सिराजुद्दौला कोण होता? त्याच्या हत्येनंतर भारतात ब्रिटीशांचा अंमल कसा सुरू झाला?

सिराजुद्दौला

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, सिराजुद्दौला
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

23 जून, 1757ला प्लासीच्या लढाईत पराभवानंतर सिराजुद्दौला एका उंटावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. सकाळ होईपर्यंत तो मुर्शिदाबादमध्ये पोहोचला होता. दुसऱ्या दिवशी रॉबर्ट क्लाईव्हनं मीर जाफरला एक पत्र पाठवलं.

''या विजयावर मी आपलं अभिनंदन करतो. तुम्हाला नवाब घोषित करण्याचा सन्मान मिळेल अशी आशा आहे,'' असा उल्लेख पत्रामध्ये होता.

त्याचदिवशी सकाळी चिंताग्रस्त आणि काहीसा थकलेला मीर जाफरनं इंग्रजांच्या छावणीत गेला तेव्हा त्याला इंग्रज सैनिक कर्नल क्लाईव्ह यांच्या तंबूत घेऊन गेले होते.

क्लाईव्ह यांनी मीर जाफरला लगेचच तेव्हाची राजधानी असलेल्या मुर्शिदाबादकडं कूच करण्याचा आणि ते ताब्यात घेण्याचा सल्ला दिला. मीर जाफरबरोबर कर्नल वॉट्सही जातील अंसं ते म्हणाले होते.

क्लाईव्ह मुख्य सैन्यासह त्यांच्या मागून जात होते. मुर्शिदाबादपर्यंतचं 50 मैलांचं अंतर कापण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले. रस्त्यात अनेक ठिकाणी तोफा, मोड-तोड झालेल्या गाड्या आणि सिराजुद्दौलाच्या सैनिक तसंच घोड्यांचे मृतदेह पडलेले होते.

''क्लाईव्ह 27 जूनलाच मुर्शिदाबादला पोहोचणार होते. पण जगत सेठ यांनी त्यांना त्यांच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे ते 29 जूनला मुर्शिदाबादला आले. मीर जाफर यांनी शहराच्या मुख्य द्वारावर त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्यासह रॉबर्ट यांनी शहरात प्रवेश केला.

रॉबर्ट क्लाईव्ह यांनीच मीर जाफरला सिंहासनासारख्या आसनावर बसवलं आणि सॅल्युटही केला. त्यानंतर त्यांनी कंपनी मीर जाफरच्या शासनात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही, असं जाहीर केलं. केवळ व्यापाराशी संबंधित गोष्टींवर त्यांची नजर असेल असं सांगण्यात आलं,'' असा उल्लेख सर पेंडेरल मून यांनी त्यांच्या 'द ब्रिटिश कॉक्वेस्ट अँड डॉमीनियन इन इंडिया' या पुस्तकात लिहिलं आहे.

रॉबर्ट क्लाईव्ह

या लढाईनंतर 180 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं.

एका रात्रीत युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले क्लाईव्ह

क्लाईव्ह यांना सिराजुद्दौलाच्या खजिन्यात पाच कोटी रुपये मिळाले होते. पण तेही त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच होते.

''क्लाईव्ह यांना या विजयासाठी वैयक्तिकरित्या दोन लाख 34 हजार पौंड एवढी रक्कम मिळणार होती. त्याशिवाय दरवर्षी 27 हजार पौंड उत्पन्न मिळणारी सुभेदारीही त्यांना मिळणार होती. ही सर्व संपत्ती मिळाल्यास वयाच्या 33व्या वर्षी क्लाईव्ह हे अचानक युरोपातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक ठरणार होते.

त्यानंतरचे काही दिवस प्रचंड तणावाची स्थिती होती. मीर जाफरनं दिलेलं वचन पाळलं नाही तर काय? याची चिंता क्लाईव्ह यांना होती. एखादी मोठी लूट किंवा दरोड्यानंतर ज्याप्रकारे दोन गुंड वाटणी करण्यासाठी बसतात, त्याप्रकारे हे दोघंही एकमेकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते,'' असा उल्लेख प्रसिद्ध इतिहासकार विल्यम डॅलरिंपिल यांनी त्यांच्या 'द अनार्की' पुस्तकात केला आहे.

