INS Vikrant : भारताने जेव्हा पाकिस्तानी नौसैनिकांच्या मदतीनेच त्यांच्या युद्धनौका बुडवल्या..

फोटो स्रोत, HARPERCOLLINS INDIA
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
1 ऑगस्ट 1971 रोजी प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या न्यूयॉर्कमधल्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसन यांनी बांगलादेशवर लिहिलेलं गाणं गायलं आणि संपूर्ण स्टेडियम मंत्रमुग्ध झालं.
एवढंच नाही तर या गाण्याने संपूर्ण जगाचं लक्ष पूर्व पाकिस्तानात सुरू असलेला नरसंहार आणि तिथून लाखोंच्या संख्येने भारतात शरण घेणाऱ्या शरणार्थींकडे वळवलं.
मात्र, 1971च्या मार्च महिन्यापासूनच पाकिस्तानी सैन्यातर्फे त्यांच्याच लोकांवर करण्यात येणाऱ्या 'क्रॅक डाऊन'च्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्याच काळात फ्रान्सच्या तुलों या नौदल तळावर अभ्यास करत असलेली पाकिस्तानी पाणबुडी "पीएनएस मांगरो'वरच्या 8 बंगाली नाविकांनी पाणबुडी सोडून बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात सामिल होण्याचा निर्णय घेतला.
'Operation X, The Untold Story of India's Covert Naval War in East Pakistan' या पुस्तकाचे लेखक आणि इंडिया टुडे मॅगझिनचे एक्झिक्युटिव्ह एडिटर संदीप उन्नीथन सांगतात, "31 मार्च 1971 रोजी स्पेनची राजधानी माद्रिदच्या भारतीय दूतावासात फ्रान्समधून पळून आलेले 8 बंगाली नाविक दाखल झाले."
"तिथे तैनात असलेले 1964च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी गुरदीप बेदी यांनी त्यांचे पासपोर्ट तपासले आणि जवळच्याच एका स्वस्त हॉटेलात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यांनी याविषयी दिल्लीशी चर्चा केली. नाविकांना तात्काळ दिल्लीला पाठवण्याचे निर्देश त्यांना मिळाले."

फोटो स्रोत, MICHAEL OCHS ARCHIVES/GETTY IMAGES
"या 8 लोकांना हिंदू नावं देण्यात आली आणि त्यांना नकली भारतीय नागरिक बनवून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसवण्यात आलं. त्यांना आधी माद्रिदमधून रोमला पाठवण्यात आलं. मात्र, याआधीच त्यांच्या भारतात जाण्याची बातमी प्रसिद्धी माध्यमांमध्ये फुटली आणि रोममधल्या पाकिस्तानी दूतावासातल्या अधिकाऱ्यांनाही ही बातमी मिळाली."
"पाकिस्तानी दूतावासातले अधिकारी या नाविकांची मनधरणी करण्यासाठी विमानतळावर पोचले. त्यांच्यात आणि मांगरोचा क्रू यांच्यात झडपही झाली. मात्र, त्यांचे नेते अब्दुल वहीद चौधरी यांनी आपण बांगलादेशचा स्वातंत्र्य लढ्यात सामिल व्हायला जात असल्याचं स्पष्ट सांगितलं."
प्लासीची युद्धभूमी आणि गुप्त प्रशिक्षण केंद्र
हे आठही नौसैनिक दिल्लीत पोचताच त्यांना 'रॉ'च्या एका सुरक्षित घरी ठेवण्यात आलं. त्यावेळी भारतीय नौसेनेचे डायरेक्टर नेवल इंटेलिजन्स कॅप्टन एम. के. मिकी रॉय यांच्या डोक्यात एक विचार आला. या पाकिस्तानी नौसैनिकांच्या मदतीने पूर्व पाकिस्तानात तैनात पाकिस्तानच्या युद्धनौका बुडवाव्या आणि त्यांचं नुकसान करायचं.
अशा पद्धतीने 'ऑपरेशन जॅकपॉट'ची सुरुवात झाली. कमांडर एम. एन. आर. सामंत यांना या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. भारत आणि पूर्व पाकिस्तानच्या सीमेनजिक जिथे प्लासीचं युद्ध झालं होतं तिथे मुक्ती वाहिनीच्या जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी कॅम्प उभारण्यात आला. या कॅंपला कोड नाव देण्यात आलं 'कॅंप टू प्लासी' म्हणजेच 'सी2पी'.
