UPSC : 4 मिनिटांचा उशीर आणि त्याने जीव दिला

फोटो स्रोत, BBC Hindi
- Author, सूर्यांशी पांडेय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कर्नाटकातल्या कोटा गावचे वरुण सुभाष चंद्रन यांचं वय फक्त 28 वर्षं होतं. आतापर्यंत त्यांनी 3 वेळा UPSCची परीक्षा दिली पण त्यांना यश मिळालं नाही.
पण या अपयशासमोर त्यांनी हार न मानता जोमाने चौथ्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि 3 जूनला पूर्वपरीक्षा द्यायला ते परीक्षा केंद्रावर गेले. पण त्यांना माहीत नव्हतं की आजचा दिवस हा त्यांच्या जीवनातील शेवटचा दिवस ठरेल.
पण परीक्षा केंद्रावर 4 मिनिटं उशीरा पोहोचल्यामुळे गेटवरल्या अधिकाऱ्यानं त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. परीक्षा केंद्रावर प्रवेश न मिळालेल्या वरुणने अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
वरुण यांच्यासोबत काय झालं, हे जाणून घेण्यासाठी आम्ही पहाडगंजला पोहोचलो. इथंच त्यांचं परीक्षा केंद्र होतं. सर्वोदय बाल विद्यालय असं या शाळेचं नाव. वरुण ओल्ड राजेंद्र नगरमध्ये राहत होते.
तिथून हे सर्वोदय बाल विद्यालय 5 किलोमीटरवर आहे.
वरुण यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर का झाला?
पहाडगंज परिसरात एक नव्हे तर 3 सर्वोदय बाल विद्यालय आहेत. एक ओल्ड राजेंद्र नगर पोलीस स्थानकाजवळ, दुसरं 'रानी झांसी' परिसरात आणि तिसरं कसेरुवालानमध्ये. वरुणचं परीक्षा केंद्र शोधत असताना ही बाब आमच्या लक्षात आली.
वरुणच्या फ्लॅटमध्ये मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलंय की, "3 जूनच्या सकाळी ते 8.45ला घरातून निघालो होतो आणि चुकून दुसऱ्याच सर्वोदय बाल विद्यालयात पोहोचलो."

फोटो स्रोत, BBC Hindi
वरुण यांचं परीक्षा केंद्र कसेरुवालानमधील सर्वोदय बाल विद्यालय होतं. या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुमार श्रीवास्तव त्या दिवशी UPSC परीक्षेसाठी सेंटर सुपरिटेंडंट म्हणून काम पाहात होते.
"UPSCच्या नियमानुसार सकाळी 9.20च्या नंतर कुणालाही परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही. 9 वाजून 21 मिनिटांनी आम्ही गेट बंद केलं आणि परीक्षा वर्गात पेपर वाटपासाठी आम्ही निघून गेलो," श्रीवास्तव परीक्षेच्या दिवसाबद्दल सांगतात.
"गेट बंद झाल्यानंतर त्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांना सोपवली जाते. त्या दिवशी 9 वाजून 24 मिनिटांनी वरुण आला आणि दिल्ली पोलिसांच्या 5 शिपायांनी त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास मनाई केली. ते UPSCनं दिलेल्या निर्देशांचं पालन करत होते," श्रीवास्तव पुढे सांगतात.
परीक्षा केंद्रावर UPSCकडून इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी अभी रामी यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

वेळेच्या नियमांविषयी आम्ही UPSCची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची चर्चा केली. UPSCची तयार करण्यासाठी अलाहाबादहून दिल्लीत आलेल्या हरेंद्र यांच्या मते, 4 मिनिटांच्या उशिरासाठी UPSCनं इतकी कठोरता दाखवायला नको होती.
असं असलं तरी UPSC ही व्यवस्था कठोर ठेवण्यामागे काही कारणं आहेत, असं आयकर विभागातील अधिकारी अंकित कौल यांचं मत आहे.
कुणालाही उशिरानं परीक्षा केंद्रावर प्रवेश दिल्यास नियमांची गरजच काय आहे, असं प्रश्न कौल विचारतात.
"विद्यार्थी हा सर्व काही विसरून UPSCची तयारी करत असतो. उशिरा येण्याचं योग्य कारण वरुणजवळ होतं. चुकून तो दुसऱ्याच परीक्षा केंद्रावर गेला होता आणि असं कुणासोबतही घडू शकतं. फक्त 4 मिनिटं तर उशीर झाला होता त्याला," राजस्थानचे रिभुराज सिंह सांगतात.
वस्तुस्थिती काय आहे?
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू व्हायच्या 10 मिनिटं अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायला हवं, असं UPSCकडून देण्यात आलेल्या हॉल तिकीटवर लिहिलेलं होतं.
म्हणजे सकाळी 9.30 वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यानं 9.20 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणं आवश्यक असतं. दुपारच्या परीक्षेसाठी 2.20 वाजेपर्यंत पोहोचणं अनिवार्य असतं.

फोटो स्रोत, SUNIL KUMAR SRIVASTAVA
"UPSCनं याच वर्षी परीक्षेसाठी 10 मिनिटं अगोदर पोहोचण्याचा नियम केला आहे. यापूर्वी ही वेळ सकाळच्या पेपरसाठी 9.30 आणि दुपारच्या पेपरसाठी 12.30 अशी होती," UPSCमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
"मागच्या वर्षी काफीर करीम यांनी केलेल्या फसवणुकीचं प्रकरण समोर आल्यानंतर नियम कडक करण्याचा प्रस्ताव आला होता आणि त्यावर अंमलबजावणी करण्यात आली," असं UPSCचे अधिकारी सांगतात.
2017मध्ये आयपीएस अधिकारी काफीर करीम मुख्य परीक्षेत कॉपी करताना पकडले गेले होते.
'आम्हाला 20 मिनिटं उशिरा पेपर मिळाला'
आता जेव्हा हिशोब प्रत्येक मिनिटाचा सुरू आहे तर नजफगढच्या केंद्रीय विद्यालय बीएसएफ कँप छावलामध्ये 3 जूनला UPSCची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचं म्हणणं लक्षात घेणं आवश्यक ठरतं.
परीक्षेसाठी हा विद्यार्थी ज्या वर्गात बसला होता तिथं पेपर 20 मिनिटं उशिरा मिळाले, असं त्या विद्यार्थ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. याचा अर्थ तिथं 9.30 वाजता नाही तर 9.50ला परीक्षा सुरू झाली.

फोटो स्रोत, BBC HINDI
पेपर 20 मिनिटं उशिरा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यासाठी 20 मिनिटांचा अधिक वेळ मिळायला हवा होता. पण 11 वाजून 40 मिनिटांनी त्यांचे पेपर परत घेण्यात आले.
केंद्रीय विद्यालय बीएसएफ कॅम्प छावलाचे मुख्याध्यापक आर के बस्सी यांच्याशी याविषयावर चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की, "आमच्या शाळेतल्या 18 वर्गांत पेपर वाटण्यात आले होते. यातल्या फक्त एकाच वर्गात पेपर वाटण्यास उशीर झाला होता."
20 मिनिटं उशीर झाल्याचा आरोप मात्र त्यांनी फेटाळला.
"उशीर झाल्याची आम्ही भरपाई केली होती आणि विद्यार्थ्यांना शिल्लकचा वेळही दिला होता," असं बस्सी पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








