सेक्सटॉर्शन: मुलाच्या आत्महत्येनंतरही ब्लॅकमेलर्स मागतच होते पैसे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे
सेक्सटॉर्शन म्हणजेच न्यूड फोटो किंवा कंटेटवरून ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचा प्रकार घडल्यानंतर दोन मुलांवर आत्महत्या करण्याची वेळ आली.
ब्लॅकमेलर्सने या मुलांना इतक्या निर्दयपणे ब्लॅकमेल केले की त्या मुलाने ब्लॅकमेलरकडे आपल्यावर आत्महत्या करायची वेळ येईल असे सांगितले असता त्याने खुशाल कर असं म्हटलं. तर दुसऱ्या प्रकारात आत्महत्या झाल्यावर त्या फोनवर पुन्हा धमक्या सुरूच होत्या.
पहिली घटना घडली ती पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये.
एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये बी.कॉम च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने 28 सप्टेंबरला पुण्यात तो ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता तिथल्या दहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.
त्याचे अंत्यविधी आटोपल्यावर त्याच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली की, त्याला इंस्टाग्रामवर ब्लॅकमेल केलं जातं होतं.
त्याचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचाकडून पैशांची मागणी केली जात होती.
इंस्टाग्रामवर प्रिथा यादव या नावाच्या अकाउंटवरुन त्याला ब्लॅकमेल केलं जातं होतं. बदनामीच्या भीतीने या मुलाने त्या अकाउंटवरुन सांगितल्याप्रमाणे एकूण साडेचार हजार रुपये ऑनलाईन पाठवले सुद्धा. पण त्यानंतरही आणखी मागणी झाल्याने त्याने दहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडियावर अनोळखी अकाउंटवरून ब्लॅकमेलिंग झाल्यामुळे पुण्यात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आली आहे.
दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरीही त्यामागचं कारण मात्र सारखंच आहे. अर्धनग्न, नग्न फोटो किंवा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि वारंवार पैशांची मागणी केली गेली. त्यानंतर या तरुणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
"त्याने 28 सप्टेंबर रोजी साडेचार ते पाच वाजल्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरातून दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर विधी साठी कुटुंबीय गावी गेले होते. ते परत आल्यावर मृत मुलाच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली, की त्याचा मृत भावाला प्रिथा यादव या मुलीने इन्स्टाग्रामवरून पुन्हा ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली होती.
"त्याचा कमेरपर्यंतचा फोटो पाठवला. मृत मुलाने तिला गुगल पे वरून 4500 रुपये दिले होते. कलम 306,384 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.
पैशांची मागणी आणि बदनामीची भीती यामुळे मृत मुलाने आत्महत्येचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा कयास आहे.
मला आत्महत्या करावी लागेल म्हटल्यावरही ब्लॅकमेलर्स मागे हटला नाही
तर दुसरी घटना घडली ती धनकवडी भागात. व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असलेल्या एका अकाऊंटवरून नग्न व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याने एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
30 सप्टेंबरला या तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार 8 दिवसांनी कुटुंबीयांनी त्याच्या फोनमधले व्हॉट्स् अप चॅट चेक केलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामध्ये एका अनोळखी महिलेचा व्हॉट्सअप डीपी असलेल्या एका अकाउंटसोबत मृत तरुणाचं चॅटिंग होतं. या चॅटमध्ये साधारणपणे 55 सेकंदाचा त्याचा न्यूड व्हीडिओ होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 12 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
त्याने स्वतःकडे पैसे नसल्याने मित्रांकडून पैसे घेऊन त्या अकाउंटवर थोडे पैसे पाठवले. पण त्या अकाऊंटवर धमकी सुरूच होती. तो न्यूड व्हीडिओ यूट्यूबवर अपलोड करत आहे असा त्याला मेसेज आला.
यावर त्या तरुणाने मी आत्महत्या करत आहे असा मेसेज त्या महिलेला पाठवला. त्यावर तिकडून 'करो मै व्हीडिओ ऑनलाईन करता हूँ' असा मेसेज त्याला आला. यानंतर या 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.
"मी तर माझा भाऊ हकनाक गमावला. घरामध्ये आम्ही तिघंच होतो. आई मी आणि भाऊ. वडील जाऊनही एक वर्ष झालं आहे. एकदम छोट्या कारणांमुळे भाऊ गेला. काय तर त्याला भीती वाटली की माझा व्हीडिओ सगळ्यांनी पाहिला तर त्याचा माझ्या आईवर आणि घरावर काय परिणाम होईल. या भीतीने त्याने ते कृत्य केले. त्याला ब्लॅकमेल केलं गेलं. आम्ही कुणाला काही कल्पना नव्हती की तो असं काही करेल," असं या मृत तरुणाच्या मोठ्या भावाने सांगितलं.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच त्यातून होणाऱ्या गैरप्रकारांचं प्रमाणही वाढलं आहे. आबालवृद्धांकडून सोशल मीडियाचा वापर होतो.
यामुळे ही माध्यमं वापरताना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. न्यूड फोटो आणि व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसत आहे.
पुणे शहर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्सटॉर्शनच्या यावर्षी साधारणपणे चौदाशे तक्रारी त्यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. पण फक्त एकाच प्रकरणात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्सटॉर्शन कसं होतं?
पुणे सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मीनल पाटील यांनी सेक्सटॉर्शन कसं होतं याची माहिती दिली.
त्या सांगतात, "व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो. त्या अकाऊंटला सुंदर मुलीचा फोटो असतो. Hi, how are you असं म्हणून बोलणं सुरू केलं जातं. मग चॅटिंग सुरू झालं की तिकडून मागणी केली जाते की आपण व्हीडिओ कॉलवर बोलूया. व्हीडिओ कॉल सुरू झाला की, ती समोरची व्यक्ती न्यूड होते आणि आपल्यालाही प्रेशराईज केलं जातं की न्यूड व्हा.

