आयफोनची 14 वर्षं : अॅपलचे 4 मोठे निर्णय ज्यांनी घडवली स्मार्टफोन क्रांती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
आजपासून 14 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. अमेरिकेतल्या 'सिलिकॉन व्हॅली'मध्ये अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स स्टेजवर अवतरले आणि लोकांसमोर एक छोटंसं उपकरण सादर करत ते म्हणाले, "हे क्रांती घडवेल."
बऱ्याच अंशी, ते खरं ठरलं. ते उपकरण होतं पहिला आयफोन.
आयफोन काही इतिहासातला पहिलावहिला स्मार्टफोन नव्हता. त्याआधीही IBM, मोटोरोला आणि सोनी सारख्या कंपन्या असे फोन बनवून विकत होत्या. त्या फोनमुळे केवळ बोलणं किंवा मेसेजच नाही तर आणखी बरंच काही करणं शक्य होतं.
आयफोनची कल्पना आणि त्याची रचना ऐतिहासिक होती. त्याची काम करण्याची पद्धत इतकी अनोखी होती. या फोननं आज अनेकांची जीवनशैलीच बदलून टाकली आहे.
अहो तुमचंच उदाहरण घ्या ना, तुम्ही ती मोठमोठाली बटणं दाबून शेवटचा फोन कधी लावला होता हे आठवतं आहे का ? किंवा एक सामान्य कॅमेरा घेऊन पार्टीला, सहलीला शेवटचं कधी गेला होतात? म्युझिक सिस्टीमवर शेवटचं गाणं कधी ऐकलं होतं?
हल्ली तर लोक रस्त्यावर पत्ताही विचारत नाहीत, कारण सगळ्यांकडे गूगल मॅप्स आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण हा प्रवास अॅपलसाठी तितका सोपा नव्हता. आयफोन तयार करायला अनेक वाटाघाटी कराव्या लागल्या, अनेक अडचणी आल्या, कधी न घेतलेले अनेक निर्णय घ्यावे लागले.
1. फोन बनवायचा की नाही?
एक वेळ अशी होती की स्टीव्ह जॉब्स यांना त्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीतून काढून टाकण्यात आलं. पण त्यानंतर अॅपलची जणू साडेसातीच सुरू झाली. जॉब्स मात्र आपल्या नव्या कंपनी NeXT मध्ये यश संपादन करत होते.
1997 साली जेव्हा स्टीव्ह जॉब्स अॅपलमध्ये परतले, तेव्हा कंपनी आपल्या उदिद्ष्टापासून भरकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांच्या NeXT आणि अॅपलचं विलीनीकरण केलं आणि अॅपलला तोट्यात टाकणारे काही प्रकल्प बंद केले.
आणि कंपनीत थोडी शिस्त आणली. आता कुठलाही नवा प्रकल्प सुरू करायला जॉब्स यांचे आशिर्वाद लागायचेच.
त्यांना त्या काळचे मोबाईल फोन वापरायचा वैताग यायचा. "काय ही फालतू वस्तू!" असा त्यांचा राग होता खरा, पण त्यांना स्वत:ही फोन बनवायचा नव्हता. त्यांना म्युझिक इंडस्ट्रीत क्रांती घडवायची होती.
2001 साली त्यांनी अॅपलचा आयपॉड आणला. हे केवळ mp3 गाणी ऐकवणारं उपकरण होतं, आपल्या कॅसेटवाल्या वॉकमनचा पिटुकला डिजिटल अवतार.
पण त्यानंतर कालांतरानं आधुनिक स्मार्टफोन्समध्येही गाणी वाजवणं शक्य झालं. म्हणून आयपॉडचा अंतही जवळच होता की काय, अशी भीती स्टीव्हसह सगळ्यांनाच वाटू लागली. त्या भीतीपोटी स्टीव्ह यांनी मोटोरोलासोबत हातमिळवणी केली आणि Moto ROKR नावाचा फोन बाजारात आला. यात अॅपलची गाण्यांची अॅप, iTunes होती.

फोटो स्रोत, Getty Images
"मोटोरोलासोबत भागीदारी करून एक फोन काढणं अॅपलपुढे त्या क्षणाला सर्वोत्तम पर्याय होता. त्यानं काही काळ तरी आयपॉडचा अंत पुढे ढकलणं शक्य होतं," असं ब्रायन मर्चंट यांनी 2017 साली आलेल्या त्यांच्या 'The One Device: The Secret History of the iPhone' या पुस्तकात म्हटलं आहे.
