हमीदुल्लाह खान : भोपाळच्या नवाबांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची ऑफर दिली गेली आणि...

पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा
    • Author, फारुख आदिल
    • Role, लेखक व स्तंभकार

1956 सालचा जुलै महिना पाकिस्तानच्या राजकीय इतिहासामध्ये विशेष महत्त्वाचा मानला जातो. 'पाकिस्तान क्रॉनिकल' (संपादक- अक़ील अब्बास जाफ़री) या वर्तमानपत्रानं म्हटल्यानुसार, 1956 साली 31 जुलै या दिवशी तत्कालीन पंतप्रधान चौधरी मोहम्मद अली यांना पदच्युत करण्यासाठीची वेगाने कारस्थानं होऊ लागली होती आणि ते राजकारणात एकटे पडले होते.

पंतप्रधानांसमोरच्या अडचणी अचानक उद्भवलेल्या नव्हत्या. 13 जुलै रोजी घडलेल्या एका घटनेमुळे सरकारचं प्रशासकीय व्यवस्थेवरचं नियंत्रण संपुष्टात आलं होतं.

त्या दिवशी कराचीच्या आयुक्तांनी व गृह सचिवांनी गुप्त पोलिसांच्या कार्यालयावर छापा टाकून मंत्र्यांची आणि सरकारमधील उच्चाधिकाऱ्यांची दूरध्वनी संभाषणं रेकॉर्ड करणारं उपकरण ताब्यात घेतलं.

या घटनेमुळे राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. त्याचप्रमाणे देशातील राजकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांचा पायरीसारखा वापर करून सत्ताधारी रचनेत स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या वर्गातील दरी वाढू लागली.

सत्ता टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या केल्या जाऊ लागल्या. निवडणुका स्थगित करण्याचा प्रयत्न याच क्लृप्तीचा भाग होता. माजी गृह मंत्री व तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) इस्कंदर मिर्झा यांना हा सगळा खटाटोप करण्याची सर्वाधिक गरज होती. 'युनिट वन' योजनेमुळे वाढणारी अस्वस्थतेची भावना त्यांनी स्वतःच्या हितसंबंधांसाठी वापरायचं ठरवलं होतं.

चौधरी मोहम्मद अली यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी हुसैन शहीद सहरवर्दी यांनाही घरी बसवण्यात इस्कंदर मिर्झा यांना यश मिळालं होतं. आता निवडणुकांशिवाय पंतप्रधान फिरोझ खान यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा ही त्यांच्या समोरची समस्या होती. यावर मात करण्यासाठी त्यांनी क़लात या गतकालीन संस्थानाचे राज्यकर्ते मीर अहमद यार खान यांना विश्वासात घेतलं.

"मी भोपाळच्या नवाबांना बोलावलंय, ते पंतप्रधान होतील, मी राष्ट्राध्यक्ष होईन, त्यानंतर सगळं पुन्हा स्थिरस्थावर होईल," असं मेजर जनरल (निवृत्त) इस्कंदर मिर्झा 'खान ऑफ कलात' मीर अहमद यार खान यांच्या कानात खुसफुसले.

"हे सगळं पार पडत असताना कोणताही अडथळा यायला नको एवढी तजवीज तुम्ही करा."

मोहम्मद अली जिन्ना आणि खान ऑफ कलात

फोटो स्रोत, KHAN OF KALAT FAMILY ARCHIVE

दुसऱ्या दिवशी सकाळी भोपाळचे नवाब सर हमीदुल्लाह खान पाकिस्तानची राजधानी कराचीला आले.

हे कारस्थान मार्गी लागायला थोडकाच वेळ उरला होता.

इस्कंदर मिर्झा यांच्या योजनेची सुरुवात

मीर अहमद यार खान यांच्या 'इन्साइड बलोचिस्तान' या पुस्तकात नमूद केल्यानुसार, त्या काळी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची बहीण फातिमा जिना, मुस्लीम लीगचे अध्यक्ष खान अब्दुल कय्युम खान आणि वर्षभरापूर्वी देशाचे पंतप्रधान राहिलेले पूर्व पाकिस्तानचे शक्तिशाली नेते हुसैन शहीद सहरवर्दी विरोधकांचं नेतृत्व करत होते.

