बांगलादेश 1971: जेव्हा एका बंगाली पायलटने पाकिस्तानी विमानाचं अपहरण केलं होतं...

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, BANGLADESH/ALCETRON.COM

फोटो कॅप्शन, पायलट
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कराचीच्या मॉरीपूरमधील लष्कराच्या हवाई तळावर दुपारच्या काही वेळापूर्वी पाकिस्तानी पायलट ऑफिसर रशीद मिन्हास त्यांच्या दुसऱ्या उड्डाणासाठी टी 33 विमान ट्रेनर टेकऑफसाठी घेऊन निघाले होते.

विमान टेक ऑफ पॉइंटवर पोहोचलं तेव्हा असिस्टंट फ्लाइट सेफ्टी ऑफिसर फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रेहमान यांनी हात दाखवत ते थांबवलं. विमानाचं उड्डाण करायला नव्यानं शिकलेल्या पायलटची अशा प्रकारे नेहमी तपासणी केली जायची.

मिन्हास यांनाही त्यांना तपासणीसाठी थांबवलं असेल असं वाटलं. मात्र मतिउर रेहमान यांचे इरादे वेगळे होते.

मतिउर बंगाली अधिकारी होते. ढाक्यात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईनं ते नाराज होते. त्यांनी मित्र सदरुद्दीन यांच्यासह मिळून विमान घेऊन भारतात पळून जाण्याची योजना आखली होती.

पाकिस्तानी प्रशासनाला या योजनेची चाहूल लागली. भारताबरोबर युद्धाची शक्यता निर्माण होऊ लागली होती, तेव्हा पाकिस्ताननं इतर बंगाली अधिकाऱ्यांसह मतिऊर यांनाही ग्राऊंड ड्युटी देत असिस्टंट फ्लाइट सेफ्टी ऑफिसर बनवलं होतं.

पाकिस्तानच्या वायुसेनेचे इतिहासकार कैसर तुफैल यांनी त्यांच्या 'ब्लूबर्ड 166 इज हायजॅक्ड' या लेखात याबाबत लिहिलं आहे.

"पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आपल्यावर पाळत ठेवून असल्याचं बंगाली अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे बेसवरील अधिकाऱ्यांबरोबर मैत्रीचे संबंध कायम ठेवायचे आणि कधीही एकत्रित भेटायचं नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र पाकिस्तानच्या वायुसेनेच्या विमानाचं अपहरण करून भारतात न्यायचं, यावर मात्र त्यांचं आधीच एकमत झालेलं होतं.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, BANGLADESH DEFENCE

फोटो कॅप्शन, पायलट

सुरुवातीला एक किंवा दोन एफ 86 सेबर विमानांचं अपहरण करण्याची योजना आखण्यात आली. मात्र बेसच्या टारमॅकवर बंगाली अधिकाऱ्यांची उपस्थितीही त्यांना संशयाच्या फेऱ्यात अडकवू शकते, असं त्यांना वाटलं. ग्राऊंड स्टाफच्या मदतीशिवाय जेट विमानांचं अपहरण करणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळं सोलो मिशनवर जाणारं टी-33 विमान अपहरण करणं अधिक सोपं ठरेल, हे त्यांच्या लक्षात आलं."

मतिउर यांनी विमान थांबवलं

रशीद मिन्हास यांनी स्क्वॉर्डन क्रू रूममध्ये नाश्ता गरम केला. त्यांना उड्डाण करायचं नव्हतं. कारण एकट्यानं उड्डाण करण्यासाठी कराचीच्या जवळपास वातावरण चांगलं नव्हतं. मात्र अचानक परिस्थिती बदलली. वातावरण स्वच्छ झालं आणि मिन्हास यांना उड्डाणाची तयारी करण्यास सांगण्यात आलं.

"रशीद मिन्हास नाश्ता अर्ध्यातच सोडून फ्लाइट लेफ्टनंट हसन यांच्याकडून उड्डाणाबाबत माहिती घेण्यासाठी गेले. त्यांनी उड्डाणासाठी गणवेश परिधान केला. घाई-घाईत दोन गुलाब जामून खाल्ले आणि कोका कोलाचे दोन तीन घोट प्यायले.

बरोबर साडे-अकरा वाजता टी-33 विमानानं कॉल साइन ब्लूबर्ड 166 सह मुख्य टारमॅकडं प्रस्थान केलं. यादरम्यान मतिउर रेहमान त्यांच्या ओपेल केडिट कारद्वारे मुख्य धावपट्टीच्या उत्तर पूर्व दिशेला असलेल्या ट्रॅकवर पोहोचले. मतिउर यांनी विमान थांबवण्याचा इशारा केला. त्यावेळी त्यांना काहीतरी महत्त्वाचा संदेश द्यायचा असेल, असं मिन्हास यांना वाटलं," असं कैसर तुफैर यांनी लिहिलं आहे.

