लहान मुलांमध्ये डोळ्यांचे कोणते आजार आढळतात? त्यांची लक्षणं काय आहेत? महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत घरातले सर्वच सदस्य अतिशय काळजी घेत असतात. लहान बाळापासून वयाच्या सहा ते सात वर्षांपर्यंतच्या मुलांच्या वाढीवर अनेक घटक परिणाम करत असतात. मूल बसू लागणं, रांगणं, चालणं, बोलणं, खेळणं या गोष्टी जशा त्या मूलाच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर येतात तसेच त्यांची दृष्टी हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
लहान मुलांमध्ये डोळ्यांचे आजार आणि त्रास याबद्दल फारच कमी माहिती पालकांना असते. त्यामुळे आपल्या बाळाला नक्की कोणता त्रास होतोय याची कल्पनाच त्यांना येत नाही.
बहुतांशवेळा मुलांच्या डोळ्यासंदर्भातील आजारांची, त्रासांची कल्पना न आल्यामुळे त्यांच्यावरील उपचारांना उशीर होतो. यामुळे मुलाच्या वाढीमध्ये नवे अडथळे निर्माण होऊ शकतात.
काही आजार मुदतीपूर्वी जन्मास आलेल्या बाळांमध्ये (प्रिमॅच्युअर बेबी) दिसून येतात. ते तसे ओळखायचे याचीही माहिती असणे आश्यक आहे. यासाठीच आपण येथे लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांबद्दल माहिती घेणार आहोत.
लहान मुलांना डोळ्यासंदर्भात, दिसण्यासंदर्भात काही त्रास आहे हे कसं ओळखाल?
बहुतेक पालक आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या डोळे किंवा दृष्टीसंदर्भातील त्रासाबद्दल अनभिज्ञ असतात. डोळ्यांसंदर्भात असणाऱ्या त्रासाची लक्षणं पालकांच्या लक्षात येत नाहीत. किंवा कधीकधी त्याकडे दुर्लक्षही होतं. परंतु यामुळेच मुलांना भविष्यात आरोग्यविषयक मोठ्या प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं. यासाठी आपण काही लक्षणांची माहिती करुन घेऊ.

फोटो स्रोत, Getty Images
1) तिरळं पाहाणे- बरेचदा मुलं तिरळं किंवा तिरक्या नजरेने सर्वत्र पाहायचा प्रयत्न करतात. कदाचित अशी मुलं अस्पष्ट दिसत असल्यामुळे तिरकं पाहाण्याचा प्रयत्न करत असू शकतात. जरं मूल वारंवार असं करत असेल तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
2) डोळे सतत भरपूर चोळणं- मूल सतत डोळे चोळत असेल तर डोळ्यांचा दाह किंवा ते थकव्याचं लक्षण असू शकतं. तसेच दृष्टीदोष किंवा एखाद्या अॅलर्जीचंही ते लक्षण असू शकतं.
3) एक डोळा बंद करणं- दुहेरी प्रतिमा म्हणजे एकाच वस्तू किंवा व्यक्तीच्या दोन प्रतिमा दिसत असतील किंवा समोरचं दृश्य नीट दिसत नसेल तर एक डोळा बंद करुन पाहाण्याचा प्रयत्न केला जातो. जर मूल सतत असं करत असेल तर तपासणी करण्याची गरज आहे.
4) डोके आणि डोळे दुखणं- मूल सतत डोकं दुखतंय, डोळे दुखतायत अशा तक्रारी करत असेल तर ते एखाद्या त्रासाचं लक्षण असू शकतं.
5) वस्तू अगदी तोंडासमोर धरणं- मूल जर पुस्तकं, खेळणी किंवा इतर वस्तू अगदी तोंडासमोर धरत असेल तर त्याला कदाचित लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसत असल्यामुळे असं करावं लागत असेल.
6) डोकं तिरकं करणं किंवा वळवणं- ज्या मुलांचे डोळे एकाच दिशेने एकाचवेळी दृश्य किंवा वस्तू पाहू शकत नसतात ती मुलं डोकं तिरकं करुन ते एकाच रेषेत आणून पाहाण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीला स्ट्रॅबिस्मस असं म्हणतात.
