आयफोन हॅकिंगच्या दाव्याची चौकशी सुरू, ॲपलच्या उत्तरावर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं...

फोटो स्रोत, ANI
आयफोन हॅक करणं हा 'राज्य प्रायोजित' हल्ला असल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं होतं. या आरोपावर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
काही विरोधी नेत्यांनी असा दावा केलाय की, "काही राज्य प्रायोजित हल्लेखोरांनी त्यांचे आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न केलाय."
यानंतर आयफोन उत्पादक कंपनी 'ॲपलने'ही आपली भूमिका मांडली.
वृत्तसंस्था आणि अनेक भारतीय वृत्तपत्रांच्या मते, कंपनीने असं म्हटलंय की, कोणत्याही इशारा देणाऱ्या मॅसेजसाठी कंपनी राज्य प्रायोजित हल्लेखोरांना जबाबदार धरत नाही.
'ॲपल'ने आपल्या निवेदनात पुढे असं म्हटलंय की, "राज्य प्रायोजित हल्लेखोरांना मोठा निधी मिळत असतो. कालांतराने ते अधिकाधिक अत्याधुनिक होत जातात."
"अशा हल्ल्यचा शोध धोक्याच्या इंटेलिजन्स सिग्नलवर आधारित असतो. बर्याचदा तो चुकीचा आणि अपूर्ण असतो. त्यामुळे हल्ल्याचा इशारा देणारे काही मॅसेज फॉल्स अलार्म देखील असू शकतात. किंवा यातून हल्लेखोरांची ओळख पटणार नाही."
"कोणत्या परिस्थितीत आम्ही असे मॅसेज देतो हे सांगता येणार नाही, कारण असं केल्यास राज्य-प्रायोजित हल्लेखोरांना भविष्यात बचाव करण्याची संधी मिळू शकते."
त्याचवेळी ॲपलने दिलेली माहिती अस्पष्ट असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटच्या मालिकेत ही माहिती दिली आहे की, सरकार या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाईल.
याआधी, काही विरोधी खासदारांनी सोशल मीडियावर दावा केला होता की त्यांना ॲपलकडून हॅकिंगच्या प्रयत्नांबाबत मॅसेज मिळाला होता.
या खासदारांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या मॅसेज मध्ये असं लिहिलं होतं की, "ॲपलच्या मते, राज्य प्रायोजित हल्लेखोर, तुमच्या ॲपल आयडीशी लिंक असलेला आयफोन दूरस्थपणे हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही ज्या पदावर आहात त्यामुळे हे हल्लेखोर तुम्हाला लक्ष्य करत आहेत."
काय म्हणाले विरोधी पक्षनेते?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसचे शशी थरूर आणि त्यांच्या पक्षाचे जनसंपर्क विभाग प्रमुख पवन खेडा यांनी या मॅसेजचे स्क्रीनशॉट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत.
महुआ मोइत्रा यांनी एक्सवर लिहिलंय की, "सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अलर्ट मला ॲपलकडून मिळाला. यासंबंधी ईमेल आणि टेक्स्ट मॅसेज मिळाला आहे."
त्यांनी लिहिलंय की, "तुमची भीती पाहून मला दया येते."

फोटो स्रोत, X/MahuaMoitra
यानंतर महुआ म्हणाल्या, "इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांचे फोन हॅक करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यात माझ्याशिवाय अखिलेश यादव, राघव चढ्ढा, शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी, सीताराम येचुरी, पवन खेडा आणि राहुल गांधी यांच्या कार्यालयाशी संबंधित आणखीन काही लोक आहेत. हे आणीबाणीपेक्षा वाईट आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही महुआ मोईत्रासारखा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
हा मॅसेज त्यांना ॲपलकडून मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याची चौकशी होणार का? असा सवाल प्रियांका चतुर्वेदी यांनी गृहमंत्रालयाला विचारला आहे.
भाजपने म्हटलं की, एफआयआर का नोंदवत नाही?
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सरकारवरील आरोप निराधार आणि खोटे असल्याचं म्हटलं आहे.
कंपनीचं निवेदन येण्यापूर्वी ॲपलने या विषयावरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं पक्षाने म्हटलं आहे.
पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितलं की, सरकारला दोष देण्याऐवजी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ॲपलकडे हा मुद्दा उपस्थित करून एफआयआर दाखल करायला हवी.
ते म्हणाले, "त्यांना कोणी थांबवलंय का? त्यांनी एफआयआर दाखल करायला हवी.”
अमित मालवीय यांचा राहुल गांधींवर पलटवार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून सरकार आणि भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
केरळमधील वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, “
"माझ्या कार्यालयातील अनेकांना हा मॅसेज मिळाला आहे. यामध्ये के सी वेणुगोपाल आणि पवन खेडा यांचा समावेश आहे. हे लोक तरुणांचं लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत."
पत्रकार परिषदेत ॲपलकडून मिळालेला मॅसेज दाखवत राहुल गांधी म्हणाले, "तुम्हाला पाहिजे तेवढे फोन टॅप करा, मला काही फरक पडत नाही. तुम्ही माझा फोन घ्या, मला कसलीही भीती नाही.”
केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, "अदानीला हात लावताच गुप्तचर संस्था हेरगिरी करू लागतात."

