Rizz, Green Flag, friendzone : जेन झी आणि अल्फा पिढी वापरत असलेले 'हे' शब्द आले कुठून?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
Gen Z आणि Gen Alpha पिढीतील तरुण बोलताना अनेकदा वेगळेच शब्द, शॉर्टफॉर्म्स वापरतात. सोशल मीडियावरही हे शब्द पहायला - ऐकायला मिळतात. हे शब्द आले कुठून? भाषेतले हे बदल कधी आणि कसे झाले.
2023 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा Word of the year होता - Rizz . हा आहे करिझ्मा या शब्दाचा शॉर्टफॉर्म. याचा अर्थ म्हणजे style, attractiveness. आकर्षकपणा.
2024 मध्ये Merriam Webster डिक्शनरीमध्ये 200 शब्दांचा समावेश करण्यात आला आणि यातले अनेक जेन झी आणि जेन अल्फाचे शब्द आहेत.
जेन झी म्हणजे झूमर्स. मिलेनियल्सच्या नंतरचे आणि अल्फाच्या आधीचे.1997 ते 2012 दरम्यान जन्म झालेली पिढी.
तर जेन अल्फा म्हणजे त्यानंतर 2013 ते 2024 मध्ये जन्म झालेली पिढी.
जेन झींची पिढी ही इंटरनेटने जोम धरलेला असताना मोठी झाली, मोबाईल फोन्स - सोशल मीडियापूर्वीचं जग या पिढीला माहिती नाही.
तर जेन अल्फा ही पूर्णपणे इंटरनेटच्या जगात मोठी झालेली पिढी आहे. या पिढ्यांकडून सध्या वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतायत आणि ते रुळतायतही.
या शब्दांना म्हटलं जातं - Slang. मग स्लँग म्हणजे शिव्या का? तर नाही. स्लँग म्हणजे काहीसे रांगडे शब्द किंवा अनेकदा बोलीभाषांमधले, अनौपचारिकपणे वापरले जाणारे शब्द. हे Slang words लेखीपेक्षा बोलण्यामध्ये जास्त वापरले जातात. प्रत्येक पिढीचे असे काही स्लँग शब्द असतातच.
मग आता वापरात आलेले हे सगळे शब्द नवीन आहेत का? तर नाही. यातले काही शब्द जुनेच आहेत आणि ते पुन्हा वापरले जातायत, पण त्याचे अर्थ बदलत आहेत.
तर काही शब्द हे काही कम्युनिटीज - काही समूहांपर्यंत मर्यादित होते, जे आता सगळेच वापरायला लागले आहेत.
जेन झी आणि अल्फा वापरत असलेले शब्द
जेन झी वापरत असलेले अनेक शब्द हे आफ्रिकन - अमेरिकन आणि Queer कम्युनिटीजकडून आलेले आहेत. Slay, tea, we be wilding, yas queen, slaps, lowkey हे शब्द अनेक दशकांपूर्वी अस्तित्त्वात आलेले आहेत.
Rizz हा शब्द Kai Cenat (उच्चार - का सिनेट) नावाच्या युट्यूबरने पहिल्यांदा वापरल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर 2022 मध्ये हा शब्द लोकप्रिय झाला. इतका की तो 2023 चा वर्ड ऑफ द इयर ठरला.
Ick हा शब्द वापरला जातो एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक आलेली किळस दाखवण्यासाठी. हा शब्द सायकॉलॉजीमधला आहे. पण Gen Z ने लोकप्रिय केलाय.
इन्स्टाग्रामला तुम्ही अनेक रील्स पाहिली असतील ज्यात लिहीलेलं असतं - 'Understood the Assignment'. म्हणजे एखाद्या व्यक्तीने अगदी योग्य काम पार पाडलं वा अपेक्षेपेक्षा चांगलं काम केलं. Tay Money (टे मनी) या अमेरिकन रॅपरच्या द असानमेंट या गाण्यामध्ये ही ओळ होती. ती वापरून टिकटॉक व्हीडिओज - रील्स झाली आणि एका नव्या शब्दप्रयोगाची भर पडली.