सिराजुद्दौलानं पहाटे तीन वाजता काढला पळ

एकीकडे क्लाईव्ह लुटीनंतर त्यांचा वाटा मिळण्याची वाट पाहत होते, तर मीर जाफरचा मुलगा मीरारनं पळून गेलेल्या सिराजुद्दौलाला शोधण्यासाठी संपूर्ण ताकदीनं प्रयत्न सुरू केले होते.

प्लासीचे युद्ध

फोटो स्रोत, Francis Hayman

फोटो कॅप्शन, प्लासीचे युद्ध

''सिराजुद्दौला सामान्य व्यक्तींसारखे कपडे परिधान करून पळाला होता. त्याच्याबरोबर काही जवळचे नातेवाईक आणि काही किन्नर होते. पहाटे तीन वाजता त्यानं पत्नी लुत्फ उन निसा आणि इतर काही निकटवर्तींयांना पूर्णपणे बंद असलेल्या गाड्यांमध्ये बसवलं, शख्य तितकं सोनं दागिने सोबत घेतले आणि महाल सोडून पळ काढला,'' अशी माहिती प्रसिद्ध इतिहासकार सय्यद गुलाम हुसेन खान यांच्या 'सियारुल मुताखिरी' फारसी पुस्तकामध्ये आहे.

ते सर्व आधी भगवानगोला याठिकाणी गेले. त्यानंतर दोन दिवस अनेक नावा बदलून ते महालाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. त्याठिकाणी काहीतरी खाण्यासाठी म्हणून ते थांबले. कारण त्यांच्याबरोबर असलेल्यांनी तीन दिवसांपासून काहीही खाल्लेलं नव्हतं.

फकिरानं माहिती दिल्यानं झाली अटक

शत्रू सिराजुद्दौलाला शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करत होते. तेव्हा याच परिसरातील शाह दाना नावाच्या फकिरानं सिराजुद्दौलाची माहिती त्यांना दिली होती. मीर जाफरचा जावई मीर कासीमनं ही माहिती मिळताच नदीच्या पलिकडं जात सिराजुद्दौलाला सशस्त्र सैनकांचा घेराव घातला.

प्लासीचे युद्ध

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, प्लासीचे युद्ध

सिराजुद्दौलाला अटक करून 2 जुलै 1757ला मुर्शिदाबादला आणण्यात आलं. त्यावेळी रॉबर्ट क्लाईव्ह मुर्शिदाबादमध्येच होते. ते पोहोचण्याआधीच त्यांनी फोर्ट विल्यममध्ये त्यांच्या साथीदारांना पत्र लिहिलं होतं.

''मीर जाफर गादीवरून हटवलेल्या नवाबाप्रति या परिस्थितीत शक्य त्या सर्व शिष्टाचाराचं पालन करेल, अशी आशा आहे,'' असं त्या पत्रात लिहिलं होतं.

त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी आणखी एक पत्र लिहिलं. ''सिराजुद्दौला आता या जगात नाही. मीर जाफरनं कदाचित त्यांना जीवदान दिलं असतं. पण देशात शांतता राहावी यासाठी सिराजुद्दौलाचं मरणं गरजेचं आहे असं त्याचा मुलगा मीरानला वाटलं होतं. सकाळीच त्यांना खोशबागमध्ये दफन करण्यात आलं,'' असं या पत्रात लिहिलं होतं.

''पदावरून हटवलेल्या नवाबला मध्यरात्री महालात मीर जाफरसमोर हजर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी नवाब याच महालात राहत होता. सिराजुद्दौलानं मीर जाफरसमोर मस्तक झुकवत प्राणांची भीक मागितली. त्यानंतर शिपाई त्याला महालाच्या दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन गेले. यादरम्यान मीर जाफरनं सिराजुद्दौलाबरोबर कसं वर्तन करावं याबाबत दरबारातील अधिकाऱ्यांबरोबर सल्ला मसलत केला. त्याच्याकडं तीन पर्याय होते.

एकतर सिराजुद्दौलाला मुर्शिदाबादमध्ये तुरुंगात ठेवावं, दुसरा देशाबाहेर कैद करून ठेवावं आणि तिसरा पर्याय म्हणजे मृत्यूदंड. काही जणांनी त्याला तुरुंगात ठेवण्याचा सल्ला दिला. पण मीर जाफरचा 17 वर्षांचा मुलगा मीरानचा त्याला पूर्णपणे विरोध होता. मीर जाफरचं स्वतःचं असं काहीही मत नव्हतं,'' असं रॉबर्ट ओर्मे यांच्या 'अ हिस्ट्री ऑफ द मिलिट्री ट्रान्सेक्शन ऑफ द ब्रिटिश नेशन इन हिन्दोस्तान' मध्ये म्हटलं आहे.

