टेलिग्राम बनतंय 'खिशातलं डार्क वेब', गुन्हेगारांचं हे 'गुप्त जग' नेमकं कसं काम करतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जो टाइडी
- Role, सायबर प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
जगभरात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रसार वाढत गेल्यावर दिवसेंदिवस सायबर सुरक्षेचा मुद्दा अतिशय गंभीर होत चालला आहे. गुन्हेगार अतिशय शिताफीनं सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करून निसटत आहेत.
टेलिग्रामच्या सीईओला झालेल्या अटकेमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जवळपास नऊ महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी एका बातमीसाठी संशोधन करत होतो. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अंमली पदार्थांच्या विक्रीवर पूर्ण भर असलेल्या एका अशा टेलिग्राम (Telegram) चॅनलशी माझं टेलिग्राम खातं जोडण्यात आलं आहे.
यानंतर मला आणखी एका चॅनलशी जोडण्यात आलं. हे चॅनल हॅकिंगशी संबंधित होतं. मग पुन्हा एका चॅनलशी मला जोडलं गेलं. या चॅनलचा संबंध चोरलेल्या क्रेडिट कार्डशी होता.
हे असं का घडत होतं? थोडसं लक्ष दिल्यावर माझ्या लक्षात आलं की हे सर्व माझ्या टेलिग्राम खात्याच्या (Telegram Account) सेटिंग्समुळे होत होतं. अॅपवरील माझ्या खात्याच्या सेटिंग्समुळेच लोक मी काही न करताच आणि मला न सांगताच त्यांच्या चॅनलशी जोडून घेऊ शकत होते.
मात्र, असं घडल्यावरही मी माझ्या टेलिग्राम खात्याची सेटिंग्स बदलली नाही. मला पाहायचं होतं की, पुढे आणखी काय काय होणार आहे. यानंतर काही महिन्यातच मला 82 वेगवेगळ्या ग्रुप्सशी जोडण्यात आलं.

अखेर एक दिवस मी सर्व थांबवण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या टेलिग्राम अॅपची सेटिंग्स बदलली. त्यानंतर मात्र हा सर्व प्रकार थांबला.
मात्र, आता आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. मी अॅपमध्ये लॉग इन करताच माझ्यासमोर टेलिग्राममधील खूपच सक्रीय असलेल्या डझनावारी अवैध ग्रुप्सचे हजारो नवे मेसेज येऊ लागतात.
दरम्यान टेलिग्रामचे अब्जाधीश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला (सीईओ) फ्रान्समध्ये अटक झाली. या अटकेमुळे टेलिग्रामच्या नियमनासंदर्भात नवीन चर्चा सुरू झाली आहे.
पावेल दुरोव (Pavel Durov) टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पावेल यांच्यावर टेलिग्रामवर बेकायदेशीर देवाणघेवाण, अंमली पदार्थांची तस्करी, फसवणूक आणि मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित फोटोंचा प्रसार करण्यासारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'खिशातील डार्क वेब'
इतर सोशल मीडिया व्यासपीठांवर देखील गुन्हेगारी कृत्ये सुरू आहेत याबद्दल कोणतीही शंका नाही.
मात्र, मी जो प्रयोग करतो आहे, तो एका मोठ्या समस्येकडे इशारा करतो. या समस्येबाबत कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांशी संबंधित लोक मागील काही वर्षांपासून चिंता व्यक्त करत आहेत.
टेलिग्रामवर मला ज्या ग्रुप्सशी जोडण्यात आलं होतं, त्यातील काही ग्रुप कशाप्रकारचे होते हे जाणून घेऊया.
आम्ही ग्रुप्सवर पोस्ट करण्यात आलेले फोटो आणि चॅनलची नावं बदलली आहेत. जेणेकरून त्यांची जाहिरात होता कामा नये.
मागील काही दिवसांत टेलिग्रामवर अनेक आरोप झाले आहेत. हे आरोप पाहता सायबर सिक्युरिटी पॉडकास्टर असणाऱ्या पॅट्रिक ग्रे यांसारखी माणसं मागील काही महिन्यांपासून टेलिग्रामला 'खिशात असलेलं डार्क वेब' का म्हणत आहेत याचं आश्चर्य वाटत नाही.