एअर ट्राफिक कंट्रोलला अपहरणाची माहिती

रशीद मिन्हासला थांबण्याचा इशारा केल्यानंतर विमान थांबताच मतिउर उघडलेल्या कॅनोपीमधून विमानाच्या कॉकपिटमध्ये चढले. ते कॉकपिटची तपासणी करत आहे, असा दिखावा करू लागले. मिन्हास यांना काही समजण्यापूर्वी विमान रनवेवर धावू लागलं.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, BANGLADESH DEFENCE

फोटो कॅप्शन, चमू

"मिन्हास यांना यादरम्यान एकच गोष्ट करता आली. त्यांनी 11 वाजून 28 मिनिटांनी एअर ट्राफिक कंट्रोलला विमानाचं अपहरण झाल्याची माहिती माहिती दिली. मिन्हास यांनी आपण सांगितलेलं ऐकावं म्हणून रेहमान यांनी पिस्तुलाची मदत घेतली असेल. कारण तसं नसतं तर धोक्याची चाहूल लागताच रशीद यांना इंजीन बंद करता आलं असतं," असं कैसर लिहितात.

"दोन पायलटमध्ये विमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं मला दिसत होतं," असं त्यावेळी एटीसीमध्ये तैनात असलेले बंगाली अधिकारी कॅप्टन फरीदुजमाँ यांनी बांगलादेशी दैनिक 'द डेली स्टार'च्या 6 जुलै 2006 च्या अंकात लिहिलं होतं.

"मतिउर रेहमान भारताला डिफेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मला त्याचवेळी वाटलं. कारण त्यांनी पॅराशूट किंवा हेल्मेटही परिधान केलेलं नव्हतं." विमान नजरेआड जाताच, एटीसीमध्ये तैनात इतर अधिकाऱ्यांनी विमान बेपत्ता झाल्याचा अलर्ट जारी केला. घाई-घाईत दोन सेबर जेट्स टी-33 ला इंटरसेप्ट करण्यासाठी पाठवण्यात आले."

रशीद मिन्हास 'कॉकपिटमध्ये फ्रीज'

पाकिस्तानचे आणखी एक प्रसिद्ध पायलट आणि सितार-ए-जुर्रतनं सन्मानित करण्यात आलेले सज्जाद हैदर यांनी त्यांच्या 'फ्लाइट ऑफ द फॉल्कन' या आत्मकथेच मतिउर रेहमानचा उल्लेख केला आहे.

"मतिउर यांनी 1965-66 दरम्यान माझ्यासोबत काम केलं होतं. त्यांनी अपहरण रोखण्याचा गंभीर प्रयत्न केला नाही. त्यानी ठरवलं असतं तर, फ्रंट कॉकपिटमध्ये असलेला मेन फ्युएल स्विच त्यांना बंद करता आला असता.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, ALCETRON.COM

फोटो कॅप्शन, पायलट

एअर इनव्हेस्टिगेशन बोर्डाचे प्रमुख ग्रुप कॅप्टन झहीर हुसैन यांच्या मते, तरुण आणि अनुभव नसलेले मिन्हास कॉकपिटमध्ये फ्रीज झाले होते. मतिउर यांनी कमी उंचीवरून विमान उडवत डाव्या बाजुला विमान वळवलं. विमान खूपच खाली उडू लागलं तेव्हा, एटीसी ऑफिसर असीम रशीद यांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. बेस कमांडर बिल लतीफ यांना लगेचच याबाबत माहिती देण्यात आली.

त्यानी लगेचच नुकतीच लँड झालेली दोन एफ-86 सेबर विमानं त्यांना अडवण्यासाठी पाठवली. या विमानांचे विंग कमांडर शेख सलीम आणि त्यांचे विंगमॅन फ्लाइट लेफ्टनंट कामरान कुरेशी विमान चालवत होते. पण रडारवर विमानाचा काहीही पुरावा मिळत नव्हता. त्याचं कारण म्हणजे टी- 33 झाडाएवढ्या उंचीवरून उडत होतं.

विमान उड्डाण होऊन आठ मिनिटं झाली. त्यामुळे पूर्ण क्षमतेनं पाठलाग केला असता तरी सीमेच्या पूर्वी त्याला गाठणं शक्य नव्हतं. त्यात रडारच्या चुकीमुळं एफ 86 विमानांची जोडी नवाबशाहहून रुटीन मिशनवरून परतणाऱ्या बी-57 विमानांच्या मागे लागली तेव्हा आणखी वेळ वाया गेला.