अॅपलचे एक मोठे अधिकारी आणि "पॉडफादर" अर्थात 'आयपॉडचे जनक' टोनी फेडेल यांनी या पुस्तकात सांगितलं आहे, की "पहिले योजना हीच होती. लोकांची iTunesशी ओळख करवून द्यायची, आयपॉडची एक झलक दाखवायची, जेणेकरून ते मग आवर्जून वेगळा आयपॉडच विकत घेतील."

फोटो स्रोत, YOUTUBE
पण 2005 साली जेव्हा स्टीव्ह स्टेजवर लोकांसमोर Moto ROKR सादर करत होते, तेव्हाच त्या फोनमध्ये काहीतरी गडबड झाली. चिडलेल्या जॉब्सनी मग निर्धार केला, "आता बस्स! आपणंच आपला फोन बनवू."
प्रोजेक्ट पर्पल
आयफोन बनवण्याचे दोन मार्ग अॅपलमधल्या लोकांसमोर होते. पहिला मार्ग म्हणजे, आधीच लोकप्रिय असलेला आयपॉड घ्यायचा आणि त्यात कॉल करण्यासारख्या सुविधा टाकून आयफोन बनवायचा. "पॉडफादर" टोनी फेडेल यांच्या टीमने हा मार्ग अवलंबला. या टीमचं नाव होतं P1.
दुसरा पर्याय म्हणजे, एक नवा प्रयोग करून अशी मोठी पाटी बनवायची जिला केवळ बोटांच्या स्पर्शानेच हाताळता येईल. हा प्रयत्न P2 टीम करणार होती.
मर्चंट यांनी आपल्या पुस्तकात या दोन टीममधल्या संघर्षाचं सविस्तर वर्णन केलं आहे.
त्या काळच्या आयपॉडला एक चक्र होतं, जे फिरवून गाणी तुम्ही निवडू शकत होता. P1 टीमचा विचार होता की, या चक्रालाच आपण नंबर किबोर्डही बनवूया. म्हणजे फोन जेव्हा आयपॉड म्हणून वापरायचा असेल, तेव्हा त्या चक्राने गाणी बदलायची, आणि जेव्हा फोन लावायचा असेल, तेव्हा या चक्रावर आकडे दिसतील.
पण ही कल्पना फारच किचकट होती. एकाच बटणाचा वापर दोन कामांसाठी करण्याएवढी प्रगत बुद्धी माणसाची तेव्हा झाली नव्हती, असं सर्वांनाच अॅपलमध्ये वाटायचं.

फोटो स्रोत, YOUTUBE
त्याउलट, P2 टीमची कल्पना कुठेतरी आकार घेत होती, पण तो आकार खूप मोठा होता. एक मोठाली, सुटकेसएवढी टचस्क्रीन त्यांनी बनवली होती, जी मानवी स्पर्शाला उत्तर देत होती. याचा डेमो पाहून स्टीव्ह जाम खूश झाले. "यालाच आणखी छोटं करा. आपण याचा फोन बनवूया," असं ते उत्साहाने म्हणाले.
मग P2 टीमचे इंजिनिअर लागले कामाला. दिवस-रात्र एक करून, तहान-भूक विसरून त्यांनी अखेर ती सुटकेसएवढी टचस्क्रीन एका क्रेडिट कार्डच्या आकाराएवढी बनवली. आयफोन आकार घेऊ लागला होता.
किबोर्ड द्यायचा की नाही?
2006च्या जवळपास आधुनिक फोनमध्येही इंटरनेट वापरणं शक्य झालं होतं. अॅपलच्या आयपॉडमध्येही आता व्हीडिओ पाहणं, व्हीडिओ गेम खेळणं शक्य होतं. पण अॅपलला हा व्हीडिओचा अनुभव बदलायचा होता.
म्हणून किबोर्ड काढायचा की ठेवायचा, यावरच साधारण चार महिने वाद-विवाद झाले. फेडेल यांनी गेल्या वर्षी बीबीसीच्या डेव्ह ली यांना सांगितलं होतं, "एकदा जॉब्सनं किबोर्डसाठी हट्ट करणाऱ्यांना ठणकावून सांगितलं, 'किबोर्ड द्यायचा नाहीये, आणि हे ठरलंय. जोवर तुम्हाला हे पटत नाही, तोवर या खोलीत परत येऊ नका.' एकाला चक्क हाकलण्यात आलं आणि मग सर्वांनी ही गाठ मनाशी बांधून घेतली की आयफोनमध्ये किबोर्ड नसणार."

फोटो स्रोत, YOUTUBE
2007 साली आयफोन सादर करताना स्टीव्ह जॉब्स यांनी त्या काळचे चार मोठे स्मार्टफोन स्क्रीनवर दाखवले. त्यांच्या किबोर्डकडे लोकांचं लक्ष वेधत ते म्हणाले, "हे फोन चांगले आहेत, यात काही शंका नाही. पण त्यांच्यात अडचण येते ती हे किबोर्ड वापरताना. तुम्ही फोनवर कुठलंही काम करत असाल, कुठलीही ऍप सुरू असेल तरी हे प्लास्टिकचे किबोर्ड इथं असेच राहतात. काय गरज आहे?"
