सोमालीलँडमध्ये आता बलात्कार ठरणार गुन्हा

फोटो स्रोत, Getty Images
इतिहासात पहिल्यांदाच स्वयंघोषित रिपब्लिक ऑफ सोमालीलँड या ठिकाणी बलात्कार करणं हा गुन्हा ठरणार आहे.
सोमालीलँडमध्ये बलात्कार पीडितेला गुन्हेगारासोबत लग्न करण्यास भाग पाडलं जात असे. या जाचक प्रथेविरुद्ध सोमालीलँडमध्ये कायदा मंजूर करण्यात आला आहे.
सोमालियाचा भाग असलेल्या सोमालिया लॅंडनं 1991मध्ये स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं आहे. सोमालियात अजूनही बलात्कारविरोधी कायदा अस्तित्वात नाही.
या नव्या कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्हेगाराला तीस वर्षांची शिक्षा होणार आहे.
सोमालीलॅंडच्या संसदेचे अध्यक्ष बाशे मोहम्मद फराह यांनी बीबीसीला सांगितलं, "गेल्या काही वर्षांमध्ये बलात्कारांच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. या नव्या कायद्यामुळे अशा प्रकारांना आळा बसेल अशी आशा आहे."
"सध्या सामूहिक बलात्काराचं प्रमाणही वाढले आहे. बलात्काराचं प्रमाण पूर्णपणे थांबलं पाहिजे असा या कायद्याचा उद्देश आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.
महिला आणि बालहक्क कार्यकर्त्यांनी ही गेल्या काही वर्षांपासून या कायद्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळेच या कायद्याची निर्मिती करण्यात आली असं म्हटलं जात आहे.
या नव्या कायद्यामुळे स्वयंघोषित रिपब्लिक ऑफ सोमालीलॅंडकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलेल. तसंच या देशात लोकशाही जिवंत आहे आणि संस्थात्मक पातळीवर चांगलं काम होत आहे, असा संदेश यामुळे जगात जाईल असं बीबीसीच्या प्रतिनिधी अॅने सोय यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









