लग्न यशस्वी होण्यासाठी पती-पत्नी एकाच धर्माचे असावे लागतात का?

प्यू रिसर्च सेंटर या धर्माबद्दल अभ्यास करणाऱ्या संस्थेनं देशभरात 30,000 जणांच्या मुलाखती घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्यू रिसर्च सेंटर या धर्माबद्दल अभ्यास करणाऱ्या संस्थेनं देशभरात 30,000 जणांच्या मुलाखती घेतल्या.
    • Author, लेबो डिएस्को
    • Role, ग्लोबल रिलिजन करस्पॉन्डन्ट

इशा आणि त्यांचे पती राहुल हे आदर्श आणि आनंदी अशा नवविवाहित दाम्पत्याप्रमाणं आहेत. ते एकमेकांमध्ये असलेल्या उणिवा भरून काढतात. राहुलचं काही चुकत असल्याचं इशा यांना वाटलं तर, त्या हळूवारपणे मार्गदर्शन करत पुन्हा त्यांना योग्य मार्गावर आणतात.

त्यांचं वैवाहिक जीवन यशस्वी होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, दोघंही एकाच म्हणजे हिंदू धर्माचे असणं हे आहे, असं ते सांगतात. "एकाच धर्माचे असल्यानं तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये मदत होते," असं इशा म्हणतात. ''आपल्याला अनेक गोष्टी नव्यानं शिकाव्या लागत नाहीत. आपल्याला फक्त एकच गोष्ट नव्यानं शिकावी लागते, ती म्हणजे एकमेकांच्या आवडीनिवडी. "

प्यू रिसर्च सेंटर या धर्माबद्दल अभ्यास करणाऱ्या संस्थेनं देशभरात केलेल्या एका व्यापक सर्वेक्षणातून समोर आलं की, भारतीय हे स्वतःला धार्मिक सहिष्णू म्हणून घेतात. पण असं असलं तरी, "भारतातील वेगवेगळ्या प्रमुख धार्मिक समुदायातील लोकांना मात्र आपसांत फारसं साम्य आहे, असं वाटत नाही."

प्यू रिसर्च सेंटरनं 26 राज्यं, तीन केंद्रशासित प्रदेश आणि 17 भाषांमधील जवळपास 30,000 जणांच्या मुलाखती घेतल्या. 2019 च्या अखेरीस आणि 2020 च्या सुरुवातीला हे सर्वेक्षण करण्यात आलं.

नात्यांच्या विषयी बोलताना, बहुतांश हिंदू, शीख आणि मुस्लीम हे आंतरधर्मिय विवाह रोखणं हेच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असल्याचं सांगतात. जवळपास 80% मुस्लीम आणि 65% हिंदूंचं मतही असंच आहे.

अभ्यासात असं दिसून आलं की, भारतीय लोक हे ''कायम धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावर उत्साह दाखवत असतात.'' मात्र त्याचवेळी, ''त्याचं प्राधान्य हे नेहमी स्वतःच्या धर्माच्या समुदायाबाबत एक वेगळी भूमिका व्यक्त करण्याला असतं.'' (म्हणजे ते एकत्र असले तरीही विभक्त असतात)

याचा निष्कर्ष असा की, "या दोन भावना परस्पर विरोधी किंवा विरोधाभासी वाटू शकतात, पण बहुतांश भारतीयांना तसं वाटत नाही. "

'आम्हाला पाठिंबा देणारे सारखेच होते'

इशा आणि राहुल यांची भेट ऑनलाईन झाली आणि आठ महिने डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. इशा सांगतात की, कोरोनाच्या संकटामुळं त्यांचा ''आलिशान भारतीय विवाह सोहळा'' रद्द करावा लागला. त्यानंतर त्यांनी अगदी जवळच्या 11 जणांच्या उपस्थितीत छोटेखानी सोहळ्यात गेल्यावर्षी लग्न केलं.

जेव्हा सुरुवातीला मी लग्नासाठी मुलं पाहायला सुरुवात केली, त्यावेळी मला दोघांचे धर्म सारखे असायला हवे, याचं महत्त्वच समजलं नव्हतं, असं इशा म्हणाल्या.

