1971 च्या युद्धात भारतीय वैमानिकाचं विमान 'नो मॅन्स लँड'मध्ये कोसळलं आणि पुढे...

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
4 डिसेंबर 1971 रोजी आदमपूर हवाई तळावर 101 स्क्वार्डनचे फ्लाइट लेफ्टनंट गुरदीप सिंग सामरा मेट ब्रिफिंगसाठी सकाळी चार वाजताच उठले होते.
त्यांना रात्रभर झोपही लागली नव्हती. कारण एका दिवसापूर्वीच पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय तळांवर हल्ले करत युद्ध पुकारलं होतं.
अंदाजे सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी गुरदीप सिंग सामरा यांनी आदमपूर एअरबेसवरून सुखोई 7 विमानाद्वारे टेक ऑफ केलं. त्यांच्यावर छंब सेक्टरमध्ये असलेले पाकिस्तानी टँक उध्वस्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा मनिंदर कौर यांच्याशी विवाह झाला होता. खाली असलेल्या पाकिस्तानी टँकवर 57 एमएम रॉकेटचा हल्ला करताच, त्यांना विमानाला काहीतरी धडकल्याचा आवाज ऐकू आला. खालून तोफेनं हल्ला केलेला तोफगोळा त्यांच्या विमानाला धडकला होता.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
अचानक कॉकपिटमध्ये लाल लाईट लागले आणि सीटच्या समोर लावलेल्या मीटरनं इंजीन काम करत नसल्याचं आणि विमानात आग लागल्याचं दर्शवलं.
त्यावेळी ते विमान ज्या पद्धतीनं हवेत उडत होतं, ते त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत नेत होतं. पण त्यांनी लगेचच विमान भारतीय हद्दीच्या दिशेन वळवलं.
शक्य तेवढं भारतीय हद्दीकडे सरकता यावं म्हणून ते विमान जास्त उंचीवर घेऊन गेले. त्यांनी लगेचच इजेक्ट केलं असतं (विमानातून बाहेर निघणं) तर ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले असते. तसं झालं असतं तर ते युद्धकैदी बनणार हे जवळपास निश्चित होतं.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
''मी एकिकडं रेडिओद्वारे संपर्क करून आणीबाणीची स्थिती आणि विमानातून उडी मारण्याचा विचार असल्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी विमान सर्वात जवळ असलेल्या पठाणकोटच्या तळावर इमर्जन्सी लँडिंग करता यावं म्हणून मी इंजिन पुन्हा सुरू करण्याचाही प्रयत्न करत होतो,'' असं ग्रुप कॅप्टन गुरदीप सिंग सामरा यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितलं.
''मी 'मे डे कॉल' (जीवाला धोका असल्याने केला जाणारा आपत्कालीन कॉल) करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तोही अपयशी ठरला. अचानक मला विमान झाडांच्या वरून उडत असल्याचं दिसून आलं. निर्णायक वेळ आल्याचं लक्षात येताच मी दोन्ही इजेक्शन बटन दाबले. बटन दाबताच काही सेकंदांसाठी मी ब्लँक झालो. त्यावेळी एअर स्पीड इंडिकेटर जवळपास शून्य दाखवत होतं. वेळ होती सकाळचे सव्वा दहा...'' असं त्यांनी सांगितलं.
पॅराशूटला लागली आग
गुरदीप सिंग सामरा पॅराशूटमधून खाली पडले तेव्हाच, त्यांचं विमानही जमिनीवर कोसळलं आणि क्रॅश झालं.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
सामरा यांच्या चारही बाजूंना क्रॅश झालेल्या विमानातून उठणाऱ्या आगीच्या ज्वाळा होत्या. त्यामुळं पॅराशूट कुठे लँड करणार हे त्यांना कळत नव्हतं.
तो परिसर 'नो मॅन्स लँड' सारखा होता. ''त्याचवेळी माझ्या कपड्यांनी पेट घेतला. माझ्या चेहऱ्यासमोर एवढ्या ज्वाळा होत्या की, त्यामुळं माझ्या भुवयाही जळाल्या.मी एवढ्या कमी उंचीवरून इजेक्ट केलं होतं की, मला परफेक्ट लँडिंगसाठी दोन्ही पाय जवळ घेण्याचीही संधी मिळाली नाही,'' असं सामरा सांगतात.
''आगीच्या ज्वाळा आणि उष्णतेमुळं माझं पॅराशूट पूर्णपणे गुंता झालं होतं, त्यामुळं आकाशातून दगड खाली पडावा तसा मी पडलो होतो. चारही बाजुंना असलेल्या आगीच्या ज्वाळांमध्ये मी पडलो होतो. त्यामुळं मी उभं रागून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मला माझ्या पायचं हाड अनेक ठिकाणी तुटलं असल्याचं जाणवलं. चालणं तर लांबच राहिलं, मला पायावर उभंही राहता येत नव्हतं,'' असं ते म्हणाले.
