BBC Impact: फुटपाथवर राहाणाऱ्या आस्माला बीबीसी मराठीमुळे मिळालं घर

आस्मा
फोटो कॅप्शन, आस्मा आणि तिचं कुटुंब
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"मला खूप आनंद होतोय. माझं स्वप्न पूर्ण झालं. आता मला शिक्षण पूर्ण करता येईल." आसमा शेखने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

मुंबईतील महापालिका मार्गावर कुटुंबासह फुटपाथवर राहणाऱ्याला आस्माला आता निवारा मिळाला आहे.

बीबीसी मराठीने प्रसारित केलेल्या ग्राऊंड रिपोर्टनंतर आस्माला देसभरासह जगभरातून मदत मिळाली. आस्मा आता कुटुंबासह फुटपाथवरुन चार भिंतीच्या खोलीत राहणार आहे.

जुलै 2021 रोजी बीबीसी मराठीने आस्माची व्यथा मांडली होती.

बारावीत शिकणाऱ्या आस्माला फुटपाथवर राहून ऑनलाईन शिक्षण घेणं किती अवघड आहे हे वास्तव दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला.

आतापर्यंतचे शिक्षण आस्माने फुटपाथवर राहूनच पूर्ण केलं. परंतु लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर फुटपाथवर राहून ऑनलाईन शिकणं आस्मासाठी कठीण होऊ लागलं.

बीबीसी मराठीशी बोलताना आस्मा म्हणाली होती, "मला पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करायचं आहे. पण आमच्याकडे घर नाही. आमची एक झोपडी होती पण ती पोलिसांनी तोडली. रस्त्यावर ऑनलाईन शिकणं कठीण आहे."

आस्मा
फोटो कॅप्शन, आस्माचं कुटुंब

बीबीसी मराठीने आस्माचं हे म्हणणं दाखवल्यानंतर देशभरातून तिच्या मदतीसाठी हात पुढे आले. एवढंच नाही तर सातासमुद्रापार राहणाऱ्या अनेकांनी आस्माच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

यूके, अमेरिका, जर्मनी, नॉर्वे अशा विविध देशातील नागरिकांनी एकत्र येत सोशल मीडियावर आस्मासाठी निधी उभारण्यास सुरुवात केली.

आस्माच्या वडिलांनी सांगितलं, "आम्हाला भाड्याने खोली मिळवून दिली आहे. जगभरातून लोकांनी आम्हाला संपर्क साधला. तीन वर्षांसाठी भाड्याचं घर असेल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. शिवाय आस्माच्या शिक्षणासाठीही ते मदत करणार आहेत."

आस्मा शेख चर्चगेट येथील केसी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत आहे. महाविद्यालय बंद असल्याने आस्मापुढे शिक्षण पूर्ण करण्याचं आव्हान होतं.

फुटपाथवर राहत असताना केवळ शिक्षणच नव्हे तर इतर अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्यात एक महिला दररोज मनात भीती बाळगूनच रस्त्यावर राहावं लागतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

याविषयी आस्मा म्हणाली, "मला फुटपाथवर कायम असुरक्षित वाटतं. रात्रीच्यावेळी तर वडिलांना किंवा भावाला माझ्या सुरक्षेसाठी जागं राहावं लागतं. दारुडे बाजूला येऊन झोपतात त्यांना हकलावं लागतं."

पण आता निवारा मिळाल्याने आता बऱ्याच समस्यांंपासूून सुटका झाली असं वाटतं असंही तिने सांगितलं.

आस्मा शेखचे वडील सलीम शेख यांची लिंबूपाण्याची गाडी होती. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर ते लिंबूपाणी विकायचे. पण कोरोना आरोग्य संकटात लॉकडॉऊनमध्ये त्यांचा धंदा ठप्प झाला.

सलीम शेख सांगतात, "आता मी हमाली करुन किंवा जिथे काम मिळेल तिथे जाऊन कुटुंबाच्या गरजा भागवत आहे. माझी पत्नी आसपासच्या कार्यालयांमध्ये जाऊन कधी साफसफाईसुद्धा करते."

आस्मा

"आता चार भिंतीत राहण्याची संधी मिळणार असल्याने किमान सुरक्षित वाटत आहे. काम मिळेल तसं करत राहणार," असंही ते म्हणाले.

आस्मा ज्या फुटपाथवर राहते ती जागा आझाद मैदानाबाहेर आहे. राज्यभरातल्या विविध संघटनांंना आंदोलन करायचे असल्यास किंवा मोर्चा काढायचा असल्या ते थेट आझाद मैदान गाठतात.

शिवाय, याच ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यलय आहे. तसंच राजकीय पक्षांचे कार्यालय आहे. त्यामुळे याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो.

"पोलीस आम्हाला काठ्या मारायचे. मग आम्हाला आमचं सामान घेऊन 2-3 दिवस असंच फिरावं लागायचं. यात अभ्यास होत नव्हता आणि शिकलो नाही तर कायम असंच फुटपाथवर रहावं लागेल. याची जाणीव मला आहे." असं आस्मा सांगते.

पदवीचं शिक्षण पूर्ण करुन आस्माला सरकारी नोकरी करायची आहे.

तूर्तास आस्माला भाड्याचे तात्पुरते घर मिळाले आहे. यामुळे किमान शिक्षण अपूर्ण राहणार नाही आणि माझी जबाबदारी आणखी वाढली आहे असं तिने सांगितलं.

"खूप लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही मदत केली आहे. त्यामुळे आता माझी जबाबदारी आहे की मी सर्वांचा विश्वास सार्थ ठरवेन. मी शिक्षण पूर्ण करेन." असा निर्धार आस्मा शेखने व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)