रील्स बघता-बघता सलग 5-6 तास निघून जातात? मग 'ब्रेन रॉट' या नव्या शब्दाबद्दल नक्की वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, यास्मिन रुफो
- Role, बीबीसी न्यूज
इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर रील्स पाहत नाहीत, अशी माणसं आता शोधून सापडायची नाहीत! ही काही अतिशोयक्ती नाही, वास्तव आहे. आपल्यापैकी अनेकजण तासन् तास स्क्रीनला चिकटून असतात.
रील्स पाहण्यात किती वेळ निघून गेलाय, हे आपल्याला लक्षातच येत नाही.
मीम्स, रिल्स बघण्यात आपण इतके गुंग होतो की अनेक गोष्टींचा त्यापुढे विसर पडतो. पण हे असं का होतं? याला एका शब्दात मांडायचं झाल्यास कसं मांडता येईल?
इंग्रजीतील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड प्रेस डिक्शनरीमध्ये यासाठी एक शब्द दिला गेलाय. ‘ब्रेन रॉट’ (Brain Rot) असा हा शब्द आहे.
ब्रेन रॉट म्हणजे काय, या शब्दाची निवड का केली गेली, असं सगळं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
'ब्रेन रॉट' म्हणजे, अशी सवय, ज्यात सोशल मीडियावरील निरुपयोगी ऑनलाईन साहित्य पाहण्याची सवय जडते. स्क्रीनवर निरुपयोगी वस्तू पाहताना तासन् तास निघून जातात.
2023 ते 2024 दरम्यान या शब्दाचा वापर 230 टक्क्यांनी वाढला आहे.
मानसशास्त्रज्ञ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अँड्र्यू प्रझिबिल्स्की म्हणतात, या शब्दाची लोकप्रियता आपल्याला ‘जीवनातील वेळेचे महत्व दर्शवते.’
‘ब्रेन रॉट’ या शब्दानं प्रकाशकांनी अंतिम यादीत निवडलेल्या पाच शब्दांनाही मागे टाकलंय.
शॉर्टलिस्टेड शब्दांमध्ये ‘डिम्योर’ (demure), ‘रोमँटेंसी’ (romantansy) आणि ‘डायनॅमिक प्रायसिंग’ (dynamic pricing) यांचा समावेश होता.


'ब्रेन रॉट' शब्द आला कुठून?
‘ब्रेन रॉट’ म्हणजे एखादी व्यक्तीच्या मानसिक किंवा बैद्धिक स्थितीत कथितरीत्या बदल घडून येणे.
सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, एखाद्या गोष्टीत विनाकारण गरजेपेक्षा जास्त वेळ घालवणं, यामुळे आपल्या मनस्थितीवर परिणाम होतो, यालाच ब्रेन रॉट म्हणता येईल.
ब्रेन रॉटचा वापर इंटरनेट यायच्या खूप आधीपासून करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
1854 साली जगप्रसिद्ध लेखक हेनरी डेव्हिड हेन्री थोरो यांनी लिहिलेल्या 'वॉल्डन' या पुस्तकात या शब्दाचा उल्लेख आढळून आला होता.
थोरो यांनी समाजातील अशा काही घडामोडींवर टीका केली होती, ज्याचा अतिविचार, अतिवापर माणसाला मानसिक आणि बौद्धिक अधोगतीकडे घेऊन जातो.
यावर प्रश्न उपस्थित करताना थोरो म्हणाले होते, “इंग्लंडमध्ये बटाटे सडण्याच्या प्रक्रियेला थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण मानवी मेंदू सडण्याची जी प्रक्रिया सुरू झालीय, त्याला आटोक्यात आणण्यासाठी काही पाऊल उचललं जाणार आहे का? कारण ही समस्या अधिक व्यापक आणि तितकीच घातक आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडियावरील ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या गटात मोडणाऱ्या तरुण पिढीत हा शब्द बराच लोकप्रिय झाल्याचं पहिल्यांदा दिसून आलं. तिथूनच सोशल मीडियावर विनाकारण तासन् तास घालवत बिनकामाचा कंटेट पाहण्यात वेळ वाया घालवणे, याच्या पर्यायी शब्दाच्या रुपात ब्रेन रॉटच्या सर्वत्र वापर केला जाऊ लागला.
