मोबाईल, कॉम्प्युटरचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? त्यामुळे मोतीबिंदू होतो का?

मोतीबिंदू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या दोन दशकांमध्ये आपल्या सर्वांचा फोन आणि संगणकाचा वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे टॅब, आयपॅडसारखी उपकरणंही प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली आहेत. या उपकरणांमुळे आपलं आयुष्य अनेक बाबतीत सोपं झालं असलं तरी त्याच्या अतिवापरामुळे काही दुष्परिणामही तयार झाले आहेत.

या उपकरणांच्या अतिवापराचा जीवनशैलीविषयक आजार होण्यासाठी हातभार लागू शकतो. मोबाईलच्या अतिवापराचा डोळ्यांवर ताण येणं, सतत एकाजागी बसून राहाणं, हात, मनगट, हाताचं कोपर तसेच मानाचे आजार आणि कानाचेही आजार वाढत असल्याचं तुम्ही अनुभवलं असेल. त्यापैकीच डोळ्यांवर होणाऱ्या परिणामाचा आपण विचार येथे करणार आहोत.

या उपकरणांमधून ब्लू लाईट म्हणजे निळा प्रकाश बाहेर पडत असतो. निळा रंग हा प्रकाशाच्या स्पेक्ट्रमचचा एक भाग आहे. त्याची वेव्हलेंग्थ 380 ते 500 नॅनोमीटर्स एवढी असते. हा प्रकाश सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या उजेडाचाच एक भाग असतो तसेच संगणक, स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्समधूनही तो बाहेर पडत असतो.

सतत ब्लू लाईटमध्ये काम केल्यास डोळ्यांसंबंधीत अनेक आजार होण्याची शक्यता ही अधिक असते. याचा परिणाम इतका वाईट होतो की व्यक्ती त्यांची दृष्टी गमावू शकते.

आपल्यापैकी अनेक लोकांना अंधारात फोन वापरण्याची सवय असते. मात्र अशी सवय असल्यास ती तातडीने बदला. त्याचा डोळ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

डोळ्यांवर ताण आल्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होतात, वयोमानानुसार मोतीबिंदूचीही लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे मोतीबिंदू म्हणजे नक्की काय हे पाहाणं आवश्यक आहे.

मोतीबिंदू कशाला म्हणतात?

मोतीबिंदू हा डोळ्यांचा सामान्य विकार आहे. आपल्या डोळ्यांत ‘इमेज’ तयार होण्यापूर्वी प्रकाश तीन वेगवेगळ्या स्तरांतून जातो. पहिला स्तर म्हणजे कॉर्निया, दुसरा स्तर म्हणजे कॉर्नियामागे असलेली लेन्स व तिसरा स्तर म्हणजे रेटिना.

त्यानंतर रेटिनावर म्हणजे डोळ्यातील पडद्यावर प्रकाशकिरणं आदळली की, मेंदूकडे संकेत जाऊन आपल्याला एक ‘इमेज’ दिसू लागते. वयोमानानुसार किंवा अन्य काही कारणांनी दुसरा स्तर म्हणजे लेन्सधील फायबर पांढरट होऊ लागतात आणि प्रकाशाची किरणं डोळ्यांच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे धुसर दिसू लागतं मग मोतीबिंदूसारखी समस्या उद्भवते.

मोतीबिंदूची कारणं

या मोतीबिंदूच्या कारणांची माहिती आम्ही मुंबईतील लिलावती हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुनील मोरेकर यांच्याकडून घेतली.

ते म्हणाले, “आपल्या डोळ्यांच्या आतील लेन्स या कॅमेर्‍याप्रमाणे काम करत असतो. तो स्पष्ट दिसण्यासाठी रेटिना किंवा दृष्टिपटलावर प्रकाश केंद्रित करत असतो. तो डोळ्यांचा फोकसही अ‍ॅडजस्ट करत असतो. त्यामुळेच आपल्याला सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे जवळून किंवा दुरून पाहता येतात.

"लेन्स बहुतांशपणे पाणी आणि प्रोटीनने तयार झालेला असतो. यातील प्रोटीन किंवा प्रथिनांचे योग्य तर्‍हेने व्यवस्थापन केले जाते. हे प्रोटीनच लेन्सला पारदर्शी ठेवत असते आणि यातूनच प्रकाश आरपार जातो," डॉ. मोरेकर सांगतात.

बीबीसी मराठीवरील बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉइन व्हा.
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीवरील बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉइन व्हा.