लोक आगामी निवडणुकीची वाट बघत होते आणि विरोधकांमधील या मोठ्या नेत्यांच्या समोर आपलं काही फारसं चालणार नाही, या धोक्याची जाणीव राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना झाली होती.

या धोक्याचा अंदाज घेऊनच इस्कंदर मिर्झा यांनी तपशीलवार कट रचला. यात भोपाळचे नवाब आणि कलात संस्थानचे राज्यकर्ते खान यांना विशिष्ट भूमिका निभावायची होती.

ही कहाणी उलगडत होती तेव्हा 1957 सालचा उन्हाळा सुरू होता, बलोचिस्तानचं वाळवंट उन्हाखाली रणरणत होतं. बलोचिस्तानातील गतकालीन कलात या संस्थानातील सर्वसामान्य जनता आणि ज्येष्ठश्रेष्ठ सर्वच अस्वस्थ झाले होते.

कलातमधील स्थानिक परंपरा व बलोच संस्कृती विस्मरणात जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. वास्तविक खुद्द कायद-ए-आझम जिना यांनी या भागातील लोकांना त्यांच्या परंपरेचं रक्षण केलं जाईल असं लेखी आश्वासन दिलं होतं.

'वन युनिट' या योजनेद्वारे हे संरक्षण देण्यात आलं होतं, पण हे सुरक्षाकवच मोडीत काढण्यासाठी सरकारी अधिकारी वेळोवेळी काहीतरी पळवाट शोधून काढत आणि त्यामुळे स्थानिक लोकांच्या अस्वस्थतेत वाढ होत असे.

असाच काही काळ गेला आणि हिवाळ्याच्या मोसमात एकदा कलातचे राज्यकर्ते खान यांची जिनांचे कनिष्ठ सहकारी मिर्झा जवाद बेग यांच्याशी भेट झाली. त्या वेळी कराचीमध्ये जोरदार थंडी पडत असे. थंडीपासून बचाव करण्याकरता लोकांना ओव्हरकोट घालावा लागायचा.

त्या दिवशी संध्याकाळी खान ऑफ कलात ओव्हरकोट घालून आले. त्यांनी डोक्यावरची टोपी काढून ठेवली आणि दुःखी सुरात ते म्हणाले, "मिर्झा, चोरपावलांनी आलेली ही सत्तेची हाव आपल्याला उद्ध्वस्त करून टाकेल."

या संदर्भातील आठवण सांगताना मिर्झा जवाद बेग म्हणाले की, त्या वेळी कलात व बलोचिस्तानातील इतर काही शहरांमध्ये स्थानिक धुरीण व टोळ्यांचे प्रमुख यांच्यात सल्लामसलत सुरू होती. बलोचिस्तानातील लोकांना आश्वस्त वाटण्यासाठी काही ठोस पावलं उचलली नाहीत, तर मोठं संकट अटळ आहे, याची जाणीव 'खान ऑफ कलात' मीर अहमद यार खान यांना झाली होती.

असेच दिवस चालले होते आणि वाळवंटातलं तापमान थोडं कमी होत गेलं.

हुसैन शहीद सुहरावर्दी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हुसैन शहीद सुहरावर्दी

त्याच दिवशी टोळ्यांच्या प्रमुखांचं एक प्रतिनिधीमंळ कलातमध्ये खान यांची भेट घेण्यासाठी आलं आणि त्यांनी सुरक्षाविषयक सहा मुद्द्यांचं एक निवेदनपत्र सादर केलं.

कलात संस्थान 1948 साली पाकिस्तानात विलीन करण्यात आलं, तेव्हा स्थानिक संस्कृतीचा व परंपरेचा आदर राखला जाईल, असं आश्वासन कायद-ए-आझम जिना यांनी दिलं होतं, त्यानुसार स्थानिक परंपरांना संरक्षण पुरवण्यात येणार होतं, परंतु दुर्दैवाने परिस्थिती याच्या उलट झालेली आहे, याची आठवण या प्रतिनिधींनी करून दिली.

