डीबी कूपर : बॉम्ब दाखवून त्याने विमान हायजॅक केलं, खंडणी घेतली आणि अक्षरशः अदृश्य झाला

डी. बी. कूपर
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

ब्रीफकेसमध्ये ऑफिसच्या कागदपत्रांची फाईल आणावी तितक्या सहजतेने बॉम्ब घेऊन एक माणूस एकटाच नॉर्थवेस्टर्न एअरलाईनच्या विमानात चढला. त्याच्या बळावर विमानातला स्टाफ वेठीला धरला, 2 लाख अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली आणि त्यानंतर जगाच्या पाठीवरून जणू काही अदृश्य झाला.

तो कुठे गेला, जगला की मेला याची आजही जगात कोणालाही कल्पना नाही. आज तो जगात फक्त एक दंतकथा बनून राहिला आहे.

डीबी कूपर त्याचं नाव आणि त्याच दंतकथेमागची ही खरी कहाणी.

Presentational grey line

तुम्ही अॅव्हेंजर सीरिजचे फॅन असाल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली 'लोकी' ही वेबसिरीज पाहिली असेल तर तुम्हाला डीबी कूपर या नावाचा रेफरन्स नक्की लक्षात येईल. समजा नसली पाहिली, तरी मी आहे की सांगायला.

तर काय असतं एक असतो थोर (Thor) - वीजेचा देव आणि त्याचा भाऊ असतो लोकी (Loki) सॉरी... मला ही गोष्ट थोडीच सांगायची आहे! अव्हेंजर्सची गोष्ट वाचा इथे - Avengers Endgame: मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सची गोष्ट मराठीत

आपण परत येऊ लोकी... आपलं डीबी कूपरकडे.

या स्टोरीला सुरुवात तर आहे, पण शेवट नाही.

24 नोव्हेंबर 1971 चा दिवस होता. एका व्यक्तीने अमेरिकेतल्या पोर्टलंड शहरातून सिएटल शहरात जाण्यासाठी नॉर्थवेस्टर्न एअरलाईन्सचं तिकीट काढलं.

तिकिटाला त्याने रोख 20 डॉलर्स दिले. त्या व्यक्तीने त्याचं नाव सांगितलं डॅन कूपर. आजही लोकांना माहिती नाही की हे त्याचं खरं नाव होतं की खोटं. पण सगळ्या चौकशा आणि तपासातून तरी असंच वाटलं की हे त्याचं खरं नाव नसावं.

तो कुठला होता, कुठून आला होता, त्याच्या कुटुंबात कोणी होतं का? याचा थांगपत्ता कधीच लागला नाही. आजही ही केस 'न सुटलेली' या वर्गात मोडते. अनेक संशयित होते पण या गुन्ह्यातला आरोपी सापडला नाही.

डी. बी. कूपर
फोटो कॅप्शन, डी. बी. कूपरचं FBI ने तपासासाठी प्रसिद्ध केलेलं रेखाचित्र

"त्या काळात विमानांचे अपहरण होणं सामान्य गोष्ट होती," नॉर्थ वेस्टर्न एअरलाईन्सचं ज्या बोईंग 727 विमानाचं अपहरण झालं त्याचे को-पायलट विल्यम रॅटकझॅक यांनी बीबीसी फोरच्या स्टोरीव्हील : डीबी कूपर या डॉक्युमेंट्रीत बोलताना सांगितलं.

त्याकाळी अमेरिकेत देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानांच्या सुरक्षिततेसाठी कोणते नियम नव्हते. तुम्ही बॉम्ब किंवा बंदूक घेऊन सरळ विमानात घुसू शकत होता.

"अमेरिकेत राहणारे क्युबाचे नागरिक बंदूक दाखवून विमानाचं अपहरण करायचे, त्यांना आपल्या देशात जायचं असायचं. विमान क्युबात पोचलं की अपहरण झालेल्या प्रवाशांना क्युबन एअरपोर्टवरचे अधिकारी उत्तम दर्जाची क्युबन रमची एक बाटली आणि काही क्युबन सिगार भेट म्हणून द्यायचे आणि हे लोक परतीच्या प्रवासाला निघायचे," विल्यम म्हणतात.