सिराजुद्दौला

फोटो स्रोत, Battle that Changed the Course of Indian History

फोटो कॅप्शन, सिराजुद्दौला

''मीराननं वडिलांचं मौन म्हणजे होकार समजला. तो वडिलांना म्हणाला की, तुम्ही आराम करा, मी यांना सांभाळतो. मीर जाफरला असं वाटलं की, यात हिंसाचार होणार नाही. त्यामुळं त्यानं रात्री उशिरा दरबार बरखास्त केला आणि झोपण्यासाठी निघून गेला, '' असं सुदीप चक्रवर्ती यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'प्लासी द बॅटल दॅट चेंज्ड द कोर्स ऑफ इंडियन हिस्ट्री' या पुस्तकात म्हटलं आहे.

तलवार आणि कट्यारींनी केली हत्या

''मीराननं त्याचा साथीदार मोहम्मदी बेगला सिराजुद्दौलाला संपवण्याचे आदेश दिले. मोहम्मदी बेगचं दुसरं नाव लाल मोहम्मदही होतं. मीरान साथीदारांसह सिराजुद्दौलाजवळ पोहोचला तेव्हा आपल्याबरोबर काय घडणार याचा अंदाज त्याला आला होता. त्यानं मरण्यापूर्वी वजू (नमाज पठणापूर्वी हात पाय धुणं) करुन नमाज पठण करू देण्याची विनंती केली.

काम लवकर संपण्यासाठी मारेकऱ्यांनी सिराजुद्दौलाच्या डोक्यावर बादलीभर पाणी टाकलं. आपल्याला वजूही नीट करू दिलं जाणार नाही, हे समजल्यानं सिराजुद्दौलानं पिण्यासाठी पाणी मागितलं," असं सय्यद गुलाम हुसेन खान यांनी लिहिलं आहे.

''तेवढ्यात मोहम्मदी बेगनं सिराजुद्दौलाच्या डोक्यावर कट्यारीचा वार केला. कट्यारीनं तिचं काम करताच इतरांनीही तलवारी उपसल्या आणि सगळे सिराजुद्दौलावर तुटून पडले. काही मिनिटांमध्येच त्याचा अंत झाला आणि तो खाली पालथा पडला," असं रॉबर्ट ओर्मे यांनी म्हटलं आहे.

हत्तीवरून काढली मृतदेहाची वरात

दुसऱ्या दिवशी सिराजुद्दौलाचा मृतदेह हत्तीच्या पाठीवर लादून मुर्शिदाबादच्या गल्ल्या आणि बाजारांत फिरवण्यात आलं. सिराजुद्दौलाच्या पराभवाचा हा मोठा पुरावा होता.

मीरजाफर आणि रॉबर्ड क्लाईव्ह

फोटो स्रोत, Wikimedia Commons

फोटो कॅप्शन, प्लासीच्या युद्धानंतर मीरजाफर आणि रॉबर्ड क्लाईव्ह यांची भेट झाल्याचे चित्र (1760)

सय्यद गुलाम हुसेन खान यांनी या निर्घृण कृत्याचं वर्णन केलं आहे. ''या बीभत्स प्रकारादरम्यान हत्तीच्या महावतानं मुद्दाम हत्ती हुसेन कुली खानच्या घराबाहेर थांबवला होता. दोन वर्षांपूर्वी याच हुसेन कुली खानची सिराजुद्दौलानं हत्या करायला लावली होती. ज्याठिकाणी कुली खानची हत्या करण्यात आली होती, त्याठिकाणी सिराजुद्दौलाच्या मृतदेहातून रक्ताचे काही थेंब पडले होते,'' असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यावेळी सिराजुद्दौलाचं वय अवघं 25 वर्षे होतं. पण मीरानचं क्रौर्य एवढ्यावरच थांबलं नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यानं अलीवर्दी खानच्या कुटुंबातीलदेखील सर्वांची हत्या केली.

