पुणे: 'बांगलादेशचं तिकीट मिळाल्याचं 'ही' महिला सगळ्यांना का सांगत सुटलीय?

बांगलादेश, पुणे

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

फोटो कॅप्शन, मोहम्मद आणि माजिदा
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे

"इथं आल्यापासून जेव्हा जेव्हा मुलांशी फोनवर बोलणं व्हायचं, तेव्हा एका आठवड्यात येतो असं आम्ही म्हणायचो. मुलं म्हणायची तुमचा एक आठवडा संपतच नाही. जेव्हा तिकीट आलं तेव्हा खूप आनंद झाला. मी तर सगळ्यांना सांगत सुटले आमचं तिकीट आल्याचं."

साधारण गेल्या तीन महिन्यांपासून फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये राहत असलेल्या माजिदा सांगत होत्या.

माजिदा आणि मोहम्मद या जोडप्याला नोकरीच्या आमिषाने बांगलादेशातून फसवून पुण्यात आणले गेले होते. त्यांना पुण्यातील बुधवार पेठेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर माजिदा यांना देहविक्री व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

त्याला माजिदा यांनी विरोध करत पोलिसात धाव घेतली. मोहम्मदला पोलिसांनी भारतात घुसखोरीच्या आरोपावरुन त्यांना अटक केली. दोघांना बेकायदा भारतात आल्याबाबत अडीच वर्षाची शिक्षा झाली.

शिक्षेनंतर कोर्टाने त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याचे आदेश पोलिसांना दिले.

तोपर्यंत त्यांना ज्या पोलिसांनी अटक केली होती. त्याच पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे गेल्या साधारण तीन महिन्यापासून मोहम्मद आणि माजिदा फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये राहत होते. पोलीस स्टेशनच त्यांच घरं झालं होतं.

फरासखाना पोलिसांकडून त्यांना परत पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. पोलिसांनी ते बांगलादेशी नागरिक असल्याचे सर्व पुरावे मिळवले होते. परंतु कोरोनाचे कारण पुढे करत बांगलादेश दुतावासाकडून पुढील प्रक्रिया केली जात नव्हती.

बांगलादेश, पुणे

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, पोलीस स्टेशन

माजिदा आणि मोहम्मद यांची तीन लहान मुले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते आपल्या आई वडिलांची वाट पाहत आहेत.

बीबीसी मराठीने माजिदा आणि मोहम्मद यांची कैफियत मांडली होती. त्यानंतर प्रक्रियेला वेग आला आणि बांगलादेश दुतावासाकडून त्यांना परत येण्याबाबत ग्रीन सिग्नल देण्यात आला. 5 सप्टेंबरला पुण्यातून या दोघांना घेऊन पोलीस पश्चिम बंगालकडे रवाना होणार आहेत.

आपल्या मायदेशी परत जायला मिळणार याची बातमी कळताच माजिदा इतक्या खुश झाल्या की पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकाला त्या परत जाणार असल्याचं सांगत आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना माजिदा म्हणाल्या, "माणूस एका ठिकाणी राहिला की त्या ठिकाणाशी त्याचं नातं तयार होतं. आमचंही तसंच झालं. आम्हाला वाटलं नव्हतं पोलीस स्टेशन आमचं घर होईल. घरी मुलं आणि आई नसती तर इथेच राहून काम देण्याची विनंती पोलिसांना केली असती. पोलिसांनी आमची संपूर्ण काळजी घेतली. कॉन्स्टेबल समीर पवार यांनी माझी बहिणीसारखी काळजी घेतली. त्यांनी आम्हाला परत पाठवण्यासाठी खूप मदत केली."

बीबीसीची बातमी बांगलादेशमध्ये देखील प्रसिद्ध झाल्याचे पोलिसांनी दोघांना सांगितले. त्यामुळे आता आपले काम लवकर होईल असे त्यांना वाटत होते आणि झालेही तसेच. त्यामुळे त्यांनी आभार दखील व्यक्त केले.

"तुम्ही आमची बातमी केल्याबद्दल तुमचे आभार त्या बातमीनंतर आमचं काम लवकर झालं. तीन महिने तीन जन्मांसारखे वाटत होते. आता तीन जन्मांनंतर मुलांना भेटेन असं वाटतंय. एक एक दिवस माझ्यासाठी एक वर्षासारखा होता. घरच्यांना तर अजून विश्वास बसत नाही आम्ही परत येतोय.'' माजिदा सांगत होत्या.

बांगलादेश, पुणे

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

घरी जाऊन पुन्हा आपला टमटम चालवायचा व्यवसाय करण्याचा निर्णय मोहम्मद यांनी घेतला आहे. तिकडेच राहून कुटुंबाची काळजी घेण्याचं त्यांनी ठरवलंय.

"मी गावी जाऊन पुन्हा टमटम चालवीन. मला वाटलं आता इथे वर्षभर राहवं लागणार पण बातमी आल्याने आमचं काम लवकर झालं. पोलिसांनी आम्हाला हॉटेल नेमून दिले होते, त्या हॉटेलमधून जेवणाची व्यवस्था केली होती," असं मोहम्मद म्हणतात.

भारतात येऊन पैसे कमावता येईल आणि त्या पैशातून घर चालवता येईल असं मोहम्मद आणि माजिदा यांना वाटत होतं. दोघेही अशिक्षित असल्याने पासपोर्टशिवाय भारतात जाता येणार नाही, हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीने वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातात स्वाधीन केलं होतं. त्यामुळे भारतात पुन्हा येण्याची वेळ आली तर पासपोर्ट बनवूनच येणार असं माजिदा आवर्जून सांगतात.

माजिदा म्हणाल्या, "भारतात परत आले तर पासपोर्ट बनवूनच येणार. घरी हालाखीची परिस्थिती आहे. घरी दोनवेळचं जेवण मिळालं तरी तेच खाऊन राहू. पण आता पुन्हा असं कामाच्या शोधात भारतात येणार नाही. मला जास्त पैशांची आता गरज नाही. जास्त पैशांच्या हव्यासापोटी तीन वर्ष इथे रहावं लागलं."

माजिदा आणि मोहम्मद यांना परत पाठवण्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, "बांगलादेश दुतावासाकडून त्यांना परत पाठवण्याबाबत पत्र मिळालं आहे. त्यांना आता आम्ही परत पाठवत आहोत. बीबीसीने केलेली बातमी बांगलादेशमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली त्यामुळे त्याचा जास्त परिणाम झाला आणि त्यामुळे लवकर त्यांना परत देखील बोलवण्यात आले."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)