या कॅंपमध्ये दिवसाची सुरुवात 'आमार शोनार बांगला' या बांगलादेशच्या राष्ट्रगीताने व्हायची. त्यानंतर सर्वजण बांगलादेशच्या हिरव्या-नारंगी रंगाच्या झेंड्याला सलामी द्यायचे.

फोटो स्रोत, HARPERCOLLINS INDIA
हा कॅंप चालवणारे कमांडर विजय कपिल सांगतात, "तिथे वीज, पाणी काहीच नव्हतं. रात्री आम्ही कंदिल लावायचो. हँडपंपवरून पाणी आणायचो. एकूण 9 टेंट होते. आम्ही पहाटे 5 वाजता उठायचो. पीटी झाल्यानंतर त्यांना ऊसाच्या शेतात अनवाणी धावायला सांगायचे."
"त्यानंतर भारतीय नौसेनेचे कमांडो त्यांना गुप्तपणे बॉंब कसे पेरायचे, हे शिकवायचे. भारतीय कमांडो जे निर्देश द्यायचे त्यांचं मांगरोवरून पळून आलेले बंगाली नाविक मुक्ती वाहिनीच्या जवानांसाठी अनुवाद करायचे. यानंतर त्यांना पोहण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. तोवर दुपारच्या जेवणाची वेळ व्हायची."
"दीड तास आराम केल्यानंतर या मुलांना माणसाच्या उंचीच्या पुतळ्यांवर गोळ्या झाडण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. सूर्व मावळेपर्यंत सर्व जण थकलेले असायचे तेव्हा रात्री त्यांना पुन्हा एकदा पोहण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. ते सर्व दिवसभरात जवळपास 6-7 तास पाण्यात असायचे."
"वजन उचलून पोहण्याचा सराव व्हावा, यासाठी त्यांच्या पोटावर दोन विटा बांधायचे."
आहारात बदल
यांची बांगलादेशातून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या लोकांमधून निवड करण्यात आली होती. अनेक आठवड्यांपासून त्यांना नीट अन्नही मिळालं नव्हतं. सुरुवातीला त्यांना भात खायची इतकी घाई असायची की भात शिजत असतानाच ते त्यावर तुटून पडायचे.
भारतीय प्रशिक्षकांना हे कळून चुकलं होतं की यांचा योग्य उपयोग करून घ्यायचा असेल त्यांच्या डायटवर लक्ष द्यावं लागेल.

फोटो स्रोत, HARPERCOLLINS INDIA
कमांडर विजय कपिल सांगतात, "ते आले तेव्हा ते उपासमारीच्या उंबरठ्यावर होते. त्यांची हाडं दिसायची. पाकिस्तानी सैन्याने त्यांचा अनन्वित छळ केला होता. त्यांनी आपल्या डोळ्यांनी बलात्कार होताना बघितला होता. पाकिस्तानच्या लष्कराची क्रूरता अनुभवली होती."
"त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या नौदलाच्या कमांडोंना जाणवलं की त्यांना लवकरच थकवा यायचा आणि पोहून लांबचं अंतर कापताना अनेक चुका करतात. कोलकातातल्या फोर्ट विलियममध्ये कमांडर सामंत यांना संदेश पाठवण्यात आला की यांच्यासाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करावी."
"यानंतर प्रत्येकाला रोज दोन अंडी, 120 ग्राम दूध, एक लिंबू आणि 80 ग्राम फळ मिळू लागले. याचा परिणाम लवकरच दिसला. त्यांची अंगकाठी सुदृढ होऊ लागली."
लिम्पेट माईन वापराचं प्रशिक्षण
या तरुणांना तीन आठवडे युद्धनौका उद्धवस्त करण्याचं कठोर प्रशिक्षण देण्यात आलं. लिंपेट माईन्सचा वापर कसा करायचं आणि हल्ला कधी करायचा, हेदेखील शिकवलं.

फोटो स्रोत, EXPRESS/EXPRESS/GETTY IMAGES
कमांडर विजय कपिल सांगतात, "पाण्याच्या आत स्फोट करण्यासाठी लिंपेट माईन्स वापरायचे. भारतीय नौदलाकडे मोठ्या प्रमाणात हे माईन्स नव्हते. परकीय गंगाजळी जेमतेमच असल्यामुळे परदेशातून विकतही घेता येत नव्हते."