मीर जाफरशी लग्नाला लुत्फ उन निसानं दिला नकार

''सुमारे 70 निरापराधांना एका नावेत बसवून हुगळी नदीच्या मध्यभागी नेलं. त्याठिकाणी त्यांनी नाव बुडवून टाकली. सिराजुद्दौलाच्या कुटुंबातील इतर महिलांची विष देऊन हत्या करण्यात आली. त्या सर्वांना बुडवण्यात आलेल्या महिलांसह नदीच्या शेजारी खुशबाग याठिकाणी दफन करण्यात आलं," असं करम अली यांनी 'मुझफ्फरनामा ऑफ करम अली' मध्ये म्हटलं आहे.

केवळ एका महिलेला जिवंत ठेवलं होतं. ती म्हणजे सिराजुद्दौलाची अत्यंत सुंदर अशी पत्नी लुत्फ उन निसा. मीरान आणि त्याचे वडील मीर जाफर दोघांनीही तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता.

प्लासी मेमोरिअल कंम्पाऊंड आणि मोतीझील कॉम्प्लेक्समध्ये सिराजुद्दौला यांच्या मूर्ती

फोटो स्रोत, Sudeep Chakrvarti

फोटो कॅप्शन, प्लासी मेमोरिअल कंम्पाऊंड आणि मोतीझील कॉम्प्लेक्समध्ये सिराजुद्दौला यांच्या मूर्ती

''मी आधी हत्तीची स्वारी केली आहे. त्यामुळं आता मी गाढवाची स्वारी करणार नाही, असं म्हणत लुत्फ उन निसानं दोघांचाही प्रस्ताव फेटाळून लावला,'' असं करम अली यांनी लिहिलं आहे.

मीर जाफरचं पतन

प्लासीची लढाई जिंकल्यानंतर एका वर्षभरातच मीर जाफरच्या पतनालाही सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वीच मीर जाफरचं कौतुक करणाऱ्या क्लाईव्ह त्यांना 'द ओल्ड फूल' म्हणजे 'मूर्ख म्हातारा' आणि त्याचा मुलगा मीरानला 'अ वर्थलेस यंग डॉग' म्हणजे 'बिनकामाचा कुत्रा' म्हणू लागले होते.

आळस, अकार्यक्षमता आणि अफू यांमुळं मीर जाफर पूर्णपणे उध्वस्त झाला. 11 नोव्हेंबर 1758 ला क्लाईव्ह यांनी जॉन पेनला पत्र लिहिलं होते. ''ज्याला आम्ही गादीवर बसवलं तो अहंकारी, लालची आणि शब्दा शब्दाला शिवी देणारा असा बनला आहे. त्याच्या अशा वागणुकीमुळं तो लोकांच्या मनातून उतरत चालला आहे,'' असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं.

सिराजुद्दौलाची कब्र

फोटो स्रोत, Sudeep Chakravarti

फोटो कॅप्शन, मुर्शिदाबादजवळ खोशबाग येथे सिराजुद्दौलाची कब्र

क्लाईव्ह इंग्लंडहून परतण्याच्या आधीपर्यंत मीर जाफरनं लष्कराचा तेरा महिन्यांचं पगार थकवला होता. त्यातल्या तीनच महिन्यांचा पगार तो देऊ शकला होता. पगार न मिळाल्यानं सैनिकही बंडाच्या पवित्र्यात होते.

'मीर जाफरच्या सैनिकांचे घोडे म्हणजे केवळ, हाडांचा सापळा बनले होते. त्यांच्यावर स्वारी करणाऱ्यांची अवस्था त्या तुलनेत जरा बरी होती. अगदी जमादार (अधिकारी) देखील जुने फाटके कपडे परिधान करत होते,'' असं सर पेंडेरल मून यांनी त्यांच्या 'वॉरेन हॅस्टिंग्स अँड ब्रिटिश इंडिया' मध्ये लिहिलं आहे.

प्लासीच्या लढाईच्या नंतरच्या तीन वर्षांच्या काळामध्येच भारतातील सर्वात श्रीमंत शहरात समावेश असलेलं मुर्शिदाबाद गरीबीच्या दरीत लोटलं होतं.

मीर जाफरनं बंगाल केलं उध्वस्त

या संपूर्ण प्रकारासाठी मीर जाफर स्वतःदेखील जबाबदार होता.