सगळं मजेशीर होतं... कूपर प्रकरणापर्यंत. ही केस वेगळी होती. या अपहरणात पहिल्यांदाच खंडणीची मागणी केलेली होती.

विमानात चढताना कूपरने चांगल्यातला बिझनेस सूट घातला होता आणि डोळ्यांना काळा गॉगल होता. त्याने एका एअर होस्टेसला जवळ बोलावलं आणि तिच्या हातात एक चिठ्ठी दिली. तिला वाटलं हा माणूस आपल्याशी फ्लर्ट करतोय. त्या काळात ही फारच नॉर्मल गोष्ट होती.

म्हणजे 'आमच्या एअरहोस्टेसचे कपडे पहा किती छोटे', 'आमच्या विमानात बसा आणि माझा (अर्थातच सुंदर एअर होस्टेस) सहवास मिळवा' असल्या जाहिराती तेव्हा विमान कंपन्या करत होत्या यावरून लक्षात येईल.

तर त्या एअर होस्टेसचं नाव फ्लोरेन्स शॅटनर. कूपरने तिच्याकडे चिट्ठी दिली, आणि तिच्याकडे पाहत राहिला. हा माणूस इतर फ्लर्ट करणाऱ्या लोकांपेक्षा वेगळा होता, त्याची नजरही वेगळी होती. तो म्हणाला, "ती चिठ्ठी उघड आणि वाच."

तिने ती चिठ्ठी दुसरी एक एअर होस्टेस टीना मक्लोकडे आणून दिली. टीनाने ती उघडली, त्यात लिहिलं होतं, "मिस, तुमच्या विमानचं अपहरण झालंय. माझ्याकडे बॉम्ब आहे. इथे माझ्या शेजारी येऊन बसा."

टीना त्याच्या शेजारी जाऊन बसल्या, त्याने आपली ब्रीफकेस उघडून दाखवली, आतमध्ये बॉम्बसदृश्य गोष्ट होती. डायनामाईटच्या कांड्या होत्या, एक बॅटरी होती, अनेक वायरी होत्या. त्याने टिनाला सांगितलं की त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तो विमान बॉम्बने उडवून देईल. तो जिवंत कोणाच्या हाती लागणार नाही आणि इतरांना जिवंत सोडणार नाही.

टीनाने तातडीने पायलटला फोन करून कळवलं, "विमानाचं अपहरण झालंय."

पण तोवर उशीर झाला होता, विमान हवेत उडालं होतं.

"त्याने ड्रिंक ऑर्डर केलं. तो सतत सिगरेट ओढत होता आणि त्याच्या शेजारी बसून मी त्याच्या सिगरेट पेटवून देत होते कारण त्याला बॉम्बच्या ट्रीगरवरून हात काढायचा नव्हता," टीना बीबीसीशी बोलताना म्हणतात.

टीना मक्लो
फोटो कॅप्शन, कूपरने ज्या विमानाचं अपहरण केलं, त्यात टीना मक्लो एअर होस्टेस होत्या.

कूपरने एका कागदावर आपल्या मागण्या लिहून पायलटकडे पाठवल्या. गंमत म्हणजे हा कागद त्याने नंतर पुन्हा मागून घेतला.

त्याच्या मागण्या होत्या - 2 लाख अमेरिकन डॉलर्स रोख, 4 पॅराशूट आणि सिएटलला विमान उतरल्यानंतर त्यात इंधन भरायला तयार ट्रक.

पायलटने नॉर्थवेस्टर्न एअरलाईनला फोन केला, आणि परिस्थिती सांगितली. आता अमेरिकेतली सर्वात मोठी देशांतर्गत तपास यंत्रणा, एफबीआयकडे हे प्रकरण गेलं. पोर्टलंड ते सिएटल हा 37 मिनिटांचा प्रवास होता. विल्यम रॅटकझॅक यांनी वेळ काढण्यासाठी हवेतल्या हवेत चकरा मारायला सुरुवात केली.

