तालिबान : पुण्यात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थिनीची व्यथा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
साखरझोपेतून उठावं आणि अगदी काल रात्रीपर्यंतच आपलं सारं आयुष्य स्वप्न होतं की काय असं वाटावं असा विचार करण्याची वेळ अफगाणिस्तानच्या अलिफा (बदललेलं नाव) या 21 वर्षीय तरुणीवर आली आहे.
अलिफा आपल्या कुटुंबापासून दूर भारतात शिक्षण घेत आहे. पुण्यात शिकते आहे. पण तिचं मन आता अफगाणिस्तानच्या आठवणीनं कावरंबावरं झालंय.
मी राहते त्यापासून जवळपास 150 किमी अंतरावर अलिफा आणि आणखी काही अफगाण विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा त्यांना भेटण्यासाठीचा माझा प्रवास सुरू झाला.
माझी पहिली भेट झाली ती जीन्स-शर्ट घातलेली आणि डोक्यावर ओढणी घेतलेल्या अलिफाशी. गेल्या काही दिवसांपासून जे धगधगतं अफगाणिस्तान मी दृश्यांमध्ये पाहत होते त्या देशाची एक मुलगी माझ्यासमोर उभी होती. उच्च शिक्षण घेऊन स्वत:चं भविष्य घडवण्यासाठी धडपड करू पाहणारी एक मुलगी.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC
वर्षभरात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घरी जाणार का? असं विचारल्यावर ती म्हणाली, "मला घरी परतायचं आहे. माझं कुटुंब, नातेवाईक तिथेच आहेत. माझं सगळं काही तिकडे आहे. पण अशा परिस्थितीत कसं जाणार?" असा प्रश्न तिने उपस्थित केला.
पदवीचं शिक्षण पूर्ण करुन अलिफा गेल्यावर्षी अफगाणिस्तानातून भारतात आली. त्यावेळी भारतात कोरोनाचं थैमान सुरू होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत होता, रुग्णसंख्या दररोज वाढत होती पण तरीही उज्ज्वल भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक नियमांचे अडथळे पार करत अलिफा महाराष्ट्रात पोहोचली.
पण तेव्हा अलिफाला याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती की या आरोग्य संकटाप्रमाणे आणखी एक भयानक संकट भविष्यात तिच्यासमोर उभं ठाकणार आहे.
ती म्हणाली, "मी चांगलं भविष्य घडवण्यासाठी भारतात आले. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता भविष्याचा काहीच विचार करता येत नाही. आता आमच्या स्वप्नांचाही विचार करू शकत नाही. केवळ देशात काय चाललं आहे, घरचे कसे आहेत त्याचाच विचार सुरू आहे."
अलिफा पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर पडली. त्यामुळे अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर ती सातत्याने कुटुंबाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते आहे. ती म्हणाली, "मला घरातल्या सगळ्यांची आठवण येत आहे. असं एकटं राहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे."
तिच्या मनातली भीती, अगतिकता तिच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होती. सर्वच अफगाण लोकांसाठी हा कठीण काळ असून तसं आम्ही लहानपणापासूनच तालिबानविषयी अनेक गोष्टी ऐकल्याचं ती म्हणाली.
"माझं बालपण खूप चांगलं नसलं तरी बरं होतं. मात्र आता सगळं अचनाक बदललं. असं काही होईल याचा कधीही विचार केला नाही. पण दुर्दैवानं हे झालं आहे. आम्ही आता याबाबत काहीच करू शकत नाही. फक्त चांगले दिवस येण्याची प्रतिक्षा करू शकतो."
अलिफाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या संस्थेत किंवा दुतावासात नोकरी करण्याची इच्छा आहे. पण तालिबानच्या राजवटीत कदाचित हे शक्य नाही याची जाणीव तिला आहे.
ती म्हणाली, "तालिबान नसतं तर मी नक्की नोकरी करु शकले असते. मी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेणार आहे. मी एखाद्या संस्थेत नोकरी केली असती किंवा दुतावासात काम करू शकले असते. पण तालिबान कायम राहिलं तर कदाचित मी कोणतंही काम करू शकणार नाही. साधी कामंही नाही."

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC
शरियाचं पालन करुन महिलांना शिक्षण आणि नोकरी करता येईल असं तालिबानने पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तालिबान मुलींना शिक्षणाचा अधिकार देणार असल्याचं आपण बातम्यांमधून ऐकल्याचं ती सांगते. पण आपला शब्द ते कितपत पाळतील याबाबत खात्री नसल्याचंही ती म्हणाली.
"भारतात किंवा बाहेर कुठेही राहणाऱ्यांना परत जाण्यासाठी त्यांचं एक घर होतं पण आता माहिती नाही की परत जाता येईल की नाही? आता सगळंच कठीण होऊन बसलंय. आम्ही आता अफगाणिस्तानात परतलो तर आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आम्हाला ना शिक्षण घेता येईल ना काम करता येईल. आशा करतो की तिथे परिस्थिती सुधारेल आणि आम्ही परत जाऊ शकू."