7) उजेड सहन न होणं- काही मुलांना उजेड सहन होत नाही. त्यांना काही दृष्टीदोष किंवा संसर्ग (इन्फेक्शन) किंवा दाह (इन्फ्लमेशन) असू शकतात.
8) डोळ्यातून सतत पाणी वाहाणं- जर डोळ्यांतून सतत पाणी येत असेल तर अश्रू वाहून नेणाऱ्या नलिकांमधील अडथळ्यांमुळे ते होऊ शकतं, तसेच डोळे आल्यावरही (कंजक्टिव्हायटिस) डोळ्यांतून द्रवपदार्थ बाहेर येत असतात.
9) डोळे आणि हाताच्या संतुलनात अडथळा- एखाद्या जागेच्या खोलीचा अंदाज न येणं किंवा हात-डोळे यांच्यात संतुलन राखता येत नसेल तर दृष्टिदोष असू शकतात.
10) अभ्यासात मागे पडणे- दृष्टीसंदर्भातील त्रासांमुळे मूल अभ्यासात, खेळात मागे पडू शकतं. त्यामुळे त्यांना डोळ्यांसंर्भातील काही त्रास आहे का हे पाहाणं आवश्यक आहे.
अशा प्रकारची कोणतीही लक्षणं असतील तर तात्काळ डॉक्टराना दाखवून तपासणी केली पाहिजे. याबाबत घरच्याघरी उपचार घेणं टाळलं पाहिजे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाळाच्या, मुलांच्या डोळ्यांवर उपचार घेतले पाहिजेत.
लहान मुलांमध्ये डोळ्यांचे कोणते आजार व त्रास दिसून येतात?
लहान मुलांमध्ये दृष्टीसंदर्भातील तसेच डोळ्यांचे अनेक आजार दिसून येतात.
मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रद्धा चांदोरकर यांनी बीबीसी मराठीला याबद्दल अधिक माहिती दिली.
त्यांनी लहान मुलांना होणाऱ्या या आजारांची काही उदाहरणं दिली ती पुढीलप्रमाणे-

फोटो स्रोत, Getty Images
1) प्रतिमा निर्मितीत अडथळे- याला रिफ्रॅक्टिव्ह एरर्स अशा वर्गातले त्रास म्हटलं जातं. यात लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात याला निअरसायटेडनेस किंवा मायोपिया म्हणतात. काही मुलांना जवळच्या वस्तूंऐवजी लांबच्या वस्तू स्पष्ट दिसतात त्याला फारसायटेडनेस म्हणजे हायपरोपिया म्हणतात. अॅस्टिगमॅटिझममध्ये मुलाला प्रतिमा अस्पष्ट दिसत असते.
2) अॅम्बलीओपिया- याला लेझी आय असं म्हटलं जातं. दृष्टिविकासातील अडथळ्यामुळे एका डोळ्याची दृष्टी दुसऱ्या डोळ्यापेक्षा कमकुवत असल्यास या स्थितीला लेझी आय असं म्हटलं जातं.
3) स्ट्रॅबिस्मस- याला क्रॉस्ड आय असंही म्हटलं जातं. डोळे एकाच रेषेत नसतील, त्यांच्यात संतुलन नसेल तर त्या मुलांमध्ये दृष्टीदोष तयार होऊ शकतात. त्यावर योग्य उपचारांची गरज असते.
4) कंजक्टिव्हायटिस- म्हणजे डोळे येऊन लाल होणं, पापणीच्या आत डोळ्यांचा भागावर संसर्गामुळे दाह होतो. त्यामुळे या स्थितीला डोळे येणं असं म्हणतात. संसर्ग पसरू नये यासाठी डॉक्टरांकडून तात्काळ उपचार घेणं आवश्यक असतं.
5) अश्रूनलिकांमध्ये अडथळे- अश्रूग्रंथींनी तयार केलेले अश्रू वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये अडथळे आल्यास डोळ्यातून भरपूर पाणी सतत वाहू लागतं तसेच त्यामुळे संसर्गही होण्याची शक्यता असते.