"परदेशात या माईन्सची ऑर्डर दिली तर ते पाकिस्तानला कळण्याचाही धोका होता. त्यामुळे भारतातल्याच ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये माईन्स बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे माईन्स एक प्रकारचे टाईम बॉंब होते. त्यांच्यावर चुंबक लावलेलं असायचं. हे माईन युद्धनौकांच्या तळाला लावल्यानंतर काही वेळात त्याचा स्फोट व्हायचा."
कॉन्डमचा वापर
विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर कॉन्डमची व्यवस्था करण्यात आली होती.
कमांडर सामंत यांच्यापुढे ही ऑर्डर आली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. मात्र, लेफ्टनंट कमांडर मार्टिस यांनी सांगितलं की तुम्हाला वाटतं त्या कामासाठी कॉन्डम मागवलेले नाहीत.
संदीप उन्नीथन सांगतात, "लिंपेट माईन्सला एक प्रकारचा फ्युज लागलेला असायचा. तो विरघळणाऱ्या प्लगसारखा होता. तो 30 मिनिटात विरघळायचा. मात्र, पाण्यात उडी मारुन काम करणाऱ्यांना आपलं काम पूर्ण करण्यासाठी एक तास लागायचा."
"यावर उपाय म्हणून फ्युजवर कॉन्डम लावण्यात आलं. पाणबुडे पाकिस्तानच्या युद्धनौकांवर लिंपेट माईन्स चिकटवण्याआधी त्यावरचं कॉन्डम काढून टाकायचे आणि झपाट्याने माघारी फिरायचे."
आरती मुखर्जींनी गायलेलं गाणं होता कोड
दीडशेहून जास्त बंगाली कमांडोजना पूर्व पाकिस्तानच्या सीमेच्या आत पाठवण्यात आलं आणि नेव्हल इंटेलिजन्सचे चीफ आणि कमांडर सामंत यांनी पूर्व पाकिस्तानातल्या चारही बंदरांवर उभ्या असलेल्या पाकिस्तानी युद्धनौकांवर एकाच वेळी हल्ला चढवायचं, हे ठरवलं.
सर्व कमांडोजना एक-एक लिंपेट माईन, नॅशनल पॅनासॉनिकचा एक ट्रान्झिस्टर आणि 50 पाकिस्तानी रुपये देण्यात आले.

फोटो स्रोत, HARPERCOLLINS INDIA
संदीप उन्नीथन सांगतात, "त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी वॉकी-टॉकीचा पर्याय होता. मात्र, त्याचा वापर 10-12 किमीच्या क्षेत्रातच शक्य होता. त्यामुळे या कमांडोजचे संकेत पोचवण्यासाठी आकाशवाणीचा वापर करण्याचं ठरलं."
"दुसऱ्या महायुद्धात देखील अशाप्रकारचे गुप्त संदेश पाठवण्यासाठी दोन्ही बाजूने रेडियोचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांना सतत रेडियो ऐकायला सांगण्यात आलं. ज्या दिवशी सकाळी 6 वाजता आकाशवाणीच्या कलकत्ता बी केंद्रावरून आरती मुखर्जी यांनी गायलेलं 'आमार पुतुल आजके प्रथम जाबे सुसुर बाडी' गाण वाजेल त्याचा अर्थ हल्ल्यासाठी 48 तास शिल्लक असले, असा कोड ठरवण्यात आला."
टोयोटा पिकअप ट्रक
14 ऑगस्ट 1971 रोजी सकाळी 6 वाजता आकाशवाणीच्या कलकत्ता केंद्रावरून हेमंत कुमार यांचं एक गाणं ऐकवण्यात आलं. 'आमी तोमई जोतो शूनिए छिछिलेम गान'
हादेखील एक कोडच होता. याचा अर्थ होता हल्लेखोरांना त्याच रात्री चटगावसह चारही बंदरांवर हल्ला करायचा आहे.
