पुणे : सेक्सटॉर्शन म्हणजे काय? त्यातून बाहेर कसं पडायचं?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

सेक्स्टॉर्शनमुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. राजस्थानचं गुरुगोठडी हे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे.

तरुणांच्या आत्महत्येप्रकरणा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

पुण्यात सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून तरुणांना धमकावलं जात होतं, त्यामुळे दोघांनी आत्महत्या केली होती. त्या घटनेचा तपास पुणे पोलीस करत होते. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांना खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधलं. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले.

पुणे पोलिसांच्या एका पथकाने थेट ते गाव गाठलं आणि तेथून अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवलं.

गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास 2500 लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असं त्याने सांगितलं.

सेक्सटॉर्शन मुळे पुण्यात दोन लोकांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा पुण्यात असाच प्रकार उघडकीस आला होता.

नेमकं काय घडतं?

पुण्यातल्या एका महाविद्यालतील प्रोफेसरच्या व्हॉट्सअॅपवर रात्री उशीरा एक मेसेज आला. त्यांच्या एका विद्यार्थिनीची आई बोलत असल्याचं भासवण्यात आलं. तुमचं उद्याचं कॉलेजचं शेड्युल कसं आहे? असं त्या विचारत होत्या.

मुलगी काही नीट सांगत नाही तुम्हीच सांगा असं त्या म्हणत होत्या. काही वेळाने त्याच नंबरवरुन प्रोफेसरला व्हॉट्सअॅप कॉल आला त्या कॉलवर आवाज व्यवस्थित येत नव्हता. नंतर व्हिडीओ कॉल आला ज्यात काहीवेळ ती महिला बोलल्यानंतर ती प्रोफेसरसमोर कपडे काढू लागली.

हा व्हिडीओ रेकॉर्ड करुन एडिटकरुन शिक्षकांच्या ग्रुपवर टाकण्यात आला आणि काही वेळात डिलीट करण्यात आला. त्यात लिहिलं होतं प्रोफेसर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी काय करतात पाहा.

त्या प्रोफेसरने सायबर तज्ज्ञांशी संपर्क करुन हे कोणी केलं याचा शोध घेतला, तेव्हा त्यांच्याच महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी इंटरनेटवरुन माहिती घेऊन हा प्रकार केल्याचे समोर आलं.

सेक्स्टॉर्शन म्हणजे काय?

सेक्स + एक्स्टॉर्शन (Sex + Extortion) यावरून सेक्स्टॉर्शन हा शब्द आलाय. म्हणजे सेक्सचा वापर करत ब्लॅकमेल करून वा दबावाखाली आणत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणं.

सेक्सटॉर्शनच्या अशा 682 घटना पुणे शहरात 2021 या एका वर्षात समोर आल्या आहेत. हा आकडा ज्यांनी समोर येऊन सायबर पोलिसांकडे तक्रार केली त्यांचा आहे. ज्यांनी तक्रार केली नाही अशांची संख्या अधिक असण्याची शक्यता सायबर पोलीस व्यक्त करतात.

सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्याने त्यातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार देखील वाढलं आहे. सावज शोधून त्याला अडकवून पैसे वसूल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. याप्रकारांमुळे अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय तर काही लोक बदनामीच्या भीतीमुळे नैराश्यात देखील जात आहेत.

ऑनलाईन खंडणी

फोटो स्रोत, Thinkstock

दुसरी घटना देखील पुण्यातली आहे. एका व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल व्हॉट्सअॅपवर आला. त्या व्यक्तीने कुतुहलाने तो फोन उचलला तर कॉलवर न्यूड महिला दिसत होती. त्या व्यक्तीने काही वेळातच तो व्हिडीओ बंद केला.

तुम्ही अश्लील व्हिडीओ पाहत होता आता हे आम्ही व्हायरल करु असं म्हणत त्या व्यक्तिकडे पैशांची मागणी करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे ती व्यक्ती पुरती घाबरुन गेली होती.

पुणे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर गुन्ह्यातील 60 ते 70 टक्के गुन्हे हे एखाद्या व्यक्तीकडून पैसे वसूल केल्याचे असतात. जमतारा नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आहे त्याप्रमाणे सॉफ्ट टारगेट शोधून लोकांना आर्थिक गंडा घातला जातो. यात मॅट्रोमोनियल साईटवरुन ओळख करुन गिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवण्याचे गुन्हे देखील अधिक आहेत.

