गुगलवर 2017 मध्ये या गोष्टी सर्वांत जास्त शोधल्या गेल्या

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

गुगलवर 2017 मध्ये ज्या गोष्टी शोधल्या गेल्या त्यावरून या वर्षांत काय घडलं याचा पट तयार होतो. आण्विक युद्धाच्या टोकावर पोहोचलेल्या जगाचं रूप आपल्याला या वर्षात दिसलं, तर इंटरनेटवरच्या ऑनलाईन करन्सीमुळे काही जण रातोरात श्रीमंतही झाले.

महत्त्वाची बाब म्हणजे, 2017 मध्ये आपल्या कार्यालयांमध्ये पुरुषांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात अनेक महिलांनी आवाज उठवला. यामुळे हॉलीवूडमधले 'बाहुबली' चित्रपट निर्माते हार्वे वाईनस्टाईन यांचा या कृत्यांमधला सहभाग उघड झाला. यानं वाईनस्टाईन यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली.

या वर्षी अमेरिकन टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला गुगलवर सर्वाधिक शोधलं गेलं आणि दर वर्षीसारखंच एक भन्नाट गाणं जगाच्या ओठांवरच नव्हे, तर कीबोर्डच्या मार्फत गूगल सर्चमध्येही ट्रेंड झालं.

बीबीसीनं गुगलवर 2017 मध्ये गाजलेल्या अशाच काही गोष्टींचा धांडोळा घेतला आहे. यातून 2017 मध्ये चर्चेत राहिलेल्या घडामोडींचा घटनाक्रम आपल्याला पाहता येणार आहे.

1. मेगन मार्कल : गुगलवर सर्वाधिक शोधली गेलेली अभिनेत्री

एक वेळ अशी होती की मेगन मार्कल ही रेचल झेन या नावानं ओळखली जायची. ते तिचं 'सूट्स' या गाजलेल्या अमेरिकन मालिकेतलं नाव. यात ती वकिलाच्या सहाय्यकाची भूमिका साकारते.

पण तिचं प्रिन्स हॅरीसोबत सूत जुळल्यानंतर नुकतंच नोव्हेंबरमध्ये या जोडीनं आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. तिनं संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी प्रकल्पांमध्ये महिलांसाठी काम केलं आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल
फोटो कॅप्शन, नव्या वर्षात 19 मे रोजी मेगन मार्कल प्रिन्स हॅरीसोबत विवाहबद्ध होणार आहे.

मेगन आणि प्रिन्स यांच्या लग्नाच्या निर्णयामुळे अनेक जण अचबिंत झाले. कारण प्रथमच ब्रिटीश राजघराण्यात मिश्रवंशीय व्यक्ती अधिकृतरीत्या सहभागी होणार आहे.

ही बातमी बाहेर पडल्यावर या जोडप्याला सामान्य जनतेपासून इंग्लंडच्या राणी आणि प्रिन्स फिलीप ते कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या.

मात्र अनेकांना मेगन मिश्रवंशीय असल्याबद्दल सर्वाधिक कुतूहल असल्याचं दिसलं. मेगनचे वडील श्वेतवर्णीय असून तिची आई आफ्रिकी-अमेरिकी वंशाची आहे. तसंच ज्या भागात ती लहानाची मोठी झाली तो भाग पूर्वीपासूनच वांशिक संघर्षाच्या घटनांसाठी ओळखला जातो.

एका वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, मेगन लॉस एंजेलिसमधल्या अत्यंत साध्या आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून पुढे आली आहे. मात्र मेगनवर माध्यमांतून होणाऱ्या वांशिक टीकेमुळे त्याविरोधात प्रिन्स हॅरी जोरदार बाजू मांडणारं वक्तव्य करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या पलीकडेही मेगनची एक वेगळी ओळख आहे. लैंगिक समानतेच्या प्रसारासाठी संयुक्त राष्ट्रांची प्रतिनिधी म्हणून ती कार्यरत आहे. तसंच कॅनडातल्या वर्ल्ड व्हिजनची आंतरराष्ट्रीय दूत म्हणून ती काम पाहत आहे. ज्यात ती उत्तम शिक्षण, अन्न आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी प्रबोधनाचं काम करत आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल येत्या 19 मे रोजी विवाहबद्ध होणार आहे.

2. हार्वे वाईनस्टाईन : चौथी सर्वाधिक शोधली गेलेली व्यक्ती

5 ऑक्टोबर 2017ला न्यूयॉर्क टाइम्सनं एक बातमी प्रसिद्ध केली, ज्यात हॉलीवूडमधले मोठे चित्रपट निर्माते हार्वे वाईनस्टाईन यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आले होते.

अनेक महिलांनी गेल्या दशकभरात हार्वेंकडून झालेल्या लैंगिक शोषणची कैफियत या बातमी मांडली होती.

