आंतरराष्ट्रीय महिला दिन: नेत्रहीन असूनही समाजाला नवी दृष्टी देणाऱ्या प्रांजल पाटील

प्रांजल

फोटो स्रोत, L B Patil

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

प्रांजल पाटील नुकत्याच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केरळमधल्या एर्नाकुलममध्ये रुजू झाल्या. हे वाक्य एका नियमित बातमीसारखं वाटू शकतं. परंतु प्रांजल पाटील हे व्यक्तिमत्त्व रुढार्थानं वेगळं आणि प्रेरणादायी आहे.

कारण प्रांजल पाटील दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत आणि अशा परिस्थितीत प्रचंड हिमतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्या प्रशासनात एक महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

प्रांजल मुळच्या उल्हासनगरच्या. जन्मत: त्यांची दृष्टी अधू होतीच. त्यांची दृष्टी कधीही जाऊ शकते असं डॉक्टरांनी त्यांच्या पालकांना सांगितलं होतं.

एके दिवशी डोळ्यात पेन्सिल गेल्याचं निमित्त झालं आणि आठव्या वर्षी त्यांची दृष्टी कायमची गेली. शस्त्रक्रिया करून दृष्टी परत आणण्याचा प्रयत्न झाला, पण यश मिळालं नाही.

असं होऊनसुद्धा एक वर्ष त्या नियमित शाळेत गेल्या. मात्र नंतर गोष्टी अशक्य झाल्या आणि मग त्यांना अंध विद्यार्थ्यांच्या शाळेत घालण्यात आलं.

त्यांच्या प्रवासाबद्ल त्यांचे वडील एल. बी. पाटील सांगत होते, "बदलापूरला मांजरेकर म्हणून एक मॅडम होत्या. त्यांच्या शाळेत आम्ही तिला घातलं. पण तिथं ती अॅडजस्ट झाली नाही. मग दादरला कमलाबाई मेहता शाळेत अॅडमिशन घेतली. तिथं आम्ही तिला सोमवारी सोडायचो आणि शुक्रवारी घेऊन यायचो."

प्रांजल

फोटो स्रोत, L B Patil

फोटो कॅप्शन, प्रांजलने अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली आहे.

"हा सिलसिला पाचवी ते दहावी सुरू होता. तिला पेपर वाचनाची लहानपणापासूनच आवड होती. ती घरी आली की आम्ही पेपर वाचून दाखवायचो. परत शाळेत सोडताना दु:ख वाटायचं आणि घरी आली की छान वाटायचं." हे सांगताना पाटील यांचा आवाज कापरा झाला होता.

ते पुढे म्हणाले, "11वीत तिला CHM कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा माझी पत्नी तिला कॉलेजमध्ये सोडायची. माझा मुलगासुद्धा मोठा झाला होता. तोसुद्धा तिला नेण्या-आणण्यात मदत करत होता. या सगळ्या काळात प्रांजलनं धीर सोडला नाही.

उलट तीच आम्हाला धीर द्यायची. पण इंग्रजी माध्यम असल्यामुळे तिचा धीर कधी कधी खचायचा. कधी आम्ही अभ्यासाचं साहित्य कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून तिला ऐकवायचो. असा अभ्यास करत तिनं 12वीत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला."

12वी नंतर प्रांजल यांनी मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथं अंध विद्यार्थ्यांसाठी सगळ्या सोयीसुविधा होत्या.

आतापर्यंत त्यांनी आपल्या अवस्थेशी जुळवून घेतलं होतं. पदवीचा अभ्यास जोमानं सुरू केला होता. एका विषयात त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या.

पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) गाठलं. दिल्लीला एकटं कसं राहणार याबाबत पाटील यांना शंका वाटत होती. मग हळूहळू प्रांजल तिथं रुळल्या आणि आठ वर्षं त्या दिल्लीत राहिल्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून M.A., M.Phill. आणि Ph.D चा प्रबंध पूर्ण केला. इतकंच काय NET आणि SET परीक्षा सुद्धा पास केली.

UPSC च्या अभ्यासाचा संघर्ष

या संघर्षाच्या काळाबद्दल प्रांजल सांगतात, "मी M.Phill नंतर नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीचा काळ कोणती पुस्तकं वाचायची हे कळण्यातच गेला. माझ्या कॉम्प्युटरवर स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं.