डार्क वेब (Dark Web) हा इंटरनेटचाच एक भाग आहे. फक्त इंटरनेटप्रमाणे तो प्रत्येक युजरला उपलब्ध नसतो. नावाप्रमाणेच इथं सर्वकाही सरळमार्गी नसतं. डार्क वेबवर विशिष्ट प्रकारचं सॉफ्टवेअर आणि माहितीच्या माध्यमातूनच पोहोचता येतं किंवा जोडून घेता येतं.
2011 मध्ये सिल्क रूट रोड मार्केट प्लेसची लॉंचिग झाली होती. तेव्हापासूनच वेबसाईट्सचा एक संपूर्ण 'कन्व्हेअर बेल्ट' (कारखान्यांमध्ये सामान वाहून नेण्यासाठी यंत्रांना जोडलेला पट्टा) समोर आला आहे. म्हणजेच या वेबसाईट्स गुन्हेगारी कृत्यांसाठीचा महामार्ग बनल्या आहेत. या वेबसाईट्सच्या माध्यमातून बेकायदेशीर सामान आणि सेवांची विक्री होते आहे.
दुरोव यांच्या अटकेमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. या अटकेनंतर पॅट्रिक ग्रे नं त्यांच्या 'रिस्की बिझनेस' पॉडकास्ट मध्ये यासंदर्भात म्हटलं होतं की बऱ्याच कालावधीपासून टेलिग्राम गुन्ह्यांचं नंदनवन बनलं आहे.

फोटो स्रोत, bbc

पॅट्रिक म्हणाले, टेलिग्रामवरून प्रसारित होणाऱ्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित वस्तू, अंमली पदार्थांचा व्यापार आणि गुन्हेगारी कृत्यांच्या डार्क वेबपर्यंत पोहोचण्याचं प्रकरण आम्ही सातत्यानं मांडत आहोत, त्याबद्दल बोलत आहोत.
मात्र या गोष्टींना आळा घालण्यासाठी टेलिग्रामकडून कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत.
गुन्हेगारांना डार्क वेब आवडतं. कारण डार्क वेबच्या माध्यमातून गुन्हा करून नंतर गायब होणं किंवा नामानिराळा राहणं सोपं जातं.
प्रत्यक्षात जगभरात लोकेशन लपवणारे लोक इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळेच टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांवर एखाद्या युजर नेम मागील खरा चेहरा कोणाचा आहे, हे जाणून घेणं खूपच कठीण होऊन बसतं.
टेलिग्रामच्या धोरणामुळे वाढली चिंता
इंटेल47 ही एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे. या कंपनीच्या संशोधकांचं म्हणणं आहे की "टेलिग्रामच्या आधी या प्रकारची गुन्हेगारी किंवा लपूनछपून केली जाणारी कृत्ये ऑनलाइन मार्केटमध्ये डार्क वेब सर्व्हिसेसच्या वापराद्वारे केली जायची. मात्र, आता तुलनेनं नवख्या किंवा लहानसहान सायबर गुन्हेगारांसाठी टेलिग्राम हे सर्वात लोकप्रिय ठिकाण बनलं आहे."
यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला चिलिन या हॅकर ग्रुपनं एनएचएस हॉस्पिटल्स कडून खंडणी वसूल करण्यासाठी रक्ताच्या चाचण्यांची माहिती (ब्लड टेस्ट डेटा) उघड करण्याचं तत्रं अंमलात आणलं होतं.