सुप्रसिद्ध अभिनेत्री अॅश्ले जुडस आणि रोझ मॅकगोवन यांच्यासह 15 महिलांनी हार्वे वाईनस्टाईनवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याचं या बातमीत म्हटलं होतं. या बातमीनंतर अनेक महिलांनी पुढे येत वाईनस्टाईन यांनी त्यांच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात वाचा फोडली.

हार्वे विनस्टीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक महिलांनी पुढे येत हार्वे विनस्टीन यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली.

वाईनस्टाईन यांनी अत्याचार आणि बलात्कार केलेल्या घटनांची संख्या नंतर वाढतच गेली. सलमा हाएक, मिरा सॉरविनो, ग्वेन्थ पॅल्ट्रो, अँजेलिना जोली, कॅरा डिलीविन, लुपिता निआँगो या आघाडीच्या अभिनेत्रींनीही पुढे येऊन मौन तोडलं.

तीन दिवसांनंतर, वाईनस्टाईन यांना त्यांच्याच वाईनस्टाईन कंपनीनं संचालक म्हणून काढून टाकलं.

वाईनस्टाईन यांचं या आरोपांमुळे खच्चीकरण झाल्यानंतर हॉलीवूडमधल्या अनेक दिग्गजांविरोधात, राजकीय नेत्यांविरोधात, मोठ्या कंपन्यांच्या संचालकांविरोधात महिलांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली.

या लोकांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत या महिलांची लैंगिक पिळवणूक केली होती.

यात अभिनेता केविन स्पेसी, विनोदी अभिनेता लुईस सीके, खासदार अल फ्रँकेन, दिग्दर्शक ब्रेट रॅटनर आणि टीव्ही अँकर चार्ली रोझ, मॅट लाऊर आदींचा समावेश आहे.

यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर #MeToo या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडियावर एक मोठं आंदोलनच उभं राहिलं. या हॅशटॅगचा वापर करत हजारोंच्या संख्येनं महिलांनी सोशल मीडियावर लैंगिक अत्याचारांची व्यथा मांडली.

यामुळे हॉलीवूडमध्ये आजवर राहिलेलं गुपित जगासमोर उघड झालं.

3. उत्तर कोरिया : चौथा सगळ्यांत जास्त शोधला गेलेला आंतरराष्ट्रीय शब्द

किम जोंग-ऊन यांनी "Dotard" हा इंग्रजी शब्द पुन्हा चर्चेत आणला. कारण हा शब्द त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना उद्देशून वापरला होता.

कारण ट्रंप यांनी किम जोंग-ऊन यांच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत टीका करताना "Rocket Man" हा शब्द वापरला होता.

उत्तर कोरियानं या वर्षांत अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यामुळे दोन्ही देशांत अशा शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या.

किम जोंग-ऊन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग-ऊन

या वर्षीच्या 28 नोव्हेंबरला हॉसाँग या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियानं केली होती. या क्षेपणास्त्रानं आजवरची सर्वाधिक उंची म्हणजेच 4,475 किलोमीटरचं अंतर गाठत 1000 किलोमीटरचा पल्ला गाठला. या दाव्याला तज्ज्ञांनी मात्र दुजोरा दिलेला नाही.

हे क्षेपणास्त्र जपानाच्या आकाशातून पुढे गेल्यानं खळबळ उडाली होती. या चाचणीमुळे उत्तर कोरियाविरोधात आंतरराष्ट्रीय वर्तुळात मोठी टीका झाली.

तसंच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तात्काळ बैठकही या मुद्द्यावर झाली. अमेरिकनं उत्तर कोरियाशी इतर राष्ट्रांनी राजनैतिक संबंध तोडावे, असं आवाहनही केलं होतं.

अमेरिकनं विशेषतः उत्तर कोरियाला तेल पुरवठा करणाऱ्या चीनला हे आवाहन केलं होतं.

4. डेसपासिटो : सर्वाधिक शोधलं गेलेलं गाणं

जानेवारी 2017 मध्ये डेसपासिटो हे गाणं प्रदर्शित झालं. त्यानंतर तीन महिन्यांनी गायक जस्टिन बिबर या गाण्याचं रिमिक्स करण्याच्या प्रक्रियेत आला आणि त्यानं वापरलेल्या पॉप ट्यूननं हे गाणं लोकप्रिय झालं.

बिबरच्या यातल्या सहभागाचं कौतुक झालं तसंच समीक्षाही झाली. मात्र या स्पॅनिश गाण्याच्या लोकप्रियतेत त्यामुळे काही फरक पडला नाही.

Picture of Luis Fonsi and Daddy Yankee लुईस फाँसी आणि डॅडा यांकी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लुईस फाँसी आणि डॅडा यांकी यांनी 2017 मधलं हे गाजलेलं गाणं गायलं.

