स्मार्टफोनचं व्यसन सोडायचंय, मग हा 'बार्बी फोन' तुमच्यासाठीच

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झोई क्लेमन
- Role, टेक्नोलॉजी रिपोर्टर, बीबीसी न्यूज
बाजारात सध्या एका नव्या फोनची चर्चा जोरदार सुरू आहे. युके आणि युरोपमध्ये लाँच झालेला हा फोन इतर मोबाइल फोन्सहून काहीसा वेगळा आहे.
'बार्बी' असं या फोनचं नाव असून या फोनच्या निर्मात्यांनी केलेल्या दाव्यानुसार हा फोन तरुणांना लागलेलं स्मार्टफोनचं व्यसन दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
फोनचं नावचं 'बार्बी फोन' असल्यामुळे अर्थातच हा फोन गुलाबी रंगाचा आहे आणि त्यामधील फीचर्सही अत्यंत साधे आणि बेसिक आहेत.
तुम्ही लहानपणी 'छैंया छैंया'चे गाणे वाजणारा फोन पाहिला असेल; हा फोन दिसायला अगदी तसाच काहीसा आहे.
या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा नाही. त्यामध्ये फक्त एका 'गेम'चा समावेश आहे आणि इंटरनेटबाबत बोलायचं झालं तर अत्यंत मर्यादित स्वरूपात या फोनमध्ये इंटरनेटचा वापर करता येतो.
'HMD' कंपनीने या बार्बी फोनची निर्मिती केली आहे. याच कंपनीकडून 'नोकिया' फोनचीही निर्मिती करण्यात येते. आपल्या आयुष्यावर झालेला 'डिजिटल इम्पॅक्ट' कमी करण्याची इच्छा असलेल्या लोकांची संख्या भारतासहित जगभरात वाढत आहे. त्यासाठी मोबाइल फोनचा नियंत्रित वापर ही अत्यावश्यक बाब ठरते आहे.
'अशा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणं', हा आमचा प्रयत्न असल्याचे HMD या कंपनीने म्हटलं आहे.
मात्र, त्यासाठी बार्बी फोनची काय गरज? पेक्षा आपल्याकडे असलेला स्मार्टफोन अधिक 'आरोग्यदायी' आणि 'नियंत्रित' पद्धतीने वापरण्यास शिकून घेणं हा पर्याय अधिक प्रभावी असल्याचं इतर काहींचं म्हणणं आहे.
मुलांमध्ये वाढलेला स्क्रीन टाइम चिंताजनक
हल्ली लहान मुलंही आपला बहुतांश वेळ मोबाइल फोनवर घालवताना दिसतात. त्यामुळे, मुलांकडून होणारा स्मार्टफोनचा वापर मर्यादित व्हायला हवा; किंबहुना तो बंदच व्हायला हवा, अशी मागणी पालकांकडून आणि जागृत नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
स्मार्टफोनमुळे मुलांची एकाग्रता कमी होईल असे पालकांना वाटते. त्याचबरोबर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही स्मार्टफोन चांगले नाहीत असं अनेक पालकांना वाटतं. त्यातच कोणत्या प्रकारचे कंटेट ते पाहत आहेत हे देखील आपल्या नियंत्रणात नसतं अशी भीती या पालकांना असते.
यावर उपाय म्हणून जगभरात नवनवे प्रयोग आणि उपायही राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा म्हणून काही शाळांकडूनही अनोखे प्रयत्न केले जात आहेत.
युकेमधील सुप्रसिद्ध इटॉन कॉलेजने आपल्या काही विद्यार्थ्यांना 'ब्रिक फोन' देऊ केले आहेत. ब्रिक फोन हे अगदी सुरुवातीच्या काळातील मोठ्या मोबाइल फोनसारखेच असतात ज्यांना फीचर्स फोन असेही म्हणतात. यामध्ये, मेसेजिंग आणि कॉलिंगशिवाय फारच तुरळक सुविधा उपलब्ध असतात.

फोटो स्रोत, Getty Images
तंत्रज्ञानाचे शाळेसाठी होणारे फायदे आणि त्यातून उभी राहणारी आव्हाने या दोन्हींचे संतुलन साधण्याचा प्रयत्न आम्ही करू इच्छितो, असे इटॉन कॉलेजचे म्हणणे आहे.