अशा तऱ्हेच्या गाठीभेटी येत्या काळात सुरूच राहिल्या. आठ ऑक्टोबर 1957 रोजी बलोचिस्तानातील 44 टोळ्यांच्या प्रमुखांचं प्रतिनिधीमंडळ खान ऑफ कलात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना भेटलं. अनेक महिन्यांच्या खटपटीनंतर तयार केलेलं निवेदन या प्रतिनिधीमंडळाने राष्ट्राध्यक्षांना दिलं.

या मागण्यांचा सहानुभूतीने विचार केला जाईल, असं आश्वासन इस्कंदर मिर्झा यांनी दिलं आणि काही महत्त्वाची पावलं उचलण्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घ्यायला सांगितलं.

खान ऑफ कलात आणि इस्कंदर मिर्झा यांची 'ती' भेट

निवेदन दिल्यानंतर प्रतिनिधी निरोप घ्यायला लागले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांनी खान ऑफ कलात यांना विनंती केली की, त्यांनी खाजगी पाहुणे म्हणून तिथेच थांबावं. अशा रितीने खान ऑफ कलात पुढील 15 दिवस- 7 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 1957- राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पाहुणे म्हणून राहिले.

याच 15 दिवसांमध्ये इस्कंदर मिर्झा यांच्या कारस्थानाची पूर्तता होण्याचे संकेत मिळू लागले.

खान ऑफ कलात यांची दुखरी नस म्हणजे त्यांचं विलीन झालेलं संस्थान आणि 'वन युनिट' या योजनेशी असलेलं त्यांचं नातं. इस्कंदर मिर्झा यांनी याच मुद्द्यावरून संभाषणाची सुरुवात केली.

इस्कंदर मिर्झा यांनी बोलताना ब्रिटनमधील मोठे कायदातज्ज्ञ मेक नायर यांचा उल्लेख केला आणि त्यांशी चर्चा करण्याचा सल्ला खान ऑफ कलात यांना दिला. 'वन युनिट'पासून विलग होण्याचा काही मार्ग असू शकतो का, हे तपासण्याची सूचना मिर्झा यांनी त्यांना केली.

खान ऑफ कलात यांना हा सल्ला पटला आणि ते लंडनला जायला तयार झाले. (या प्रवासासाठी इस्कंदर मिर्झा यांनी खान यांना मोठ्या प्रमाणात परकीय चलनही उपलब्ध करून दिलं).

आता खान पूर्णतः आपल्या कह्यात आल्याची खात्री पटल्यावर मिर्झा कारस्थानातील पुढची खेळी खेळले.

खान ऑफ कलात यांच्या 'इन्साइड बलोचिस्तान' या पुस्तकात म्हटल्यानुसार, इस्कंदर मिर्झा म्हणाले, "निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि पुढील कार्यकाळातही राष्ट्राध्यक्ष होण्याची माझी इच्छा आहे, हे तुम्ही जाणताच. पण निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी लागतो तितका पैसा माझ्यापाशी नाही. त्यामुळे तुम्ही 50 लाख रुपयांची देणगी दिलीत तर प्रचाराला मदत होईल."

यावर खान ऑफ कलात यांच्याकडून काही उत्तर येण्यापूर्वीच इस्कंदर मिर्झा यांनी स्वतःचं मन मोकळं केलं. बहावलपूर व खैरपूर या गतकालीन संस्थांमधील राज्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांच्याकडूनही अनुक्रमे 40 लाख व 10 लाख रुपये मिळवून द्यावेत, अशी विनंती मिर्झा यांनी केली.

याचा मोबदला म्हणून राष्ट्राध्यक्ष झाल्यावर आपण कलातसह बहावलपूर व खैरपूर या राजवटींना 'वन युनिट'पासून वेगळं करू, असं आश्वासन मिर्झा यांनी खान ऑफ कलात यांना दिलं.

गतकालीन संस्थानांचं कायदेशीर स्थान आणि आगामी काळातील निवडणुका या संदर्भातील अडचणींबाबत सदर भेटीत सविस्तर चर्चा झाली असेल, हे यावरून आपल्या लक्षात येतं.