"मी बंडखोर विचारांची होते. याचा फारसा काही फरक पडणार नाही असं मला वाटत होतं. पण जेव्हा मी सारख्या धर्मातील मुलाशी लग्न केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, यामुळं बरंच काही सोपं झालं आहे. भारतात तुम्हाला कुटुंबाबरोबरच अनेक नातेवाईकांबरोबर राहावं लागतं. त्यामुळं हे अधिक सोपं बनतं."

ईशा आणि राहुल लग्नाच्या दिवशी.

फोटो स्रोत, Esha & Rahool Kapoor

फोटो कॅप्शन, ईशा आणि राहुल लग्नाच्या दिवशी.

विवाहाच्या वेळी एकाच धर्माचे असण्याचं महत्त्व आणि त्याबद्दलच्या दृष्टीकोनातून संपूर्ण भारतीय समाजाचं मत समोर येतं.

भारतीयांचा कुटुंब आणि समाजाकडं पाहण्याच्या दृष्टीकोन या दोन्हीशी याचा संबंध असल्याचं राहुल म्हणतात. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी विवाहाच्या एका व्यक्तीच्या निर्णयानं इतरांवरही परिणाम होऊ शकतो.

"सांस्कृतिकदृष्ट्या भारतीयांना स्वतंत्र ओळख नसते.''

"ख्रिश्चन धर्मात आणि अमेरिकेत (किंवा अमेरिकेसारख्या ठिकाणी) व्यक्ती म्हणून तुम्हाला स्वतंत्र ओळख असण्याला महत्त्व आहे. पण भारतीय कुटुंबांमध्ये तुम्ही सर्व मिळून एकत्रितपणे निर्णय घेत असता.''

"तुम्ही एका व्यक्तीशी नव्हे तर संपूर्ण कुटुंबाशी लग्न करत असता. "

'तुम्हाला प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असं काहीतरी शोधण्याचीही गरज नसते'

मॅचमेकर तानिया मल्होत्रा सोंधी यांच्या मते, त्यांनाही त्यांच्या कामाच्या दरम्यान अशी वाक्य ऐकायला मिळत असतात.

"आमचं काम शक्यतो अधिक शिकलेल्या, पुरोगामी आणि बऱ्याच ठिकाणी फिरलेल्या शहरी भागातील ग्राहकांबरोबर असतं, " असं तानिया म्हणतात.

''असं असलं तरी अनेकजण अजूनही इतर धर्मातील जोडीदाराबरोबर लग्नाला तयार होत नाही," असं त्या म्हणाल्या.

मॅचमेकर तानिया मल्होत्रा सोंधी

फोटो स्रोत, Tania Sondhi

फोटो कॅप्शन, मॅचमेकर तानिया मल्होत्रा सोंधी

विविध धर्मांबद्दल असलेल्या त्यांच्या दृष्टीकोनामुळं तसं असू शकतं, असं तानिया म्हणतात.

मुस्लीम किंवा हिंदू धर्मातील जोडीदाराशी लग्न केल्यास आपल्याला धर्मांतर करावं लागू शकतं, अशी काळजीही तानिया यांच्या काही, ग्राहकांना असते.

त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. त्यांच्या एका मुस्लीम व्यक्तीनं ती त्यांना सांगितली होती.

"तो मला म्हणाला की, इस्लाममध्ये पुरुष अनेक वेळा लग्न करू शकतो. त्यामुळं हिंदू महिलांमध्ये मुस्लीम पुरुषांशी लग्न करण्याबाबत एक भीती असते.''

"पुरुष एकच लग्न करणार असला तरी, धर्माची परवानगी असल्यामुळं महिलांना ही भीती वाटत असते.''

"त्यांचे मूळ धार्मिक विचार हे भिन्न असतात."

पण हा दृष्टीकोन बदलला जाऊ शकतो, अशी आशा असल्याचंहा तानिया म्हणतात.

"लग्नाचा विचार करता दोन समविचारी व्यक्ती एकत्र आले की, धर्माचा फारसा काही फरक पडत नाही."

