भीमा कोरेगाव प्रकरण : कोण आहेत मिलिंद एकबोटे?

फोटो स्रोत, FACEBOOK/MILIND EKBOTE
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पुण्यात एट्रॉसिटी आणि दंगल भडकावणं या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.
पण या प्रकरणानंतर कायम वादांमध्ये असलेली महाराष्ट्रातली ही दोन नावं पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेत आली आहेत.
अनेक संस्था-संघटनांचे संस्थापक वा सदस्य असणारे मिलिंद एकबोटे यापूर्वीही अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. हिंदुत्ववादी विषयांची आक्रमकपणे मांडणी करणाऱ्या एकबोटेंवर यापूर्वीही काही प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत.
'हिंदुत्व मुख्य लक्ष्य'
हिंदुत्ववादी आंदोलनांसोबतच निवडणुकीच्या राजकारणातही त्यांनी ताकद आजमावायचा प्रयत्न केला आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, एकबोटेंचं मुख्य लक्ष्य राजकारणापेक्षा हिंदुत्वच आहे. त्याच्या आधारे जे पक्ष त्यांना जवळ करू शकतात, म्हणजे फक्त भाजप आणि शिवसेना, त्यांच्याकडे त्यांनी संधी मागितली.

फोटो स्रोत, FACEBOOK/MILIND EKBOTE
1997 ते 2002 या दरम्यान एकबोटे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यानंतरही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा अनेकदा प्रयत्न केला.
2014 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी पुण्याच्या शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. त्याअगोदर त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती, पण ती नाकारण्यात आली.
पण राजकारणापेक्षा कट्टर हिंदुत्ववादाचा चेहरा, अशीच त्यांची ओळख समजली जाते. सध्या 'समस्त हिंदू आघाडी' अशी एक संघटना ते पुण्यात चालवतात. ज्यामध्ये अनेक संघटनांचा अंतर्भाव आहे.
साताऱ्यात होती प्रवेशबंदी
एकबोटे सर्वप्रथम चर्चेत आले जेव्हा त्यांनी 'प्रतापगड उत्सव समिती' स्थापन करून प्रतापगडजवळील अफझलखानाच्या कबरीपाशी चालणाऱ्या कार्यक्रमांविरोधात आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामुळे काही काळ एकबोटे यांच्यावर सातारा जिल्ह्यात बंदीही करण्यात आली होती.

फोटो स्रोत, FACEBOOK/MILIND EKBOTE
पुण्यामध्ये जेव्हा लाल महालात दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून वाद सुरू झाला, तेव्हा त्यात उडी घेत एकबोटे यांनी पुतळ्याच्या बाजूने भूमिका घेतली होती. त्याशिवाय 'संस्कृतीचं रक्षण' म्हणून 'व्हेलेंटाइन्स डे'ला विरोध केला होता.
एकबोटे आणि त्यांचे कार्यकर्ते गोरक्षणाच्या अनेक आक्रमक आंदोलनांमुळे कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांनी 'अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ' सुद्धा स्थापन केला आहे, ज्याअंतर्गत गाईंना कत्तलीपासून वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतात.
याशिवाय 'क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठान', 'खाशाबा जाधव प्रतिष्ठान' अशा संस्थाही त्यांनी स्थापन केल्या आहेत.
मिलिंद एकबोटे यांना पोलीस संरक्षणही देण्यात आलं आहे. त्यांच्या वहिनी ज्योत्स्ना एकबोटे सध्या पुणे महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत. तर त्यांचे भाऊ डॉ. गजानन एकबोटे हे पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळातलं मोठं नाव आहे.
भीमा कोरेगांव प्रकरणानंतर गुन्हा दाखल झाल्यावर 'समस्त हिंदू आघाडी'ने प्रसिद्धीला दिलेल्या दुसऱ्या पत्रकात म्हटलं आहे की, "1 जानेवारी रोजी कोरेगांव भीमा इथं घडलेल्या घटनेशी मिलिंद एकबोटे यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. मिलिंद एकबोटे यांचे नाव या साऱ्या प्रकरणात जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने गोवण्यात आले आहे."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