खान ऑफ कलात याचे पुस्तक 'इनसाईड बलोचिस्तान'

फोटो स्रोत, AMAZON.COM

फोटो कॅप्शन, खान ऑफ कलात याचे पुस्तक 'इनसाईड बलोचिस्तान'

देशातील लोकप्रिय राजकारण्यांशी मैत्रीचे संबंध वाढवले तरच पुन्हा राष्ट्राध्यक्षपद मिळण्याची इस्कंदर मिर्झा यांची मनिषा प्रत्यक्षात येऊ शकते, असं आपल्याला वाटल्याचं खान ऑफ कलात यांनी नमूद केलं आहे.

परंतु, इस्कंदर मिर्झा यांना हा सल्ला रुचला नाही. निवडणुकीचा निकाल आपल्याला अनुकूल लागला नाही, तर लष्करी कायदा लादायला आपण मागे-पुढे पाहणार नाही, असा त्यांचा पवित्रा होता.

सल्लामसलतीची ही मालिका बराच काळ सुरू होती. या विषयावर झालेल्या एका खाजगी संवादात इस्कंदर मिर्झा म्हणाले की, त्यांनी भोपाळच्या नवाबांना पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण दिलं आहे आणि त्यांच्या समोर पंतप्रधानपद सांभाळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

अशा रितीने स्वतः मिर्झा राष्ट्राध्यक्ष होतील आणि निवडणुकीचा निकाल त्यांना अनुकूल लागला नाही तर देशात लष्करी कायदा लागू केला जाईल, अशी योजना त्यांनी आखून ठेवली होती.

खान ऑफ कलात दुरावले

हे सगळं ऐकल्यावर आपण अचंबित झाल्याचं खान ऑफ कलात यांनी पुस्तकात नोंदवलं आहे. या संदर्भात मिर्झा यांनी सैन्यदलप्रमुखांना विश्वासात घेतलं आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यावर इस्कंदर मिर्झा यांनी दिलेलं उत्तर आणखी अचंबित करणारं होतं. ते म्हणाले, "अय्युब खान यांनी माझ्या वाटेत यायचा प्रयत्न केला, तर अजिबात वेळ न घालवता त्यांना संपवून टाकण्यात येईल."

त्याच दिवशी संध्याकाळी खान ऑफ कलात यांची दुसऱ्या एका पार्टीमध्ये अय्युब खान यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी अय्युब खान यांच्याशी खाजगीत संवाद साधत इस्कंदर मिर्झा यांनी रचलेल्या कारस्थानाचा निर्देश केला. हे ऐकल्यावर अय्युब खान यांचा चेहरा लालबुंद झाला आणि राष्ट्राध्यक्षाला असा काही सल्ला आपण कधीच देणार नाही असं त्यांनी म्हटल्याचं खान ऑफ कलात यांनी नोंदवलं आहे.

दुसऱ्याच दिवशी भोपाळचे नवाब सर हमीदुल्लाह खान कराचीला पोचले. इस्कंदर मिर्झा यांनी खान ऑफ कलात यांना आपल्या कटात सामील करून घेतलं आणि भोपाळच्या नवाबांना पाकिस्तानातील सर्वांत महत्त्वाचं पद देण्याचा निर्णय घेतला, यामागे विश्वासाचे नक्की कोणते संबंध होते, असा प्रश्न यातून उपस्थित होतो.

नवाब हमीदुल्लाह ख़ान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवाब हमीदुल्लाह ख़ान

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव आणि नवाबांचे नातू शहरयार एम. खान यांच्या पत्नीने नोंदवल्यानुसार, भोपाळचे नवाब व इस्कंदर मिर्झा यांच्या कुटुंबांमध्ये पूर्वीपासून मैत्रीचे संबंध होते.

नवाबसाहेब पाकिस्तानात येत तेव्हा प्रत्येक वेळी मिर्झा यांच्याकडेच थांबत असत. मिर्झासुद्धा आराम करण्यासाठी कराचीजवळच्या मलेर इथे असणाऱ्या नवाबसाहेबांच्या फार्महाऊसवर जात असत. पाकिस्तानची स्थापना झाली तेव्हा नवाबांनी हे फार्महाऊस विकत घेतलं होतं.