अजूनपर्यंत काय होतंय याचा प्रवाशांना थांगपत्ताही नव्हता. प्रवाशांना सांगितलं गेलं की तांत्रिक कारणांमुळे इच्छित स्थळी पोहचायला उशीर होईल. बस इतकंच!

"मी त्याला विचारलं तुला आमच्या विमानकंपनीचा राग आलाय का? तो म्हणाला, मला तुमच्या कंपनीचा राग आलाय असं नाही, पण मला राग आलाय हे खरं," टीना म्हणतात.

दुपारी पावणेचारला विमान सिएटल विमानतळावर उतरलं. डीबी कूपरने मागितलेले पैसे, पॅरेशूट आले. हातात पैसे पडल्यावर त्याने विमानातल्या प्रवाशांना सोडून देण्याची परवानगी दिली. त्याबरोबर तीनपैकी दोन एअरहोस्टेसलाही जाऊ दिलं.

आता विमानात शिल्लक राहिले, पायलट हॅरोल्ड अँडरसन, को-पायलट विल्यम रॅटकझॅक आणि एअर होस्टेस टीना मक्लो.

कूपरने सांगितलं की त्याला मेक्सिको सिटीला (मेक्सिकोची राजधानी) जायचं आहे. पायलटने सांगितलं की विमानात तेवढं इंधन नाहीये मग अमेरिकेच्या नेवाडा राज्यातल्या रिनोच्या दिशेने विमान वळवा असं कूपर म्हणाला.

रात्री पावणेआठला विमान रिनोच्या दिशेने उडालं.

बॉब फरिमन एफबीआयचे निवृत्त एजंट आहेत. डीबी कूपरने विमान हायजॅक केलं हे कळाल्यानंतर सिएटल विमानतळावर पोहचणाऱ्या पहिल्या काही अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. ते नंतर या केसच्या तपास अधिकाऱ्यांपैकी एक होते.

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "आम्हाला वाटलं की कूपर मेक्सिकोला जाईल. रिनोच्या दिशेने विमान जातंय हे माहिती होतं, पण आम्हाला काहीच माहिती नव्हतं!"

विमानात शांतता होती. कूपर अस्वस्थ झालाय हे टीनाच्या लक्षात येत होतं पण तिने कोणतंही पाऊल उचललं नाही, ना कूपर काही वेगळं वागला. त्याने आपलं काम सुरू केलं.

हॅरोल्ड अँडरसन आणि विल्यम रॅटकझॅक यांना सांगितलं की, तुम्ही विमान आता 10 हजार फुटांच्या उंचीवरच चालवायचं, ना जास्त वर, ना जास्त खाली.

विमानाची चाकं पोटात न घेता बाहेर काढायची. विमानाच्या पंख्यांचे फ्लॅप गती कमी होईल अशा रितीने उघडायचे. तरीही बोईंग 727 ताशी 400 किलोमीटरच्या वेगाने जात होतं.

विल्यम रॅटकझॅक
फोटो कॅप्शन, विल्यम रॅटकझॅक हे त्या अपहरण केलेल्या विमानाचे पायलट होते.

हँरोल्ड म्हणतात, "त्याच्या सगळ्या सूचनांवरून तर असंच वाटत होतं की तो विमानाबाहेर उडी मारणार आहे."

बोईंग विमानाच्या पोटात एक शिडी असते. आजकाल तुम्हाला आम्हाला ती फारशी दिसत नाही. पण सत्तरच्या दशकात ही शिडी विमान हवेत उडत असताना उघडता येणार नाही अशी यंत्रणा विमानांमध्ये बसवली नव्हती.

हीच शिडी उघडून कूपरला खाली उडी मारायची होती. इमर्जन्सी लँडिंगचा दरवाजा आत ओढून उघडावा लागतो. ते करण्यासाठी त्याने टीना थांबवून घेतलं पण लवकरच लक्षात आलं की टीनाकडून तो दरवाजा उघडणार नाही.

त्याने पायलटच्याच केबिनमध्ये टीनाला पाठवून दिलं.

