शेती : 'शेतकऱ्यानं जिद्दीनं शेती केली तर तो नोकरीवाल्यालाही मागं टाकू शकतो'

- Author, निरंजन छानवाल/अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
"वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा मला फारसं कळतं नव्हतं. आता अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. पण, वेळ आली तर मी रासायनिक खतं न वापरता शेती करून दाखवेन."
नववीत शिकत असलेल्या संजिवनी गाढेला, खरंतर पोलीस अधिकारी व्हायचं आहे. पण, वेळ आली तर शेती करण्याची तयारी तिच्या खंबीर मनाचा दाखला देणारी आहे.
संजिवनी मुळची मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातली. भोकरदन तालुक्यातल्या सुभानपूर या छोट्याशा गावात ती राहते.

तिचे वडील अंबादास गाढे यांनी 2008 मध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या जाण्यानं गाढे कुटुंबावर आभाळ कोसळलं.
"वडिलांच्या मृत्यूचं कळालं तेव्हा मला काहीच वाटलं नाही. कारण, ते कळायचं माझं वयच नव्हतं. पण आता कळतं, वडील म्हणजे काय असतात, आत्महत्या काय असते."

"आता धक्का बसतो. कारण आईसह आमच्या कुटुंबाला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं." असं संजिवनी सांगते.
कोरडवाहू शेती आणि रोजमजुरी
पण, तिची आई दुर्गाबाई गाढे यांनी मोठ्या हिंमतीनं सर्व पुन्हा उभं केलं.
जवळ फक्त दीड एकर कोरडवाहू शेती असल्यानं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न तिच्या आईसमोर होता.
"माझ्या आईनं रोजमजुरी करून आम्हा भावंडांना शाळेत घातलं. सरकारकडून मिळालेली थोडीफार मदत आणि रोजमजुरीतून आईनं कर्ज फेडलं." असं संजिवनी सांगते.

संजिवनी सध्या औरंगाबादच्या हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूलमध्ये नववीत शिकते.
वडिलांची आठवण येते
इतर मुलांबरोबर त्यांचे वडील पाहिल्यानंतर वडिलांची आठवण येत असल्याचं ती सांगते. "माझे जर वडील असते तर मी सुध्दा बाहेरगावी गेले असते, त्यांच्यासोबत फिरायला गेले असते."
संजिवनीला पीएसआय व्हायचं आहे, ते शक्य झालं नाही तर एक चांगली समाजसेविका व्हायचं आहे, आणि वेळ आली तर शेतकरी सुद्धा.
वेळ आली तर शेती करेन
"वडील शेतकरी होते. शेतीमुळे जरी आमच्या कुटुंबावर ही परिस्थिती ओढावली असली, तरी मला शेतकरी व्हायला आवडेल. मी रासायनिक खतं न वापरता चांगल्या पध्दतीनं शेती करून दाखवेन." असा निर्धार ती व्यक्त करते.

"मला आयुष्यात शेतकऱ्याशी लग्न करावं लागलं तरी करेन. कारण, एखाद्या शेतकऱ्यानं मेहनतीनं, चिकाटीनं आणि जिद्दीनं शेती केली तर तो नोकरीवाल्यालाही मागं टाकू शकतो." असा विश्वास ती व्यक्त करते.
"वडील गेले असले, तरी जिद्दीनं शिकायचं! मोठं व्हायचं! आपल्या वडिलांनी जे केलं ते इतर कुणी करू नये या कडे लक्ष द्यायचं!" असा संदेश ती तिच्यासारख्याच वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांना देते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








