सोशल मीडियावरच सेक्सटॉर्शन, ब्लॅकमेलिंगचे क्लासेस - बीबीसी इनव्हेस्टिगेशन

सराईत गुन्हेगार आता स्वत: गुन्हा करण्यासोबत सोशल मीडियावरून गुन्हेगारीचं रीतसर प्रशिक्षणही देत असल्याचा धक्कादायक प्रकार बीबीसीच्या नजरेस आला आहे.
आधी लैंगिक सुखाचे आमिष दाखवायचे आणि नंतर एकदा सावज जाळ्यात अडकल्यावर त्या व्यक्तीकडून खंडणी वसूल करायची या प्रकाराला सेक्सटॉर्शन म्हणतात. समोरची व्यक्ती आपली बदनामी होईल या भीतीने हवे तितके पैसे देते आणि ती अधिकाधिक या दलदलीत अडकत जाते. हे कसं करायचं याचं प्रशिक्षण देखील आता सोशल मीडियावर दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियावर तरूण आकर्षक महिलांचं खोटं रूप धारण करून संभाव्य पीडितांना जाळ्यात कसं ओढायचं, त्यांना प्रलोभनापायी स्वतःच्या नग्न प्रतिमा पाठवायाला भाग कसं पाडायचं व नंतर त्यांचाच वापर पैसे उकळण्यासाठी कसा करायचा, या सगळ्या गोष्टी अनुभवी गुन्हेगार नव्या होतकरू गुन्हेगारांना पैसे घेऊन शिकवत असल्याचं समोर आलंय.
मंगळवारी असाच एका प्रशिक्षण देणारा निष्णात गुन्हेगार ओलामिडे शानू याला लंडनमधील न्यायालयात दाखल करण्यात आलं.
सेक्सटॉर्शन द्वारा आत्तापर्यंत लोकांकडून तब्बल 2 मिलीयन युरो ( अंदाजे 18 कोटी रुपये ) उकळणाऱ्या टोळीचा तो सदस्य असल्याचं कळतंय.
मागच्याच महिन्यात युनायटेड किंग्डमच्या राष्ट्रीय गुन्हे शाखेनं यासंबंधी देशभरातील शाळांमध्ये धोक्याचा इशारा जारी केला होता.
अशा प्रकारे सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळ्या मुख्यत: अफ्रिकेतील नायजेरियात असल्याचंही समोर आलंय. आधी प्रौढ/वयस्कर लोकांना शिकार बनवणाऱ्या या टोळ्यांनी मागच्या काही काळापासून आपला मोर्चा तरुण शाळकरी मुलांकडे वळवल्याचं दिसून आलंय.
ऑक्टोबर 2022 पासून आतापर्यंत ब्रिटनमध्ये दोन किशोरवयीन शाळकरी मुलांनी याला बळी पडत आत्महत्या केली आहे.
गुप्त माहिती आणि सेक्सटॉर्शनसंबंधी अभ्यासाचे तज्ज्ञ पॉल रफाईल यांनी हा नवीन पायंडा लहान मुलांसाठी अतिशय घातक असल्याचा इशारा दिलाय.
“किशोरवयीन मुलांची नवीन बाजारपेठ या इंटरनेटवरील गुन्हेगारांच्या हाती लागली असून क्षणार्धात श्रीमंत होण्याचा हा अतिशय सोपा मार्ग त्यांनी गवसलाय. मागच्या दोन वर्षांपासून किशोरवयीन मुलांनी अशा घटनांना बळी पडण्याचं प्रमाण त्यामुळे सतत वाढत आहे,” असं रफाईल म्हणाले.

“याआधी सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळ्यांचं मुख्य लक्ष्य हे प्रौढ लोकच असायचे. पण आता मागच्या काही काळात किशोरवयीन मुलांना हे गुन्हेगार आपलं लक्ष्य बनवत आहेत. कारण किशोरवयीन मुलांना फसवणं आणि घाबरवणं सोपं आहे,’’ रफाईल सांगतात.
गुन्हा कसा करावा याची सगळी इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ पैसे घेऊन इंटरनेटवर विकले जात असल्याचं बीबीसीला आढळून आलं.
फोन क्रमांकाचा मागोवा घेता येऊ नये यासाठी काय करावं इथपासून ते फेक सोशल मीडिया प्रोफाईल कशी बनवावी आणि खंडणीचे पैसे गोळा करायला कुठलं तंत्रज्ञान वापरावं हे सगळं या व्हिडिओंमधून सांगितलं जातंय.
हे लोक तर आपल्या 'विद्यार्थ्यांना' आकर्षित करण्यासाठी बढायादेखील मारतात.
एक गुन्हेगार सांगतो की 'माझा एक पीडित अजूनही न चुकता मला दर शुक्रवारी पैसे पाठवतो.'