लँडिंग दरवाजा खटपट करून उघडला, विमानतलं प्रेशर झटक्यात कमी झालं, सायरन वाजायला लागले. पायलटला ते पडद्यावर दिसलं.

पण कूपरला शिडी उघडता येत नव्हती. त्याने इंटरकॉमवरून पायलटला फोन केला, हवेचा आवाज इतका जबरदस्त होता की कोणाला काही ऐकू येत नव्हतं, तरी अँडरसन यांनी त्याला काहीतरी सांगितलं.

दोन सेंकदात विमानाला झटका बसला.

"लिहून घ्या, आपल्या मित्राने उडी मारली खाली," विल्यम इतरांकडे बघून म्हणाले.

सीएटल ते रिनो या प्रवासात कुठेतरी कूपरने दहा हजार फुटांवरून पॅराशूटने चालत्या विमानातून खाली उडी मारली होती. हॅरोल्ड, विल्यम आणि टीना सुखरूप रिनोला पोचले.

यानंतर डॅन कूपर या नावाने विमानात चढलेली ही व्यक्ती जगात कुणालाही कधीच दिसली नाही.

गुन्हेगाराचा शोध

अपहरणनाट्य तर संपलं होतं पण अमेरिकेच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या ठरणाऱ्या शोधमोहीमांपैकी एक शोधमोहीम सुरू झाली होती.

एफबीआय, स्थानिक पोलीस, सैन्याची एक तुकडी डीबी कूपरचा शोध घेत होते, अगदी स्काऊटच्या पोरांनाही कामाला लावलं होतं.

ज्या क्षणाला कूपरने विमानातून उडी मारली त्याचा अंदाज घेऊन तेव्हा विमान कुठे असेल याचा नकाशा काढला आणि ऐशी चौरस मीटरच्या भूभागात शोधाशोध सुरू झाली.

काय नव्हतं या भूभागात, पाणी, डोंगर, जंगल, बर्फ… म्हणाल ती नैसर्गिक परिस्थिती होती.

अशा परिस्थिती विमानातून उडी मारल्यानंतर कूपर जिवंतच राहिला नसेल असं अनेकांचं म्हणणं होतं. पण मग काहीतर सापडायला हवं होतं ना?

हॅरोल्ड अँडरसन
फोटो कॅप्शन, सीएटल ते रिनो या प्रवासादरम्यान कूपरने दहा हजार फुटांवरून पॅराशूटने चालत्या विमानातून खाली उडी मारली. हॅरोल्ड अँडरसन त्या विमानाचे पायलट होते.

कूपरने विमानात काहीच ठेवलं नव्हतं. फक्त उडी मारायच्या आधी आपला टाय काढून सीटवर फेकला होता, आणि त्याने ओढलेल्या सिगरेट्सची थोटकं होती. ही थोटकं नंतर एफबीआयकडून हरवली.

बाकी त्याने आधी फ्लोरेन्सला दिलेली चिठ्ठी, आपल्या मागण्या लिहिलेला कागद, त्याची ब्रीफकेस, दोन पॅराशूट आणि पैशाची पिशवी सगळं घेऊन त्याने विमानाबाहेर उडी मारली होती.

महिनोन महिने चाललेल्या या शोधमोहीमेत सुतळीचा तोडाही सापडला नाही. पैसे, कूपरचा मृतदेह तर लांबची गोष्ट पण त्याने ज्या पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली त्याच्या कापडाची एखादी चिंधी, दोर असलं काहीही त्या भागात सापडलं नाही.

मग गेला कूपर कुणीकडे?

अनेकांना वाटतं की त्या रात्री आपण काय करतोय याचा पूरेपूर अंदाज कूपरला होता तर काहींना वाटतं की तो अंधारात गोळ्या मारत होता.

याचा पहिला पुरावा म्हणजे कूपरने पैसे तर मागितले पण कोणत्या नोटांमध्ये हे पैसे द्यावे ते स्पष्ट सांगितलं नाही. याचा फायदा घेत एफबीआयने वीस वीस डॉलर्सच्या नोटांमध्ये 2 लाख डॉलर्स दिले, तेही पोत्यात घालून. ती बॅग धरायला ना हँडल होतं, ना त्याला खांद्यावर अडकवण्यासाठी पट्टा.

