मातृभाषा दिन : एखादी भाषा लयाला का जाते? 780 भाषांच्या रक्षणकर्त्याचं विश्लेषण

फोटो स्रोत, Anushree Fadnavis/ Indus Images
- Author, सौतिक बिश्वास
- Role, बीबीसी इंडिया
भारतीय भाषांचे उद्गाते गणेश देवी पेशाने इंग्रजी प्राध्यापक, पण देवी यांना भारतीय भाषा खुणावत होत्या. या प्रेरणेतून भाषांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि यातून उलगडल्या थक्क करणाऱ्या काही गोष्टी. तब्बल 780 भाषांचा हा अभ्यास मैलाचा दगड ठरला.
देवी यांच्या संशोधनामुळे असंख्य देशी भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचं स्पष्ट झालं. नामशेष होत जाणाऱ्या या भाषांच्या दस्तावेज संवर्धनाचं काम त्यांनी हाती घेतलं. आजच्या घडीला देवी यांना भाषाप्रभू म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
हिमाचल प्रदेश राज्यात बोलल्या जाणाऱ्या 16 भाषा त्यांनी शोधून काढल्या. या भाषांमध्ये बर्फासाठी 200 प्रतिशब्द आहेत. भूतलावर अवतरलेला चंद्र अशा आशयाचे अलंकारिक शब्द बर्फासाठी योजले जातात.
राजस्थानात सातत्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमणा करणारी मंडळी शुष्क वातावरणाचं वर्णन करण्यासाठी विविध शब्दांचा वापर करतात. यांचा उपयोग करताना माणूस आणि प्राणी भिन्न पद्धतीने ओसाड आणि वैराण वातावरणाला सामोरे जातात अशाही संकल्पनेचा वापर होतो.
इंग्रजांनी गुन्हेगारी जमाती म्हणून बदनाम केलेल्या प्रजातींची मंडळी गुप्त स्वरुपाची भाषा बोलतात. भटक्या समाजाच्या या व्यक्तींना गाव नाही. राहण्याचं विशिष्ट ठिकाण नसलेली ही मंडळी आता दिल्लीत असतात. त्यांच्या समाजाला लागलेला बट्टा आजही कायम आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या काही तासांवर असलेल्या गावांमध्ये कालबाह्य ठरलेली पोर्तुगीज भाषा बोलली जाते.
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या मात्र मुख्य भूमीपासून विलग असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर करेन भाषा बोलली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भाषा प्रत्यक्षात म्यानमारची आहे. गुजरातमधल्या काही गावांमध्ये चक्क जपानी भाषा बोलली जाते. भारतात तब्बल 125 विदेशी भाषा मातृभाषा म्हणून अस्तित्वात आहेत.
डॉ. देवी यांनी भाषाशास्त्राचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. मात्र त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि निग्रह ठाम आहे. गुजरात राज्यातील विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी 16 वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांनी जवळच्या आदिवासी क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक आदिवासींच्या मदतीने ते काम करतात. पतपुरवठ्यासाठी पाठपुरावा, बियाणं पेढी तसंच आरोग्यविषयक प्रकल्पांमध्ये ते काम करतात. विशेष म्हणजे आदिवासींच्या अकरा भाषांमध्ये ते नियतकालिकं प्रसिद्ध करतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या भाषा
- 1961च्या जनगणनेनुसार भारतात 1, 652 भाषा अस्तित्वात होत्या.
- द पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार 2010 मध्ये देशात 780 भाषा होत्या.
- यापैकी 197 भाषांचं अस्तित्व धोक्यात आहे तर 42 भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
- पूर्वांचलात अरुणाचल प्रदेश आणि आसाम, पश्चिम प्रांतात महाराष्ट्र आणि गुजरात, पूर्व भागात ओरिसा आणि बंगाल तर उत्तरेकडे राजस्थानमध्ये सर्वाधिक भाषा बोलल्या जातात.
- देशात वापरात असलेल्या 68 लिपी आहेत.
- भारतात 35 भाषांमध्ये वृत्तपत्रे प्रकाशित होतात.
- हिंदी ही भारतात सर्वाधिक (40 टक्के) लोकांची बोली भाषा आहे. त्यानंतर बंगाली (8 टक्के), तेलुगू (7.1 टक्के), मराठी (6.9 टक्के) आणि तामीळ (5.9 टक्के) या भाषा अनुक्रमे बोलल्या जातात.
- सरकारतर्फे चालवलं जाणारं 'ऑल इंडिया रेडिओ' अर्थात आकाशवाणी 120 भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करतं.
- भारताच्या संसदेत देशभरातल्या भाषांपैकी केवळ 4 टक्के भाषांचं प्रतिनिधित्व होतं.
(स्रोत : भारतीय जनगणना 2001 आणि 162, युनेस्को, पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया 2010)
भाषेची ताकद जाणवली तेव्हा
याच काळात डॉ. देवींना भाषेच्या ताकदीची जाणीव झाली. 1998मध्ये स्थानिक भाषेत लिहिलेल्या नियतकालिकाच्या 700 प्रती घेऊन डॉ. देवी आदिवासी भागात गेले.
फक्त 10 रुपये देऊ शकणारी कोणीही व्यक्ती हे पुस्तक घेऊ शकते असं त्यांनी सांगितलं. दिवसाच्या शेवटी एकही पुस्तक शिल्लक राहिलं नव्हतं.
जेव्हा त्यांनी पैशाची थैली पाहिली तेव्हा त्यात जीर्ण, शीर्ण, कळकट नोटा आणि नाणी होती. आदिवासी मंडळी देवाणघेवाणीसाठी ज्याचा वापर करतात ते सगळं त्या थैलीत होतं.