युकेमधील 'EE' या मोबाइल नेटवर्क कंपनीनेही या आठवड्यात यासंदर्भात भाष्य करुन या चर्चेमध्ये उडी घेतली आहे. आपल्या अकरा वर्षांखालील मुलांना स्मार्टफोन्स अजिबात देऊ नयेत, असा सल्ला या कंपनीने पालकांना दिला आहे.
'सध्या स्मार्टफोनचा वापर नियंत्रित करण्याचा ट्रेंड जोरदार आहे. आम्ही फक्त या ट्रेंडला प्रतिसाद देत आहोत', असे बार्बी फोन्सची निर्मिती करणाऱ्या HMD कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लार्स सिल्बरबॉअर यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, "अमेरिकेतून सुरू झालेला हा ट्रेंड आता युरोपातही वाढल्याचं आम्हाला दिसून आलंय. अधिकाधिक लोकांची आता सदासर्वकाळ डिजिटल जगातच राहण्याची इच्छा नाहीये."
डिजिटल डिटॉक्स
मात्र, HMD कंपनी आणि त्यांचे अधिकारी लार्स सिल्बरबॉअर यांचा हेतू किती शुद्ध आहे, याबाबत काहींना नक्कीच साशंकता असू शकते.
'आपल्याला बार्बी फोनमध्ये 'व्हॉट्सअप'सारखा मेसेजिंग प्लॅटफॉर्मचाही समावेश करायला आवडेल', असे त्यांनी मान्य केले आहे.
ज्यांनी हा फोन वापरला आहे, त्यांचा अनुभव नक्कीच समाधानकारक आहे.
मी स्वत: ( प्रस्तुत पत्रकार) हा बार्बी फोन एक दिवस वापरुन पाहिला आणि सध्या तरी डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी हा फोन कितपत प्रभावी ठरू शकतो, याबाबतच्या माझ्या मनातील शंका कमी झाल्या आहेत.
कारण, या बार्बी फोनमध्ये अत्यंत कमी फीचर्स उपलब्ध असल्याने डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी तो नक्कीच एका मर्यादेपर्यंत प्रभावी ठरतो. हा फ्लिप फोन आहे. म्हणजेच त्याच्या वरच्या बाजूला स्क्रीन आहे तर खालच्या बाजूला कीपॅड आहे.
या दोन्हींच्या मधून तो दुमडता येतो. या फोनमध्ये अॅप स्टोअरची सुविधा नाही; तसेच हा टच स्क्रीन फोनदेखील नाही. या फोनमध्ये सोशल मीडियाचा एकही प्लॅटफॉर्म समाविष्ट नाही.
साध्या एसएमएस मेसेज व्यतिरिक्त या फोनवरुन आधुनिक पद्धतीने काही पाठवताही येत नाही आणि स्वीकारताही येत नाही.


म्हणजेच, व्हॉट्सअप मेसेजप्रमाणे टेक्स्ट मेसेजेसना 'रिड रिसीप्ट्स' (मेसेजच्या खाली दिसणारे निळ्या दोन रेषा) दिसत नाहीत. रिड रिसीप्ट्समुळे आपला मेसेज समोरच्याला पोहोचल्याचे आणि त्याने तो वाचल्याचे निश्चितपणे समजू शकते. ती सुविधा या फोनमध्ये नाही. याबरोबरच 'टायपिंग...' असेही दिसत नसल्याने चॅट करताना समोरचा व्यक्ती टाइप करतोय, हेदेखील या फोनवरुन कळत नाही.
खरं तर सध्या अनेक स्मार्ट्सफोनवर ही सुविधा पहिल्यापासूनच अंतर्भूत केलेली असते. त्यामुळे, मला हा फोन वापरताना फारसे टेक्स्ट मेसेजही आले नाहीत.
स्मार्टफोनवर एखादा टेक्स्ट टाइप करताना काही शब्द सुचवले जातात; मात्र, टचस्क्रीनच्या तुलनेत या फोनवर ही सुविधा फारच संथ गतीने चालत असल्याने मला लक्षात आले. त्यापेक्षा हा फोन वापरताना समोरच्या व्यक्तीला थेट कॉल करुनच संवाद साधणे अधिक सहज-सोपे ठरते.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही नोकियाच्या मोबाइलवर सापाचा गेम खेळला असेल; तोच गेम या फोनमध्येही तुम्हाला खेळता येईल. फरक इतकाच बार्बी फोनमध्ये या गेमचे नाव 'मलिबू स्नेक' असे असून यातील सापही गुलाबी रंगाचा आहे.