त्या पोत्याचंच वजन 10 किलो झालं होतं. आता हे 10 किलोचं पोतं बांधून विमानातून खाली उडी मारणं सोपं होतं का?

कूपरचे कपडेही स्कायडायव्हिंगला सुटेबल असे नव्हते. ज्याला माहितेय की आपल्याला पॅरेशूटमधून उडी मारायची आहे, तो असा सूट घालून का येईल?

पॅराशूट बांधणं अतिशय कौशल्याचं काम असतं, म्हणजे ते उडी मारताना नीट उघडेल आणि उडी मारणाऱ्याचा जीव जाणार नाही.

डॅन कूपरला जे पॅराशूट दिले होते ते कॉस नावाच्या व्यक्तीने बांधले होते. नॅशनल जिओग्राफिकच्या 'रॉबरी इन द स्काय' या डॉक्युमेंट्रीत ते म्हणतात, "त्या दिवशी मी NB8 आणि स्पोर्ट्स अशा दोन प्रकारचे पॅराशूट बांधून दिले होते. कूपरने NB8 निवडलं. ही निवड आश्चर्यात टाकणारी होती कारण ते अतिशय त्रासदायक आहे, ते उघडायला जास्त जोर लावावा लागतो आणि ते उघडण्याची दोरी पटकन हातात येत नाही. ती जर वेळेत सापडली नाही तर पॅरेशूट न उघडता तुमचा कपाळमोक्ष होऊ शकतो."

कूपरने विमानातून उडी मारली तेव्हा प्रचंड पाऊस होता आणि मरणाची थंडी होती. 10 हजार फुटांवरून जमिनीपर्यंत पोहचेपर्यंत तो थंडीने अर्धमेला झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोंधळात टाकणारे पुरावे

अनेक वर्ष तपास चालला पण ठोस काही हाती आलं नाही. या काळात एफबीआयने शेकडो संशयितांची चौकशी केली. तपास थंड बस्त्यात गुंडाळून ठेवून देण्याची वेळ आली होती पण एक दिवस चमत्कार घडला.

गुन्हा घडला त्या नंतर नऊ वर्षांनी, फेब्रुवारी 1980 मध्ये कोलंबिया नदीच्या किनारी एक बापलेकांची जोडी लाकूड गोळा करत होती. लाकूड शोधता शोधाता ब्रायन इंग्रम या लहानशा मुलाला मातीत पुरलेली कुजलेल्या नोटांची तीन बंडलं सापडली.

या त्याच नोटा होत्या ज्या खंडणी म्हणून डीबी कूपरला दिल्या होत्या. नोटांवरचे सीरियल नंबर्स जुळत होते.

इंग्रम कुटुंबाला नदीकिनारी ज्या ठिकाणी पैसे सापडले तिथे खोदकाम करताना FBI एजंट्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंग्रम कुटुंबाला नदीकिनारी ज्या ठिकाणी पैसे सापडले तिथे खोदकाम करताना FBI एजंट्स

दहा वर्षांनी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली. एफबीआयने आसपासचा सगळा परिसर खणून काढला पण ती तीन बंडलं सोडून इतर काही सापडलं नाही. ना पैसे, नाही दुसरा काही पुरावा.

या सापडलेल्या नोटांनी प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी आणखीन प्रश्न उभे केले. ही बंडलं जिथे कूपरने उडी मारली आणि ज्या ऐंशी चौरस मीटर परिसरात शोधाशोध झाली त्याभागापासून तीस चाळीस किलोमीटर विरुद्ध दिशेला सापडली.

या नोटा इथवर आल्या कशा?

बरं नदीच्या प्रवाहातून आल्या म्हणावं तर शोधमोहिमेचा भाग नदीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला आणि नोटा सापडल्या तो भाग प्रवाहाच्या वर होता. नोटा प्रवाहाविरुद्ध पोहत तर वर नाही गेल्या ना?