''मीर जाफरला महागडे दागिने परिधान करण्याची आवड होती. पण नवाब बनल्यानंतर तो एकाच मनगटात वेगवेगळी रत्नं असलेले सात ब्रेसलेट (हातात परिधान करण्याचा दागिना) परिधान करू लागला होता. त्याच्या गळ्यांमध्ये तीन-चार पदरी मोत्यांच्या माळा आसायच्या. त्याचा संपूर्ण वेळ हा संगीत ऐकणं आणि नृत्य पाहणं यातच जायचा," असं हुसेन गुलाम खान यांनी लिहिलंय.

आताचे मैदाना ज्याठिकाणी प्लासीचे युद्ध झाले.

फोटो स्रोत, Sudeep Chakrvarty

फोटो कॅप्शन, आताचे मैदाना ज्याठिकाणी प्लासीचे युद्ध झाले.

मीर जाफरमध्ये बंगालवर राज्य करण्याची क्षमता नसल्याचं काही दिवसांतच लोकांच्या लक्षात आलं होतं. तो प्रत्यक्षात एखाद्या अडाणी अरबी शिपायासारखा होता, ज्याचा राज्य कारभाराशी लांबपर्यंतही काही संबंध नव्हता.

''क्लाईव्ह यांनी स्वतःदेखील इंग्लंडला जाताना जहाजावर प्रवेश करण्यापूर्वी मीर जाफरमध्ये राज्य चालवण्याची क्षमता नसल्याचं म्हटलं होतं. लोकांचं मन आणि विश्वास जिंकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. त्यांच्या कुशासनानं बंगालला अराजकतेकडं नेलं,'' असं सर पेडेंरल मून यांनी त्यांच्या 'द ब्रिटिश कॉनक्वेस्ट एंज डॉमीनियन ऑफ इंडिया' मध्ये लिहिलं आहे.

मीरानने 300 पेक्षा अधिक लोकांना मारलं

मीर जाफरचा मुलगा मीरानचा दया आणि औदार्य यांच्याशी काहीही संबंध नव्हता. भविष्यात कोणत्याही प्रकारचा विद्रोह होता कामा नये यासाठी अलीवर्दी खानच्या उर्वरित कुटुंबाला मारणं, ही त्याच्यासमोरची सर्वात मोठी काळजी ठरली होती.

मीरजाफरचे घर 'नमक हराम ड्योढ़ी'चे प्रवेशद्वार

फोटो स्रोत, Sudeep Chakrvarti

फोटो कॅप्शन, मीरजाफरचे घर 'नमक हराम ड्योढ़ी'चे प्रवेशद्वार

''अलीवर्दी खानच्या कुटुंबातील महिलांना नदीत बुडवल्यानंतर, त्याचं लक्ष हे सिराजुद्दौलाचे निकटवर्तीय असलेल्या पाच नातेवाईकांकडं गेलं होतं. त्यानं सिराजुद्दौलाचा लहान भाऊ मिर्झा मेहदीला दोन मोठ्या लाकडाच्यामध्ये चिरडून ठार केलं होतं. सापाला मारल्यानंतर त्याच्या पिलांना मोकळं सोडण्यात हुशारी नसते, असं म्हणत मीरानने ही हत्या योग्य असल्याचं म्हटलं होतं," असं ' गुलाम हुसेन खान यांनी लिहिलं आहे.

इतर प्रतिस्पर्धी आणि आधीच्या प्रशासनातील काही महत्त्वाच्या लोकांना मीराननं दरबारात किंवा महालाच्या मुख्य दरवाजामध्ये चाकूनं किंवा गुपचूप विष पाजून मारलं होतं.

मीरान सिराजुद्दौलाच्या कुटुंबातील मारलेल्या लोकांची यादी करून एका खास डायरीत त्याची नोंद करून ठेवत होता. या यादीत काही काळातच 300 जणांच्या नावाचा समावेश झाला होता. वॉरेन हेस्टिंग्स यांना सिराजुद्दौलाच्या कुटुंबातील लोकांच्या हत्येबाबत समजलं तर, त्यांनी कलकत्त्याला एक अहवाल पाठवला.

''कोणतंही कारण या पाशवी खलनायकाच्या कृत्यांवर पडदा टाकू शकत नाही. अशा व्यक्तीला आपण दिलेल्या पाठिंब्याचंही समर्थन केलं जाऊ शकत नाही," असं त्यात लिहिलं असल्याचं गुलाम हुसेनखान यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त