150 मीटरवर दिसली अॅम्ब्युलन्स
सामरा यांना प्रचंड वेदना होत होत्या. त्यांना आगीपासून वाचण्यासाठी लगेचच काही तरी करणं गरजेचं होतं. त्याचवेळी विमानात ठेवलेले बॉम्ब फुटायला लागले. मात्र सुदैवानं त्यांची दिशा दुसरीकडे होती.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
एवढ्या धोकादायक पद्धतीनं इजेक्ट केल्यानंतर सामरा यांचा त्यांच्याच शस्त्रांनी अंत व्हावा यापेक्षा वाईट दुसरं काही ठरलं नसतं. सामरा यांनी मास्क काढला आणि विमानाच्या ढिगाऱ्यापासून दूर झाडांकडे सरकायला सुरुवात केली.
त्यांना तहान लागली होती. तसंच प्रचंड घाम येत होता. सुमारे 15 ते 20 मिनिटांनी त्यांना एक अॅम्ब्युलन्स येताना दिसली. "मृगजळासारखा तो काही भास आहे की नेमकं काय? हे मला लक्षात येत नव्हतं,'' असं सामरा म्हणाले.
विली जीप पोहोचली घटनास्थळी
दरम्यान, गुरदीप सिंग सामरा त्यांना पुढं काय करायचं आहे, याचा विचार करू लागले. त्यांचं ओव्हरऑल (पायलटचं शरिर झाकणारं जॅकेट) आगीत फेकलं. कारण त्याखाली त्यांनी साधे कपडे परिधान केलेले होते.
ऐनवेळी गरज पडू शकते म्हणून त्यांच्याकडे असलेली एक केस कापण्याची कात्री आणि काही पाकिस्तानी पैसेही होते.
सुमारे 45 मिनिटांनी त्यांना एक गाडी त्यांच्याकडे येताना दिसली. ती एक विली जीप होती.
''मला नंतर समजलं की, त्याठिकाणी खरंच एक अॅम्ब्युलन्स आली होती. आगीच्या ज्वाळा खूप जास्त असल्यानं कुणीही वाचण्याची शक्यता नाही, असं वाटल्यामुळं ती तिथून परत गेली होती.
छोटी असल्यानं जीप त्यांच्या अगदी जवळ पोहोचली होती. मी शिटी वाजवली आणि हात हलवून त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळात सैनिकांनी मला घेराव घातला,'' असं सामरांनी सांगितलं.
नकाशे आणि रिव्हॉल्वर दिली
''त्यांच्या रायफल माझ्या दिशेनं रोखलेल्या होत्या. एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं ते दृश्य होतं. ते काही सेकंद मला अनंतकाळाचा अनुभव देणारे ठरले. सगळीकडे स्मशान शांतता होती. काही अंतरावरून टँक फायर झाल्याचा आवाज ऐकू येत होता,'' असं सामरा यांनी पुढं सांगितलं.
''त्याचवेळी सैनिकांचे कॅप्टन अपय्या यांनी मला तुम्ही कोण आहात? असं विचारलं. मी भारतीय आहे असं उत्तर दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरही काहीही हावभाव किंवा हास्य नव्हतं. त्यांच्यापैकी एकाने अचानक मला, तुमच्याकडे काही शस्त्र आहे का? असेल तर ते आमच्या दिशेला फेका असं म्हटलं. मीही तसंच केलं,'' असं सामरा म्हणाले.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
''त्यांनी माझ्याकडून नकाशे, इतर कागदपत्रं आणि कोडवर्ड मागितला. मी सर्व काही त्यांना दिलं. तरीही त्यांच्याकडून मला वाचवण्याचा प्रयत्न होत नसल्यानं मी काहीसा विचारात पडलो. मी ज्या ब्रिगेडसाठी उड्डाण घेतलं होतं, त्याचं नाव त्यांना सांगितलं. त्यानंतर खूप वेळापासून माझ्या मनात असलेला प्रश्न मी विचारला. 'तुम्ही कोण आहात?' काही वेळानं कॅप्टननं आम्ही 'भारतीय' आहोत, असं उत्तर दिलं."
भूमिगत बंकरमध्ये ठेवलं
थोड्या वेळानं भारतीय सैनिकांनी सामरा यांना उचललं आणि छोट्याशा जीपमध्ये त्यांना ठेवलं. या छोट्याशा जीपमध्ये आधीचे तीन जण होते. त्यात एका पायाचं हाड तीन ठिकाणी तुटलेला रुग्ण झोपलेला होता, त्याची अवस्था काय असेल, याचा अंदाज विली जीपचा आकार माहिती असलेल्यांना लावता येऊ शकतो.