अजून एक धक्कादायक गोष्ट तपासात कळली. 1974 साली कोलंबिया नदीचं पाणी वाढल्यामुळे किनाऱ्यावर नव्या वाळूचा एक थर जमा झाला होता. या नोटा त्या थरावर सापडल्या. जर या नोटा 71 साली, घटनेच्या रात्री किंवा त्यानंतर काही दिवसांनी वाहात वाहत इथवर आल्या असं जर म्हटलं तरी 74 साली झालेल्या वाळूसंचयाच्या खाली त्या सापडायला हव्या होत्या.

याचाच अर्थ घटनेनंतर कमीत कमी तीन वर्षांनी त्या नोटा इथे आल्या होत्या. अनेक तर्कवितर्क लढवले गेले पण कोणालाच याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

कॉपीकॅट

1971 साली डीबी कूपरने नॉर्थवेस्टर्न एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण केलं आणि 2 लाख डॉलर्स मागितले. पुढच्याच वर्षी, खरंतर पाचच महिन्यांनी एप्रिल 1972 साली अगदी सारख्याच प्रकारे दुसऱ्या विमानाचं अपहरण झालं आणि अपहरणकर्त्यांने 5 लाख अमेरिकन डॉलर्स खंडणी म्हणून मागितले.

एक व्यक्तीने जेम्स जॉन्सन या नावाने तिकीट काढलं. युनायडेट एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण केलं. डॅन कूपरने जे जे केलं सगळं तेच आणि तसंच केलं. चार पॅराशूटची मागणी केली आणि 5 लाख डॉलर्स घेऊन अमेरिकेच्या युटाह राज्यावरून विमान जात असताना पॅराशूटने उडी मारली.

या माणसाने अनेक वर्षं अशा अपहरणाच्या योजना बनवल्या होत्या आणि या आपल्या मित्राशी गप्पा मारताना त्या सांगितल्या होत्या. त्या मित्राने माहिती दिली म्हणून ही व्यक्ती पकडली गेली.

या माणसाचं खरं नाव होतं रिचर्ड मकॉय. त्याच्या घरात खंडणीचे पैसे सापडले. रिचर्ड व्हिएतनाम युद्दधातला पायलट होता, त्याला शौर्यपदकंही मिळाली होती. बायको होती, दोन मुलं होती.

या प्रकरणी रिचर्डला 45 वर्षांची शिक्षा झाली. जेलमध्ये असताना तो पळून गेला. त्याला एफबीआयने पुन्हा पकडलं आणि कडक सुरक्षेच्या तुरुंगात ठेवलं. तो तिथूनही पळून गेला.

फ्लोरेन्स शॅटनर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या विमानातल्या एअर होस्टेस फ्लोरेन्स शॅटनर यांना सुरुवातीला कूपर आपल्याशी फ्लर्ट करतोय, असं वाटलं होतं.

काही महिन्यांनी एफबीआय सोबतच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

पण या प्रकरणाने एक गोष्ट सिद्ध झाली. चालत्या विमानातून पॅराशूटने उडी मारलेला माणूस जिवंत राहू शकतो. मकॉय राहिला. मग कूपर का नाही?

लोकांचा हिरो

कूपरचं वर्णन अनेक ठिकाणी 'सभ्य चोर' असं वर्णन केलं आहे. विमानातल्या एअर होस्टेसनी त्यांचं वर्णन उच्चभ्रू असं केलं. त्या विमानात असताना सेव्हन-अप आणि बर्बन (व्हिस्कीचा एक महागडा प्रकार) हे ड्रिंक ऑर्डर केलं. सत्तरच्या दशकात हे ड्रिंक उच्चभ्रू वर्गात लोकप्रिय होतं. त्याने विमानात जवळपास 8 सिगरेट ओढल्या. त्या सिगरेटचा ब्रँड होता रोली. या सिगरेटही श्रीमंत लोक प्यायचे.

पण या केसचे तपास करणारे एफबीआय अधिकारी राल्फ हिमेलबाख यांनी नॅशनल जिओग्राफिकला सांगितलं की, "तो निव्वळ एक चोर होता आणि आयुष्यभर गुन्हेगारी जगतात वावरलेला होता. तो एक 'लूजर' होता."