पुणे सायबर पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2020 या वर्षामध्ये मॅट्रोमोनियल साईटवरुन फसवणुकीचे 278 गुन्हे दाखल झाले होते. 2021 मध्ये ही संख्या 94 इतकी होती तर 2022 या नवीन वर्षात आत्तापर्यंत 14 गुन्हे दाखल झाले आहेत. सेक्स्टॉर्शनचे बळी ठरलेल्यांमध्ये 30 वयाच्या वरील पुरुषांचे तसेच खासकरुन लग्न झालेल्या पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Thinkstock

पुणे सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, ''गेल्या वर्षात पुण्यात सेक्सटॉर्शनच्या गुन्हांची संख्या जास्त आहे. एखाद्या व्यक्तीशी फेसबुकवरुन मैत्री केली जाते. त्यानंतर न्यूड फोटो पाठवले जातात व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी सांगितले जाते आणि नंतर बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. फसवणुक करणारे लोक फसवल्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रोफाईलचा संपूर्ण अभ्यास करतात. त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये कोण आहे, ही व्यक्ती काय करते वगैरे ही सगळी माहिती ते घेतात.''

''सेक्सटॉर्शनमध्ये फसवणूक झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. अशी फसवणूक ही राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली या भागांमधून केली जात असल्याचं प्रमाण अधिक आहे.'' असं देखील हाके म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकारांचा अनुभव

गणेश कनाटे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. सध्या ते कॉर्पोरेट कम्युनिकेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनाही एकदा अशाच अनुभवाला सामोरं जावं लागलं. एक दिवशी त्यांना एका नंबरवरून असाच व्हीडिओ कॉल आला. कॉल उचलताच समोर एक व्यक्ती नग्नावस्थेत दिसली. त्यांनी तातडीने कॉल कट केला. मग त्यांना धमक्या येण्यास सुरुवात झाली. त्यांनी धमकी देणाऱ्यास अजिबात भीक घातली नाही.

उलटपक्षी त्यांनी हा सगळा घटनाक्रम फेसबुकवर जाहीरपणे सांगितला. पोलिसात तक्रारही केली.

याविषयी बीबीसी मराठीने त्यांच्याशी बातचीत केली. गणेश कनाटे सांगतात, "मी पोलिसात तक्रार केल्यावर त्याचं पुढे काहीही झालं नाही. हे लोक म्हणजे अगदी सराईत चोर नसतात. त्यांनी धमक्या दिल्यावर आपण बधलो नाही तर ते फारसा आग्रह करत नाही. हे लोक राजस्थान, पंजाब, या राज्यातले असतात. ते एक सिम कार्ड वापरून लगेच फेकून देतात. त्यामुळे त्यांचा माग लागणं कठीण असतं. तरीही या लोकांना जे पैसे देतात त्यांनीही पुढे यावं. मात्र तसं होत नाही. यावरून कोणत्या अकाऊंट मध्ये पैसे टाकले हे लक्षात येऊ शकतं. 99.99 टक्के वेळेला असं होत नाही. सामाजिक प्रतिष्ठा, पापभीरू वृत्ती यामुळे अशा प्रकरणांविषयी फार बोललं जात नाही. मात्र हा विषय गंभीर आहे. यावर जनजागृती होणं गरजेचं आहे. असे काही प्रकार झाल्यास कोणीही घाबरून जाऊ नये आणि धमक्यांना तर अजिबात भीक घालू नये."

सेक्सटॉर्शनपासून वाचायचे कसे?

दिवसभरात आपल्याला शेकडो मेसेजेस व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येत असतात. अनेक अनोळखी लोकांच्या फ्रेंण्ड रिक्वेस्ट सुद्धा आलेल्या असतात. त्यामुळे आपली फसवणुक टाळण्यासाठी सोशल मीडियावर वावरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

दगडू हाके सांगतात, ''ज्यांची फेसबुकची सिक्युरिटी वीक आहे अशांना अनेकदा टार्गेट केलं जातं त्यामुळे फेसुबकची सुरक्षा वाढवली पाहिजे. अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर ती खात्री करुन स्विकारा किंवा ती स्विकारण्याचे टाळा. अनोळखी नंबरवरुन मेसेज आला तर त्याची खातरजमा करुनच त्यावर रिप्लाय करा. अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल आला तर तो स्विकारु नका. सेक्सटॉर्शनच्या केसेसमध्ये फसवणुक करणाऱ्याने असे व्हिडीओ कुठे पोस्ट केल्याचे फारसे दिसून येत नाही. केवळ पैसे उकळण्यासाठी धमकावले जाते. त्यामुळे अशी फसवणुक झाली तर सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करा.''

