आत्मसमर्पणाची कोणतीच अधिकृत सूचना आली नव्हती. त्यामुळे सीओंना पाकिस्तानी सैनिकांच्या हेतूवर संशय आला."
भारतीय सैनिकांनी शरणागती स्वीकारण्यास नकार दिला
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय सैनिकांना एक चिठ्ठी दिली. गॅरीसन कमांडर भारतीय ब्रिगेड कमांडरसमोर संपूर्ण गॅरीसनची शरणागती पत्करण्यास तयार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, IAN CARDOZO
जनरल कारडोजो सांगतात, "आमच्याकडे एक संपूर्ण ब्रिगेड आहे, असं दाखवण्याचा आमचा डाव यशस्वी ठरला होता. पण जर पाकिस्तानींना याची माहिती मिळाल्यास ते कधीही पलटू शकतील, याची कल्पना त्यांना होती."
त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आल्यापावली परत फिरावं अशी सूचना त्यांनी केली. आतापर्यंत आम्हाला शरणागती स्वीकारण्याचे आदेश मिळालेले नाहीत, असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"भारतीय ब्रिगेड कमांडर त्यावेळी 100 मैल मागे होते. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांची शरणागती स्वीकारावी, याविषयी त्यांना एक कोडेड संदेश पाठवण्यात आला."
भारतीय ब्रिगेडियरना पाहून पाकिस्तानींना धक्का
15 डिसेंबर रोजी दुपारी भारतीय ब्रिगेड कमांडर बंटी क्विन हे हेलिकॉप्टरमधून सिल्हेटला दाखल झाले.
दुपारी 3 वाजता पाकिस्तानी गॅरीसन कमांडरशी त्यांची भेट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 16 डिसेंबर रोजी संपूर्ण सिल्हेट गॅरीसनने भारतीय सैनिकांसमोर आत्मसमर्पण केलं.

फोटो स्रोत, IAN CARDOZO
बंटी क्विन यांना हेलिकॉप्टरमधून उतरताना पाहून पाकिस्तानी सैनिकांना आश्चर्य वाटलं होतं. पण नंतर तर भारताची फक्त अर्धी बटालियन त्याठिकाणी पाकिस्तानच्या दोन ब्रिगेड्सचा सामना करत होती, हे त्यांना कळालं त्यावेळी त्यांना धक्का बसला.
एकूण 3 पाकिस्तानी ब्रिगेडियर, 173 अधिकारी, 290 JCO आणि 8 हजार सैनिकांनी भारतीय सैनिकांसमोर शस्त्र खाली ठेवलं.
शरणागती पत्करणारे पाकिस्तानी ब्रिगेडियर होते सलीमउल्लाह खाँ, इफ्तिकार राणा आणि एस. ए. हसन.
ही बटालियन इथं नसती तर आम्ही कमीत कमी 10 दिवस सिल्हेटमध्ये ठाण मांडून राहिलो असतो, असं गॅरीसन कमांडरनी ब्रिगेडियर क्विन यांना म्हटलं.

फोटो स्रोत, IAN CARDOZO
जनरल कारडोजो म्हणतात, "या घटनेला आता 50 वर्षं उलटून गेली आहेत. पण, बीबीसीच्या त्या ऐतिहासिक चुकीसाठी 4/5 गोरखा बटालियनच्या अधिकाऱ्यांना आणि जवानांना त्यांचे आभार मानायचे आहेत. बीबीसीसाठी ही मोठी चूक असेल, पण आमच्यासाठी त्यांचं हे सर्वात चांगलं प्रसारण होतं."
कारडोजो यांचा पाय भूसुरुंगावर पडला
या लढाईत गोरखा बटालियनचे 4 अधिकारी, 3 JCO आणि 123 जवान मारले गेले. पाकिस्तानी गोळीबारात त्यांची रेजिमेंटल अॅड पोस्टही उद्ध्वस्त झाली.