फोटो स्रोत, Getty Images
"मग तुम्ही न्यूड झाला किंवा नाही झालात तरीही तुमचा चेहरा कॅप्चर होईपर्यंत तो व्हीडिओ सुरू राहतो. मग धमक्यांचे फोन यायला सुरुवात होते. की आम्ही तक्रार करतो, व्हीडिओ व्हायरल करतो वगैरे वगैरे.. नाहीतर पैसे भरा.
"पैसे जरी भरले तरीही परत दुसऱ्या दिवशी फोन येतो आणि पोलिसांकडून फोन असल्याची बतावणी करुन म्हणतात की तक्रार आहे पैसे भरा. परत एखादा फोन येतो की यूट्यूबचा मॅनेजर बोलतोय, तुमचा असा असा व्हीडिओ आहे पैसे भरा. असं करत करत पैसे उकळले जातात. जो व्हिक्टीम आहे त्याला अंदाज नसतो. सध्या 1400 तक्रारी आहेत. तपास सुरू आहे," मीनल पाटील सांगतात.
सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणे आणि काही अनुचित प्रकार झाल्यास पॅनिक न होता पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
"अनोळखी व्यक्ती जर चॅट करत असेल तर सतर्क राहा करा. काही संशयास्पद वाटलं तर ब्लॉक करा. सुरुवातीला अनोळखी व्यक्तीशी चॅटच करू नका. चुकून दर व्हीडिओ कॉल झाला तर घाबरुन जाऊ नका आणि पोलिसांशी संपर्क करा.
ज्या कायदे मान्य वेबसाईट आहेत त्यावर असे पॉर्न व्हीडिओ अपलोड केले जाऊ शकत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि पॅनिक होऊन आत्महत्येसारखी चुकीची पावलं उचलू नका," असं मीनल पाटील यांनी सांगितलं.
पुणे सायबर पोलिसांकडे 1400 अर्ज येऊनही फक्त एक गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी बोलताना पोलिस निरीक्षक मीनल पाटील म्हणतात, "जसे अर्ज येतात तसा आम्ही तपास करतो. पहिले तर जी व्यक्ती बळी पडली आहे त्यांना शांत करतो. धीर देतो. त्यांना जर पैसे दिले असतील तर बॅंक अकाउंटची चौकशी करतो. व्हाॅट्सएपकडून माहिती घेतो. ती माहिती आली की पुढची कारवाई करतो."
घाबरण्याचे काहीही कारण नाही
अशा फसवेगिरीला बळी न पडण्यासाठी काही गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात. याच सोबत घाबरून न जाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा असंही ते म्हणाले.
"पंचविशीच्या आतले तरुण हे साधारणपणे बेधडक वागणारे असतात. टीनेज ते पंचवीशी ही अशी फेज असते की यामध्ये शारीरिक मानसिक बदलही होतात. यामुळे त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होतं.

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE
हल्ली सगळ्या गोष्टींसाठी ऑनलाईनच पर्याय शोधले जातात. योग्य सेक्स एज्युकेशन नसणे, सायबर विश्वाबद्दलची साक्षरता नसणे यामुळे अशा गोष्टींना ही तरुण बळी पडतात. यावर उपाय म्हणून फार काही वेगळं करण्याची गरज नाही. पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्याच प्रभावीपणे करण्याची गरज आहे.
"योग्य सेक्स एज्युकेशन असणं , सायबर जगातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची कल्पना असणं आणि काहीही अडचण आली तरीही कुणीतरी जवळ बोलून ते शेअर करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये ही भावना रुजवणंही तितकंच महत्त्वाचं आहे की एखादी कठीण परिस्थिती आली तरीही त्यातून मार्ग निघू शकतो. त्यासाठी अगदी टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही," असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितलं.
ऑनलाइन भेटणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा
पुण्यातले सायबर तज्ज्ञ राजस पाठक यांनी सध्या प्रचलित असलेल्या सायबर गुन्ह्यांबद्दल अधिक माहिती दिली.
"सेक्सटॉर्शन, हनी ट्रॅपिंग, सायबर बुलिंग, ऑनलाईन ब्लॅकमेल ह्या प्रकारचे गुन्हे सध्या वाढले आहेत. तरुण पिढी ह्या प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडत आहे. ह्यावर उपाय म्हणजे आपली वैयक्तिक माहिती आणि फोटो व व्हीडिओ अति प्रमाणात शेअर न करणे आणि प्रथमच ऑनलाईन भेटणाऱ्या व्यक्ती पासून सावध राहणे.

फोटो स्रोत, Getty Images
"एखादी व्यक्ती फक्त ऑनलाईनच बोलण्यासाठी उपलब्ध असेल तर शंका घ्यायला जागा असते. चॅटिंग करताना एका माध्यमावरुन दुसऱ्या माध्यमावर संभाषण सुरू ठेवण्याची मागणी झाली तर सावध राहणंही आवश्यक आहे.
"आपण जे काही ऑनलाईन पोस्ट करतो ते इतर मार्गांनी मिळवलं जाऊ शकतं आणि दुसरीकडे शेअर केला जाऊ शकतं ह्याची खबरदारी बाळगायला हवी. आपल्या बाबतीत असा प्रकार घडला असेल अथवा घडत असेल तर न लाजता मोठ्या व्यक्तींना किंवा पोलिसांना कळवायला हवं," असं राजस पाठक यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