सामरा यांना प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळं त्यांनी अॅम्ब्युलन्स का बोलवत नाही? असं विचारलं. त्यावर कॅप्टन अपय्या यांनी काही लांब अंतरावर असलेल्या पाकिस्तानच्या टँककडे इशारा केला आणि आपण याठिकाणी फार वेळ राहू शकत नाही, कारण त्या टँक आपल्यावर हल्ला करण्याची संधी सोडणार नाही, असं उत्तर दिलं.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
सामरा यांना काही अंतरापर्यंत जीपमधून नेण्यात आलं आणि नंतर त्यांना एका भूमिगत बंकरमध्ये ठेवण्यात आलं. ते बंकर एका झाडाला लागून होतं. त्याठिकाणी एक भारतीय टँक उभी होती आणि त्याद्वारे थोड्या - थोड्या वेळानं पाकिस्तानच्या टँकवर हल्ला केला जात होता. योगायोगानं पाकिस्तानी टँकनं या टँकवर हल्ला केला नाही.
जौरियातील रुग्णालयात केलं प्लास्टर
सामरा यांच्या अडचणी मात्र कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या. टँक फायर करताच त्याठिकाणी जमीन जोरानं हादरायची आणि सगळीकडं धूळ पसरत होती. बंकरच्या आत मेडिकल कोरचा एक सैनिक जखमींची मदत करण्यासाठी धाव-पळ करत होता.
सायंकाळी सामरा यांना काही जखमी सैनिकांसह अॅम्ब्युलन्समधून जौरियाँमधील फिल्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं पोहोचायला त्यांना रात्रीचे 9 वाजले. पण त्या रुग्णालयात एक्स-रे मशीन नव्हती. त्याठिकाणच्या डॉक्टरांनी वरुनच पाहत सामरा यांना त्यांच्या एका पायाचं हाड तीन ठिकाणी तुटलेलं असल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
त्याचठिकाणी कंदिलाच्या उजेडात अॅनेस्थेशिया (भूल) न देता सामरा यांच्या पायावर प्लास्टर करण्यात आलं. प्लास्टर एवढं घट्ट आवळलं होतं की, त्यांच्या वेदना आणखी वाढल्या.
पाकिस्तानी विमानाचा हल्ला
5 डिसेंबरच्या सकाळपर्यंत सामरा यांना 'मिसिंग इन अॅक्शन' (बेपत्ता सैनिक) घोषित करण्यात आलं होतं. आदमपूर एअरबेसशी संपर्क होत नव्हता. सामरा यांचे सहकारी त्यांच्याबाबत माहिती मिळण्याची आतुरतेनं वाट पाहत होते.
संपूर्ण दिवस संपल्यानंतर रात्री सामरा यांना, एक एमआय-4 हेलिकॉप्टर येईल आणि त्यांच्यासह इतर जखमींना घेऊन ऊधमपूर रुग्णालयात जाईल असं सांगण्यात आलं.
''त्याठिकाणी आम्ही चार जण जखमी होतो. हेलिकॉप्टरचं इंजिन बंद केलं जाणार नाही, ते खाली उतरल्यानंतर त्याचे रोटर्स फिरत राहतील आणि ते जखमी सैनिकांना घेऊन लगेच हवेत उड्डाण करेल, असं ठरलं होतं. आम्हाला स्ट्रेचरवरून हेलिकॉप्टरकडे नेलं जात होतं. तेवढ्यात पाकिस्तानच्या हवाई दलाचं एक मिग-9 विमान अचानक त्याठिकाणी पोहोचलं आणि बॉम्ब हल्ला सुरू केला,'' असं सामरा यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
''ते विमान हेलिकॉप्टरच्या रोटर्समुळं उडणारी धूळ पाहून तिथं पोहोचलं होतं का, हे मला माहिती नाही. पण त्यामुळं भारताच्या हेलिकॉप्टरनं इंजिन बंद केलं. जे सैनिक आम्हाला स्ट्रेचरवरुन हेलिकॉप्टरकडे घेऊन निघाले होते, ते आमचे स्ट्रेचर तसेच सोडून बंकरमध्ये जाऊन लपले,'' असंही ते म्हणाले.
''आम्ही पाकिस्तानच्या विमानांच्या थेट निशाण्यावर होतो. आम्ही जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेलो आहोत, याचा कदाचित त्यांना अंदाज आला नसेल. सुदैवानं भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं आमची मदत केली. आम्हाला त्या अवस्थेत सोडल्यामुळं ते सैनिकांवर ओरडले. त्यामुळं सैनिकांनी लगेचच आम्हाला तिथून सुरक्षित स्थळी हलवलं.''
लष्करी रुग्णालयात उपचार
पाकिस्तानचा हल्ला संपताच सामरा आणि इतर जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरद्वारे तिथून नेण्यात आलं. उधमपूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गुरदीप सिंग सामरा यांना दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

फोटो स्रोत, Gurdeep Singh Samra
त्याठिकाणी तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. जानेवारी 1973 पासून सामरा यांनी पुन्हा विमान उड्डाण सुरू केलं.
1995 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टन पदावरून ते निवृत्त झाले. पुढे कारगिल युद्धादरम्यान काही काळ त्यांना भारतीय हवाई दलाचे राखीव अधिकारी म्हणून सेवा देण्याची संधीही मिळाली. ग्रुप कॅप्टन गुरदीप सिंग सामरा हे सध्या जालंधरमध्ये राहतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








