फराळ निघालाय लंडनला!
- Author, रोहन नामजोशी आणि प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आईच्या हातचा फराळ ही जगात भारी गोष्ट असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालून आईच्या हातच्या कुरकुरीत चकल्या खाणं यासारखं स्वर्गसुख नाही.
पण शिक्षण, व्यवसायानिमित्त हल्ली अनेक मुलं मुली परदेशात असतात. प्रत्येकाला घरची दिवाळी नशिबी असतेच असं नाही. त्यामुळे घरच्या फराळाची आठवण काढून उसासे टाकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.
पण, या समस्येवर आता उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घरचा फराळ विविध देशांत पाठवण्याची सोय करून दिली आहे.
या केंद्रानी विविध कंपन्यांशी टाय-अप करून परदेशात राहणाऱ्या सदस्यांना दिवाळीच्या दिवसात फऱाळ मिळेल अशी सोय करून दिली आहे.
उदंड प्रतिसाद
या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून हे केंद्र चालवणाऱ्यांना सध्या श्वास घ्यायलासुद्धा उसंत नाही.
दादरमधील गोडबोले फराळ केंद्राचे सचिन गोडबोले सांगतात "2006 पासून आम्ही हा उपक्रम सुरू केला."

फोटो स्रोत, Getty Images
"त्याआधी परदेशात अन्नपदार्थ पाठवण्यावर अनेक बंधनं होती, पण 2006 पासून ती शिथिल झाली. दिवाळीच्या फराळाबरोबर लोक उटणं, आकाशकंदील, रांगोळी अशा वस्तू पण पाठवतात"
सांगलीचे अभिजीत पाटील गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत ह्युस्टन येथे राहतात. यावर्षी दहा वर्षानंतर ते आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करणार आहे.
त्यांची आई गेल्यावर्षापर्यंत कुरिअरनं फराळ पाठवायची. पण, यावर्षी त्यांची आईच फराळ घेऊन आली आहे. हे एक वेगळं फिलिंग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पॅकिंगची उत्तम काळजी
डोंबिवलीतील गीता कुळकर्णी 'कुळकर्णी ब्रदर्स' या नावानं हा उपक्रम चालवतात. फराळ पॅकिंग करण्याचा खर्च जीएसटीमुळे जास्त झाल्यानं यावर्षी प्रतिसाद किंचित कमी झाला आहे असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, BBC
"अमेरिकेत फराळ पाठवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पदार्थ खराब होऊ नये हा या उपक्रमातला एक मोठा काळजीचा भाग आहे. त्यासाठी जास्तीत जास्त काळजी घेतली जाते. अमेरिकेतल्या हवेत पुरणपोळी एक महिनासुद्धा टिकते."
"अमेरिकेत दिवाळी मुख्यत: विकेंडला साजरी करतात. ते ध्यानात घेऊनसुद्धा कुरिअर पाठवण्याची आम्ही व्यवस्था करतो." असंही कुळकर्णी सांगतात.
"एकदा अमेरिकेत राहणाऱ्या मुलानं स्वत:चा पत्ता बदलला. पण हे त्याने आपल्या घरच्यांना कळवलं नाही. जेव्हा मुलाला फराळ मिळाला नाही तेव्हा त्याने घर बदलल्याचं कळलं." असे अनुभव गीता कुळकर्णी यांना या उपक्रमादरम्यान आले.
सांस्कृतिक देवाणघेवाण
औरंगाबाद येथील रमेश पांडव अनेक वर्ष आपल्या भावाला दिवाळीचा फराळ पाठवत असत.
"आपल्या समाजाशी, संस्कृतीशी नाळ जोडलेली असावी, एकटं वाटू नये तसंच सणावाराच्या निमित्तानं का होईना कुटुंबीय एकमेकांशी जोडले जातात हा त्यामागचा उद्देश होता."
"तसंच परदेशातील लोकांनासुद्धा भारतीय पदार्थांची चव मिळत असे. सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी हा एक मोठा दुवा आहे असं मला वाटतं" पांडव सांगत होते.

गेल्या वर्षी पांडव यांच्या भावाचं निधन झाले. त्यामुळे यावर्षी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे. पण, या उपक्रमामुळे 'हे विश्वचि माझे घर' या संकल्पनेला पाठबळ मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
परदेशात लाडू जास्त गोड लागले...
फराळ पाठवाणाऱ्यांबरोबरच फराळ ज्यांना मिळतो त्यांची उत्सुकता देखील तितकीच ताणली जाते. जर्मनीत हॅनोव्हर शहरात राहणारी तेजल राऊत सांगते,
"फराळाशिवाय मी दिवाळीची कल्पनाच करू शकत नाही. कधीकधी दिवाळीत आईला फराळ करण्याचा कंटाळा यायचा तेव्हा थोडा का होईना घरचा फराळ कऱण्याचा हट्ट करायचे."
"2013 साली जर्मनीत आले तेव्हा मी दिवाळीत घरी नसल्याची चुटपूट होती. पण आईनं मला दिवाळीचा संपूर्ण फराळ पाठवला होता."
"डबा उघडल्यावर डबडबलेल्या डोळ्यांनी सगळ्या पदार्थावरून हात फिरवला. यावर्षीसुद्धा मुंबईहून फराळ निघाला आहे. लवकरच तो पोहोचेल" तेजल सांगत होती.
असा हा फराळाचा प्रवास जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात होत असतो. प्रेमाची माणसं सोबत नाही हे शल्य अशा उपक्रमामुळे कमी झालं आहे. शेवटी हौसेला मोल नाही आणि घरच्या फराळाला तोड नाही.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