प्राध्यापक प्रझिबिल्स्की म्हणतात, “ब्रेन रॉटसारखी गोष्ट अस्तित्वात असल्याचा ठळक पुरावा नाहीये. मात्र, या माध्यमातून ऑनलाईन जगाप्रति आपल्या मनात असलेली नाराजी व्यक्त होते. तसेच सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांबाबतची चिंताही दिसून येते.”
ते म्हणतात, “गेल्या वर्षी ‘रिज’ हा शब्द निवडण्यात आला होता. या माध्यमातून आपल्याला भाषा कशाप्रकारे ऑनलाईन समुहात तयार होते, उपयोगात येते आणि आदानप्रदान केली जाते, हे समजून घेता येईल.”
“ब्रेन रॉट व्हर्चुअल रिएलिटीमुळे उत्पन्न होणाऱ्या धोक्यांना दर्शवते सोबतच आपण रिकाम्या वेळेचा वापर कुठे, कसा आणि कशाप्रकारे करतो, याचाही खुलासा यातून होतो.”
ब्रेन रॉटप्रमाणे चर्चेत असलेले इतर शब्द
ब्रेन रॉटव्यतिरिक्त ऑक्सफर्ड डिक्शनरीतील पाच शब्द शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत.
डिम्योर : सौम्य, संयमित – अशी व्यक्ती जो दिखावा करत नाही किंवा त्याचा व्यवहार अगदी संयमित आहे.
डायनॅमिक प्राइसिंग : एखादी वस्तू किंवा सेवेचा बाजारातील बदलत्या स्थितीनुसार किंमतीत होणारा बदल
लोर : एखादी व्यक्ती किंवा विषयाशी संबंधित तथ्य, त्याची पार्श्वभूमी काय, कथांचं संग्रह, ज्याच्याशी संबंधित प्रश्न तपशीलवार माहितीसाठी किंवा चर्चेसाठी आवश्यक मानले जातात.
रोमँटिसिझम : काल्पनिक कथांचा एक प्रकार ज्याच्या माध्यमातून प्रणय आणि कल्पनारम्य विषय कथांच्या माध्यमातून मांडला जातो. यात विशेषत: जादू, अलौकिक आणि साहसी कथांचा समावेश असतो, परंतु त्याचं केंद्रात रोमँटिक कथा असते.
स्लोप : कला, लेखन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार केलेली अशी गोष्ट, जी विवेकाशिवाय ऑनलाईन शेअर केली आहे, ज्यामध्ये सिद्ध न झालेल्या किंवा निरुपयोगी गोष्टींचा समावेश आहे.
केंब्रिज विद्यापीठाने कोणता शब्द निवडलाय?
अशाप्रकारच्या शब्दांची घोषणा करणारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही एकमेव नाही. तर, गेल्या महिन्यात केंब्रिज विद्यापीठाने ‘मॅनिफेस्ट’ हा शब्द जाहीर केला होता.
पारंपरिकरित्या मॅनिफेस्ट हा शब्द विशेषण म्हणून वापरला जात असेल, तर त्याचा अर्थ स्पष्ट असा होतो. याची व्याख्या करायची झाल्यास असा शब्द जो ‘चिन्हं किंवा कृतींद्वारे काहीतरी स्पष्टपणे दर्शवते’ असा होतो.
यात आता ‘टू मॅनिफेस्ट’ हा शब्दही सहभागी झालाय.
‘टू मॅनिफेस्ट’ म्हणजे आपणाला जे साध्य करायचंय त्यासाठीचा दृढसंकल्प आणि इच्छाशक्ती बाळगणं.
कॉलिन्स इंग्लिश डिक्शनरीने नोव्हेंबरमध्ये ब्रॅट हा शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला.
‘ब्रॅट’ म्हणजे अशी व्यक्ती जी “आत्मविश्वासू, स्वतंत्र आणि हंसमुख आहे."
यासोबतच ‘डिम्योर’ या शब्दालाही इंटरनेट ट्रेंड डिक्शनरी डॉट कॉमने 'वर्ड ऑफ द इयर' घोषित केलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