अफगाणिस्तानातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात आलेली अलिफा ही एकमेव विद्यार्थी नाही. असे शेकडो विद्यार्थी आयआयटीसह राज्यातील विविध महाविद्यालयांत शिकत आहेत.
'आम्हाला शांती हवी आहे'
सर्व अफगाण नागरिकांना केवळ शांतीपूर्ण आयुष्य पाहिजे आहे असं अलिफाने चर्चेदरम्यान सांगितलं होतं. असंच काहीसं सांगणारा आणखी एक अफगाण विद्यार्थी मला भेटला. याच महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तो बीबीए-सीएचं शिक्षण घेत आहे.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC
2019 साली त्याने अफगाणिस्तानातून थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठलं आणि मुंबईहून तो पुण्यात आला.
टीशर्ट-जीन्स आणि चष्मा घातलेला हा अफगाण तरुण अगदी इथल्या कोणत्याही शहरातील एखाद्या सामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच दिसत होता.
तो सुरुवातीलाच म्हणाला, आम्हाला फक्त आणि फक्त शांती हवी आहे. माझा सत्ताधाऱ्यांना एकच संदेश आहे की त्यांनी आता भांडणं थांबवावीत. शांतता प्रस्थापित करावी आणि कोणालाही नुकसान पोहोचवू नये.
कुटुंबातील, देशातील लोक भयंकर संकटात असताना तुम्ही मात्र कोसो दूर परक्या देशात, परक्या माणसांसोबत राहत असताना तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे?
यावर तो म्हणाला, "मला अफगाणिस्तान आणि आमच्या लोकांची काळजी वाटत आहे. माझ्या कुटुंबाचं, आमचं भविष्य काय असेल? आम्ही शिकतोय पण लक्ष केंद्रीत करता येत नाहीय. आम्ही प्रार्थना करतो की अफगाणिस्थानची परिस्थिती सुधारेल. आम्ही शिक्षणासाठी इथे आलो. शिक्षण करून आम्ही आमच्या देशाला एक उज्ज्वल भविष्य देऊ. हेच आमचं ध्येय आहे."
'आमच्या देशात असं का झालं'
ऑगस्ट महिन्यात एमए-राज्यशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलेल्या एका अफगाण विद्यार्थ्यालाही मी भेटले. पदवी हातात येताच मायदेशी परत जाऊन चांगली नोकरी करण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण अशा परिस्थितीत परतणार कसं आणि काय करणार? असा प्रश्न त्याच्यासमोर आहे.
तो म्हणाला, "मला खूप दु:ख होत आहे. आमच्या देशात, गावात, शहरात अशी परिस्थिती का उद्भवली? अचानक असं झालं यावर विश्वास बसत नाही."
खरं तर या अफगाण विद्यार्थ्यांसाठी अशी तणावपूर्ण परिस्थिती नवीन नाही. पण तो सांगतो, शहराबाहेर सक्रीय असणारं तालिबान एकेदिवशी संपूर्ण अफगाणिस्तान काबिज करेल असं कधी वाटलं नव्हतं.
"मी जेव्हा शाळेत होतो तेव्हाही शहराबाहेर तालिबान सक्रिय होतं. सरकारसोबत त्यांचा संघर्ष तेव्हाही सुरू होता. लहानपणी वाटायचं काही वर्षांत ही समस्या दूर होईल, पण आता 2021 उजाडलं तरीही हे संपलं नाही आणि आता तर सगळं बदललं आहे."

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC
तो पुढे म्हणाला, "हल्ले होत होते. त्यामुळे भीतीचं वातावरण होतं. माझ्या अनेक मित्रांचा, नातेवाईकांचा यात मृत्यू झाला आहे. आता भविष्यात काय होईल सांगता येणार नाही पण अफगाणिस्तानातील जनतेला शांततापूर्ण आयुष्य हवं आहे. अर्थव्यवस्था, शेतीची कामं अशी सर्व कामं शांततेतच सुरळीत होतात असं मला वाटतं,"
'व्हिसासाठी मुदत वाढ द्यावी'
भारतात शिक्षण सुरू असलेल्या आणि आगामी काही काळात शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसा मुदतवाढ द्यावी अशी मागणी अफगाण विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
"आमच्या देशाची अवस्था खूप खराब आहे. आम्ही भारत सरकारला विनंती करतो. इकडे जे विद्यार्थी आहेत त्यांना व्हिजा मुदतवाढ द्यावी."
केवळ मुदतवाढ नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून त्यांच्यासाठीही उपाययोजना करा असा विनंती अर्ज विद्यार्थ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचीही मंगळवारी (17 ऑगस्ट) भेट घेतली. यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करू, असं आश्वासन राज्य सरकारने काही अफगाण विद्यार्थ्यांना दिलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









