#Feminism : लैंगिक समानतेचा लढा कसा ठरला वर्ड ऑफ द इयर 2017?

फोटो स्रोत, Getty Images
फेमिनिझम या शब्दानं ऑनलाइन सर्चमध्ये एवढी उचल घेतली की मेरियम-वेबस्टर डिक्शनरीने त्याला 'वर्ड ऑफ द इयर 2017'चा बहुमान दिला.
महिलांनी काढलेले मोर्चे, महिलांच्या प्रश्नांशी निगडित टीव्हीवरील नवीन कार्यक्रम आणि सिनेमे, तसंच लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या बातम्या, लैंगिक छळाचे दावे यामुळे 'फेमिनिझम' या शब्द सतत चर्चेत राहिल्याचं 'मेरियम-वेबस्टर'नं म्हटलं आहे.
हा शब्द शोधणाऱ्याचं प्रमाण 2016 पेक्षा 70 टक्क्यांनी वाढलं आहे, असं 'मेरियम-वेबस्टर'नं सांगितलं.
'फेमिनिझम'चा डिक्शनरीतला अर्थ, "राजकीय, आर्थिक आणि सामाजिक लिंग समानतेचा सिद्धांत" असा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात, महिलांचे हक्क आणि हितसंबंध यांच्यासाठी केलेली संघटित कृती, यांचाही समावेश होतो.
डोनाल्ड ट्रंप यांच्या 2005 मधील वादग्रस्त विधानाचा संदर्भ देत जानेवारी महिन्यात वॉ़शिंग्टनमध्ये महिलांनी मोर्चा काढला.
तसेच मोर्चे जगभरातल्या शहरांमधून निघाले. या घटनेनं 'फेमिनिझम'बद्दलच्या चर्चेनं उचल घेतली.
ट्रंप यांच्या व्हाईट हाऊसमधील निवडीमुळे महिलांचे हक्क संकटात आल्याचा या मोर्च्यांच्या आयोजकांचा दावा होता.
फेब्रुवारीत, 'व्हाईट हाऊस'च्या सल्लागार केलीन कॉनवे यांनी आपण स्त्रीवादी नसल्याचं म्हटलं आणि पुन्हा या शब्दाची चर्चा वाढली.
एका कार्यक्रमात बोलताना, केलीन कॉनवे म्हणाल्या, "स्वत:ला स्त्रीवादी म्हणणं मला अवघड वाटतं कारण मी पुरुषविरोधी नाही आणि गर्भपाताचा हक्क हवाच असंही मला वाटत नाही."
त्या म्हणाल्या, "स्त्री म्हणजे परिस्थितीची शिकार झालेली लाचार व्यक्ती नसून तिनं निवडलेली स्वतंत्र अभिव्यक्ती असते, याला कॉन्झर्वेटिव्ह फेमिनिझम म्हणजे पुराणमतवादी स्त्रीवाद म्हटलं जातं."

फोटो स्रोत, Getty Images
मार्गारेट अॅटवूड यांच्या 'हॅण्डमेड्स टेल' या कादंबरीवर आधारित सुरू झालेली टीव्ही मालिका आणि 'वंडर वुमन' हा सिनेमा यांच्यामुळे पुन्हा एकदा 'फेमिनिझम'च्या चर्चेनं जोर धरल्याचं 'मेरियम-वेबस्टर'नं म्हटलं आहे.
"हा शब्द सगळीकडेच चर्चेत होता," असं 'मेरियम-वेबस्टर'चे संपादक पीटर सोकोलोव्स्की यांनी म्हणतात.
त्याला #MeToo या चळवळीमुळे आणखी जोर मिळाला. हॉलिवूडमधल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फुटल्यानंतर लाखो महिलांनी त्यांना आलेले लैंगिक अत्याचाराचे अनुभव जाहीरपणे मांडण्यास सुरुवात केली.
या #MeToo या चळवळीच्या पार्श्वभूमीवर टाइम साप्ताहिकानं "द सायलन्स ब्रेकर्स" - लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवलेल्या महिला आणि पुरुष यांना 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून गौरवलं.

फोटो स्रोत, TIME
'टाइम'नं त्यांच्या मुखपृष्ठावर, लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या पाच महिलांचे फोटो प्रसिद्ध केले. त्या पाचपैकी दोघी सेलेब्रिटी आहेत. त्याच वेळी, या मोहिमेत अनेकांनी सहभाग घेतल्याची नोंदही 'टाइम'नं केली.
दुसरा, सर्वाधिक चर्चेत राहिलेला शब्द ठरला, 'कम्प्लिसिट' - Complicit. डोनाल्ड ट्रंप यांनी FBIचे संचालक जेम्स कॉमी यांना काढून टाकल्यावर आलेल्या बातमीत हा शब्द वापरण्यात आला होता. ट्रंपकन्या इव्हांका यांनी या शब्दाचा अर्थ काय माहिती नसल्याचं म्हटल्यानं हा शब्द एकदम चर्चेत आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








