आणि म्हणून या अल्पवयीन मुली झाल्या सुटीच्या काळातील वधू

व्हीडिओ कॅप्शन, पैशांसाठी मुलींचं लग्न आखाती देशातील श्रीमंत व्यक्तीशी लावण्यात येण्याच्या घटना हैदराबादमध्ये घडल्या आहेत.
    • Author, दिव्या आर्य आणि दीप्ती बत्तिनी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पैशांसाठी गरीब मुस्लीम कुटुंबातील लोक आपल्या अल्पवयीन मुलींचं लग्न आखाती देशातील श्रीमंत पुरुषांसोबत लावून देत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

लग्न झाल्यानंतर या मुलींना अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आखाती देशातील पुरुष आपल्या सुट्टीच्या काळात हैदराबादमध्ये येऊन या अल्पवयीन मुलींसोबत लग्न करतात.

या पीडित मुलींना 'हॉलिडे ब्राइड्स' किंवा सुटीच्या काळातील वधू म्हटलं जातं.

25,000 रुपयांसाठी भवितव्य पणाला

फरहीनला (नाव बदललं आहे) शिकायचं होतं. विज्ञानाची आवड होती. नर्स होण्याचं तिचं स्वप्न होतं. पण तेराव्या वर्षी तिचं लग्न जॉर्डनमधील एका श्रीमंत व्यक्तीशी लावून देण्यात आलं.

तिचे वडील तिला एका अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी तिघं जण बसलेले होते. त्यांनी फरहीनला पाहिलं. त्यातील एकानं तिला पसंती दिली आणि आज संध्याकाळी तुझं लग्न होईल, असं तिच्या वडिलांनी तिला सांगितलं.

अल्पवयीन मुलीला लग्नासाठी तयार करताना तिची आई
फोटो कॅप्शन, 'माझ्या वडिलांना 25,000 रुपये रोख देण्यात आले आणि माझं लग्न ठरवण्यात आलं'

"मी खूप रडले. मला पुढं शिकायचं आहे असं त्यांना सांगून पाहिलं. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही," असं फरहीन सांगते.

"मला नटवण्यात आलं. नववधूसाठी जो ड्रेस असतो तो मला देण्यात आला. माझ्या वडिलांना 25,000 रुपये रोख देण्यात आले आणि नंतर दरवर्षी 5000 रुपये देण्यात येतील असं सांगण्यात आलं."

तीन आठवडे पतीनेच केला बलात्कार

"काझींनी माझा निकाह त्या 55 वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिला. नंतर पहिल्यांदा जेव्हा आम्ही एकांतात एकत्र आलो तेव्हा मी घाबरून गेले."

"त्या रात्री मी रडत होते. पण माझ्या नवऱ्याने माझ्यावर अत्याचार केला. मी रडत असून देखील त्याने माझा बलात्कार केला. त्याने सतत तीन आठवडे माझ्यावर बलात्कार केला," फरहीननं सांगितलं.

नंतर, फरहीनला मी जॉर्डनला घेऊन जात आहे असं त्यान शेखने फरहीनच्या वडिलांना सांगितलं.

अल्पवयीन मुलगी आणि वयस्कर पुरुष
फोटो कॅप्शन, 'माझ्या पतीचं वय 55 होतं'

त्या ठिकाणी त्याच्या इतर बायका आणि मुलं होती. त्याचं आधी लग्न झालं आहे याची फरहीन यांना कल्पना नव्हती. फरहीनने जॉर्डनला जाण्यास नकार दिला.

फरहीनच्या वडिलांनी त्या व्यक्तीला व्हिसा मिळाला की पाठवतो, असं सांगून पाठवून दिलं. "काही दिवस ती इथे राहील आणि जेव्हा तिला व्हिसा मिळेल तेव्हा तिला पाठवू. यावर तो तयार झाला आणि जॉर्डनला परतला."

फरहीन यांचं लग्न झालं आहे, पण त्यांना त्यांचा पती सध्या कुठं आहे?

"या घटनेनंतर मी वर्षभराहून अधिक काळ शांत होते. पण मी रडले नाही. बऱ्याचदा मला माझं आयुष्य संपवून टाकावासं वाटलं. मला माझ्या आई-वडिलांनीच मला फसवलं होतं," असं त्या सांगतात.

चुकी नसताना देखील समाज देतो दोष

या घटनेला आता आठ वर्ष झाली आहे. अजूनही फरहीन कुणासोबत याबाबतीत मोकळ्या होत नाहीत. घरी न भेटता एनजीओच्या कार्यालयात आपण भेटू असं त्या म्हणाल्या.