'ते फक्त प्रेम होतं'

सुमित चौहान आणि त्यांच्या पत्नी अझरा परवीन यांनाही हे मत पटलं.

सुमित हिंदू कुटुंबातील असून, दलित जातीतील आहेत. तर अझरा मुस्लीम आहेत.

आम्ही या दाम्पत्याच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बोलत होतो. अझराबरोबर दिल्ली विद्यापीठात झालेली भेट आणि त्यानंतर सगळं कसं घडत गेलं हे सांगताना त्यांचा आनंद आम्हाला स्पष्टपणे जाणवत होता.

"आम्ही कॉलेजमध्ये एकमेकांबद्दल शिकण्यातच तीन वर्ष घालवली,'' असं सुमित म्हणाले. "आमची मैत्री अगदी घट्ट होती आणि आम्ही एकमेकांबरोबर अत्यंत आनंदी होतो. "

सुमित चौहान आणि त्यांच्या पत्नी अझरा परवीन

फोटो स्रोत, Sumit Chauhan & Azra Parveen

फोटो कॅप्शन, सुमित चौहान आणि त्यांच्या पत्नी अझरा परवीन

"पण आम्हाला माहिती होतं की, वेगवेगळ्या धर्मातील असल्यामुळं आमच्यासाठी लग्नं करणं सोपं ठरणार नाही," असं सुमितनं सांगितलं.

'' माझ्या कुटुंबाचे मुस्लीम समाजाबाबत काही गैरसमज होते, पण मी माझ्या आईला आणि भावाला समजावलं.''

"माझ्या पत्नीनंही तिच्या कुटुंबाला राजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा त्याला ठाम विरोध होता. ती हिंदू मुलाशी लग्न करू शकत नाही, असं ते म्हणाले. "

अझराचे कुटुंबीय कधीही लग्नासाठी तयार होणार नाहीत, या भीतीपोटी त्यांनी अखेर गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर कुटुंबीयांना सांगायचं असं त्यांनी ठरवलं.

भारतातील विवाह कायद्यानुसार आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना लग्नाच्या 30 दिवस आधी सार्वजनिक माध्यमातून त्याबाबत नोटिस देणं बंधनकारक असतं. एखाद्याला आक्षेप असेल तर त्याला तो आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ही तरतूद आहे.

भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यांनी तर आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. या राज्यांनी बेकायदेशीर धर्मांतरास आळा घालण्यासाठी अध्यादेश लागू केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये हा अध्यादेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत बेकायदेशीर धर्मांतर याबरोबरच बळजबरीनं लग्नाच्या विरोधी तरतुदी आहेत.

सुमित चौहान आणि त्यांच्या पत्नी अझरा परवीन

फोटो स्रोत, Sumit Chauhan & Azra Parveen

फोटो कॅप्शन, सुमित चौहान आणि त्यांच्या पत्नी अझरा परवीन

"आमच्या लग्नाचं गुपित फुटेल आणि लग्नात अडथळा निर्माण होईल याची मला भीती वाटत होती,'' असं सुमित यांनी म्हटलं.

सुदैवानं त्यांच्याबाबतीत तसं झालं नाही. पण "आमच्या लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनंतर अजूनही अझराच्या कुटुंबीयांनी अद्याप मला स्वीकारलेलं नाही".

आता ते बोलायला लागले आहेत. पण तसं असलं तरी सार्वजनिकरित्या अझराचे कुटुंबीय अजूनही आमच्या लग्नाचा स्वीकार करायला तयार नाहीत.

"गेल्यावर्षी माझ्या पत्नीच्या लहान बहिणीचं लग्न झालं, पण आम्हाला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.''

"आमच्यासारख्या दाम्पत्यांसाठी प्रेमात पडणं आणि लग्न करणं हे सर्वच अत्यंत कठीण असतं," असं सुमित म्हणाले.

पण "ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, त्याच्याशी लग्न करण्यासाठी तुम्हाला धर्म बदलण्याची गरज नाही, " असं मत त्यांनी व्यक्त केलं.

" प्रेम करत असलेल्या व्यक्तीबरोबर तुम्ही राहणं हा गुन्हा नाही,'' असं सुमित जाहीरपणे म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)