मात्र, त्यांनी ही माहिती डार्क वेबवरील वेबसाईट्सवर टाकण्याआधी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर टाकली होती.
स्पेन आणि दक्षिण कोरियातील शालेय विद्यार्थिनींचे खोटे किंवा बनावट नग्न फोटो तयार करण्यासाठी जी डीप फेक सर्व्हिस वापरण्यात आली होती, ती टेलिग्रामवर त्यांची पूर्ण सर्व्हिस चालवते. यामध्ये पेमेंट सर्व्हिसचाही समावेश आहे.
असं दिसतं की मला ज्या गुन्हेगारी टेलिग्राम चॅनलशी जोडण्यात आलं होतं, ते स्नॅप चॅटवर सुद्धा उपस्थित आहेत. अंमली पदार्थांचा धंदा करणारे लोक तुम्हाला इंस्टाग्राम (Instagram) वर सुद्धा भेटू शकतो.

अशा प्रकारच्या सोशल मीडिया साइट्सवर खासगी चॅटच्या माध्यमातूनच याप्रकारचे गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर कृत्ये होतात यात कोणतीही शंका नाही.
मात्र, अंमली पदार्थांचा धंदा करणारे लोक त्यांच्या टेलिग्राम चॅनलची जाहिरात या साइट्सवर करताना अनेकदा दिसून येतील. प्रत्यक्षात हे लोक युजर्सना त्यांच्या सोशल मीडिया व्यासपीठावर आणण्यासाठी या प्रकारच्या जाहिराती देतात.
जानेवारी महिन्यात लातविया पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यासंदर्भातील संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या चॅटिंग अॅप्सवर लक्ष ठेवण्यासाठी एक खास युनिट तयार केलं होतं. या सर्व प्रक्रिये दरम्यान अधिकाऱ्यांनी टेलिग्रामसंदर्भात विशेषकरून चिंता व्यक्त केली होती.
लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात टेलिग्रामची भूमिका
टेलिग्राम म्हणणं आहे की, या अॅपचं नियमन या क्षेत्रातील मानकांच्या कक्षेतच केलं जातं आहे.
मात्र, या आठवड्यात आम्ही त्यांच्या या दाव्याच्या विसंगत किंवा विरुद्ध असे पुरावे पाहिले. ही बाब गुन्हेगारी जगताच्या अशा क्षेत्राशी देखील जोडलेली होती, जे फारच कमी प्रमाणात समोर येतं. ते म्हणजे लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित गोष्टी (मी यासाठी कधीही सर्च केलं नाही.).
बुधवारी (28 ऑगस्ट) बीबीसीला माहिती मिळाली की, पोलिस आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून चॅनलवरील काही कंटेट हटवण्याच्या विनंतीवर टेलिग्रामकडून पाऊल तर उचललं जातं.
मात्र, मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ यांचा प्रसार रोखण्यासाठी टेलिग्राम सक्रियपणे पावलं उचलत नाही.
फ्रान्सच्या सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की, आपल्या चॅनलवर असलेल्या मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील सामानावर लक्ष ठेवण्यासाठी टेलिग्रामकडून पुरेशी पावलं उचलण्यात येत नाहीत. टेलिग्रामवर करण्यात आलेल्या आरोपांपैकी हा एक मुख्य आरोप होता.

