दृष्टिकोन : 'ताजमहाल हा कलंक? भाजप नेत्यांना का खुपतो ताजमहाल?'

संगीत सोम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ताजमहाल हे तर प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. मग भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना त्याविषयी इतका द्वेष का?

भाजप नेते रोमांस-विरोधी आहेत का? शहाजहानचं मुमताजवर असलेलं प्रेम देशाच्या संस्कृतीचा भाग नाही?

जगभरातून दरवर्षी दोन लाख आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून 40 लाख पर्यटक ताज महालला भेट देतात. नवविवाहित जोडपं तर या रोमांसचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून येतात.

या स्मारकावर टिप्पणी करताना रविंद्रनाथ टागोर म्हणाले होते की, "काळाच्या गालावर ओघळणारे अश्रू म्हणजे ताजमहाल."

संगीत सोम

फोटो स्रोत, Sangeet Som FB Page

हे स्मारक 1648 साली तयार झाल्यापासूनच सर्वदूर चर्चेत होतं. औरंगजेब सम्राट होण्याच्या काही वर्षं आधी आणि काही वर्षांनंतर भारत भ्रमणावर आलेल्या फ्रांसवा बर्नियर या फ्रेंच प्रवाशानं ताजमहालच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख केला होता.

आणि जेव्हा त्यानं आग्र्याला येऊन हे स्मारक स्वत: डोळ्यांनी पाहिलं तेव्हा तो अचंबित झाला.

ब्रिटनच्या लेडी डायना यांचा ताजमहालात घेतलेला फोटोही अजरामर झाला. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत ताजमहालचा समावेश झाल्यानंतर भारत आणि ताजमहाल ही दोन्ही नावं एकाच दमात घेतली जाऊ लागली.

ताजमहाल एकदा पुन्हा चर्चेत आला आहे. ताजमहालचा उल्लेख करतांना भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी त्याला "भारतीय संस्कृतीवर कलंक" म्हटलं आहे. तसंच ताजमहाल निर्माण करणाऱ्या मुघलसम्राटाला 'गद्दार' म्हटलं आहे.

इतिहास बदलल्याचा दावा

ऑक्टोबरच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारनं पर्यटन विभागाच्या एका पुस्तिकेतून ताजमहालला वगळल्यानं वाद झाला होता.

यावर मेरठमध्ये बोलतांना संगीत सोम म्हणाले, "अनेक लोक ताजमहालला उत्तर प्रदेशच्या पर्यटक यादीतून वगळल्यामुळे चिंतेत आहे. खरंच आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलतो आहोत?"

"ज्या व्यक्तीनं ताजमहाल बनवला, त्यांनं आपल्या वडिलांना कैदेत ठेवलं होतं. तो हिंदूंचं शिरकाण करणार होता."

सोम यांनी दावा केला की ते इतिहास बदलून टाकतील.

उत्तर प्रदेश सरकारनं ताजमहालसोबत केलेल्या सावत्र व्यवहारामुळे बराच गोंधळ झाला. त्यानंतर राज्याच्या पर्यटन मंत्री रीता बहुगुणा जोशी यांनी स्पष्ट केलं की, "ताजमहाल आमच्या संस्कृतीचाच भाग आहे."

असदुद्दीन ओवेसी

फोटो स्रोत, GETTY IMAGES/RAVEENDRAN

संगीत सोम यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं "हे सोम यांचे वैयक्तिक मत आहे," असं सांगितलं आहे.

पण, सोशल मीडियावर या वक्तव्यावरून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. जम्मू काश्मीचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी या प्रकरणात चिमटा घेत 'लाल किल्लाही शहाजहाननं बनवला आहे. मग नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला तिथून भाषण देणार की नाही?' असा प्रश्न विचारला आहे.

सोशल मीडियावर वाद

MIMचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी पण हाच प्रश्न विचारला आहे. "लाल किल्ला पण गद्दार माणसांनी बनवला होता, मग पंतप्रधान तिथून झेंडा फडकवणार नाही का?"

पण, अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते ताजमहालचा मुद्दा केवळ राजकारण आहे. आर्थिक विकासाचा अभाव असतांना लोकांच्या भावना भडकावल्यानं येत्या गुजरात निवडणुकीत फायदा होईल, असं पक्षाच्या नेत्याना वाटतं आहे.

संगीत सोम

फोटो स्रोत, PIB

ताजमहाल विषयी भाजपा नेत्यांना द्वेष असो किंवा नसो. पण मुघलांचा काळ देशाच्या इतिहासातून मिटवण्याचा त्यांचा डाव आहे, हे स्पष्ट झालं आहे.

ताजमहालचा इतिहास हा त्याचाच एक भाग आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)