फोटो स्रोत, X/RahulGandhi
राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर ॲपलने आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये कंपनीने या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका जाहीर केली.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलंय की, "राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर ॲपलने लगेचच एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे, त्यामुळे राहुल गांधींची चेष्टा झाली आहे. परदेशी कंपन्यांनी प्रायोजित केलेल्या कथांना ते प्राधान्य का देतात? मागच्या वेळीही त्यांनी फोन तपासासाठी देण्यास नकार दिला होता. असे किरकोळ आरोप करून ते देशाचा वेळ का वाया घालवत आहेत."
काय म्हणाले केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयफोन निर्माता कंपनी ॲपलने विरोधी पक्षांच्या नेत्यांना पाठवलेल्या मॅसेजवर चिंता व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून मंत्रालयाने याची चौकशी सुरू केल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले, "सरकारला या समस्येची चिंता असून आम्ही या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ. आम्ही या विषयावर आधीच चौकशी सुरू केली आहे."
अश्विनी वैष्णव म्हणाले, "काही सन्माननीय खासदार आणि इतर अनेक नागरिकांनी असा मुद्दा उपस्थित केलाय की त्यांना ॲपलकडून एक अलर्ट मॅसेज मिळाला आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की सरकार या समस्येबद्दल खूप चिंतेत आहे. आणि आम्ही या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ. आम्ही यापूर्वीच चौकशीचे आदेश दिले आहेत."
या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटच्या मालिकेत सरकारची भूमिका मांडली आहे.
त्यांनी म्हटलंय की, "ॲपल कडून मिळालेल्या अलर्टवर खासदार आणि इतरांनी माध्यमांवर केलेली विधानं पाहून आम्ही चिंतित आहोत. माध्यमांमधील बातम्यांनुसार, त्या लोकांना मिळालेल्या अलर्टमध्ये 'सरकार प्रायोजित हल्ल्यांचा' उल्लेख आहे.

फोटो स्रोत, ANI
मात्र, ॲपलने या प्रकरणावर दिलेली माहिती अस्पष्ट आणि सामान्य स्वरूपाची असल्याचं दिसतं. ॲपलने म्हटलंय की, हे अलर्ट 'अपूर्ण' माहितीवर आधारित असू शकतात. त्यात असंही म्हटलंय की, ॲपलचे "थ्रेट अलर्ट" चुकीचे देखील असू शकतात.
अश्विनी वैष्णव असंही म्हणालेत की, ॲपलने दावा केलाय की ॲपल आयडी सुरक्षितपणे एन्क्रिप्ट केलेले आहेत, त्यामुळे युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांना ऍक्सेस करणे खूप कठीण आहे. हे एन्क्रिप्शन ॲपल आयडीचे संरक्षण करते. आणि खजगी माहिती सुरक्षित राहील याची खात्री करते.
ते म्हणाले की, भारत सरकार आपल्या सर्व नागरिकांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्याची भूमिका अत्यंत गांभीर्याने घेत असून या प्रकरणाच्या तळाशी जाऊन माहिती घेण्यात येईल. या संदर्भात मिळालेली माहिती आणि सूचना लक्षात घेता, आम्ही ॲपललाही तपासात सहकार्य करण्यास सांगितलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