"अजूनही माझे नातेवाईक माझी थट्टा करतात. नवऱ्याने सोडून दिलं त्याचा दोष माझाचं आहे असं काही जण म्हणतात."

प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, 'माझी काही चुकी नसताना मला दोष दिला गेला'

"मी माझ्या नवऱ्याला सुखी ठेऊ शकले नाही म्हणून तो मला सोडून गेला असं माझे नातेवाईक कुजबुजतात," असं त्यांनी सांगितलं.

फरहीन या केवळ एकट्याच नाही तर त्यांच्याप्रमाणे गेल्या तीन वर्षांमध्ये 48 मुलींना या प्रकाराला सामोरं जावं लागलं.

गुन्हेगारांचं जाळं

त्यांनी नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. फक्त एजंटलाच अटक झाली पण त्या शेखला काही झालं नाही, असं त्या सांगतात.

"आमच्याकडं पीडित खूप उशिरा येतात. जास्तीत जास्त प्रकरणात तेव्हाच येतात जेव्हा त्यांना शेख सोडून गेलेले असतात. अशा प्रकारांना आळा घालणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान आहे, " असं पोलिसांनी सांगितलं.

"आम्ही त्यांच्याविरोधात परराष्ट्र मंत्रालयात तक्रार देखील केली. पण त्यांना भारतात आणता येणं कठीण आहे," असं हैदराबादचे पोलीस उपायुक्त व्ही. सत्यनारायण यांनी म्हटलं.

"अशा प्रकारचे गुन्हे एकट्या दुकट्याने होत नाहीत तर या गुन्हेगारांचं एक मोठं नेटवर्कच असतं. काही एजंट लग्नाची खोटी प्रमाणपत्रं सादर करतात."

"या प्रमाणपत्रांमुळं खोट्या लग्नांना कायदेशीर मान्यता मिळते," असं पोलिसांनी बीबीसीली सांगितलं.

शेख
फोटो कॅप्शन, सप्टेंबरमध्ये 8 शेख लोकांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती

सप्टेंबरमध्ये 8 शेखांनी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी दोघा जणांचं वय 80 वर्षे होतं. त्याच बरोबर पोलिसांनी 35 एजंट अटक केले होते.

"बरीच प्रकरणं उजेडात येत नाहीत. 12 ते 17 वयाच्या दरम्यान असलेल्या मुलींची लग्नं आखाती देशातील म्हाताऱ्या लोकांसोबत लावून दिली जातात," असं कार्यकर्ते सांगतात.

माझी मुलगी मला बहीण समजते

तबस्सूम त्यावेळी 12 वर्षांची होती. तिचं लग्न 71 वर्षांच्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं होतं. त्यानंतर तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.

तिथं तिच्यावर त्याने बलात्कार केला आणि नंतर तिला घरी पाठवलं. 'माझ्या देशात परत जाऊन या मुलीच्या व्हिसाची व्यवस्था करतो आणि तिला घेऊन जातो,' असं त्यानं सांगितलं.

या घटनेनंतर तबस्सूम गरोदर राहिली. तिनं एका मुलीला जन्म दिला. "माझी मुलगी मला बहीण समजते," असं तबस्सूम सांगते. "माझे आई-वडील तिचा सांभाळ मुलीप्रमाणे करतात."

"माझी मुलगी जेव्हा मला ताई म्हणते तेव्हा माझं मन व्याकूळ होतं. मला वाटतं तिनं निदान एकदा तरी मला अम्मी म्हणून हाक मारावी पण हे शक्य नाही," असं ती दुःखी मनानं सांगते.

बहुतेक शेख हे ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि येमेन या देशातील असतात. बऱ्याचदा तर हे शेख भारतात देखील येत नाहीत. तिकडूनच ते मुलींवर बोली लावतात.

बुरख्यातील तरुणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काही काळानंतर या मुलींना वाऱ्यावर सोडलं जातं.

15 वर्षांच्या जेहरासोबत असंच घडलं. जेहराला आई-वडील नाहीत. ती तिच्या आजीसोबत राहत होती. जेहराच्या नातेवाईकांनी तिचा फोटो तिची परवानगी न घेता एका शेखला दाखवला. शेखने तिला पसंती दिली.

तिला कळलंच नाही तिच्यासोबत काय घडत आहे. मग तिच्या घरी काझी आले. त्यांनी फोनवरुनच तिचं लग्न लावून दिलं. नंतर जेहराचा व्हिसा आला.