लुसीचा 14 वर्षांचा मुलगा नुकताच या सेक्सटॉर्शन टोळीचा लक्ष्य बनला होता.
“अर्थात त्याने स्वतःचे कुठलेही आक्षेपार्ह फोटो खंडणीखोरांना पाठवले नव्हते. तरीही या खंडणीखोरांनी त्याचा कृत्रिम अश्लील फोटो बनवत धमकवायला सुरूवात केली. 24 तासात जर पैसे पाठवले नाहीस तर तुझ्या संपर्कातील सगळ्या मित्र, नातेवाईक व शिक्षकांना हे फोटो पाठवून देऊ अशी धमकी माझ्या मुलाला दिली. माझा मुलगा हा सगळ्या प्रकारानं प्रचंड घाबरला. तो अक्षरशः थरथरत होता,” लुसी सांगत होत्या.
सुरुवातीला लुसीच्या मुलाने या खंडणीखोराला घाबरून 100 युरो दिले. पण त्यानंतर पालकांच्या मदतीने त्याने त्याचं सोशल मीडिया आणि बॅंक खातंच बंद करून टाकलं. त्यानंतर या चोरट्यांनी त्याला कधी त्रास दिला नाही.
“पण जर तो त्या दिवशी घरी नसता अथवा मी त्याच्यासोबत घरी नसते तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही. सुदैवानं आम्ही यातून वाचलो,” असं लुसी सांगतात.

अमेरिकन सरकारनं आरोपी ओलामिडे शानूच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
33 वर्षीय शानूच्या नावावर अमेरिकेतील आयडाहो राज्यातही गंभीर गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. खंडणी गोळा करणे, अवैध संपत्ती जमवणे आणि सायबर स्टॉकिंगसारख्या आरोपांमध्ये त्याच्यावर अमेरिकेत अनेक खटले दाखल केले गेलेले आहेत. अमेरिकेतील एकूण 4 लोकांना त्याने गंडा घातलेला आहे.
त्यातला एक लहान किशोरवयीन मुलगा आहे. हे झाले फक्त आत्तापर्यंत समोर आलेले व सिद्ध झालेले प्रकार. मागच्या तीन वर्षात असे शेकडो गुन्हे शानूने केले असल्याचा तपास यंत्रणेचा कयास आहे.
मोठ्या आयटी कंपन्या त्यांच्या व्यासपीठावरून होणारं सेक्सटॉर्शन व संबंधित गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणावा तितका प्रयत्न करताना दिसत नाहीत, अशी खंत रफाईल यांनी व्यक्त केली.
“मागच्या दोन वर्षांपासून इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर असे गैरप्रकार सर्रास होत असल्याचं आढळून येतंय. या गुन्हेगारांना रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांनी आणखी कठोर पावलं उचलली पाहिजेत,” अशी मागणीही त्यांनी केली.

या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेषतः अश्लिल मजकूर ओळखून तो तातडीनं रोखण्यासाठी आम्ही आमचं ॲप वापरकर्त्यांसाठी आणखी सुखकर बनवत आहोत. तसंच यासंबंधी लहान मुलांना जागृत करत ॲप वापरताना कोणती काळजी घ्यावी याचे धडेही त्यांना देत आहोत, असं स्नॅपचॅटने बीबीसीला सांगितलं.
इन्स्टाग्राम व फेसबुकची मूळची कंपनी मेटानं अधिकृत पत्रक काढत अश्लील अथवा आक्षेपार्ह फोटो/मजकूर पसरवू पाहणारं कोणतंही खातं नजरेस आल्यास लगेच त्याची तक्रार नोंदवून ते हटवण्याची सोय वापरकर्त्यांना आम्ही उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.
शिवाय ब्रिटनमध्ये 18 वर्षांखालील मुलांचं इन्स्टाग्राम खातं गोपनीय ठेवण्याचीही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. त्यामुळे कुठल्याही नवीन व्यक्तीला (खंडणीखोराला) या मुलांचा व त्यांच्या फोलोवर्सचा मागोवा घेणं शक्य होणार नाही.
टिकटॉकने तर किशोरवयीन व लहान मुलांना हानीकारक ठरेल असा कुठलाच मजकूर आम्ही आमच्या माध्यमावर मंजूरच करत नसल्याचं सांगितलं. सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यांची संधीच निर्माण होऊ नये यादृष्टीनेच ॲपची रचना आम्ही केल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.