भारत व पाकिस्तान इथल्या माजी संस्थानिकांच्या वारसदारांमधले (भोपाळचे नवाब हमीदुल्लाह खान आणि मुर्शिदाबादच्या संस्थानिकांचे वारसदार इस्कंदर खान) हे संबंध होते, तशाच तऱ्हेचे मैत्रीचे संबंध संबंध आपल्यात व भोपाळच्या नवाबांमध्ये होते, असा दावा खान ऑफ कलात करतात. या संबंधांना औपचारिकतेचं बंधन नव्हतं.

मुर्शिदाबादच्या संस्थानिक कुटुंबाशी संबंधित असलेल्या इस्कंदर मिर्झा यांना भोपाळ व कलात इथल्या राजपरिवारांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत हे अर्थातच माहीत असणार. त्यालाच धरून त्यांनी आपल्या भावी राजकीय कारकीर्दीविषयी स्वप्नं रंगवताना या परिवारांच्या वारसदारांना विश्वासात घेतलं.

भोपाळचे नवाब कराचीला पोचले

याच कारणामुळे भोपाळचे नवाब कराचीला पोचल्यावर त्यांनी लगेचच खान ऑफ कलात यांची भेट घेतली आणि इस्कंदर मिर्झा यांनी समोर ठेवलेला प्रस्ताव त्यांच्या कानावर घातला. या भेटीदरम्यान खान ऑफ कलात व भोपाळचे नवाब यांच्यात कोणती चर्चा झाली, याचं सविस्तर वर्णन 'इन्साइड बलोचिस्तान' या पुस्तकात केलेलं आहे.

खान ऑफ कलात यांनी पुस्तकात म्हटल्यानुसार, नवाब पाकिस्तान दौऱ्यावर कसे काय आले, असा प्रश्न खानांनी फारसा वेळ न घालवता विचारला.

त्यावर भोपाळचे नवाब म्हणाले, "माझ्या नावाचा समावेश असलेल्या योजनेच्या संदर्भात मी इथे आलो आहे. मी इस्कंदर मिर्झा यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे आणि आता मला या योजनेची तपशीलवार माहिती मिळवायची आहे."

खान ऑफ कलात म्हणाले, "पण परिस्थिती याहून वेगळीसुद्धा असू शकते. इस्कंदर मिर्झा यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे, तेवढ्यापुरतंच तुमचं नाव या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे, असं मला वाटतं."

हे ऐकल्यावर नवाब अचंबित झाले, आणि म्हणाले, "असं असेल तर राष्ट्राध्यक्षांच्या मनातील योजनेशी मला कोणताही संबंध ठेवायचा नाही."

खान ऑफ कलात यांनी लिहिल्यानुसार, या चर्चेनंतर सगळं काही स्पष्ट झालं आणि इस्कंदर मिर्झा यांनी सत्ता हातून जाण्याच्या भीतीने कोणतं कारस्थान रचलं आहे, याची माहिती त्यांनी भोपाळच्या नवाबांना दिली.

खान ऑफ कलात यांनी त्यांना राजकीय पक्षांमधील गटबांजीबद्दलही सविस्तर सांगितलं, त्याचप्रमाणे इस्कंदर मिर्झा यांच्या सत्तेचे वेळ भरत आल्याचंही स्पष्ट केलं. लवकरच मिर्झा यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवलं जाईल आणि यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते आपल्या दोघांना बळीचा बकरा करू पाहत आहेत, असं खान ऑफ कलात यांनी भोपाळच्या नवाबांना सांगितलं.

हे कळल्यावर नवाबसाहेबांनी खानसाहेबांचे आभार मानले आणि ते म्हणाले, "अल्लाहच्या मेहेरबानीमुळे माझी तुमच्याशी भेट झाली आणि या योजनेचा सांगोपांग विचार करायला मिळाला."

