भीमा कोरेगाव : 'मी मुंबईत रस्त्यावर उतरले कारण...'

फोटो स्रोत, NEHALI UPSHAM/FACEBOOK
- Author, नेहाली उपशाम
- Role, प्रत्यक्षदर्शी आणि निदर्शक
मी नेहाली उपशाम. मुंबईच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मी कामाला आहे. लहानपणापासूनच मी दरवर्षी भीमा कोरेगावला भेट देत आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी विजयस्तंभाचं दर्शन घेऊन मला ऊर्जा मिळते.
माझं सासर भीमा कोरेगाव आहे आणि त्यामुळेच या गावाशी माझं जवळचं नातं आहे.
भीमा कोरेगावला भारतीय इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे. इथंच 'शूद्रां'नी त्यांच्यावर होणाऱ्या जातीय अत्याचाराविरोधात लढा दिला होता. या लढाईला 1 जानेवारी 2018ला 200 वर्षं पूर्ण होत होती. म्हणून पुण्यात त्याच्या उत्सवाची तयारी दोन दिवसांपूर्वीच सुरू झाली होती.
आम्ही 'रणरागिणी' या संस्थेमध्ये चळवळीत काम करणाऱ्या महिलांना एकत्र आणण्याचं काम गेल्या तीन वर्षांपासून करत आहोत. यंदाही या उत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही 1 जानेवारीला पहाटेच भीमा कोरेगावात पोहोचलो होतो.
तिथं विजयस्तंभाच्या मागे असलेल्या मैदानावर आम्ही स्टॉल लावला. पण काही वेळानं तिथली सगळी दुकानं, फार्मसी, हॉटेलं अचानक बंद होऊ लागली.
काहीतरी वेगळं घडत आहे असा आम्हाला संशय आला. कारण यापूर्वी असं कधी बघितलं नव्हतं.
विजयस्तंभापासून एक किलेमीटर अंतरावर असलेल्या पार्किंगमध्ये आमची इनोव्हा गाडी होती. गाडीतून आम्ही काही सामानाचे खोके स्टॉलवर घेऊन जाण्यासाठी बाहेर काढताना दोन माणसं आमच्याकडं आली. "तुम्ही स्टॉल लावू शकत नाही," असं त्यांनी आम्हाला धमकावलं.
पण आम्ही महिलांनी या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं आणि आमच्या स्टॉलकडे निघून गेलो.
आगीचा कल्लोळ दिसू लागला!
त्यानंतर तासाभरात आमच्या लक्षात आलं की आमचे फोन काम करत नव्हते. मग आम्हाला भीमा नदीच्या पलीकडून आगीचा कल्लोळ दिसू लागला.

तितक्यात आमच्या गाडीकडे चक्कर टाकायला गेलेला माझा दीर धावत-धावत आला. त्यानं सांगितलं की, "कुणीतरी आपल्या गाडीची तोडफोड केली आहे, सगळ्या काचा फोडल्या आहेत. जवळपास दीडशेहून अधिक लोकांचा घोळका, हाती भगवे झेंडे घेऊन येत आहेत. मी कसाबसा त्यांच्या तावडीतून आपला जीव वाचवून आलोय."
आम्ही बाहेर आलो तेव्हा सगळीकडे गोंधळ उडाल्याचं दिसत होतं. लोक इकडंतिकडं पळत होते.
आम्ही काही विचार करायच्या आतच समोरून तलवारी हातात घेतलेला लोकांचा गट आमच्यावर धावून आला. बाजूलाच पोलीस होते, पण आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण द्यायचं सोडून पोलिसांनी उलट आमच्यावरच लाठीचार्ज सुरू केला.
तिथल्या प्रत्येक घराच्या बाल्कनीत दगडांनी भरलेल्या थैल्या आधीच होत्या. त्या घरांमधल्या स्त्रिया दगडं जमावाच्या दिशेनं फेकत होत्या. तेवढ्यात एक म्हातारा माणूस तिथं आला आणि त्याने एक मोठा दगड अशोक चक्राचं चिन्ह असलेल्या व्हॉल्वो बसवर फेकला.
त्या जमावाने आमच्या चार एकर उसाच्या शेतीला आग लावली. आमच्या बुद्धविहारात घुसून त्यांना जे काही समोर दिसलं ते तोडायला सुरुवात केली.
आम्ही माग तिथंच थांबलो... जमाव शांत होण्याची वाट बघत. आम्हाला पुलापलीकडच्या गावात प्रवेश करायचा होता. तितक्यात तिथले गावकरी आमच्यासमोर आले आणि म्हणाले, "तुम्ही आमच्या गावात येऊ नका. नाहीतर ते आमचीही घरं जाळतील."