संदीप उन्नीथन सांगतात, "त्याकाळी चटगावमध्ये शेकडो बस आणि तीन चाकी ऑटो चालायचे. खाजगी कार खूप कमी होत्या. कुणाचं लक्ष जाणार नाही आणि शहरात आरामात फिरू शकेल, अशा कार तर खूपच कमी होत्या. ही मोहीम फत्ते करण्यासाठी मुक्ती वाहिनीच्या कमांडोजना शहरातून बाहेर पडायचं होतं."

फोटो स्रोत, HARPERCOLLINS INDIA
"मुक्ती वाहिनीचा एका कार्यकर्ता खुर्शीद याने यावर एक तोडगा काढला. त्याने कुठूनतरी 'वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट ऑथोरिटी'च्या टोयोटा पिकअप ट्रकची जुळवाजुळव केली. त्यात आधी लिम्पेट माईन्स ठेवून त्यावर शेवग्याच्या शेंगा ठेवून ते झाकले."
"तो ट्रक अनवारा थाना या गावी नेण्यात आला. तिथल्या एका सुरक्षित घरात या लिम्पेट माईन्समध्ये डिटोनेटर्स बसवण्यात आले आणि त्यांच्या विरघळणाऱ्या प्लगवर कॉन्डम लावले."
चार बंदरांवर उभ्या युद्धनौकांवर एकाचवेळी हल्ला
संपूर्ण पूर्व पाकिस्तानात 14 ऑगस्ट 1971 च्या मध्यरात्री शंभराहून जास्त या प्रशिक्षित बंगाली हल्लेखोरांनी आपली लुंगी आणि बनियान काढून पोहण्यासाठीचे ट्रंक आणि पायात रबराचे फिन घातले. त्यांनी कापडाने लिपेंट माईन्स आपल्या छातीला बांधले.
तिकडे नौदलाच्या दिल्ली मुख्यालयात कॅप्टन मिकी रॉय त्यांच्या समोर असलेल्या अनेक फोनपैकी एक खास फोनची रिंग वाजण्याची आतुरतेने वाट बघत होते.
कोलकात्यात फोर्ट विल्यममध्ये या संपूर्ण मोहिमेची धुरा सांभाळणारे कॅप्टन सामंत आपला अहवाल लिहिताना तेच कोड असलेलं गाणं गुणगुणत होते. हे गाणं त्याच दिवशी सकाळी आकाशवाणीच्या कलकत्ता केंद्रावरून ऐकवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, HARPERCOLLINS INDIA
या संपूर्ण मोहिमेत कॅप्टन सामंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. यावेळी फ्रान्समध्ये असणारी त्यांची मुलगी उज्ज्वला सामंत सांगतात, "1971 साली ते 22 महिन्यांसाठी घरापासून लांब होते. सुरुवातीला ते कुठे गेले आहेत, याची काहीच माहिती आम्हाला नव्हती. त्यानंतर एक दिवस ते 'फर्लो'वर विशाखापट्टणमच्या आमच्या घरी आले."
"त्यांनी दार ठोठावलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही. कारण त्यांची दाढी वाढली होती. ते आपल्या कामाविषयी इतरांना सांगायचे नाही. त्यांना महावीर चक्र देण्यात आलं आहे, हे आम्हाला माहीत होतं. मात्र, कशासाठी ते माहीत नव्हतं."
"माझी आई बांगलादेशला जाऊन आली तेव्हा तिने आम्हाला सांगितलं की तुमच्या वडिलांनी बांगलादेशच्या लढ्यात मोठी कामगिरी बजावली आहे."
शाह आलमने केली सुरुवात
14 ऑगस्ट 1971च्या मध्यरात्री चटगावमध्ये मुक्ती वाहिनीच्या शाह आलम यांनी सर्वांत आधी पाण्यात उडी घेतली आणि एक किलोमीटर लांब उभ्या असलेल्या पाकिस्तानी युद्धनौकेकडे गेले. फ्रान्समधल्या पीएनएस मांगरोवरून पळून आलेले अब्दुल वाहेद चौधरी हे ऑपरेशन कंट्रोल करत होते.
संदीप उन्नीथन सांगतात, "नदीच्या प्रवाहासोबत पोहून उभ्या असलेल्या युद्धनौकांकडे जाण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तिथे नौकांच्या तळाला लागलेलं शेवाळ चाकूने साफ करून त्याला लिम्पेट माईन चिकटवून पुन्हा पोहून दुसऱ्या किनाऱ्यावर पोचायचं."