पोलीस ठाण्यातून मिळाली विमान कोसळल्याची माहिती

थोड्या वेळानं एफ-86 विमानाची आणखी एक जोडी टी-33 चा पाठलाग करण्यासाठी पाठवण्यात आली. ती विमानं फ्लाइट लेफ्टनंट अब्दुल वाहब आणि फ्लाइट लेफ्टनंट खालीद मेहमूद उडवत होते.

"काहीतरी गडबड आहे हे आमच्या लक्षात आलं. पण आम्ही वर गेलो तेव्हा खूपच संभ्रमाची स्थिती होती. तरीही आम्ही गार्ड चॅनलवर एक खोटा मॅसेज पाठवला. एफ 86 विमान टी-33 च्या अगदी पाठीमागे आहे, ते परत आलं नाही तर ते पाडलं जाईल, असा तो मॅसेज होता. आम्ही रेडिओ कॉलद्वारे मिन्हास यांना विमानातून बाहेर पडण्याचे निर्देश द्यायला सुरुवात केली. मात्र आम्हाला काहीही प्रत्युत्तर मिळालं नाही," असं नंतर अब्दुल वाहाब यांनी सांगितलं.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, KAISAR TUFAIL/FB

फोटो कॅप्शन, पायलट

अपहरण झालेल्या विमानाची माहिती बराच वेळ मिळाली नव्हती. मात्र दुपारनंतर शाहबंदर पोलीस ठाण्यातून एक विमान अपघातग्रस्त झालं असून त्यात दोन जण ठार झाले असल्याची माहिती मिळाली तेव्हा चित्र स्पष्ट झालं.

लगेचच एक हेलिकॉप्टर मदत कार्यासाठी पाठवण्यात आलं. त्याला मसरूरपासून 64 नॉटिकल मैल अंतरावर एका तलावाशेजारी जमिनीत गाडल्या गेलेल्या टी-33 विमानाची शेपटी दिसली. त्यावर विमानाचा क्रमांक 56-622 लिहिलेला होता. विमान दुर्घटना 11.43 मिनिटांनी झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला.

नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष

विमान भारतात नेण्याची रेहमान यांची योजना यशस्वी होऊ शकली नव्हती. भारतीय सीमेपासून 32 मैल अलिकडं थट्टा नावाच्या ठिकाणी टी-33 विमान जमिनीवर कोसळलं.

विमान हेलकावे घेत असल्याचं त्याठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं होतं. म्हणेज विमानामध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता. नंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकानं उड्डाणादरम्यान विमानाची कॅनोपी लॉक केलेली नव्हती असं अहवालात म्हटलं होतं.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, ALCETRON.COM

फोटो कॅप्शन, पायलट

बाहेरच्या हवेच्या दबावामुळं कॅनोपी (वरचा काचेचा भाग) काहीवेळ जागेवर राहिली मात्र विमान चुकीच्या पद्धतीनं उडत असल्यामुळं ती हवेत उडून गेली.

कॅनोपी विमानाच्या मागच्या बाजुला धडकली त्यामुळं विमान सरळ खाली जात जमिनीवर कोसळलं. मतिउर रेहमान यांना सेफ्टी बेल्ट बांधायला वेळच मिळाला नव्हता. कदाचित त्यामुळंच ते बाहेर उडाले. मतिउर यांच्या मृतदेहाजळ तपास पथकाला एक खेळण्यातलं पिस्तुल मिळालं होतं. अपघात झाला त्या ठिकाणापासून जवळच मृतदेह आढळला होता.

मिन्हास यांना पाकिस्तानातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार

रशीद मिन्हास यांना पाकिस्तानाचे हिरो जाहीर करण्यात आलं. त्यांना निशान-ए-हैदर या पाकिस्तानातील सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा सन्मान मिळवणारे ते पाकिस्तानातील सर्वांत कमी वयाचे पायलट होते.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, VANGUARDBOOKS

फोटो कॅप्शन, पुस्तक

त्यावेळी त्याचं वय अवघं, 20 वर्षं होतं. "विमानाचं अपहरण होऊ नये, म्हणून रशीद यांनी मुद्दाम विमान जमिनीवर कोसळवलं होतं," असं त्यांच्या सन्मानपत्रात लिहिण्यात आलं.

रशीद यांना जिथं मृत्यू झाला तिथंच दफन करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांना सितार-ए-जुर्रत पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती याह्या खान यांना संपूर्ण कहाणी समजली तेव्हा त्यांनी, या मुलाला निशान-ए-हैदर मिळायला हवं असं म्हटलं. त्याचदिवशी याबाबत घोषणा करण्यात आली.