या घटनांबाबत सायबर तज्ज्ञ काय म्हणतात?

लोक टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर बिझनेस ग्रुप किंवा चॅनेल सुरु करतात. अनेकदा अशा ग्रुपची लिंक ओपन टू ऑल असते. यावर अनेकदा बाहेरच्या देशाचे नंबर देखील अॅड होतात. ते बिझनेस प्रपोझल पाठवतात. नंतर याची खात्री करण्यासाठी आपण व्हिडीओ कॉल करु असं सांगतलं जातं आणि व्हिडीओ कॉल घेतल्यानंतर समोरची व्यक्ती नग्न असते.

हा कॉल रेकॉर्ड केला जातो. नंतर तुम्ही बिझनेसच्या नावाखाली असं करायला सांगितलं असं म्हणत तो व्हीडिओ ग्रुपवर टाकण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारची फसवणूक गेल्या दोन महिन्यांमध्ये वाढली आहे. असं सायबर पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत करणारे आणि डिजिटल टास्क फोर्सचे संस्थापक रोहन न्यायाधीश यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

ऑनलाईन खंडणी

फोटो स्रोत, Reuters

रोहन न्यायाधीश यांच्याकडे सायबर गुन्हेगारी संदर्भातील अनेक केसेस येतात. सेक्सटॉर्शन, हनीट्रॅपच्या अनेक केसेसचा त्यांनी अभ्यास देखील केला आहे. या केसेस बद्दल सांगताना न्यायाधीश म्हणाले, ''सेक्सटॉर्शन, हनीट्रॅपच्या केसेसमध्ये असं अनेकदा असं समोर आलं आहे की समोरची न्यूड व्यक्ती ही खरी नसते. एखादा व्हिडीओ प्ले करुन तो मोबाईल कॅमेराच्या इतक्या जवळ धरला जातो की तुम्हाला ते खरं सुरु असल्यासारखं वाटतं. ज्या 100 ते 150 केसेसचा स्टडी केला त्यात 80 टक्के केसेसमध्ये व्हिडीओ प्ले केल्याचं समोर आलंय.

अनोळखी व्यक्तीशी बोलताना काय खबरदारी घ्यायची ?

अनोळखी व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवरुन संपर्क करायचा असेल तर काय काळजी घ्यायची याबाबत देखील बीबीसी मराठीने न्यायाधीश यांना विचारले

न्यायाधीश म्हणाले, ''अनोळखी व्यक्तीशी व्हीडिओ कॉलवरुन संपर्क करताना सुरुवातीला तुमचा चेहरा न दाखवता आधी खात्री करुन घ्यायला हवी. किंवा कॅमेरा सुरुवातीला बंद ठेवून आधी त्या व्यक्तीबद्दल खात्री करायला हवी आणि मग व्हिडीओ ऑन करायला हवा.''

''ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक येतात त्यामध्ये कुठल्या प्रकराचा व्हायरस नाही ना हे पाहायला हवं. तुम्हाला एखाद्या अनोळख्या व्यक्तीकडून फेसबुकवरुन फ्रेण्ड रिक्वेस्ट आली असेल तर त्या व्यक्तीचं युआरएल आणि नाव सारखं आहे का हे तपासलं पाहिजे. त्याचबरोबर ते अकाऊंट कधी तयार केलं आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे.

एखाद्याने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून फसवलं तर त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला हवी. कारण त्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले तरी त्या व्यक्तीने तो व्हिडीओ डिलीट केला आहे याची तुम्ही खात्री करु शकत नाही. त्यामुळे आयुष्यभर तुम्हाला भीतीच्या छायेखाली रहावं लागेल. जर याबाबतची तक्रार दाखल केली तर हे प्रमाण कमी होत जाईल.'' असं देखील न्यायाधीश सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)