रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश ही भाजपसाठी नवीन संधी?

फोटो स्रोत, Twitter
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
मेगास्टार रजनीकांत यांना राजकारणात यश मिळालं तर त्यांचा हा निर्णय तामिळनाडूच्या पन्नास वर्ष जुन्या राजकारणाची दिशा बदलणारा असेल.
गेली दोन दशकं आजउद्या करता करता रजनीकांत यांनी "ही वेळ राजकीय बदलाची आहे," अशी घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या आणि द्रविड राजकारणाचा विरोध करणाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
जे. जयललिता यांनी एकहाती तामिळनाडूत सत्ता गाजवली. त्यांच्यासमोर अनेकदा केंद्र सरकारलासुद्धा मान तुकवावी लागली. त्यांच्या निधनानंतर कमल हासन आणि रजनीकांत यांच्या राजकारणाच्या प्रवेशाला आगळंवेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
अनियंत्रित सत्तासंघर्ष
"जयललिता आणि रजनीकांत यांच्यात चित्रपट हा समान धागा आहे. द्रविड राजरकारणातून पुढे आलेल्या जयललितांची जागा रजनीकांत घेतील असं मानायला जागा नाही."
"जयललिता यांच्या निधनानंतर द्रविड राजकारण विस्कळीत झालं आहे. या राजकारणाचा स्तर सध्या खालावला आहे," असं ज्येष्ठ विश्लेषक बी. आर. पी. भास्कर यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.
जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्ही. के. शशिकला आणि पलानीस्वामी- पन्नीरसेल्वम या दोन गटात मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे.
"AIADMK चं विभाजन आणि जयललितांचं निधन यामुळे रजनीकांत यांना राजकारणात प्रवेश करण्याची उत्तम संधी चालून आली आहे," असं राजकीय विश्लेषक के. एन. अरुण यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP
द्रविड राजकारणाच्या दुसऱ्या टोकाला DMK चे सर्वेसर्वा एम. करुणानिधी आहेत. कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या जयललितांच्या निधनानंतर करुणानिधी यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे द्रविड राजकारणाची धुरा करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या खांद्यावर आली आहे.
पण स्टॅलिन यांचा भाऊ एम. के. अळगिरी अचानक सक्रिय झाल्यामुळे स्टॅलिन यांच्यासमोरच्या अडचणींत वाढ झाली आहे.
"स्टॅलिन यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत, पण द्रविड राजकारणाचे वारसदार म्हणून त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलं आहे. आता द्रविड राजकारण कुठल्या दिशेनं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चित्रपट कलाकर हे मैदान गाजवू शकतील की नाही हे येणारा काळच सांगेल," असं भास्कर सांगत होते.
भाजपला संधी
भाजप तामिळनाडूत पाया मजबूत करण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यातच रजनीकांत यांनी राजकारण आणि अध्यात्म यांचा उल्लेख केल्यानं भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पण अरुण यांना याचं आश्चर्य वाटलं नाही.
"रजनीकांत हे अध्यात्मिक आहेत. द्रविड संस्कृती असूनसुद्धा तामिळनाडूत अध्यात्माचा प्रभाव आहे. भाजपनं अजूनही त्या आघाडीवर फारसं लक्ष दिलेलं नाही. कदाचित रजनीकांत ते करू शकतील," असं अरूण यांना वाटतं.
"पण रजनीकांत यांना संपूर्णपणे त्यांच्या चाहत्यांवर विसंबून राहता येणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे. त्यांचे चाहते त्यांच्या पक्षाचा महत्त्वाचा भाग असतील, पण राजकीय समन्वयासाठी त्यांना राजकारणी लोकांचीच गरज लागणार आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तरी त्यांना त्याची गरज पडेल," अरुण पुढे बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images
रजनीकांत विधानसभेच्या सर्व म्हणजेच 234 जागा लढवणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी करायला त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्याची त्यांची कोणतीही योजना नाही.
थोडक्यात मेगास्टारचा राजकारण प्रवेश म्हणजे त्याचा नवीन चित्रपट येण्यासारखं आहे. दोन्ही बाबतीत अनिश्चितता आहे. जसा चित्रपट हिट होतो किंवा दणकून आटपतो त्याचप्रमाणे राजकारण्यांचं भविष्यसुद्धा निवडणूक केंद्रांवर एका क्षणात बदलू शकतं.
पण जर चित्रपटक्षेत्राप्रमाणेच राजकारणात सुद्धा रजनीकांत मेगास्टार झाला तर पन्नास वर्षं जुना द्राविडी राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