मतिउर रेहमान पाकिस्तानात खलनायक, बांगलादेशात हिरो

मतिउर रेहमान यांना देशद्रोही आणि खलनायक जाहीर करण्यात आलं. मतिउर यांच्यावर मौरीपूर एअरबेसमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी 35 वर्षं त्यांचा मृतदेह दफन होता. एवढंच नव्हे तर, मशरूर एअरबेसच्या प्रवेशद्वारावर त्यांचा फोटो लावून, त्याखाली 'गद्दार' असं लिहिण्यात आलं. त्यांची पत्नी मिली रेहमान आणि दोन लहान मुलींना अटक करण्यात आली. तर बांगलादेशात मतिउर यांना त्यांच्या शौर्यासाठी बांग्लादेशमधील सर्वोच्च शौर्य पुरस्कार बीर श्रेष्ठो त्यांना देण्यात आला.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विमान

अपहरणाच्या या घटनेनं पाकिस्तानच्या लष्करातील बंगाली अधिकाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या. पीव्हीएस जगनमोहन आणि समीर चोप्रा यांनी त्यांच्या 'ईगल्स ओव्हर बांगलादेश' या पुस्तकात या परिस्थितीचं वर्णन केलं आहे.

'वातावरण एवढं गंभीर बनलं होतं की, 1965 चं युद्ध आणि 1967 च्या अरब-इस्रायल युद्धातील हिरो सैफ उल आझम यांनाही ग्रुप कॅप्टन एम एस इस्लाम, विंग कमांडर कबार, स्कवार्डन लीडर जी एम चौधरी आणि फ्लाइट लेफ्टनंट मीझान या चार बंगाली अधिकाऱ्यांसह ताब्यात घेण्यात आलं.

त्यांची भारत किंवा पूर्व पाकिस्तानात पळून जाण्याच्या योजनेबाबत अत्यंत कठोरपणे चौकशी करण्यात आली. 21 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर पाकिस्तानी वायुसेनेचे अध्यक्ष एअरमार्शल रहीम यांच्या हस्तक्षेपानंतर सैफ उल आझम यांना सोडण्यात आलं. रहीम खान यांनी आझम यांना दिलेल्या वागणुकीबद्दल सहानुभुती दर्शवली. तसंच भविष्यात असं काही न करण्याची ताकीदही दिली गेली.

बंगाली अधिकाऱ्यांना विदेशात स्थायिक करण्याचा प्रस्ताव

यानंतर रहीम खान यांनी सैफ उल आझम यांच्यासमोर पाकिस्तानी वायुसेनेतून लवकर निवृत्ती स्वीकारून एखाद्या वेगळ्या देशात स्थायिक होण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी नकार दिला. इतर बंगाली अधिकाऱ्यांनाही असे प्रस्ताव देण्यात आले. ग्रुप कॅप्टन एम जी तवाफ यांनी तो स्वीकारत जर्मनीचं नागरिकत्व स्वीकारलं.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, ALCETRON.COM

फोटो कॅप्शन, पायलट

त्यांची पत्नी जर्मनीची नागरिक असल्यानं त्यांच्यासाठी ते सोपंही होतं. फ्लाइट लेफ्टनंट शौकत इस्लाम यांनीही या निर्णयाचा फायदा उचलला. 1965 च्या लढाईत युद्धबंदी बनलेले इस्लाम त्यावेळी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत तुर्कस्तानच्या वायुसेनेत काम करत होते. 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा ते पाकिस्तानला न जाता थेट बांगलादेशला गेले.

मतिउर रेहमान यांचा मृतदेह ढाक्याला आणला

30 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर 24 जून, 2006 मध्ये मतिऊर यांचा मृतदेह कराचीतील कबरीतून काढून विशेष विमानानं ढाक्यात आणण्यात आला. मीरपूरमध्ये शहीद स्मशानभूमीत लष्करी इतमानात त्यांचा दफनविधी करण्यात आला.

बांगलादेश, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

बांग्लादेशच्या तत्कालीन पंतप्रधान खालिदा झिया या, फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रेहमान यांचा मृतदेह स्वीकारण्यासाठी स्वतः ढाका विमानतळावर गेल्या होत्या.

त्यावेळी त्याठिकाणी विमानतळावर मतिउर रेहमान यांच्या पत्नी मिली, त्यांची मुलगी तुहीन मतिहूर हैदर, त्यांचे इतर नातेवाईक आणि जुने सहकारी उपस्थित होते. बांगलादेशच्या लष्करानं त्यांना तिथंच गार्ड ऑफ ऑनरदेखील दिला. नंतर जेसोरमधील बांगलादेश एअरबेसला त्यांचं नाव देण्यात आलं. तसंच बांगलादेश सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकिटही जारी केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)