तिला येमेनला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी ती पोहोचताच तिला एक म्हातारा येऊन भेटला. 'मीच तुझा नवरा आहे' असं त्यानं म्हटलं. तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.

मग त्याने तिच्यावर अत्याचार केला. तुला पुन्हा बोलवू असं सांगून तिला परत हैदराबादला पाठवून दिलं.

जेव्हा अशा महिलांना एकटं सोडून दिलं जातं त्यावेळी त्या खूप असहाय होतात. समाजात त्यांना मान मिळत नाही.

अशा महिलांसाठी जमिला निशथ यांनी 'शाहीन' नावाचा एक एनजीओ सुरू केला आहे. "ज्या भागात मी काम करते त्या भागातील एक तृतीयांश मुस्लीम कुटुंबीयांनी आपल्या मुलींची लग्न पैशांसाठी लावून दिली आहेत," असं जमिला सांगतात.

प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

"या लोकांपैकी बहुतांश लोक हे अत्यंत गरीब असतात. त्यांची मुलं शाळेतील 'मध्यान्ह भोजन' सारख्या योजनांवर जगतात," असं त्या म्हणाल्या.

"या मुलींचे पालक आपण जबाबदार पालक आहोत असं भासवतात. आपल्या मुलीच्या भल्यासाठीच आपण हे केलं आहे असं ते म्हणतात. त्यामुळेच त्यांचं रीतसर लग्न लावून दिलं जातं," असं जमिला यांनी सांगितलं.

रुबिया आणि सुलताना या दोघी बालमैत्रिणी. त्यांच्या दोघींची लग्न लावून देण्यात आली. त्यांना नंतर समजलं की एकाच व्यक्तीसोबत त्या दोघींची लग्न लावून देण्यात आली आहेत.

रुबियाचं लग्न झालं तेव्हा ती 13 वर्षांची होती. त्या व्यक्तीचं वय होतं 78 वर्ष. लग्नाच्या काही दिवसानंतर त्याने मला आणि माझी मैत्रिणीला सोडून दिलं असं रुबियाने सांगितलं.

कित्येक दिवस तर मला माझ्या मैत्रिणीचं नंतर काय झालं हे कळलं नाही. एकेदिवशी मला ती बातमी समजली की तिने आपलं आयुष्य संपवून टाकलं आहे.

समाजात जनजागृतीचे कार्य होत आहे

इस्लामचे अभ्यासक मुफ्ती हाफिझ अबरार हे अशा लग्नांची कठोर शब्दांत निर्भत्सना करतात. ते म्हणतात, "अशा प्रकारचे लग्न लावून देणारे काझी हे मुस्लीम समुदायाचं नाव खराब करत आहेत."

तेलंगणा बाल हक्क संरक्षण विभागाचे अधिकारी इम्तियाज अली खान हे अशा प्रकारचे विवाह थांबावेत यासाठी मशिदींची मदत घेत आहेत.

"समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत. काही गरीब लोक हे भुलून आपल्या मुलींची लग्न लावून देत आहेत असा संदेश प्रार्थनेच्या वेळी देण्यात यावा अशी विनंती आम्ही मशिदींना केली आहे," असं इम्तियाज यांनी सांगितलं.

शिक्षिका
फोटो कॅप्शन, 'एक दिवस महिलांना समान वागणूक मिळेल'

इतक्या कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन देखील फरहीन खचल्या नाहीत. त्या एनजीओच्या मदतीने प्रौढ महिलांना आणि मुलांना शिकवण्याचं काम करत आहेत.

तसेच या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी जनजागृती करत आहेत. त्यांच्या या कार्याला काही लोक विरोध देखील करतात पण त्या मात्र त्यांच्याकडं दुर्लक्ष करून आपलं काम करत राहतात.

'एक दिवस महिलांना समान वागणूक मिळेल, या समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटेल आणि ते महिलांना खेळणं समजणार नाहीत,' अशी आशा त्या बाळगून आहेत.

"माझ्यासोबत जे काही केलं त्याबद्दल माझ्या पालकांना पश्चाताप होतो. जर पालकांनी आपल्या मुलींची लग्न लावून देण्याऐवजी त्यांना शिक्षण दिलं तर परिस्थिती नक्की बदलेल," असं फरहीन म्हणतात.

(या बातमीतील सर्व पीडितांची नावं बदलण्यात आली आहेत.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)