6) टोसिस- (इंग्रजी स्पेलिंग Ptosis, उच्चार- टोह्सिस) यामध्ये रुग्णाच्या पापण्या अर्ध्याहून जास्त किंवा पूर्णच बुबुळ झाकतात. त्यामुळे त्याला पाहाण्यात अडथळे येतात.
7) डोळ्यांसंदर्भातील अॅलर्जी- अॅलर्जीमुळे डोळे लाल होणं, सुजणं, खाज येणं असे त्रास होतात.
8) लहान मुलांमधला मोतीबिंदू- नेत्रभिंगावर धूसर गोष्ट साचणं यामुळे मुलाल त्रास होऊ शकतो. त्यावर उपचार घेतले नाहीत तर मुलाला दृष्टीदोष होऊ शकतात.
9) रंग ओळखण्यात अडथळा- रंग ओळखण्यात काही मुलांना अडथळे येऊ शकतात.
10) ग्लुकोमा- यामध्ये डोळ्यावर प्रमाणाबाहेर ताण आल्यामुळे आतील नस निकामी होऊ शकते यामुळे दृष्टी जाऊ शकते किंवा अंधत्व येतं.
11) रेटिनल डिटॅचमेंट- यामध्ये डोळ्यापासून रेटिना वेगळा होतो आणि यामुळे दृष्टी कमी होते किंवा अंधत्व येतं.
रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी म्हणजे काय?
लहान मुलांमध्ये दिसणारा रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी म्हणजेच आरओपी हा एक मोठा दृष्टी दोष आहे. जी अर्भकं मुदतीपूर्वी म्हणजे प्रिमॅच्युअर (पूर्ण वाढीला आवश्यक असणाऱ्या काळाच्या आधीच) जन्माला येतात त्यांच्यामध्ये काही बाळांच्या डोळ्यातील पडद्यातील रक्तवाहिन्या अयोग्य पद्धतीने विकसीत होतात. त्या स्थितीला आरओपी असं म्हटलं जातं.
भारतासह जगभरात मुदतपूर्व प्रसुतीचं, प्रसुतीनंतर बाळांना विशेष दक्षतेखाली ठेवण्याचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे आरओपीचं प्रमाणही भरपूर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या आरओपीबद्दल डॉ. श्रद्धा चांदोरकर यांनी बीबीसी मराठीला विस्तृत माहिती दिली.
डॉ. चांदोरकर सांगतात, “आरओपीबद्दल अत्यंत कमी माहिती लोकांना असते मात्र हा एक गंभीर आजार आहे. यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळांना कायमचं अंधत्व तसेच काही बाळांना पुढील काळात गंभीर दृष्टीदोष होऊ शकतात. भारतात दरवर्षी साधारणतः 35 लाख बाळं प्रिमॅच्युअर जन्माला येतात. त्यातली सुमारे 6 लाख बाळं 32 आठवड्यांपेक्षाही कमी गरोदरपणात जन्माला येतात. यातील 40 टक्के बाळांना जन्मानंतर योग्य उपचार मिळतात, यांपैकी 80 टक्के बाळं जिवंत राहातात. आणि प्रत्येकवर्षी 2 लाख बाळांना आरओपी होण्याची शक्यता असते. भारतातील विविध प्रदेशांमध्ये आरओपीचं प्रमाण 38 टक्के ते 47 टक्के असल्याचं दिसलं आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
आरओपीमध्ये काय होतं? त्याची कारणं काय आहेत?
आरओपीबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ. श्रद्धा चांदोरकर म्हणाल्या, "दृष्टीपटलावरील म्हणजे रेटिनावरील उतींवर परिणाम झाल्यामुळे हा आजार होतो.