फोटो स्रोत, Anushree Fadnavis/ Indus Images
'आदिवासी मंडळींसाठी हे अनोखं होतं. कारण त्यांच्या भाषेतलं काहीतरी पहिल्यांदाच पुस्तकरुपात ते पाहत होते. रोजंदारीवर काम करणारे ते श्रमिक होते. त्यांना धड वाचताही येत नव्हतं. मात्र आपण जी भाषा बोलतो त्यातलं काही मिळतंय यामुळे त्यांनी न परवडणारं पुस्तक विकत घेतलं. तेव्हाच मला भाषेची ताकद समजली', असे डॉ. देवी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
भाषांच्या अभ्यासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
सात वर्षांपूर्वी त्यांनी महत्त्वाकांक्षी 'पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया' प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली. देशातली माणसं जी भाषा बोलतात त्याचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रव्यापी स्वरुपाचा हा प्रकल्प आहे.
साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या देवींनी 300 वेळा घराबाहेर पडताना दीड वर्षात अख्खा भारत पिंजून काढला. प्राध्यापक म्हणून काम करत असताना मिळालेला सगळा पैसा त्यांनी या कामासाठी वापरला.
भाषांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केला. काही राज्यांना त्यांनी दहा वेळा भेट दिली आणि या सगळ्याच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या.
या कामात त्यांना खंबीर सहकाऱ्यांची साथ लाभली. अभ्यासक, शिक्षक, चळवळीतील कार्यकर्ते, ड्रायव्हर्स, वाटाडे अशा 3500 जणांची फौज त्यांनी उभारली. यामध्ये ओरिसातील एका सरकारी अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचा समावेश आहे. दौऱ्यादरम्यान ऐकायला मिळणारे नवे शब्द हा ड्रायव्हर टिपून ठेवत असे.

फोटो स्रोत, Anushree Fadnavis/Indus Images
देवी यांच्यासह काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हजारो लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि भाषेचा इतिहास, भूगोल समजून घेतलं. भाषेचा प्रवास समजून घेण्यासाठी त्यांनी स्थानिकांना नकाशे काढण्याची विनंती केली.
लोकांनी फुलं, चौकोन, त्रिकोण अशा विविध आकारांचे नकाशे काढले. हे नकाशे त्यांच्या कल्पनाशक्तीचं प्रतीक आहे असं डॉ. देवींनी सांगितलं.
1961च्या जनगणनेनुसार 1652 भाषांची नोंद करण्यात आली होती. 2011 मध्ये डॉ. देवी यांच्या प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. भारतात केवळ 780 भाषाच शिल्लक राहिल्याचं स्पष्ट झालं.
भाषा लयाला का जाते?
संघटनेचं सर्वेक्षण आणि तपशीलवार अभ्यास मांडणाऱ्या 100 पुस्तकांपैकी 39 पुस्तकं याआधीच प्रकाशित झाली आहेत. 35,000 पानांचा मजकूर प्रकाशनासाठी तय्यार आहे.

फोटो स्रोत, Anushree Fadnavis/Indus Images
तुटपुंजा राजाश्रय अर्थात सरकारी पाठिंबा, विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची कमी होणारी संख्या, स्थानिक भाषेत मिळणारं निकृष्ट दर्जाचं प्राथमिक शिक्षण तसंच जातीजमातींचं त्यांच्या मूळगावाहून होणारं स्थलांतर अशा विविध गोष्टींमुळे भाषा लयाला जाते.
भाषा नष्ट होणं ही सांस्कृतिक हानी आहे. भाषा लुप्त होण्यानं दंतकथा, खेळ, संगीत, खाण्यापिण्याच्या पद्धती असं सगळंच रसातळाला जातं.
भाषिक लोकशाही
सत्ताधारी भाजप पक्षाचा संपूर्ण देशात हिंदी भाषा प्रमाण करण्याचा हट्ट भाषांच्या वैविध्याला थेट खीळ बसवणारा आहे, असं गणेश देवी सांगतात.
'वर्चस्ववादी राजकारणाच्या काळात वेगवान स्पंदनं असणारी शहरं भाषिक वैविध्याला कसे सामोरे जातात हे पाहणं रंजक आहे. भाषा मृत्यूपंथाला लागली की मला फार वाईट वाटतं. भाषा लुप्त होणं म्हणजे भात किंवा माशाच्या प्रजाती नाहीसं होण्यासारखं आहे. हे नुकसान गहिरं आहे', असं डॉ. देवी सांगतात.

फोटो स्रोत, Anushree Fadnavis/Indus Images
आपल्या अनेक भाषा काटेकोरपणे टिकल्या आहेत. म्हणूनच आपली लोकशाही भाषिक स्वरुपाची आहे. लोकशाही जिवंत राखण्यासाठी भाषा टिकणं अत्यावश्यक आहे असं डॉ. देवी आवर्जून नमूद करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