अशा विरोधाभासांनी कूपरभोवती असणार गुढतेचं वलय अधिक दाट होत गेलं.

डीबी कूपर जिवंत राहिला की मेला हे आजवर ठामपणे कोणीच सांगू शकलं नाही. त्यावेळेचं वातावरण, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासकांना आणि एफबीआय अधिकाऱ्यांना वाटतं की तो त्या रात्री जिवंत राहिला नाही. सत्तरच्या दशकात लोकांचा मनात मात्र त्याची हिरो हीच प्रतिमा तयार झाली.

'व्यवस्थेला लढा देणारा माणूस' म्हणून सर्वसामान्य माणसं त्याच्याकडे पाहायची. याच दशकात व्हिएतनामचं युद्ध झालं, त्याविरोधात तरूणाईमध्ये असंतोष वाढत होता.

एरियल गावात आता डी. बी. कूपरच्या नावाने जत्रा भरते.
फोटो कॅप्शन, एरियल गावात आता डी. बी. कूपरच्या नावाने जत्रा भरते.

खुद्द सिएटलमध्ये मंदी आली होती. ज्या विमानाचं अपहरण झालं होतं ते विमान बनवणाऱ्या बोईंग कंपनीने तब्बल 60 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं.

सरकारविरोधात रोष होता. अशात व्यवस्थेला शिंगावर घेणारा, अचाट धाडस करून दाखवणारा आणि एफबीआयला तोंडघशी पाडणारा माणूस हिरो बनला नसता तर आश्चर्य.

एफबीआयने पहिल्यांदा डीबी कूपरला शोधण्यासाठी वॉशिंग्टन राज्यातल्या ज्या लहानशा गावात त्यांचा कँप लावला होता तिथे आता डीबी कूपरच्या नावाने जत्रा भरते. एरियल असं त्या गावाचं नाव आहे आणि दरवर्षी तिथे नोव्हेंबर महिन्यात थँक्सगिव्हिंचा सण झाला की त्याला लागून आलेल्या शनिवारी शेकडो लोक जमतात, डीबी कूपरच्या नावाने पार्टी करतात आणि मस्तपैकी बिअर पितात.

पन्नास वर्षांनंतर ही दंतकथा आजही सांगितली जाते, कूपर आजही हिरो आहे, तो कोण होता हे शोधायला लोक आजही बाहेर पडतात, पुस्तकं लिहितात, त्यादिवशी जे घडलं त्याचं नाटकीय रूपांतर करतात, डीबी कूपरवर रॅप साँग लिहिली गेलीत, पिक्चर आलेत, बीबीसीनेही अगदी मागच्यावर्षी डॉक्युमेंट्री केलीये. का? काय आकर्षण आहे या माणसाचं?

ही स्टोरी करूयात असं जेव्हा माझा सहकारी तुषार कुलकर्णीला सांगितलं, तेव्हा त्याला एका वाक्यात म्हटलं, "बॉम्ब दाखवून त्याने विमान हायजॅक केलं, खंडणी घेतली आणि अक्षरशः अदृश्य झाला."

"दॅट गाय इज माय हिरो, मी पण करतो असं काहीतरी," तो म्हणाला.

हेच वाक्य लेखक ब्रुस स्मिथ यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीत उच्चारलं होतं, "लोकांना वाटतं, आता माझा हात दगडाखाली अडकलाय, परिस्थिती हताश आहे, माझ्याकडे पैसे नाहीत.. पण साला डीबी कूपरकडे पण नव्हते. तरी त्याने विमान हायजॅक केलं, पैसै घेतले, वादळवाऱ्यात 10 हजार फुटांवरून उडी मारली, जीवघेण्या थंडीत जंगलातून मार्ग काढला पण तगला. तो करू शकतो तर मी का नाही?

हीच भावना लोकांना हवी असते. एक लार्जर दॅन लाईफ प्रतिमा डोळ्यासमोर हवी असते म्हणजे रोजच्या नीरस आयुष्यात स्पार्क येईल.

डीबी कूपर तीच प्रतिमा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)