ऑफमिन या फ्रान्सच्या बाल संरक्षण यंत्रणेच्या सरचिटणीस ज्यां मिशेल बर्निगॉद यांनी लिंक्डइनवर लिहिलं, "या प्रकरणाची मूळं नेमकी कुठे आहेत. खरंतर टेलिग्रामवर नियंत्रण आणि सहकार्याचा अभाव हेच या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे."
"विशेषकरून मुलांच्या बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यांच्या विरोधातील लढाईमध्ये टेलिग्रामची भूमिका स्पष्टपणे दिसून येते."
टेलिग्रामनं बीबीसीला सांगितलं की, ते त्यांच्या साइटवर मुलांच्या लैंगिक शोषणासह इतर सर्व बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी सक्रीयपणे काम करतात.
त्यांनी पुढे सांगितलं की, फक्त ऑगस्ट महिन्यातच 45 हजार ग्रुप्सच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी हे सांगितलं नाही की नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे.
यानंतर आणि या लेखात इतर अनेक ठिकाणी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं टेलिग्रामनं दिलेली नाहीत.
जून महिन्यात पावेल दुरोव यांनी टकल कार्लसन या पत्रकाराला सांगितलं होतं की त्यांचं अॅप चालवण्यासाठी त्यांनी 'जवळपास 30 इंजिनीअर्सची नियुक्ती' केली आहे.
टेलिग्राम पोलिसांना सहकार्य करत नाहीय?
टेलिग्रामवर असणाऱ्या चॅनल्सवर नियंत्रण नसणं किंवा यासंदर्भात कमतरता असणं हा टेलिग्रामशी निगडित समस्येचा फक्त एक भाग आहे.
दुसरी मोठी समस्या म्हणजे टेलिग्राम पोलिसांना सहकार्य करत नाही. पोलिसांनी टेलिग्रामवरील बेकायदेशीर माहिती किंवा कंटेन्ट हटवण्यास सांगितल्यावर टेलिग्राम जी भूमिका घेतं त्यावरून देखील त्यांच्यावर टीका होत असते.
सिंडर हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. ते इंटरनेटवर विश्वासार्हता आणि सुरक्षेसाठी वापरलं जातं. ब्रायन फिशमन, सिंडरचे सह-संस्थापक आहेत.
त्यांनी लिहिलं, "टेलिग्राम एका वेगळ्याच स्तरावर आहे. आयएसआयएस साठी अनेक वर्षांपासून ते एक प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी निगडीत सामानावरही टेलिग्रामकडून कारवाई केली जात नाही."
"योग्य अशा कायद्यांकडेही टेलिग्राम दुर्लक्ष करत आलं आहे. विविध बेकायदेशीर किंवा अयोग्य सामानांवर सुद्धा टेलिग्राममध्ये कोणतंही नियंत्रण नाही. टेलिग्रामचा दृष्टीकोन किंवा भूमिका पूर्णपणे वेगळी आहे."

आता यासंदर्भात काहीजण असा युक्तिवाद करू शकतात की, टेलिग्रामच्या प्रायव्हसी फीचर्सचा असा अर्थ आहे की कंपनीकडे या सर्व गोष्टींची इतकी माहिती किंवा डेटा नाही, जी पोलिसांना देता येईल.
सिग्नल आणि व्हॉट्सअॅप सारख्या अतिशय खासगी स्वरुपाच्या मोबाइल अॅप्सबाबत देखील हीच समस्या आहे.
जर एखाद्या युजरनं गुप्त संभाषणाचा (सीक्रेट चॅटिंग) पर्याय निवडला तर इतर अॅप्स देतात त्याचप्रकारची निजता किंवा प्रायव्हसी टेलिग्राम त्या युजरला देतं.
सिग्नल आणि व्हॉट्सअॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (गुप्त कोडमध्ये मेसेज पाठवण्याची सुविधा) ची सुविधा पुरवतात. टेलिग्रामवरील सीक्रेट चॅटसुद्धा त्याचप्रकारची सुविधा पुरवतं.
याप्रकारे कोणत्याही संभाषण आणि कृत्यांची माहिती पूर्णपणे खासगी स्वरुपाची राहते. इतकंच काय टेलिग्रामला देखील ती पाहता येत नाही.
मात्र, टेलिग्रामवर ही सुविधा किंवा फंक्शन डिफॉल्ट स्वरुपात सेट करण्यात आलेलं नाही. त्यामुळेच असं वाटतं की माझ्याशी जोडल्या गेलेल्या टेलिग्राम चॅनल्स आणि अॅपवरील जास्तीत जास्त कृत्ये गुप्त स्वरुपाची (सीक्रेट) म्हणून सेट करण्यात आलेली नाहीत.