मग त्यांनी कुठलही बटण नसलेला एक पूर्ण काळी स्क्रीन असलेला फोन दाखवला आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुढे जाऊन या टचस्क्रीन तंत्रज्ञानानं अख्ख्या स्मार्टफोन विश्वाचा चेहरामोहरा पालटला, जो आपण आज पाहू शकतो.
बोटानं वापरायचं की काडीनं?
आधीच्या काही उपकरणांना चालवायला एक काडी लागायची, जिला स्टायलस म्हणतात. आताही काही फोन्ससोबत ही पेनसारखं काम करणारी काडी वापरली जाते. पण स्टीव्हचा या स्टायलसला ठाम विरोध होता. ते म्हणायचे, "एखादा फोन वापरताना तुम्हाला फक्त आपल्या बोटांची गरज असायला हवी, आणखी काही नाही."
पण टोनी फेडेलसारखे काही दिग्गज लोक केवळ तंत्रज्ञान समजायचे. ते बीबीसीला सांगतात, "स्टीव्ह जे म्हणत होता, ते तत्त्वत: बरोबर होतं. पण कल्पना करणं सोपं असतं, ते सत्यात उतरवणं अशक्यप्राय!"
"कधी ना कधी आम्हाला अशी कुठली काडी लागणारच होती. म्हणून आम्ही स्टायलससोबतच हा फोन बनवायचं ठरवलं, स्टीव्हच्या नकळत," असं त्यांनी बीबीसीच्या लींना सांगितलं होतं.
1993 साली, जेव्हा स्टीव्ह अॅपलमध्ये नव्हते, तेव्हा अॅपलनं एक अत्याधुनिक उपकरण बाजारात आणलं होतं, नाव होतं न्यूटन. हे एक टचस्क्रीन असलेलं उपकरण होतं, जे स्टायलसनेच वापरता यायचं.
'Steve Jobs: The Exclusive Biography' या चरित्रात लेखक वॉल्टर आयझॅकसन लिहितात - आपली सगळी बोटं उंचावून त्यांना वळवळत स्टीव्ह म्हणायचे, "देवानं आपल्याला आधीच दहा स्टायलस दिली आहेत. आपण आणखी एक का बनवायची?"
स्टीव्ह ठाम राहिले आणि आयफोन विना काडीच्या, केवळ बोटांनी चालवता येणारा फोन झाला. पण मजेची गोष्ट अशी की, जॉब्सचे उत्तराधिकारी आणि अॅपलचे सध्याचे CEO टीम कुक यांनी 2015 साली एक अॅपल पेन्सिल आणली होती.
अखेर आयफोन लाँच झाला
तब्बल दोन वर्षांची फरफट झाली, अनेक उच्च कोटीच्या डोक्यांचा अक्षरश: भुगा झाला, आणि अशक्य डेडलाइन्स पाळत अॅपलनं अखेर 2007च्या 9 जानेवारीला आयफोन लोकांसमोर आणला. त्या पहिल्या आयफोनमध्ये काही कमालीच्या, न भूतो अशा गोष्टी होत्या, जशा की...
- 3.5 इंचाचा मल्टीटच स्क्रीन, दोन बोटांच्या चिमट्यानं कुठलीही स्क्रीन झूम करता येत होतं
- फोनची जा़डी फक्त 11.6 मिलीमीटर, त्या काळच्या फोनच्या तुलनेत फारच कमीच
- iTunes म्युझिक प्लेयर
- 2 मेगापिक्सल कॅमेरा
- माणसाची त्वचा, आसपासची लाईट आणि फोन कसा धरलाय - उभा की आडवा - हे ओळखणारे सेन्सर
- नेमके सिलेक्ट करून वाचता येणारे व्हॉईसमेल
- Quad band GSM+EDGE
- वायफाय आणि ब्लूटूथ 2.0
- सफारी वेब ब्राऊझर
- गूगल मॅप्स
आणि शेवटी एक सांगायचं झालं तर, आयफोन लाँच करणारी अॅपल पहिली कंपनी नव्हती. 18 डिसेंबर 2006 रोजी सिस्को कंपनीने प्रथम या नावाचा फोन आणला होता. अर्थातच या फोनमध्ये तेव्हा इतकं काय विशेष नव्हतं. पण तो आयफोन होता, तेवढंच.
त्याच्या काही आठवड्यांनंतरच स्टीव्ह जॉब्स यांनी जगासमोर आयफोन आणला.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








