भूजः जेव्हा कच्छच्या महिला भारतीय वायुदलाच्या मदतीला धावून आल्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जय मकवाना
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
इतिहासाकडे पाहिलं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धांच्या अनेक सुरस कथा पाहायला मिळतील. 1971 साली भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेलं युद्ध 13 दिवसांत संपलं. या युद्धात वायुदलाला मदत करून कच्छच्या महिलांनी इतिहासात आपलं नाव कोरलं. 16 डिसेंबर 1971 रोजी हे युद्ध भारताने जिंकलं होतं.
या शूर महिलांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून गुजरात सरकारने 'शौर्य वन' नावाचं एक विशेष वन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगालचा उठाव
1971 साली पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तानविरुद्ध, म्हणजे आताच्या पाकिस्तानविरुद्ध असंतोष इतका वाढला होता की पाकिस्तान सरकारला तो शमवणं कठीण होत चाललं होतं.
25 मार्च 1971 : पाकिस्तानचे हुकूमशाह याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तानातल्या बंगाली जनतेच्या उठावाचा बिमोड करण्याचे आदेश लष्कराला दिले. बंगबंधू शेख मुजिबुर रेहमान यांना अटक झाली आणि भारतात निर्वासितांचे लोंढे धडकू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
एकीकडे पाकिस्तानी लष्कराकडून बंगाली जनतेवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या जशा वाढू लागल्या, तसा दुसरीकडे लष्करी हस्तक्षेप करण्यासाठी भारतावर दबावही वाढू लागला.
कच्छवर बाँबवर्षाव
3 डिसेंबर 1971 : पाकिस्तानी हवाई दलाची सेबर जेट विमानं आणि स्टार फायटर विमानं भारतीय अवकाशात संध्याकाळी 5:40च्या सुमारास झेपावू लागली.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर आणि आग्रा इथल्या हवाई दलाच्या तळांवर बाँबहल्ले सुरू केले यानंतर भारताकडे युद्धात उतरण्याव्यतिरिक्त कुठलाच पर्याय उरला नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या पूर्व सीमेवर युद्ध सुरू होतं, त्याचवेळी पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवरही हल्ला केला.
पाकिस्तानच्या सेबर जेट विमानांनी कच्छवर नापामसारखे अत्यंत ज्वलनशील पदार्थ असणारे बाँब टाकायला सुरुवात केली. पाकिस्तानी हवाई दलानं भूज विमानतळावर 63 बाँब टाकले आणि धावपट्टी उद्ध्वस्त केली.
वायुसेनेला मदत करणाऱ्या महिला
भारतीय लष्कराचा तळ असलेल्या भूजमधल्या विमानतळावर पाकिस्ताननं हल्ला करून तिथली धावपट्टी उद्ध्वस्त केली. बाँबिंगनंतर धावपट्टीवर भलामोठा खड्डा पडला होता. तो दुरुस्त केल्याशिवाय भारतीय विमानं उड्डाण करूच शकत नव्हती.
यापूर्वी इतकं मोठं नुकसान कधीच झालं नव्हतं त्यामुळे कुणालाच ते कसं भरून काढायचं याची कल्पना नव्हती.

फोटो स्रोत, KUTCHMITRA
हवाई दलाचे अधिकारी आणि भूज विमानतळाचे तत्कालीन प्रमुख विजय कर्णिक यांनी कच्छच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे यासाठी मदत मागितली.
भारताचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी एन. गोपालस्वामी 1971 मध्ये भूजचे जिल्हाधिकारी होते. धावपट्टी दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
बीबीसीशी बोलताना गोपालस्वामी म्हणाले, "8 आणि 9 डिसेंबरला पाकिस्तानी हवाई दलाच्या हल्ल्यात भूजची धावपट्टी पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती. भारतीय वायु सेनेचे भूज विमानतळाचे प्रमुख विजय कर्णिक यांनी माझ्याकडे मदत मागितली. मी जवळच्याच माधापर गावाचे सरपंच असलेल्या व्ही.के. पटेल यांना ही गोष्ट कळवली."

फोटो स्रोत, KUTCHMITRA
"सरपंचांना कळवल्यापासून अवघ्या काही तासांतच लोक गोळा होऊ लागले. गावातल्या महिलांना ही धावपट्टी दुरुस्त करण्याची जबाबदारी देण्यात आली होती."
1971साली माधापरमधल्या शाळेत शिक्षक असलेले गोविंद खोखाणी यांनी बीबीसीला आपल्या आठवणी सांगितल्या, "तिथल्या सरपंचांनी ग्रामसभेच्या सदस्य सुंदरबेन जेठाभाई माधापरिया यांना महिलांना गोळा करायला सांगितलं."
"दुसऱ्या दिवशी माधापरमधल्या महिला शेजारच्याच वथाण खेड्यात जमल्या, तिथून त्यांना भूज विमानतळावर नेलं गेलं."
"बांधकामात कुशल अशा जवळपास 300 महिला तिथं जमल्या. बांधकाम आणि दुरुस्तीचं सगळं साहित्य त्यांनी बरोबर आणलं होतं."
"विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांना धावपट्टी लवकरात लवकर दुरुस्त करायला सांगितली होती. हल्ल्यांचा धोका आहे हे ही त्यांना सांगण्यात आलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानकडून हवाई तळावर पुन्हा हल्ला होण्याचा धोका टळला नव्हता त्यामुळे ठराविक अंतरानं धोक्याची सूचना देणारे भोंगे वाजवले जायचे.
माधापरच्या महिलांनी दुरुस्तीचं काम हाती घेतलं आणि दरवेळी भोंगे वाजले की त्या जवळच्या बाभळीच्या झाडाखाली लपत असत आणि भोंगे वाजणं थांबलं की पुन्हा काम सुरू करत.
युद्धाच्या छायेत त्या महिलांनी तीन दिवसांत ती धावपट्टी दुरुस्त केली.
पाकिस्तानची शरणागती
आठवड्याभरानंतर, पाकिस्तानी सैन्यानं शरणागती पत्करली.
पाकिस्तानच्या 90 हजारांहून अधिक सैनिकांनी ढाकामध्ये शरणागती पत्करली आणि भारताच्या पूर्वेला 'बांग्लादेश' हा नवा देश जन्माला आला.

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK
1971च्या युद्धानंतर, गुजरातचे राज्यपाल डॉ. श्रीमन नारायण यांनी माधापरला जाऊन ती धावपट्टी दुरुस्त करणाऱ्या महिलांची भेट घेतली.
गावाच्या विकासासाठी त्यांनी 50 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून माधापर ग्रामपंचायतीच्या आवारात 'विरांगना भवन'ची उभारणी केली गेली.
वायुसेनेचे तत्कालीन प्रमुख एअर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी माधापरच्या महिलांच्या योगदानाची दखल घेत त्यांना लढाऊ विमानाची प्रतिकृती भेट दिली.
2015 साली, तेव्हाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विरांगना स्मारकाचं उद्घाटन केलं.
या प्रसंगाच्या आठवणी जागवताना एन गोपालस्वामींनी बीबीसीला सांगितलं, "कच्छ ही वीरांची भूमी आहे आणि म्हणूनच या महिलांचं शौर्य पाहून मला आश्चर्य नाही वाटलं!"
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