“जसे आपले वय वाढत जाते, तसे काही प्रथिने एके ठिकाणी गोळा होतात आणि त्यांचा एक समूह तयार होतो आणि त्यामुळे लेन्सच्या एका छोट्या भागात बदल व्हायला सुरुवात होते. हाच मोतीबिंदू असतो आणि हळूहळू मोठा होत जातो आणि मग लेन्स धूसर होत जातो आणि आपल्यालाही धूसर दिसायला लागते. रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह,डोळ्यांची शस्त्रक्रिया, अतिनील किरणे, अतिमदयपान,आनुवंशिकता आदी कारणांमुळे मोतीबिंदूची समस्या उद्भवते.”

मोतीबिंदू आणि ब्लू लाईट यांचा संबंध आहे का?

विविध उपकरणांमधून आणि मोबाईलमधून बाहेर पडणारा निळा उजेड आपल्या डोळ्यासंदर्भात अनेक अडचणी निर्माण करू शकतो हे आता सिद्ध झालं आहे. मात्र त्यामुळे मोतीबिंदू होऊ शकतो का? यावर ठोस पुरावा सापडलेला नाही.

बोरिवली येथील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल येथील सोहम आय केअर सेंटरमध्ये कार्यरत असणारे डॉ. अश्विनी घुगे आणि डॉ. अभिजित देसाई यांनी बीबीसी मराठीला याबद्दल अधिक माहिती दिली.

ते सांगतात,"प्रयोगशाळेतील अभ्यासांमध्ये दिसलेल्या पुराव्यांनुसार अतिरिक्त निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो."

लहान मुलगी मोबाईलवर पाहताना

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"रोगपरिस्थितीशास्त्र म्हणजे एपिडिमिओलॉजिकल पुराव्यांनुसार विचार केला तर आपल्याला यासंबंधांचा संमिश्र पुरावे सापडतात. काही अभ्यासातून प्रखर निळ्या उजेडामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढल्याचं दिसतं, यामध्ये वेल्डिंगसारखे काही व्यवसाय येतात. मात्र क्लिनिकल पुराव्यांचा विचार केल्यास निळ्या प्रकाशाचा आणि मोतीबिंदूचा संबंध आहे असं सांगणारे पुरावे मर्यादित आहेत आणि ते पुरेसे सर्वसमावेशक नाहीत."

असं असलं तरीही डोळ्यांची काळजी घ्यायलाच पाहिजे, असं डॉ. घुगे आणि डॉ. देसाई सांगतात.

ते म्हणतात, "जर तुम्ही भरपूर स्क्रीन म्हणजे मोबाईल, टीव्ही, संगणक वापरत असताल तर ब्लू लाईट फिल्टरचे चष्मे वापरले पाहिजेत. तसेच अतिनिल किरणं रोखणाऱ्या काचांचा वापर केला पाजिजे. तुमच्या आहारात अँटिऑक्सिडंट्स योग्य प्रमाणात असले पाहिजेत, त्यामुळे डोळ्यावर येणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होऊ शकतो."

जरी मोतीबिंदू आणि निळा प्रकाश यांचा थेट सहसंबंध ठोस पुराव्यातून अजून दिसला नसला तरी डिजिटल उपकरण वापरताना डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे असं ते सांगतात.

ते म्हणतात, "याबाबत निळ्या प्रकाशाचा दीर्घकालीन वापरामुळे डोळ्यांवर मोतीबिंदूसारखे परिणाम होतात का हे पाहाण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे."

मोबाईलकडे पाहताना युवक

फोटो स्रोत, Getty Images

फरिदाबाद येथिल अमृता हॉस्पिटलच्या नेत्ररोगविभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी धर यांनीही बीबीसी मराठीला ब्लू लाईट आणि आपले डोळे यांचा संबंध कमी येण्यासाठी काही उपाय सांगितले.

त्या म्हणतात, “निळा प्रकाश रोखणारे चष्मे तुम्ही वापरू शकता तसेच ब्लू लाइट फिल्टर्सही स्क्रीनला लावू शकता. असे फिल्टर्स स्क्रीन प्रोटेक्टर किंवा त्याची सॉफ्टवेअर्सही असतात. ब्लू लाईट कमी करणारे सनग्लासेसही तुम्ही बाहेर वापरू शकता. संगणक, मोबाईल सतत वापरत असाल तर अध्येमध्ये विश्रांती घेणं गरजेचं आहे.”

याबरोबरच जीवनसत्व क आणि ई, ल्युटेइन, झिआझॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट असणारे घटक आहारात असले पाहिजेत.

मोबाईल स्क्रीनकडे पाहताना युवक

फोटो स्रोत, Getty Images

स्क्रीन टाईम कसा कमी कराल?

डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी स्क्रीनशी संपर्क म्हणजे मोबाईल, संगणकासारख्या उपकरणांचा स्क्रीनशी संपर्क कमी करणं आवश्यक आहे.

या स्क्रीन टाईमबद्दल बोलताना डॉ. सुनील मोरेकर म्हणाले, “स्क्रीन टाइम वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे लोकांचा सोशल मीडिया साइट्सचा वाढता वापर. जर तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर डिजिटल ब्रेक घेणे गरजेचे आहे. या ब्रेक दरम्यान, तुम्हाला तुमच्या फोन आणि सोशल मीडिया अकाऊंट्सपासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. मोकळ्या वेळेत कंटाळा येऊ नये म्हणून बहुतेक लोक आपला वेळ फोनवर घालवतात, पण जर तुम्हाला स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर तुमच्या मोकळ्या वेळेत मोबाईल वापरण्याऐवजी तुम्ही पुस्तके वाचणे, फिरायला जाणे, मित्रांना भेटणे, गार्डनिंग, छंद जोपासणे, चित्र काढणे या गोष्टी करा.”

डॉ. मोरेकर सांगतात, “आपण कितीवेळ स्क्रीन वापरतोय हे सांगणारी अॅप असतात. तुमचा दैनिक आणि साप्ताहिक स्क्रीन टाईम वापर ट्रॅक करण्यासाठी हे अॅप फायद्याचं ठरतं. हे अॅप तुम्हाला तुमच्या स्क्रीन टाईमसंदर्भातला सगळा डेटा पुरवतं. तुम्ही किती वेळ कोणतं अॅप वापरलं इत्यादी. याची तुलनाही तुम्ही करु शकता.”

मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी कराल?

फोटो स्रोत, Getty Images

मोतीबिंदू होऊ नये म्हणून काय कराल?

डोळ्यांच्या नियमित तपासणीत मोतीबिंदू ओळखता येऊ शकतो. वयोमर्यादेचा विचार केल्यास 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी डोळ्यांची नियमित व सर्वंकष तपासणी करण्याची शिफारस केली जाते. मोतीबिंदू दर्शविणारी कुठलीही लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णाने लवकरात लवकर नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्त्वाचे म्हणजे वयोमानानुसार दृष्टी कमी होणारच हे गृहित धरू नये किंवा दृष्टी कमी होणे जीवनाचा भाग म्हणून स्वीकारू नये. वेळीच निदान न झाल्यास त्यांना मोतीबिंदू आहे याची जाणीव लोकांना नसते आणि विशेष म्हणजे या लक्षणांवर लवकर उपचार न केल्यास दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होऊ शकतो.

आहारात व्हिटॅमिन सी आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करणे. उन्हात फिरताना गॉगल वापरल्यानेही डोळ्यांचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण होते.

मोतीबिंदू होऊ नये म्हणून या लक्षणांकडे लक्ष द्या

  • कॅमेरा प्रमाणेच आपल्या डोळ्यांनाही फोकसची गरज असते. गाडी चालवताना ट्राफिकचं चिन्ह नीट दिसत नसेल तर ती एक धोक्याची घंटा आहे असे समजा आणि त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या.
  • जर वाचताना अथवा फोन पाहताना अगदी जवळची अक्षरेसुद्धा नीट दिसत नसतील त्याकडे दुर्लक्ष करु नका. जसजसे वय व्हायला लागते, तसतसे शारीरिक बदल घडायला लागतात आणि अशा वेळी मोतीबिंदू सारख्या व्याधी दिसायला लागतात.
  • वय व्हायला लागल्यावर अनेकांना वाचन, स्वयंपाक, विणकाम अशा गोष्टी करण्यासाठी प्रखर उजेडाचीही गरज भासते. शिवाय, त्यांना रात्री गाडी चालवणे देखील अवघड वाटू लागते.

डॉ. मोरेकर सांगतात, "साठीपुढच्या सर्वच व्यक्‍तींना दृष्टिदोष होतो असे नाही; पण होणार्‍या दृष्टिदोषांची माहिती जर आपल्याला असेल, तर त्यांच्याशी जुळवून घेणं आणि गरजेनुसार योग्य ते उपचार करणं शक्य होते.

दृष्टिदोष झाल्यावर त्यावर वेळीच उपचार करणे महत्त्वाचे; पण ते शक्यतो होऊ नयेत किंवा आपली दृष्टी सुधारावी, यासाठी सुरुवातीपासूनच काळजी घ्यायला हवी."