याही बातम्या वाचा :

टेलिग्राम या चॅनलवरील सर्व माहिती, कंटेट वाचू शकतं आणि जर त्यांची इच्छा असेल, तर ते ही माहिती पोलिसांना देखील देऊ शकतात. मात्र, टेलिग्रामच्या अटी आणि नियमांमध्ये म्हटलं आहे की ते असं करत नाहीत.
कंपनीच्या अटी आणि नियमांमध्ये म्हटलं आहे की, "टेलिग्रामवरील सर्व चॅट्स आणि ग्रुप चॅट्स त्यात सहभागी असणाऱ्या युजर्सपुरतेच असतात. म्हणजेच ते चॅट्स पूर्णपणे खासगी असतात. त्यामुळे आम्हाला जर एखादी प्रक्रिया करण्याची किंवा माहिती घेण्याची विनंती करण्यात आली तर आम्ही तसं करत नाही."
अनेकवेळा पत्रकार परिषदांमध्ये माझी या मुद्द्यावर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यात त्यांनी कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांशी टेलिग्राम कसं वागतं किंवा त्यांची भूमिका काय असते त्याबद्दल सांगितलं आहे. टेलिग्रामच्या धोरणाबद्दल अनेकवेळा त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आता टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांच्यावर आरोप झाले आहेत.
या आरोपाबद्दल फ्रान्सच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की फ्रान्सचे पोलिस आणि बेल्जियम अशा दोन्ही ठिकाणच्या कायदेशीर यंत्रणांनी केलेल्या कायदेशीर मागणीकडे लक्ष न देण्याचा टेलिग्रामचा इतिहास आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा
नियमनाच्या मुद्द्याबाबत टेलिग्रामच्या धोरणावर सर्व प्रकारची टीका होत असताना देखील काही जणांना पावेल दुरोव यांची अटक ही अस्वस्थ करणारी घटना वाटते.
अॅक्सेस नाओ ही एक डिजिटल राइट्स संघटना आहे. या संघटनेचं म्हणणं आहे की ते दुरोव यांची अटक आणि त्यानंतरच्या घटनाक्रमावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.
अॅक्सेस नाओ ओपन इंटरनेटच्या संकल्पनेला पाठिंबा देते.
या संघटनेनं पुढे म्हटलं आहे की, कॉर्पोरेट कंपन्यांच्या समाजासाठी असलेल्या जबाबदारीसंदर्भात टेलिग्राम हे काही चांगलं उदाहरण नाही. या संघटनेनं याआधीही अनेक वेळा टेलिग्रामवर टीका केली आहे.

मात्र, अॅक्सेस नाओ या गोष्टीचाही इशारा देते आहे की "अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण सभा, मोर्चे, निदर्शनं करण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी लोक ज्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करत आहेत, त्यांच्या कर्मचाऱ्यांना अटक करणं योग्य नाही."
"मानवाधिकारांच्या तत्वांचं याप्रकारे हनन केल्यास त्यातून गरजेपेक्षा अधिक सेन्सॉरशिप करण्यास चालना मिळेल. यातून नागरिकांच्या कक्षा अरुंद किंवा मर्यादित होत जातील."
टेलिग्रामनं देखील वारंवार म्हटलं आहे की, "एखाद्या सोशल मीडिया व्यासपीठाच्या गैरवापरासाठी त्या व्यासपीठाला किंवा त्याच्या मालकाला जबाबदार ठरवणं अतिशय चुकीचं आहे."
इलॉन मस्क हे एक्स या प्रसिद्ध सोशल मीडिया व्यासपीठाचे मालक आहेत. मस्क यांनी पावेल दुरोव यांच्या अटकेवर टीका केली आहे. मस्क यांनी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी दुरोव यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