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR
आम्ही तिथून पळालो. कोणतीही वाहतूक व्यवस्था नसताना, आम्ही कसंबसं भीमा कोरेगावपासून चार किलोमीटर दूर चालत गेलो.
...म्हणून केली निदर्शनं
भीमा कोरेगावात आमच्यासोबत जे घडलं, त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतराव लागलं. निःशस्त्र भीमानुयायांवर लोकांनी हल्ला केला. तो फसवण्याचा डाव होता. तो कुणी केला, हे मला माहीत नाही. पण तो ज्यांनी केला, त्यांना शासन झालंच पाहिजे.
म्हणून मुंबईत झालेल्या आंदोलनात मी सहभागी व्हायचं ठरवलं. तिथं रस्त्यावर जमा झालेले सगळे वेगवेगळ्या कारणांसाठी तिथं होते. माझ्यासारखे काही जण न्यायासाठी रस्त्यावर उतरले होते, तर काही जण वैयक्तिक स्वार्थासाठी आवाज काढत होते.
आम्ही शांततेत निदर्शनं केली. आंबेडकरवादी व्यक्ती तोडफोड करू शकत नाही. आणि जर एखाद्याने केली असेल, तर कुणाही व्यक्तीला लागणार नाही याची काळजी घेतली असेल, याची मला खात्री आहे.
सोशल मीडियावरचे टोमणे
माझ्यासाठी भीमा कोरेगावात प्रत्यक्ष घडलेल्या घडलेल्या प्रसगांपेक्षाही दुर्दैवी होतं सोशल मीडियावर त्या संघर्षावरून सुरू झालेली चर्चा.
कुणालाही पेशवे आणि 'शूद्रां'च्या इतिहासाबद्दल माहिती नव्हतं. अनेक मित्रांनी मला बोलण्यासाठी डिवचलं. अनेकांनी मला असं हिणवलं, जणू काही माझं अस्तित्व फक्त माझ्या जातीपुरतंच मर्यादित आहे, मी माणूसच नाहीये.

काही जण आम्हाला म्हणत होते की, "त्यांच्यासोबत असंच घडलं पाहिजे कारण आरक्षणामुळे त्यांची प्रगती झाली आहे. आम्ही कर भरतो आणि हे लोक त्याचा फायदा घेतात. मग हे लोक ब्रिटनमध्ये जाऊन आरक्षणाची भीक का मागत नाहीत?"
आमच्यासाठी हे टोमणे काही नवीन नाही, कारण लहानपणापासूनच आम्ही हे ऐकत आलो आहोत. जेव्हाही जातीय हिंसाचार होतो, कुणावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो, तेव्हा ते आम्हाला असलेल्या आरक्षणाला दोष देतात.

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR
मला त्या सर्वांना हे विचारायचं आहे, आम्ही माणूस नाही का हो? आम्हीही त्याच हवेत श्वास घेतो, तुम्ही जे खाता, तेच खातो. आमच्याही अंगात तेच रक्त आहे, जे तुमच्या शरीरात धावतं. मग आमच्याबद्दल इतका राग का? इतकं वैर का? हे सगळं करून तुम्हाला खरंच काय मिळणार आहे?
आता भीमा कोरेगावची घटना घडून आठवडा होत आलाय. पण ती हिंसा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आता हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. न्याय मिळेपर्यंत आता आम्ही शांत बसणार नाही.
हेही वाचलंत का?
तुम्ही हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