रेटिना प्रकाशाचा अंदाज घेऊन मेंदूला संदेश पाठवत असतो त्यामुळे आपल्याला समोरचं दिसत असतं. आरओपीमध्ये बाळाच्या रेटिनावर नको असलेल्या म्हणजेच अनावश्यक रक्तवाहिन्या तयार होतात. त्यामुळे गंभीर दृष्टीदोष तयार होतात, यामध्ये बाळाची दृष्टी पूर्ण जाऊ शकते."

फोटो स्रोत, Getty Images
आरओपीसाठी कारणीभूत असलेल्या गोष्टींबद्दल सांगताना डॉ. चांदोरकर म्हणाल्या, "साधारणतः 38 ते 42 आठवड्यांचं गरोदरपण हे नॉर्मल मानलं जातं. मात्र ज्या बाळांचा जन्म 30 आठवड्यांच्या आत होतो, ज्यांचं वजन 1500 ग्रॅम पेक्षा कमी असतं, ज्यांना जन्मानंतर आयसीयूत ऑक्सिजनवर ठेवण्यात येतं तसेच जन्मानंतर ज्या बाळांना योग्य काळजी, दक्षता मिळत नाही अशा बाळांना आरओपीचा त्रास होऊ शकतो. जर त्यावर उपचार झाले नाहीत तर दृष्टीसंदर्भात दोष तयार होऊ शकतात, अंधत्व येऊ शकतं."
आरओपीवर उपचार काय?
आरओपीची शक्यता असलेल्या बाळांची नेत्रतज्ज्ञ तपासणी करतात. त्यांचा आजार कोणत्या टप्प्यावर आहे हे पाहून उपचार ठरवले जातात.
लेसर उपचारांमध्ये लेसरद्वारे रेटिनावर उपचार केले जातात. यामुळे रेटिनावर वाढलेल्या अनावश्यक वाहिन्या आकसतात आणि त्यामुळे पुढील त्रास कमी होतो.
त्यानंतर क्रायोथेरपीमध्ये नेत्रतज्ज्ञ रेटिनावरील अविकसित भाग गोठवतात त्यामुळे अनियमित रक्तवाहिन्यांच्या वाढीला खिळ बसते व पुढची गुंतागुंत टळते.

फोटो स्रोत, Getty Images
काही मुलांच्या रेटिनातील ही अनावश्यक रक्तवाहिन्यांची वाढ थांबवण्यासाठी औषधांची इंजेक्शन्स द्यावी लागतात.
काही मुलांवर शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र यासंदर्भातील सर्व निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांना विचारुन तसेच योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायचे असतात.
तुमच्या मुलांना दृष्टीसंदर्भात, डोळ्यांसंदर्भात काही त्रास असतील काय काळजी घ्याल?
ज्या मुलांना डोळ्यांसंदर्भात कोणतेही त्रास असतील त्यांच्या पालकांची या प्रवासात मोठी भूमिका असते.
डॉ. श्रद्धा चांदोरकर सांगतात, “त्यांच्या पालकांनी मुलांची नेत्रतज्ज्ञांकडून नियमित तपासणी करुन घेतली पाहिजे. तसेच घरामध्ये डोळ्यांच्या आजारांचा इतिहास असेल तर विशेष काळजी घेतली पाहिजे. मुलांमध्ये वेळोवेळी दिसणाऱ्या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे. जर एखाद्या मुलामध्ये असा कोणताही दोष आढळला तर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत.”

फोटो स्रोत, Getty Images
याबरोबरच काही चांगल्या सवयीही घरामध्ये सुरू केल्या पाहिजेत. डोळ्यांची नीट काळजी घेणं, सतत एकच काम करत असाल तर अध्येमध्ये डोळ्यांना विश्रांती देणं. घरात पुरेसा उजेड असणं, आवश्यक असेल तर चष्मा वापरणं असे बदल करू शकतो.
मुलांना डोळ्यांची काळजी कशी घ्यायची ते शिकवता येईल, हात धुणे, संसर्ग टाळणे यासाठी आवश्यक बदल करता येतील. डोळे किंवा दृष्टीसंदर्भातील त्रास असणाऱ्या मुलांना भावनिक पाठबळ, धीर देणंही गरजेचं असतं.