16 डिसेंबरच्या सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या कमांडरनी मोठ्या संख्येत पाकिस्तानी सैनिकांना शरणागतीची तयारी करताना पाहिलं. त्यावेळी त्यांना भीती वाटली. कारण तिथं भारतीय सैनिकांची संख्या अत्यंत कमी होती. मेजर कारडोजो यांना त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलं. तिथंच कारडोजो यांचा पाय पाकिस्तानने पसरवलेल्या भूसुरुंगावर पडला. त्यामुळे कारडोजो यांच्या पायाला गंभीर इजा झाली. त्यातून खूप जास्त रक्त वाहायला सुरुवात झाली होती.
कारडोजो याची आठवण सांगतात, "मला थोडी मॉरफीन द्या, असं मी डॉक्टरांना म्हणालो. पण मोहिमेदरम्यान गोळीबारात आपल्याकडची सगळी औषधं संपल्याचं मला डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी मी म्हणालो, तुम्ही हा पाय कापू शकाल का? पण त्यासाठी कोणतंच उपकरण माझ्याकडे नाही, असं डॉक्टर म्हणाले.
तेव्हा मी माझ्या एका सहकाऱ्याला कुकरीने माझा पाय कापण्यास सांगितलं. अखेर, मीच स्वतःच्या हातांनी माझा पाय मांडीतून कापला.
यानंतर जवानांना आदेश देत म्हणालो की जाऊन हा पाय जमिनीत पुरून टाका. मी आजही लोकांशी मजेत म्हणतो, अजूनही बांगलादेशात एक गुणिले एक फूट (1*1 फूट) जमिनीत माझा अंश आहे.
पाकिस्तानी डॉक्टरने केलं ऑपरेशन
यानंतर त्यांचे सीओ आले आणि म्हणाले, तू खूप भाग्यवान आहेस, एका पाकिस्तानी डॉक्टरने आपल्यासमोर आत्मसमर्पण केलं आहे. तोच तुझं ऑपरेशन करेल.
कारडोजोंनी त्याच्याकडून आपलं ऑपरेशन करून घेण्यास नकार दिला. मला लवकरात लवकर हेलिकॉप्टरने भारतात पाठवून द्या, असं ते म्हणाले.
पण पाकिस्तानी लष्कराने ढाकात आत्मसमर्पण केलेलं असल्यामुळे भारतीय लष्कराकडे रिकामं हेलिकॉप्टर उपलब्ध नव्हतं.
त्यावेळी कारडोजोंच्या सीओंनी पुन्हा म्हटलं, पाकिस्तानी डॉक्टरकडून ऑपरेशन करून घेण्यास नकार देऊन तू खूप मोठा मूर्खपणा करत आहेस.
कारडोजो ही आठवण सांगताना म्हणतात, "मी अत्यंत नाईलाजाने ऑपरेशन करून घेण्यास तयार झालो. पण मी सीओंसमोर दोन अटी ठेवल्या. मला कोणत्याच पाकिस्तानीचं रक्त चढवण्यात येऊ नये. दुसरं म्हणजे ऑपरेशन सुरू असताना तुम्ही स्वतः तिथं उपस्थित राहा. माझ्या दोन्ही अटी मान्य झाल्या.
पाकिस्तानी सर्जन मेजर मोहम्मद बशीर यांनी माझं ऑपरेशन केलं. ते हे आज वाचत असतील तर मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलं.
कारडोजो यांना आधी ओडिशातील चंद्रनगर आणि नंतर पुण्याला नेण्यात आलं. तिथं त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. ते भारतीय सैन्यातील पहिले शारीरीकरित्या अक्षम असलेले अधिकारी बनले, ज्यांनी एक बटालियन आणि एका ब्रिगेडला कमांड दिलं होतं.
इयान कारडोजो भारतीय लष्करातून मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. सध्या ते दिल्ली येथे राहतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