Sus हा शब्द शॉर्टफॉम आहे Suspicious चा. तो त्याच अर्थाने वापरला जातो. हा शब्द Among Us नावाच्या ऑनलाईन गेममुळे लोकप्रिय झाला.
तर No Cap - हा शब्द - मी खोटं बोलत नाही, टोपी लावत नाही, अशा अर्थाने वापरला जातो. आफ्रिकन - अमेरिकन समुदाय आणि कॅप घालणाऱ्या हिप-हॉप कम्युनिटीमधून हा शब्द आलाय.
शब्दांचे झाले शॉर्टफॉर्म
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
काही शब्दांचे - शब्द प्रयोगांचे शॉर्टफॉर्म झाले.
LOL म्हणजे Laugh Out Loud चा शॉर्टफॉर्म ही आधीची पिढी फक्त चॅटमध्ये लिहीताना वापरत होती. पण पुढची पिढी 'लॉल' म्हणत तो संभाषणात वापरू लागली.
असेच इतरही काही शॉर्टफॉर्म लोकप्रिय झाले.
GOAT - Greatest Of All Times
Delulu - Delusional
OOTD - Outfit Of The Day
IRL - In Real Life
NGL - Not Gonna Lie / Not Going to Lie
NMH - Nodding My Head
इंटरनेट, सोशल मीडिया आणि त्याचे तरुणाईवर होणारे परिणाम यांचा अभ्यास करणाऱ्या मुक्ता चैतन्य यांचा विविध वयोगटातल्या मुलांशी कायम संवाद होतो.
या पिढीच्या भाषेबद्दलची काही निरीक्षणं मांडताना त्या सांगतात, "जेन झींच्या भाषेवरून चेष्टा केली जाते, ऑनलाईन मीम्स होतात. पण हे लक्षात घ्यायला हवं की ही भाषा अचानक तयार झालेली नाही. ही भाषा डिजीटलायझेशननंतर तयार झाली आहे."
"जेव्हा अगदी साधे, बटणवाले फोन होते आणि आपण सगळ्यांनी पहिल्यांदा SMS करायला सुरुवात केली होती, तेव्हाच हे भाषेचे बदल व्हायला सुरुवात झाली होती."
"अगदी सुरुवातीला इंग्लिश भाषेमधले शब्द छोटे करणं, त्यांचे शॉर्टफॉम्स करणं या पॅटर्नमध्ये ही सगळी सुरुवात झाली. मग हळुहळू जसा काळ बदलत गेला, पिढ्या बदलत गेल्या, तशी ऑनलाईन जगाची भाषा बदलत गेली."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
पिढ्यांनुसार भाषेत होणारे बदल
प्रत्येक पिढीनुसार भाषेची मोडतोड - बदल होत असतात. त्या त्या वेळचे संदर्भ, वेगवेगळ्या भाषांमधले शब्द इंग्लिशमध्ये येत असतात. म्हणजे हिंदीतले जुगाड, दादागिरी, टाईमपास, अच्छा हे शब्द आता इंग्लिश डिक्शनरीत आहेत.
मग यामुळे इंग्लिश भाषा कशी बदलतेय. मुक्ता चैतन्य सांगतात, "जेन झींची भाषा प्रामुख्याने इंग्लिश आहे. ही सगळी पिढी युट्यूब पाहत वाढलीय. त्यामुळे युट्यूबर्स ज्याप्रमाणे बोलतात, त्या सगळ्याचा परिणाम यांच्यावर, यांच्या भाषेवर होतो."
"अनेक मुलं सांगतात की, जगभरातली इंग्लिश भाषा आता अधिकाधिक समजण्याजोगी झालीय. कारण या मुलांना प्रचंड प्रमाण एक्सपोजर मिळत असल्यानं प्रत्येक खंडामध्ये जसे अॅक्सेंट्स आहेत, ते देखील या मुलांपर्यंत पोहोचतात."
"त्यामुळे ऑस्ट्रेलियन इंग्लिश, अमेरिकन, ब्रिटीश, भारतीय इंग्लिश किंवा पूर्वेतल्या आशियाई देशांमध्ये ज्याप्रकारे इंग्लिश बोललं जातं, हे सगळं या मुलांच्या कानावर पडतं. त्यामुळे भाषा समजून घेणं, अॅक्सेंट समजून घेणं हे या मुलांना सहज शक्य होतं."