मात्र, या बार्बी फोनची रचना फारच आकर्षक आहे, त्यामुळे तो निश्चितपणे लक्ष वेधून घेतो. विशेषत: मुली आणि महिलांना तो अधिक आकर्षित करतो. मी ग्लासगो शहराच्या मुख्य भागातून हा फोन घेऊन फिरताना मला हे लक्षात आले.
युकेमध्ये हा फोन 99 डॉलर्सना लाँच झाला आहे. नोकियाच्या नॉन-ब्रँडेड फीचर फोनपेक्षा ही किंमत नक्कीच दुप्पट आहे. बाजारात अशाच स्वरूपाचे इतरही अनेक फोन्स उपलब्ध आहेत, जे या फोनसारखीच सुविधा उपलब्ध करुन देतात. फरक इतकाच की ते कोणत्याही मोठ्या ब्रँडशी जोडलेले नाहीत.
"मजा म्हणून हा फोन खरेदी करण्याचा मोह फार कमी जणांना होईल, असं मला वाटतं. वास्तवामध्ये, प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनवर इतका अवलंबून आहे की, एखादा 'डिटॉक्स डे' वगळता स्मार्टफोनशिवाय राहू शकेल, याची शक्यता कमी आहे," असे मत बेन वूड यांनी मांडले आहे. ते फोनमधील तज्ज्ञ असून त्यांच्याकडे स्वत:चा फोनचा संग्रहही आहे.


या संग्रहामध्ये वर्षभरात लाँच झालेल्या मोबाइल फोन्सचा समावेश आहे. पुढे ते म्हणतात की, ज्यांना डम्बफोन (कुचकामी फोन्स) म्हणता येईल, अशाही फोन्सचा बाजार मोठा आहे. 'CCC इनसाइट' या त्यांच्या फर्मने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी जवळपास 4 लाख फोन्सची विक्री होऊ शकते. "HMDसारख्या कंपनीसाठी हे एक आकर्षक उत्पादन आहे," असे त्यांनी म्हटले.
स्मार्टफोन्स आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकणे हा काही व्यवहार्य उपाय असू शकत नाही, असे काही तज्ज्ञांचं मत आहे.
सरतेशेवटी, मोबाइल फोन्स आपल्या आयुष्यामध्ये बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. त्यामुळे, त्यांचा वापर योग्य आणि सुरक्षितपणे कसा करायचा, याची शिकवणूक आपल्या मुलांना देणे हाच एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
"नव्या पिढीमध्ये योग्य, दीर्घकाळ परिणाम करणारी डिजिटल साक्षरतेची शाश्वत कौशल्ये कशी प्रसारित करता येईल, याबाबतचा विचार आपण अधिक करायला हवा," असे बाथ स्पा विद्यापीठातील 'सायकोलॉजी आणि सायन्स कम्युनिकेशन' विषयाचे प्राध्यापक पीट एचेल्स यांनी म्हटले आहे.
त्यांनी स्क्रीन टाइम या विषयावर पुष्कळ लिखाण केले आहे. ते म्हणाले की, "आपण आपले फोन अधिक योग्य आणि चांगल्या पद्धतीने वापरू शकतो, असे मला वाटते."
HMD आता एका नव्या स्वतंत्र प्रकल्पावर काम करत आहे. पालकांसमवेत काम करुन या नव्या फोनची रचना करण्यात येत आहे.
या प्रकल्पावर काम करण्यासाठी एक हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. HMD कंपनीचे लार्स सिल्बरबॉअर यांनी असा दावा केलाय की, यातून तयार होणारा नवा फोन हा एखादा डम्बफोन आणि स्मार्टफोन या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी बसणारा तयार होईल.
ते म्हणाले की, "सगळ्या सोयी-सुविधा असलेला स्मार्टफोन मला हवाय की डिजिटल जगाकडे पाहण्याचा एक संतुलित दृष्टीकोन असणारं काहीतरी हवंय, हा पर्याय आम्हाला उपलब्ध करुन द्यायचा आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