गतकालीन संस्थानांच्या या दोन राज्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली, तेव्हा भोपाळच्या नवाबांना भारत सरकारच्या वतीने मिळणारा वीस लाख रुपयांचा वार्षिक भत्ता, सन्मान, पुरस्कार व विशेषाधिकार, त्याचप्रमाणे ब्रिटनमधील मोठा कारभार, या गोष्टींचाही उल्लेख झाला.

इस्कंदर मिर्झा यांचा प्रस्ताव स्वीकारला, तर या सगळ्यावर पाणी सोडावं लागलं असतं, आणि मुळात मिर्झा यांचं कारस्थान यशस्वी होण्याची काही विशेष शक्यता दिसत नव्हती, याबद्दलही त्यांच्या निश्चितपणे चर्चा झाली असावी.

दुसऱ्या दिवशी भोपाळचे नवाब इस्कंदर मिर्झांना भेटले, तेव्हा खान ऑफ कलात यांच्याशी झालेल्या चर्चेचा काही संदर्भ त्यांनी स्वाभाविकपणेच दिला नाही.

अय्यूब ख़ान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अय्यूब ख़ान

स्वतःच्या हातातील सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी रचलेल्या या बालिश कारस्थानाबद्दल नवाबांनी नाराजीही व्यक्त केली नाही. उलट ते मिर्झांना म्हणाले की, त्यांना थोडा वेळ द्यावा, जेणेकरून ते लंडनमधील त्यांचा कारभार आणि भारतातील मालमत्ता यांची तजवीज करू शकतील.

भोपाळचे नवाब भारतात परतल्यावर खान ऑफ कलात व इस्कंदर मिर्झा यांच्यात आणखी एक बैठक झाली. ही बैठक तीन ते चार तास सुरू होती. भोपाळचे नवाब एप्रिल 1958 मध्ये परत येण्याचं आश्वासन देऊन गेल्याचं इस्कंदर मिर्झा यांनी खानांना सांगितलं.

नवाबसाहेब खरोखर परत येतील की नाही, याबद्दल मिर्झा यांनी शंका व्यक्त केली, तेव्हा खानांनी त्यांना आश्वस्तही केलं.

पुस्तकातून उलगडलेलं रहस्य

पाकिस्तानच्या राजकारणातील या सनसनाटी व नाट्यमय गोष्टीची माहिती खान ऑफ कलात यांनी त्यांच्या 1975 साली प्रकाशित पुस्तकात दिली. या सर्व घडामोडी केवळ तीन व्यक्तींच्या दरम्यानच घडत होत्या, त्यामुळे याबद्दल मौन राखण्यात आलेलं होतं.

भोपाळच्या नवाबांनी इस्कंदर मिर्झा यांच्या योजनेपासून अंतर राखलं, परंतु मिर्झांना स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला बंधनं घालणं शक्य झालं नाही. स्वतःच्या योजनेनुसार त्यांनी लष्करी कायदाही लागू केला, परंतु ते स्वतःच स्वतःच्या कारस्थानाला बळी पडले.

त्यानंतर बरीच उलथापालथ झाली. नवाबसाहेबांच्या कुटुंबातील व्यक्तींनी पाकिस्तान मोठमोठी पदं भुषवली. शहरयार एम. खान हे त्यापैकीच एक. ते पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाले.

या रोचक ऐतिहासिक घडामोडींबद्दल बीबीसीने त्यांना प्रश्न विचारला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटलं. ते म्हणाले, "होय, नवाबसाहेबांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता."

यानंतर घडलं ते असं: इस्कंदर मिर्झा यांनी स्वतःच्या अपयशाचं खापर खान ऑफ कलात यांच्यावर फोडलं आणि त्यांना लाहोरमधील तुरुंगात कैद केलं.

खान ऑफ कलात बलोचिस्तानला पाकिस्तानपासून तोडू पाहण्याच्या कारस्थानात सहभागी आहेत असा आरोप करण्यात आला.

इस्कंदर मिर्झा यांचे हे आरोप खोटे होते, त्यांनी लष्करी कायदा लागू करण्यासाठी हा कांगावा केला, असं डॉक्टर मोहम्मद वसीम यांनी 'पॉलिटिक्स अँड द स्टेट इन पाकिस्तान' या पुस्तकात म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)