इंटरनेटमुळे जग खुलं झालंय. त्यामुळे ही भाषा काहीशी सर्वसमावेशक होतेय. आधी एका समाजापर्यंत - कम्युनिटीपर्यंतच वापरात राहणारे शब्द आता सगळेजण वापरतायत.
पण जेन अल्फा कोणत्याही शब्दापुढे 'ing' लावून वाक्य करत असल्याने व्याकरणाचा घोळ मात्र होतो. म्हणजे Hair is not hairing हे एका पिढीसाठी अर्थ असलेलं पूर्ण वाक्य आहे, तर उरलेल्यांसाठी या वाक्याला व्याकरणाच्यादृष्टीने काहीच अर्थ नाही. नवीन पिढी व्याकरणाची पार मोडतोड करत असल्याची नाराजी त्यामुळे व्यक्त करण्यात येते.
(या वाक्याचा अर्थ होतो - आज माझे केस नीट दिसत - बसत नाहीयेत.)
जगभरातली तरूण पिढी समान शब्द कसे वापरते?
पण मग जगातल्या वेगवेगळ्या देशांमधली इंग्लिश बोलणारी पिढी सारखे शब्द कशी बोलायला लागली? याचं उत्तर आहे - इंटरनेट.
वेगवेगळ्या सोशल मीडिया फॉरमॅटवरून व्हीडिओज - काँटेन्ट पाहणारी ही पिढी हे व्हीडिओ करणारे लोक - इन्फ्लुएन्सर्स काय बोलतात, कसं बोलतात, काय शब्द वापरतात याचं अनुकरण करते. म्हणूनच आता प्रॉडक्ट रिव्ह्यूज आणि रेकमेंडेशन्ससाठी कंपन्या इन्फ्लुएन्सर्सकडे जातात. त्याचप्रमाणे जर या लोकांनी एखादा शब्द वापरला तर तो त्यांच्या जगभरातल्या फॉलोअर्सपर्यंत जातो.
माईनक्राफ्ट - रोब्लॉक्ससारख्या गेम्सच्या कम्युनिटीजही मोठ्या आहेत. त्यामुळे या गेमिंगच्या जगातूनही माहितीची मोठी देवाणघेवाण होत राहते.
एका रिपोर्टनुसार, आता 2025 या वर्षामध्ये नोकरी काम करणाऱ्या लोकांपैकी 27 टक्के लोक हे जेन झी मधले असतील. त्यामुळे वागण्या-बोलण्याची हीच भाषा - लहेजा आता प्रोफेशनल कम्युनिकेशन्समध्येही येणार आहे.
सामाजिक परिस्थिती आणि भाषेतले बदल
भाषेमध्ये येणारे ट्रेंड्स हे त्या त्या वेळच्या परिस्थितीची झलक दाखवत असतात. म्हणजे Brain Rot हा शब्द वॉल्डन लिहिणाऱ्या हेन्री डेव्हिड थोरोने 1854 मध्ये पहिल्यांदा वापरला होता. पण त्याचा आत्ता सर्च वाढला. कारण सोशल मीडियाच्या अतिवापराचे परिणाम चर्चेत आले.
Avataar, Sus सारखे शब्द आयुष्यावरचा गेमिंगचा प्रभाव दाखवतात. तर Manifest, Bae सारखे अनेक शब्द सोशल मीडियाचा प्रभाव दाखवतात. कारण तिथे व्यक्त होणारी पिढी हे शब्द वापरतेय.
तर आधी आफ्रिकन - अमेरिकन, Queer म्हणजे LGBTQI कम्युनिटीपर्यंत मर्यादित असणारे शब्द सगळ्यांनी वापरणं हे समाजाचं कुठेतरी - काही प्रमाणात समावेशक होणं दाखवतंय.
मग ही भाषेची मोडतोड आहे का? मुक्ता चैतन्य म्हणतात, "मला असं वाटत नाही. कारण भाषा ही कायमच प्रवाही असायला हवी. त्यात बदल झाले, तरच ती जिवंत राहील. नाहीतर भाषा मरून जाईल."