या सॉफ्टवेअरमुळे स्क्रीनवरच्या गोष्टी ऐकता येतात. मग मी अभ्यासाचं साहित्य PDF स्वरुपात कॉम्प्युटर वर लोड केलं. NCERT ची पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे तितकी अडचण आली नाही. असं साहित्य ऐकून मी अभ्यास केला."

अनेकदा हेडफोन लावून प्रांजलचे कान दुखायचे. तेव्हा डोळे गेले आता कानांना तर काही होणार नाही ना अशी चिंता त्यांना सतावायची.

दिनचर्या कशी होती या प्रश्नाचं उत्तर देताना त्या सांगतात, "माझी निश्चित दिनचर्या नव्हती. एम. फिलचं डेझर्टेशन लिहिल्यानंतर मी अभ्यास सुरू केला. दोन्ही गोष्टी बॅलन्स करायचा प्रयत्न करायचे."

"पूर्व आणि मुख्य परीक्षेला मला लेखनिक मिळाला होता. माझी JNU मधली एक मैत्रीण माझ्याबरोबर यायची. परीक्षेचं प्रेशर खूप होतं, पण खरं सांगायचं तर सांगण्यापेक्षा लिहिण्याचं प्रेशर माझ्यावर जास्त असतं.

प्रांजल

फोटो स्रोत, FACEBOOK/Pranjal Patil

मला फक्त सांगायचं काम होतं. माझं आणि माझ्या मैत्रिणीचं चांगलं ट्युनिंग जुळलं होतं. कधी माझा स्पीड कमी झाला तर ती मला सांगायची. असं करत मी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलाखत दिली आणि पहिल्या प्रयत्नात मी 773 वा क्रमांक मिळवला."

पुन्हा एकदा संघर्ष

परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना Indian Railway Account Service मिळाली. पण रेल्वेनं अंध व्यक्तीला घेण्यास नकार दिला. ही घटना म्हणजे आणखी एक संघर्षाची नांदी होती.

प्रांजल

फोटो स्रोत, L B Patil

या काळाबद्दल प्रांजल सांगतात, "3 डिसेंबर 2016 ला माझी मुख्य परीक्षा सुरू होणार होती त्याच्या आदल्या दिवशी हा सगळा प्रकार सुरू झाला. मला कुठे जावं काही कळत नव्हतं. मी फॉलो अप घेण्याचं काम करत होते. कशीबशी परीक्षा दिली. नंतर DoPT (कार्मिक विभाग) ला गेले. पहिल्यांदा मला काहीच माहिती मिळाली नाही.

वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना भेटले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना भेटले. शेवटी मला P&T Finance Service मिळाली.

तिथं मात्र मला रुजू व्हावं लागलं. कारण DoPTच्या मते त्यांनी मला सर्व्हिस देण्याचं काम तर केलं होतं. मी जर रुजू झाले नसते तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मग मला पोस्ट अँड टेलिग्राफच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही जॉईन करा मग वाटलं तर तुम्ही रेल्वेसाठी प्रयत्न करा.

मग मी रुजू झाले. हे सगळं सुरू असतानाच मुख्य परीक्षा पुन्हा पास झाले आणि मुलाखतीला बोलावणं आलं. मला 124 वा रँक मिळाला. मग मी या सेवेचा राजीनामा दिला. आता मला IAS मध्ये केरळ केडर मिळालं आहे."

कुटुंबीयांचा पाठिंबा

प्रांजल यांचा कोमल पाटील यांच्याबरोबर तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. कोमल तसं बघितलं तर प्रांजलपेक्षा कमी शिकलेले आहेत. पण एका अंध मुलीला पत्नी म्हणून स्वीकारण्याचा डोळस निर्णय त्यांनी घेतला.

प्रांजल यांना प्रत्येक टप्प्यावर कोमल यांनी साथ दिली आणि देत आहेत. ते भुसावळला राहतात. त्यांची आणि प्रांजलची अनेक दिवस भेटही होत नाही. असं असलं तरी ते आपल्या पत्नीला सतत साथ देतात. सासरच्या लोकांचीसुद्धा त्यांना खंबीर साथ मिळाली आहे.

खरी परीक्षा आता सुरू झाली आहे, पण ती देण्यासाठी प्रांजल सज्ज आहेत. अगदी नेहमीसारख्याच.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)