"मध्यरात्रीची वेळ यासाठी निवडली होती कारण यावेळी नदीत भरती असते आणि दुसरं कारण म्हणजे यावेळी जहाजावरची शिफ्ट बदलते. मोठ्या लाटा असल्याने शाह आलम केवळ 10 मिनिटात जहाजाजवळ पोचले. त्यांनी छातीला बांधलेलं लिम्पेट माईन काढलं. गुंडाळलेलं कापड आणि कंडोम दोन्ही दूर फेकले."
"माईनचं चुंबक जहाजाला चिकटताच शाह आलमने पुन्हा किनाऱ्याकडे जायला सुरुवात केली. त्यांनी आपले फिन, चाकू आणि स्विमिंग ट्रंक फेकले आणि लगेच लुंगी गुंडाळली."
भयंकर स्फोट
बरोबर अर्ध्या तासाने मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी चटगावमधल्या बंदरात पाण्याच्या खाली स्फोट सुरू झाले. पाकिस्तानी युद्धनौका 'अल अब्बास'खाली पहिला स्फोट झाला आणि काही मिनिटातच जहाज बुडू लागलं.
बंदरावर अचानक धावपळ सुरू झाली आणि तिथे असलेल्या पाकिस्तानी जवानांनी पाण्यात फायरिंग सुरू केली. स्फोट सुरूच होते. लिंपेट माईनमुळे झालेल्या छिद्रांमधून हळू हळू 'अल अब्बास', 'ओरियंट बार्ज नंबर 6' आणि 'ओरमाज्द' या जहाजांमध्ये पाणी शिरू लागलं आणि बघता बघता या तिन्ही जहाजांना जलसमाधी मिळाली.
त्या रात्री नारायणगंज, चांदपूर, चालना आणि मौंगलामध्येही अनेक मोठे स्फोट झाले. या संपूर्ण मोहिमेत पाकिस्तानच्या नौदलाचे 44,500 टन वजनी युद्धनौकांना जलसमाधी मिळाली आणि 14,000 टन वजनाच्या युद्धनौकांचं नुकसान झालं. पाकिस्तानी सैन्याने याचं उत्तर दिलं. या भागाला लागून असलेली गावं उद्ध्वस्त केली.
कमांडर विजय कपील सांगतात, "तोवर पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानमध्ये त्यांच्या तीन डिविजन सैन्य पाठवलं होतं. त्यांनी मुक्तीवाहिनीच्या हल्लेखोरांना हुसकावून लावत भारताच्या सीमेपर्यंत आणलं होतं."
"या स्फोटांमुळे नियाजीला आपले सैनिक तिथून काढावे लागले आणि मुक्ती वाहिनीच्या सैनिकांवरचा दबाव अचानक कमी झाला आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वातंत्र्याचा लढा लढणाऱ्या मुक्ती वाहिनीच्या सैनिकांचा आत्मविश्वास अचानक दुणावला."
कॅप्टन सामंत यांची घरवापसी
3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालं आणि 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या 93,000 जवानांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं. 22 महिने आपल्या घरापासून दूर असणारे कॅप्टन सामंत विशाखापट्टणममध्ये असलेल्या त्यांच्या घरी परतले. मात्र, थोड्याच दिवसांसाठी.
त्यांची मुलगी उज्ज्वला यांना तो दिवस अजूनही आठवतो. त्या सांगतात, "ते खूप थकले होते. जणू अनेक दिवस ते झोपलेच नव्हते. त्यांना बघून डॉक्टर म्हणाले होते त्यांना जेवढं झोपू द्याल, तेवढं चांगलं. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे ते खूपच शांत झाले होते."
"आईने त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. फिश करी, कढी आणि भात. एकाच दिवशी आमची दिवाळी, दसरा आणि क्रिसमस साजरा झाला. आम्ही आमच्या आईच्या चेहऱ्यावर जो आनंद बघितला तो कधीच विसरू शकत नाही. आनंदाहूनही जास्त समाधान होतं. ते जिवंत असल्याचं समाधान."
"मात्र, माझे वडील आमच्याजवळ फार काळ थांबले नाही. त्यांना लगेच बांगलादेशला जावं लागलं. तिथल्या नौदलाच्या स्थापनेत मदत करण्यासाठी."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