युट्यूबवर या गाण्याचा व्हीडिओ 4.5 अब्ज लोकांनी पाहिला आहे. तसंच विवोच्या म्युझिक व्हीडिओ विभागातला हा सर्वाधिक पाहिलेला व्हीडिओ ठरला.

Billboard.com या वेबसाईटनं या गाण्यांचे शब्दही सगळ्यांत लोकप्रिय ठरल्याचं जाहीर केलं. या गाण्याला मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांसाठीचं नामांकन मिळालं आहे.

5. बिटकॉईन : सर्वाधिक शोधला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा जागतिक शब्द

या डिसेंबरमध्ये बिटकॅाईन या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चलनाची किंमत 1000 डॉलरवरून 19,000 डॉलरच्या घरात गेली होती. ही किंमत सध्या घसरत असली तरी जागतिक अर्थव्यवस्थेत बिटकॉईन, हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

बिटकॅाईन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या डिसेंबरमध्ये बिटकॅाईन या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चलनाची किंमत 1000 डॉलरवरून 19,000 डॉलरच्या घरात गेली होती.

बिटकॉईनचं आकर्षण वाढल्यानं अनेकांनी त्याची खरेदी करण्यास सुरुवात केली. भारतात एका जोडप्यानं लग्नासाठी आहेरात बिटकॅाईन देण्यात यावेत अशी विनंती केली होती.

बिटकॉईन हे इंटरनेटवरचं चलन असून ते आभासी स्वरुपात उपलब्ध असतं. कोणतीही बँक आणि सरकारी यंत्रणेकडून हे चलन अधिकृतरित्या स्वीकारलं जात नाही.

6. स्ट्रेंजर थिंग्स : सगळ्यांत जास्त शोधला गेलेला टीव्ही शो

या टीव्ही कार्यक्रमानं इंटरनेटकरांना अक्षरशः वेड लावलं होतं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्याच्या 24 तासांतच हा कार्यक्रम सर्वाधिक पाहिला गेला.

1980च्या काळावर ही टीव्ही मालिका आधारलेली आहे. एका शांत नगरात चौघा लहान मुलांचा एक ग्रूप असतो. अचानक त्यांचातला एक मुलगा हरवतो. आणि त्यापाठोपाठ त्या नगरातले काही लोकही गायब होतात.

मग त्यांना इलेव्हन नावाची एक लहान रहस्यमय मुलगी भेटते, जिच्याकडे काही चमत्कारीक शक्ती असतात. आणि हे सर्व मिळून त्या बेपत्ता मुलाला शोधून काढतात.

स्ट्रेंजर थिंग्स टीव्ही मालिकेतील अभिनेते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्याच्या 24 तासांतच स्ट्रेंजर थिंग्स हा टीव्ही कार्यक्रम सर्वाधिक पाहिला गेला.

'स्ट्रेंजर थिंग्स'ला अनेक पुरस्कार मिळाले असून अॅमी पुरस्कारांसाठी 18 नामांकनं मिळाली आहेत. या टीव्ही मालिकेनं सगळ्यांच्याच अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.

या मालिकेचं गूढ कथानक आणि जुन्या काळातल्या घटनांचा पट हे लोकप्रियतेचं कारण समजलं जातं.

7. iPhone X : ग्राहकांनी सर्वांत जास्त शोधलेला शब्द

नोव्हेंबर महिन्यात अनेक जण भरपूर दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एका मोबाईलसाठी दुकानांच्या रांगेत उभे दिसले. कारण त्यांना 1000 डॉलरचा iPhone X विकत घ्यायचा होता.

सिंगापूर ते लंडन, जपान ते सॅन फ्रान्सिस्को अशा सगळ्याच ठिकाणी या मोबाईलसाठी खूप उत्साह आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिसला. यामुळे अॅपलच्या या मोबाईलचा खप 12 टक्क्यांनी वाढला तर कंपनीचं समभाग मूल्य 2 टक्क्यांनी वधारलं.

आयफोन वापरकर्त्या महिलेचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अॅपलच्या आयफोन एक्स मोबाईचा खप 12 टक्क्यांनी वाढला तर कंपनीचे शेअर मूल्य त्यामुळे 2 टक्क्यांनी वधारले.

या नव्या iPhoneचं लॉक तुमचा चेहराच उघडू शकतो. आणि यात प्रथमच होमचे मधले बटण नाही.

चीनमध्ये या मोबाईलचा खप वाढला असून अॅप स्टोअरवरून या मोबाईलची सर्वाधिक खरेदी झाली आहे. तसंच यानंतर अॅपलच्या सर्वच उत्पादनांची मागणीही वाढली असल्याचं अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी सांगितलं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)