व्हाट्स अॅप हॅक, कॉल फॉरवर्ड आणि *401* स्कॅम पासून वाचण्याचे उपाय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कल्पना करा तुम्हाला एक फोन येतो. फोनवर तुमच्याशी बोलणारी व्यक्ती मी अमेझॉन किंवा ब्लुडार्ट सारख्या कंपनीतून बोलत आहे आणि आमचा माणूस तुमचं पार्सल घेऊन दारावर उभा आहे असं तुम्हाला सांगतो.
आता बऱ्याचदा तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन ऑर्डर केली असेल तर तुम्हाला कसलीच शंकाही येत नाही. त्यामुळे तुमच्या फोनवर त्या व्यक्तीने पाठवलेला ओटीपी तुम्ही त्याला विश्वासाने सांगता आणि तेवढ्यात तुमचा फोन हॅक झालेला असतो.
एकदा का तुमचा फोन हॅक केला की मग तुमच्या नावे पैसे मागणारे मेसेजेस पाठवले जातात आणि एव्हाना तुम्ही सायबर गुन्ह्याला बळी पडलेला असता.
सध्या व्हॉट्स अॅप हॅकिंगचं प्रमाण वाढत चाललंय. नवनवीन पद्धतीने व्हॉट्स अॅप हॅक केलं जातं. ते टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे? आणि व्हॉट्स अॅप हॅक झालंच तर लगेच काय केलं पाहिजे? जाणून घेऊ या.
व्हॉट्स अॅप कसं हॅक करतात?
तुमचा मेसेज बॉक्स उघडून पाहा, त्यात ओटीपींचा खच पडला असेल. कॅब बुक करताना, खरेदी केलेली वस्तू स्वीकारताना, बँकेचे व्यवहार करताना, एखाद्या ॲपमध्ये लॉग इन करताना.
व्हॉट्स अॅप हॅक करतानाही हाच ओटीपी किंवा व्हेरिफिकेशन कोड मिळवण्यासाठी हॅकर्स प्रयत्न करतात.
महाराष्ट्र सायबर सेल युनिटने याबाबत अशी माहिती दिलीय की, हॅकर्स तुमच्या Online Activities वर नजर ठेवून असतात. तुम्ही कधी फोन बदलता, ऑनलाईन खरेदी कधी करता हे सगळं त्यांना माहीत असतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर कॉल करून तुमच्या फोनवर आलेला ओटीपी किंवा व्हेरिफिकेशन कोड मिळवला जातो आणि एकदा हा कोड मिळाला की त्यानंतर सहज तुमचं व्हॉट्सअॅप हॅक केलं जातं.
तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप ओपन करू शकत नाही आणि त्याच वेळात तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या अनेकांना तुमच्या नावे पैश्यांची मागणी केली जाते.
एवढंच नाही तर एका अकाउंटचा वापर करून इतरही अकाउंट हॅक केले जातात. ज्यांचा फोन किंवा व्हॉट्स अॅप हॅक झालाय त्यांना काही कळायच्या आत हा प्रकार घडतो.
फेसबुक मेसेंजरवरून तुमचा नंबर मिळवून व्हॉट्स अॅप हॅक करण्याचे प्रयत्नही सध्या केले जात आहेत. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेला प्रत्येक मेसेज नीट तपासून बघणं खूप गरजेचं होऊन बसलेलं आहे.
व्हॉट्स अॅप हॅक टाळण्यासाठी काय कराल?
तुमचा फोन, बँक अकाउंट किंवा सोशल मीडिया अकाउंट हॅक होऊ नये म्हणून काही गोष्टी करणं आपल्या हातात असतं.
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहारांसाठी एक वेगळा फोन नंबर वापरणं गरजेचं आहे. तुमच्या बँकेला दिलेला नंबर आणि सोशल मीडियाशी कनेक्टेड असणारा नंबर एकच असू नये.
कोणताही ओटीपी तुम्ही स्वतः जनरेट केला आहे का ते तपासलं पाहिजे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांना असं वाटतं की व्हॉट्स अॅप इतर फोन किंवा नवीन ठिकाणी उघडत असताना आलेला व्हेरिफिकेशन कोड कुणासोबतही शेअर करू नये. टू स्टेप व्हेरिफिकेशन (Two Step Verification) देखील सुरु ठेवलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
तुमच्या फोनमधल्या कॉल सेटिंगमध्ये कॉल डायव्हर्टचा पर्याय नेहमी बंद असल्याची देखील खात्री केली पाहिजे. अनोळखी माणसाने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून काहीही करू नये.
