दिवाळी : फटाके भारतात कसे आणि कधी आले?

फटाके

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, राजीव लोचन
    • Role, इतिहासकार, पंजाब विद्यापीठ

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटलं की फटाके आपोआप आठवतात.

पण, दिवाळी आणि फटाक्यांचा संबंध काय? दिवाळी तशी भारतात अनादीकाळापासून साजरी केली जात आहे. पण मग फटाके कधी याचा भाग झाले? आणि फटाके कुठून आले? हेच आपण आता जाणून घेणार आहोत.

पौराणिक ग्रंथ आणि मिथकांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की फटाक्यांचा उगम आपल्या संस्कृतीत झालेलाच नाही.

प्राचीन ग्रंथांनुसार दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. पण फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाच्या कुठल्याही वस्तूचा उल्लेख नाही.

मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची परंपरा चीनमध्ये होती. फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे वाईट विचारांना मूठमाती मिळेल आणि समृद्धी नांदू लागेल, अशी चीनी लोकांची श्रद्धा होती.

आतिश दीपांकर नावाच्या बंगाली बौद्ध धर्मगुरुंनी 12व्या शतकात चीनमधली ही संस्कृती भारतात आणल्याचा तर्क आहे. चीन, तिबेट आणि पूर्व आशियातून त्यांनी हे आत्मसात केलं असावं, अशी शक्यता आहे.

भारतात फटाके कधी आले मग?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात फटाके कधी आले मग?

ऋग्वेदानुसार दुर्भाग्य आणणाऱ्या निऋतीलाही देवी मानण्यात आलं होतं, आणि तिला दिकपालाचा (दिशांच्या नऊ देवतांपैकी एक) दर्जा देण्यात आला होता.

या देवीची प्रार्थना करण्यात येते. तिने परत जावं अशी प्रार्थना करण्यात येते. तू पुन्हा येऊ नकोस, असंही सांगितलं जातं. फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने तिला घाबरवून परत पाठवावं असं कुठेही म्हटलेलं नाही.

मात्र तरीही भारतात प्राचीन काळापासून प्रकाश आणि मोठ्या आवाजांचे फटाके होते.

दोन हजार वर्षांपूर्वीच्या मिथकांमध्ये फटाक्यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे.

फटाके, भारतीय संस्कृती.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, फटाके तयार होत असताना.

इसवीसनपूर्व काळातला प्रसिद्ध ग्रंथ कौटिल्य अर्थशास्त्रात एका चूर्णाचा संदर्भ आहे, जे वेगानं पेट घेऊन ज्वाळा प्रज्वलित होतात. या रसायनाला एका नळीत बंद केलं तर त्यापासून फटाका तयार व्हायचा.

बंगालमध्ये पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर शेतात क्षारयुक्त रसायनांचा थर जमा होत होता. हा थर दळल्यावर त्वरित पेटणारा ज्वलनशील पदार्थ तयार व्हायचा.

यामध्ये गंधक (सल्फर) आणि योग्य प्रमाणात कोळसा मिसळला तर या मिश्रणाची ज्वलनशीलता वाढायची.

फटाक्यांची आतशबाजी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फटाक्यांची आतशबाजी

ज्या भागात जमिनीवर साठलेले क्षार नव्हते, तिथे लाकडाच्या भुशापासून तयार झालेला पदार्थ वापरला जायचा. आजार बरे करण्यासाठी वैद्य मंडळी या पदार्थाचा वापर करत असत.

जवळपास संपूर्ण देशभर हे चूर्ण बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळायच्या. पण फटाक्यांच्या निर्मित्तीसाठी याचा उपयोग होत असेल, याला दुजोरा मिळू शकला नाही.

आनंद आणि जल्लोषासाठी प्रकाशाच्या विविध गोष्टींचा उपयोग तेव्हा व्हायचा. तुपापासून तयार झालेल्या दिव्यांचा उल्लेखही आपल्या साहित्यात आढळतो.

आजच्या फटाक्यांमध्ये आढळणाऱ्या दारूसारख्या या मिश्रणाचा स्फोट होऊन मोठ्ठा आवाज व्हायचा, पण त्याची ज्वलनशीलता कमी असल्यानं ते एखाद्या लढाईत शत्रूविरुद्ध वापरणं शक्य नव्हतं.

व्हीडिओ कॅप्शन, फटाके भारतात कसे आले? (अॅनिमेशन - निकिता देशपांडे, पुनीत बरनाला)

तशा विध्वंसक गनपावडरचा पहिला उल्लेख 1270 मध्ये सीरियातले रसायनशास्त्रज्ञ हसन अल रम्माह यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. गरम पाण्यानं या गनपावडरला शुद्ध करून आणखी विस्फोटक करण्याबाबतही त्यांनी लिहिलं होतं.

मग मुघलांनी आणले का?

1526मध्ये बाबरने दिल्लीच्या राजावर आक्रमण केलं. त्यावेळी बाबराच्या सैन्याच्या तोफांचा गडगडात ऐकून भारतीय सैनिक घाबरले होते, असं इतिहासकार सांगतात.

त्याकाळी जर मंदिरं आणि शहरांमध्ये फटाके फोडण्याची परंपरा असती तर या मोठ्या आवाजाने भारतीय सैनिक अस्वस्थ झाले नसते.

पण मुघलांच्या इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक नजफ हैदर यांच्यामते फटाके मुघलांच्या आधीपासूनच होते.

मुघलांच्या काळात आतिषबाजी आणि फटाक्यांचा भरपूर वापर होत होता, हे माहिती होतंच.

पण भारतात फटाके मुघल घेऊन आले होते, हे म्हणणं योग्य नाही. कारण ते आधीच आले होते.

मुघलांच्या लढाईतले एक दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुघलांच्या लढाईतले एक दृश्य

अशा पेंटिंग पण आहेत. दारा शिकोहच्या लग्नाच्या पेंटिंगमध्ये लोक फटाके फोडतांना दिसतात. पण हे मुघलांच्या आधीसुद्धा होते.

फिरोजशाहच्या काळातसुद्धा खूप आतिषबाजी व्हायची.

गन पावडर नंतर भारतात आली. पण मुघलांच्या आधी भारतात फटाके नक्कीच आले होते.

हत्तींच्या झुंजीत किंवा शिकारीच्या वेळी त्यांचा बराच वापर व्हायचा. खरंतर घाबरवण्यासाठीच फटाक्यांचा वापर जास्त प्रमाणात व्हायचा.

मुघलांच्या काळात लग्न किंवा उत्सवामध्येही आतशबाजी होत असे.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)