संघर्षकथा 3 : 'शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली, तरीही शेतकऱ्याशीच लग्न करणार'
- Author, श्रीकांत बंगाळे/अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातलं सिनगाव जहांगीर एक गाव. इथे 16 वर्षांची प्रज्ज्वल पंडित राहते. गाव छोटं असलं तरी प्रज्ज्वलची स्वप्नं मोठी आहेत... तिला डॉक्टर व्हायचं आहे आणि शेतकऱ्यांची सेवाही करायची आहे.
प्रज्ज्वलचे वडील रामेश्वर पंडित यांची दीड एकर शेती आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. तिघंही शाळेत जातात.
एकूणच परिस्थिती अशी की, घरात कमावणारा माणूस एक आाणि खाणारी तोंडं पाच.
अशातच सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि मुलीच्या लग्नाचं टेन्शन, यामुळे शेवटी त्यांनी 28 जून 2017ला राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
आता कर्जाचा डोंगर डोक्यावर होताच. शेतीही तशीच राहिली आणि बायका-पोरंही उघड्यावर आली.
दहावीत प्रज्ज्वल शाळेतून दुसरी
आत्महत्येच्या पंधरा दिवसांआधी म्हणजेच 13 जून 2017ला प्रज्ज्वलचा दहावीचा निकाल लागला. 88.32 टक्के मिळवून प्रज्ज्वल शाळेत दुसरी आली.

फोटो स्रोत, JANATA VIDYALAYA/SINGAON JAHANGIR
"माझ्या वडिलांवर कर्ज होतं. त्यामुळे आईसोबत त्यांचं नेहमी भांडण व्हायचं. म्हणून माझं अभ्यासात मन लागायचं नाही," प्रज्ज्वल सांगते.
"माझा पहिला नंबर फक्त एका मार्काने हुकला. घरी परिस्थिती चांगली असती, तर मी नक्कीच पहिली आले असते," ती पुढे सांगते.
'घर चालवताना आईची फरफट होते'
दहावीच्या परीक्षा संपवून प्रज्ज्वल उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी मामाच्या गावी गेली होती. तेव्हा एके दिवशी फोन आला.... वडिलांनी आत्महत्या केल्याचं तिला कळलं.

त्यानंतर तिचं अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं. एकट्या आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. मुलांचं पुढे शिकवायचं असेल तर मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय आईसमोर नव्हता.
"घरात एक आजी असते. वारंवार आजारी पडणाऱ्या या म्हातारीचा दवापाण्याचा खर्चही आईला उचलावा लागतो", प्रज्ज्वल सांगत होती.
प्रज्ज्वल सांगते, "पैशांसंबंधीच्या सर्व गोष्टी बाबाच बघायचे. पण आता आईला सारं काही बघावं लागतं. मोलमजुरी करून तिला भावांच्या शाळेचा खर्च करावा लागतो. शिवाय घरखर्चही भागवावा लागतो. तिची खूप गैरसोय होते."
प्रज्ज्वलला डॉक्टर व्हायचं आहे
वडिलांच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सावरत प्रज्ज्वल पुढील शिक्षण घेत आहे. सध्या ती गावातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकते.
शिक्षणाप्रती तिची तळमळ बघून महाविद्यालयाचे अध्यक्ष गजानन मान्टे यांनी तिच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं ठरवलं आहे.

"ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते. शिवाय त्या हुशार असतात. हे त्यांच्या दहावी-बारावीच्या निकालातून दिसून येतं," बीबीसी मराठीशी बोलताना मान्टे सांगतात.
"पण पालक मात्र दहावी-बारावी झाली, की मुलीच्या लग्नाचा विचार करू लागतात. त्यामुळे शिकून मोठं होण्याचं मुलींचं स्वप्न पूर्ण होत नाही", मान्टे म्हणाले.
हलाखीची परिस्थिती असतानाही प्रज्ज्वल डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. तिला नुसतं डॉक्टर होऊन थांबायचं नाही तर त्यातून शेतकऱ्यांची सेवाही करायची आहे.
अनियमित पाऊस, नापिकी आणि काळानुरूप बदलत्या शेतीत बळीराजा पिळला जातो आहे. पाणी आणि वीज समस्यांमुळे शेती करणं अधिकच कठीण झालं आहे.
या सर्वांतही प्रज्ज्वल आशावादी आहे.
शेतकऱ्यांनी खचून आत्महत्या करू नये आणि शेतकऱ्यांची नवीन पिढी अत्याधुनिक शेतीद्वारे स्वत:ला समृद्ध करू शकते, असा विश्वासही या बळीराजाच्या लेकीला आहे.
इतकंच काय तर वडील शेती करता करता गेला पण प्रज्जवलचा शेती आणि शेतकऱ्यावरचा विश्वास कायम आहे.
"मी भविष्यात शेती करेन आणि शेतकरी मुलाशी लग्नसुद्धा करेन. कारण मी एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि मला त्याचं काहीच वाईट वाटत नाही आणि वाटणार नाही."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