Two Step Verification कसं सुरु करायचं?
नियमित वापरात येणारं व्हॉट्सअॅप सुरक्षित करण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरु करणं हा अत्यंत प्राथमिक आणि अतिशय सोपा पर्याय आहे.
हे व्हेरिफिकेशन सुरु केल्याने तुमचं व्हॉट्सअॅप हॅक करणं सोपं राहत नाही.
तुमचा नियमित वापरातला मोबाईल किंवा डिजिटल उपकरण सोडून इतर उपकरणांवर लॉगिन करत असताना टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं.
टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठीच्या पाच पायऱ्या
1. व्हॉट्सअॅप सेटिंग ओपन करा.
2. त्यानंतर Account वर क्लिक करून Two-step verification मधल्या Enable या बटनावर क्लिक करा.
3. त्यानंतर तुम्हाला लक्षात राहील आणि दुसरे ओळखू शकणार नाहीत असा सहा आकडी पिन टाकून कन्फर्म करा.
4. त्यानंतर तुमचा ईमेल तुम्ही तिथे टाकू शकता. पिन विसरला किंवा व्हॉट्सअॅप हॅक झालं तर हा ईमेल तुमची मदत करू शकतो.
5. त्यानंतर Next वर क्लिक करून तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप अधिक सुरक्षित करू शकता.
कॉल फॉरवर्ड करून फोन कसा हॅक केला जातो?
तुमच्या मोबाईलवर येणारे कॉल फॉरवर्ड करून तुमचा फोन कसा हॅक केला जातो याबाबाबत पत्रकार प्रसन्न जोशी यांना आलेला अनुभव समजून घेतला पाहिजे.
या स्कॅमबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, "मला एक फोन आला आणि समोरील व्यक्तीने सांगितलं की तुमच्या नावावर पोस्टातून एक पार्सल आलेलं आहे. ते पार्सल घेऊन माणूस तुमच्या दारावर उभा आहे. तुम्ही बाहेर असाल तर आम्ही तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज करू त्यातला नंबर डायल करून आम्हाला तुम्ही एक ओटीपी सांगू शकता.
हा कॉल माझा फोन हॅक करण्यासाठी आलेला आहे हे मी ओळखलं होतं. पण या चोरांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मी त्यांना म्हणालो की ठीक आहे मला मेसेज पाठवा.
त्यानंतर माझ्या फोनवर एक टेक्स्ट मेसेज आला. त्यामध्ये *401*यानंतर एक मोबाईल नंबर पाठवला होता आणि मला त्यावर कॉल करायचा होता. मी लगेचच गुगलवर जाऊन तपासलं तर मला *401* हा नंबर वापरून तुमच्या फोनवर येणारे कॉल डायव्हर्ट करता येतात हे कळलं. त्यानंतर मी त्या व्यक्तीचा फोन उचलला नाही."
*401* हा नंबर तुमच्या मोबाईलवर येणारे कॉल वळवण्यासाठी वापरले जातात. हा तसा जुनाच स्कॅम असला तरी सायबर चोरांसाठी हा एक अत्यंत खात्रीचा मार्ग आहे.
एकदा का तुमच्या फोनवर येणारे कॉल ठराविक नंबरवर वळवले गेले की त्यानंतर तुमच्या सोशल मीडिया खात्यांवर लॉगिन करणं अतिशय सोपं होतं.
यासोबतच तुमच्या बँकेच्या अॅपवरही लॉगिन करता येतं. कारण तुमच्या क्रमांकावर येणारे मेसेजेस, ओटीपी आणि व्हेरिफिकेशन कॉल सगळंच त्या नवीन मोबाईलवर वळवलेलं असतं.
मुळात एकदा का तुम्ही कॉल वळवले की त्यानंतर तुमच्या क्रमांकावर येणारा एकही कॉल किंवा मेसेज तुम्हाला पाहता येत नाही आणि चोर हीच संधी हेरून चोरी करतात.
कॉल फॉरवर्डिंग कसं रोखता येतं?
तुमच्या फोनवरील कॉल फॉरवर्डिंग थांबवण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे, वेगवेगळे नियम आहेत. तुम्ही कोणत्या कंपनीचा सिमकार्ड वापरता त्यावरून तुम्ही काय केल्याने तुमचे कॉल फॉरवर्ड होण्याचे थांबतील हे ठरत असतं.
संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कॉल फॉरवर्डिंग थांबवू शकता. आपण जिओ सिमकार्डचं उदाहरण घेऊया.
जिओ क्रमांकावर येणारे कॉल डायव्हर्ट होण्यापासून थांबवण्यासाठीचा उपाय :
कॉल फॉरवर्डिंग निष्क्रिय करण्यासाठी, सेटिंग्ज > कॉल > अॅडव्हान्स सेटिंग्ज > कॉल फॉरवर्डिंग या पर्यायावर जा. वेगवेगळ्या हँडसेटवर वेगवेगळे पर्याय असू शकतात.
हे शक्य नसेल तर खालील शॉर्ट कोड डायल करूनही कॉल फॉरवर्डिंग रोखता येऊ शकतं.
1. सगळ्या प्रकारची कॉल फॉरवर्डिंग रोखण्यासाठी - *402
2. तुम्ही कॉल उचलला नाही तर होणारी कॉल फॉरवर्डिंग रोखण्यासाठी - *404
3. तुमचा फोन व्यग्र असेल तर होणारी कॉल फॉरवर्डिंग रोखण्यासाठी - *406
4. तुम्ही नेटवर्कमध्ये नसाल तर होणारी कॉल फॉरवर्डिंग रोखण्यासाठी - *410
5. सर्व फॉरवर्डिंग एकाच वेळी रोखण्यासाठी - *413
व्हॉट्सअॅप हॅक झालाच तर काय केलं पाहिजे?
सायबर सेल विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी याबाबत सांगितलं की, “सायबर चोरांकडून आपली फसवणूक झाल्याचं एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने किंवा तिने 1930 हा नंबर डायल करून फसवणुकीचा तपशील द्यावा.
त्यानंरत पोलीस त्या व्यक्तीचे बँक अकाउंट ताबडतोब गोठवतील, त्यामुळे तुमच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्यापासून लगेच रोखले जाऊ शकतात. महाराष्ट्र सायबर सेलने आतापर्यंत लोकांचे ३ कोटी रुपये वाचवले आहेत. या हेल्पलाइनवर 100 प्रशिक्षित पोलीस कर्मचारी कार्यरत असून भविष्यात त्यांची संख्या वाढवण्यात येईल."
खाते गोठवल्यानंतर, तक्रारी नोंदवण्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCCRP) शी संपर्क साधला जाऊ शकतो आणि त्यानंतर ते आपोआप महाराष्ट्र युनिटकडे तुमची तक्रार तपासासाठी पाठवतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सायबर सेलच्या सोशल मीडिया अकाउंटवर सायबर गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली जाते. वेळोवेळी ती वाचली पाहिजे आणि जर शंका आली तर लगेच सायबर सेलची मदत घेतली पाहिजे.
भारतात जगात सगळ्यांत जास्त मोबाईल वापरले जातात. सायबर चोरी हा जगातला सगळ्यांत मोठा गुन्हा बनला आहे.
यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातल्या सायबर गुन्हेगारांनी स्वतःचे हेलिकॉप्टर्स खरेदी केले आहेत.
मेवात आणि जमतारा सारख्या भागांमध्ये इंटरनेट वेग वाढावा म्हणून खाजगी मोबाईल टॉवर उभे केले जातात.
अलीकडच्या काळात केवळ बँकांनाच लक्ष्य केलं जात नसून आजकाल सरकारी संस्था आणि काही महत्त्वाच्या खाजगी संस्थांवर देखील सायबर हल्ले केले जात आहेत.
यशस्वी यादव यांनी माहिती दिली की, 2020 मध्ये मुंबईत अचानक जो वीजपुरवठा खंडित झाला होता त्यामागे देखील सायबर गुन्हेगारांचाच हात होता.
महाडिस्कॉमच्या नेटवर्कवर हल्ला करून शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. नासाच्या उपग्रहांनाही सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केलं होतं.
आणखी एक दोन गोष्टी याबाबत महत्त्वाच्या आहेत, सोशल मीडियावर आपली आणि आपल्या कुटुंबाची संवेदनशील माहिती शेअर करू नका.
हॅकर्सना त्याचीही मदत होते. सोशल मीडियाचा वापर करताना सोशल मीडिया तुम्हाला वापरून घेत नाही ना याचं भान राखलं तर अनेक अपघात टाळता येतील.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








